उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः ।
तमसाऽधोऽध आमुख्याद्रजसाऽन्तरचारिणः ॥२१॥
सत्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन ।
ते न करुनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥९२॥
त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती ।
लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥९३॥
स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक ।
उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्विक सत्यलोक पैं ॥९४॥
वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण ।
पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥९५॥
वाढलिया तमोगुण । पश्चादि योनि पावोन ।
दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥९६॥
प्राण्यासी अंतकाळीं जाण । देहांतीं जो वाढे गुण ।
त्या मरणाचें फळ कोण । तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥९७॥
अनन्य करितां माझी भक्ती । भक्तांसी अंतीं कोण गती ।
तेहीविखींची उपपत्ती । श्र्लोकार्थी हरि सांगे ॥९८॥