द्रव्यं देशः फलं कालो ज्ञानं कर्म च कारकः ।
श्रद्धाऽवस्थाऽऽकृतिर्निष्ठा त्रैगुण्यः सर्व एव हि ॥३०॥
द्रव्यशब्दें आहार त्रिविध । देशशब्दें वनग्रामभेद ।
फळशब्दें सुखउद्बोध । सत्वसंबंधविभागें ॥९३॥
काळशब्दें भगवद्भजन । कैवल्यनिष्ठा या नांव ज्ञान ।
कर्म म्हणिजे मदर्पण । कर्ता तो जाण असंगी ॥९४॥
श्रद्धाशब्दें आध्यात्मिकी । अवस्थाशब्दें जागरणादिकी ।
आकृतिशब्दें उपरिलोकीं । देवतादिकीं क्रीडन ॥९५॥
जो गुण वाढे देहांतीं । जेणें गुणें होय अंतःस्थिती ।
त्या नांव निष्ठा म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९६॥
भिन्न भिन्न भाग अनेक । किती सांगूं एकेक ।
अवघें जगचि त्रिगुणात्मक । जाण निष्टंक निजभक्ता ॥९७॥
संसार समस्त त्रिगुण । यांमाजीं मी अवघा निर्गुण ।
ते तुज कळावया निजखूण । गुणनिरुपण म्यां केलें ॥९८॥