एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एधमाने गुणे सत्त्वे देवानां बलमेधते ।

असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥१९॥

दैवी आसुरी राक्षसी स्थिती । हे त्रिगुण गुणांची संपत्ती ।

जे जे ब्रह्मांडीं इंद्रियवृत्ती । तेचि स्थिती पिंडींही ॥६३॥

ब्रह्मांडीं सकळ देव । महापुरुषाचे अवयव ।

पिंडींही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निजऐक्यें ॥६४॥

उचित स्वधर्मशास्त्रस्थिती । निवृत्तिकर्मी जे प्रवृत्ती ।

ऐशी जेथ इंद्रियवृत्ती । ते दैवी संपत्ती सत्वस्थ ॥६५॥

कामाभिलाष दृढ चित्तीं । आणि स्वधर्मी तरी वर्तती ।

ऐशी जे इंद्रियस्थिती । जे आसुरी संपत्ती राजसी ॥६६॥

सलोभमोहें क्रोध चित्तीं । सदा अधर्मी प्रवृत्ती ।

ऐशी जे इंद्रियस्थिती । ते राक्षसी संपत्ती तामसी ॥६७॥

क्षणें सकाम क्षणें निष्काम । ऐसा जेथ वाढे स्वधर्म ।

तेथ देवां असुरां परम । होय संग्राम वृत्तीसी ॥६८॥

चित्तीं वाढवूनि मोहभ्रम । अधर्मचि मानी स्वधर्म ।

तैं राक्षसाचा पराक्रम । देवासुरां परम निर्दाळी ॥६९॥

सकामनिष्काममोहभ्रमेंसी । वृत्ती वर्ते गा जयापाशीं ।

तेथ देवांअसुरांराक्षसांसीं । कलहो अहर्निशीं अनिवार ॥२७०॥

क्षणैक रति परमार्थी । क्षणैक रति अर्थस्वार्थी ।

क्षणैक होय अनर्थी । परदारारती परद्रव्यें ॥७१॥

ऐशिये गा चित्तवृत्तीं । कदा नुपजे निजशांती ।

मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती होईल ॥७२॥

साधक सर्वदा पुसती । कोण बाधा असे चित्तवृत्ती ।

ते बाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सांगीतली ॥७३॥

एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविध वृत्ती वाढे ।

हें तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी भिडे उपमर्दें ॥७४॥

एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नव्हे एकविधता ।

तेणें अनिवार भवव्यथा । बाधी भूतां गुणक्षोभें ॥७५॥

तम अधर्माकडे वाढे । रजोगुण देहकर्माकडे ।

सत्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कैसेनी ॥७६॥

रजतमउभयसंधीं । सत्व अडकलें दोहींमधीं ।

तें वाढों न शके त्रिशुद्धीं । नैराश्यें वृद्धी सत्वगुणा ॥७७॥

त्रिगुण गुणांची त्रिपुटी । आपण कल्पी आपल्या पोटीं ।

तेंचि भवभय होऊनियां उठी । लागे पाठीं बाधकत्वें ॥७८॥

सत्वें देवांसी प्रबळ बळ । रजोगुणें दैत्य प्रबळ ।

तमोगुणें केवळ । आतुर्बळ राक्षसां ॥७९॥

हे गुणवृत्तींची व्यवस्था । समूळ सांगीतली कथा ।;

आतां त्रिगुणांच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वतां सांगेन ॥२८०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP