एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सात्त्विक्याध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी ।

तामस्यधर्मे या श्रद्धा मत्सेवायां तु निर्गुणा ॥२७॥

देह इंद्रिय चेतना प्राण । येणेंसीं स्फुरे जें मीपण ।

तेथ विवेक करुनियां पूर्ण । आपुलें मीपण आपण पाहे ॥५२॥

देह नव्हें मी जडमूढत्वें । इंद्रियें नव्हें मी एकदेशित्वें ।

प्राण नव्हें मी चपळत्वें । मन चंचळत्वें कदा मी नव्हें ॥५३॥

चित्त नव्हें मी चिंतकत्वें । बुद्धि नव्हें मी बोधकत्वें ।

’अहं’ नव्हें मी बाधकत्वें । मी तों येथें अनादिसिद्ध ॥५४॥

एवं मीपणाचें निजसार । विवंचूं जाणे बुद्धिचतुर ।

ते अध्यात्मश्रद्धा उदार । सात्विक नर सदा वाहती ॥५५॥

जें जें मी नव्हें म्हणत जाये । तें मी देखिल्या मीचि आहें ।

माझ्या मीपणाचे वंदिल्या पाये । मीचि मी ठायें कोंदोनी ॥५६॥

हे आध्यात्मिकी शुद्ध श्रद्धा । सात्विकापाशीं वसे सदा ।

आतां राजसाची श्रद्धा । ऐक प्रबुद्धा सांगेन ॥५७॥

मी एक येथें वर्णाश्रमी । मी एक येथें आश्रमधर्मी ।

मी एक येथें कर्ता कर्मी । हें मनोधर्मी दृढ मानी ॥५८॥

येणें भावार्थें कर्मतत्परु । कुशमृत्तिकेचा अत्यादरु ।

अतिशयें वाढवी शौचाचारु । विधिनिषेधां थोरु आवर्त भोंवे ॥५९॥

दोषदृष्टीच्या रंगणीं । मिरवती गुणदोषांच्या श्रेणी ।

पवित्रपणाच्या अभिमानीं । ब्रह्मयासी न मनी शुचित्वें ॥३६०॥

देहाभिमान घेऊनि खांदा । सत्य मानणें कर्मबाधा ।

ते हे राजसाची कर्मश्रद्धा । जाण प्रबुद्धा उद्धवा ॥६१॥

अधिक अविवेक वाढे । जेणें अकर्म अंगीं घडे ।

अधर्माची जोडी जोडे । हे श्रद्धा आवडे तामसी ॥६२॥

जेथ अपेयाचें पान । स्वेच्छा अभक्ष्यभक्षण ।

अगम्यादि घडे गमन । हे श्रद्धा संपूर्ण तामसी ॥६३॥

अधर्म तोचि मानी धर्म । हें तामसी श्रद्धेचें वर्म ।

आतां निर्गुणश्रद्धा परम । उत्तमोत्तम ते ऐक ॥६४॥

सर्व भूतीं भगवंत । ऐशिये श्रद्धे श्रद्धावंत ।

अनन्य भावें भूतां भजत । तो भजनभावार्थ निर्गुण ॥६५॥

स्त्री पुत्र वित्त जीवित । मजलागीं कुरवंडी करित ।

अनन्य भावें जे मज भजत । ते श्रद्धा निश्चित निर्गुण ॥६६॥

चारी पुरुषार्थ त्यागिती । उपेक्षूनि चारी मुक्ती ।

ऐक्यभावें मज भजती । ते श्रद्धासंपत्ती निर्गुण ॥६७॥

निष्काम नामस्मरण । निर्लोभ हरिकीर्तन ।

भावार्थें जें जें भजन । ते श्रद्धा निर्गुण उद्धवा ॥६८॥

त्रिगुणांचा त्रिविध आहारु । स्वयें सांगे शार्ङगधरु ।

निर्गुण आहाराचा प्रकारु । सखोल विचारु हरि सांगे ॥६९॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP