यदा आशिष आशास्य मां भजेत स्वकर्मभिः ।
तं रजःप्रकृतिं विद्याद्धिंसामाशास्य तामसम् ॥११॥
जो कां आचरोनि स्वधर्म । वांछी नाना फळकाम ।
तें तें जाण काम्य कर्म । राजस धर्म या नांव ॥८१॥
जो अभ्यंतरीं अतिसकाम । तो जे जे आचरे कर्मधर्म ।
ते ते अवघेचि सकाम । फळसंभ्रम निजहेतू ॥८२॥
स्वरुपीं काम्य कर्म नाहीं । कामना काम्य करी पाहीं ।
सोनें स्वभावें असे ठायीं । लेणें उपायीं स्वयें कीजे ॥८३॥
स्वकर्म स्वभावें पवित्र जाण । स्वधर्में माझें शुद्ध भजन ।
तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ॥८४॥
फळकामें जें माझें यजन । तें केवळ फळाचेंचि भजन ।
सकामें जें स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥८५॥
ऐसऐशिये प्रकृतीचा विलास । स्त्री अथवा हो कां पुरुष ।
तें तें जाण पां राजस । ऐक तामस गुणवृत्ति ॥८६॥
क्रोधयुक्त अंतःकरण । तेणेंसीं ज्याचें स्वधर्माचरण ।
फळ वांछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥८७॥
जेथें द्वेषें बांधलें घर । जे ठायीं क्रोध अनिवार ।
जो भूतमात्रीं निष्ठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ॥८८॥
ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी ।
ते ते तामस संसारीं । निजनिर्धारीं उद्धवा ॥८९॥
जीव स्वरुपें चैतन्य पहा हो । त्यासी ’मां भज’ कां म्हणे देवो ।
जीवासी कां सेवकभावो । सेव्य देवो कैसेनी ॥१९०॥
येच अर्थीचें निरुपण । कृष्ण सांगताहे आपण ।
सेव्यसेवकलक्षण । मायागुणसंबंधें ॥९१॥