कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मोजयो राजा श्रोता ॥ आणी वैशंपायना वक्ता ॥ यांची संगती उभयतां ॥ काय वानूं ॥१॥

जैसा गगनीं सुंधांशु ॥ कमळा मेळवी अंशेंअंशु ॥ कीं सागरीं होय पैसु ॥ आपगीं जैसा ॥२॥

कीं चंद्रदर्शन होतां चकोरीं ॥ नातरी चातकें मेघघारीं ॥ तैसा आनंद शरीरीं ॥ दोहींचिया ॥३॥

असो रावो ह्मणे वैशंपायना ॥ तूं ज्ञाननिधी परिपूर्णा ॥ मनकामनेची तापतृष्णा ॥ हरिली तुवां ॥४॥

ऋषे तुझिये सुखसंगतीं ॥ मी उद्धरलों गा वेदमूर्ती ॥ कीं पूर्वज आनंदें नाचती ॥ या कथाश्रवणें ॥५॥

आणि ब्रह्महत्ये वेगळें ॥ तुवां केलें पुण्यशीळें ॥ माझीं उद्धरिलीं गा कुळें ॥ जन्मजन्मींचीं ॥६॥

जन्मेजयो ह्मणे हो मुनी ॥ तूं सर्वज्ञ चिंतामणी ॥ तरी अंतःकरणीची ॥ शिरोणी ॥ फेडीं माझे ॥७॥

तरी अगा ये वैशंपायना ॥ पुशी उत्तराचिया पूर्ण घना ॥ मनचातकाची तापतृष्णा ॥ परवीं माझें ॥८॥

हें पृथ्वीमंडळ दिगंतर ॥ मेरु आणि सप्तसागर ॥ यांचें आदिअवसान समग्र ॥ सांगें मज ॥९॥

नदी पर्वत ध्रुवमंडळ ॥ स्वर्ग मृत्यु आणी पाताळ ॥ हें कोणापासाव कोण स्थुळ ॥ सांगा संख्या योजनांची ॥१०॥

मग मुनी ह्मणे गा भुपती ॥ हा भुगोल बोलिजे भागवतीं ॥ पंचमस्कंधीं भारती ॥ व्यासदेवाची ॥११॥

तें तुज करुं गा श्रुत ॥ असंभाव्य परि मानीं सत्य ॥ हें ब्रह्मयानें केलें गणित ॥ वेदघ्वनीचें ॥१२॥

तें ब्रह्ययानें कथिलें नारदा ॥ आणि कथिलें नानाऋषिवृदां ॥ मग नारदें कथिलें सुबुद्धा ॥ व्यासमुनीसी ॥१३॥

तरी जें व्यासमुनीचें वचन ॥ तें तुज करूं गा परिज्ञान ॥ ज्याचिये श्रवणमात्रें दहन ॥ होय पातकाचें ॥१४॥

जैसें पिपीलिकांचें गृहमंडळ ॥ तैसीं द्वीपें सागर शैलं ॥ मध्यस्थानीं गा वर्तुळ ॥ पृथ्वीरचना हे ॥१५॥

जैसी कमळ्गर्भींची पुटी ॥ तैसा मेरू पृथ्वीच्या देंटीं ॥ लोह‍अरणीसारिखा उपकंठीं ॥ दीर्घ जाण ॥१६॥

कीं कर्णीं कनकाचें पुष्प ॥ तैसें द्वीपगर्भीं जंबूद्दीप ॥ माजी मेरू हे वरटीक ॥ जंबद्दीपींचिया ॥१७॥

त्या मेरूचे सखे संवगडे ॥ ते अष्टाचळ पडिले देहुंडे ॥ ह्मणोनि जाहलीं नव खंडें ॥ जंबुद्दीपींची ॥१८॥

हेमकूट निषध हिमाचळ ॥ श्र्वेत श्रृंगवान् आणि नील ॥ माल्यवान सातवा शैल ॥ गंधमादन आठवा ॥१९॥

यांचेनी वर्तती मध्यपाडें ॥ तींचे जाहलीं नवखंडें ॥ समुद्र्सीमेचेनि आंगडें ॥ वेढिलें असे ॥२०॥

किंपुरुष आणि भरतखंड ॥ केतुमाल हिरण्मय प्रचंड ॥ करु रमणक भद्राश्र्वखंड ॥ इलावृत हरिवर्ष पैं ॥२१॥

हें जंबद्दीपींची घटना ॥ गणित येकलक्ष योजनां ॥ मध्यें रोविलें पाषाणा ॥ मेरूसि पै ॥२२॥

हें मरूचें महाडिखळ ॥ उदकावरी करी डळमळ ॥ ह्मणोनि मेरु नाभिनाळ ॥ रोविला मेढिया ॥२३॥

भ्रमण करितां दिनमणी ॥ ते छत्रकणियाची आटणी ॥ लोट नावरे मेदिनीं ॥ ह्मणोनी मेरू रोंविला ॥२४॥

तो येकलक्ष उंच समस्त ॥ सोळासहस्त्र भूमिगत ॥ बाहेर उरला उर्वरित ॥ सहस्त्र चौर्‍यायशीं ॥२५॥

जैशी लोहाची अरणी ॥ तैशी मेरुची असे घडणी ॥ मूळीं सान परि ऊर्ध्वस्थानीं ॥ दीर्घता तया ॥२६॥

तया बत्तीसपैस माथा ॥ तळीं आलें अर्ध गणिता ॥ तें इलावृत खंड गा भारता ॥ स्थापिलें देवीं ॥२७॥

तेथें पर्वतराज मंदर ॥ आणि दुजा मेरुमंदर ॥ तिसरा सुपार्श्र्व असे ॥ चौथा कुमुद ॥२८॥

हे पूर्वादि दक्षिणफेरीं ॥ मेरूनिकट पैं निर्धारीं ॥ चारी वृक्ष यांचे शिरीं ॥ उगवले राया ॥२९॥

आंबा जांबुळ कंविठ वट ॥ आकाशप्रमाण उंचदाट ॥ शतयोजनें छायावरट ॥ पल्लवांचा ॥३०॥

त्या वृक्षांचे छायास्थानीं ॥ चारी डोह रचिले देवगणीं ॥ पय मधु इक्षुरसखाणी ॥ चौथा मृष्टजल ॥३१॥

तें सेविलिया पुण्यपावन ॥ स्वभावें होइजे मुनिजन ॥ चहूंवणींचे ऋषिगण ॥ राहिले तेथें ॥३२॥

नंदन आणि चित्ररथवन ॥ सर्वतोभद्र वैभ्राजक जाण ॥ तेथें स्त्रिया आणि देवगण ॥ करिती क्रिडा ॥३३॥

तया वृक्षांचीं दीर्घफळें ॥ ऐरावतीसारिखीं विशाळें ॥ जयां साल बीज कफकांचोळें ॥ आर्थीच ना ॥३४॥

ऐशिया फळांचें दीर्घवन ॥ तें देवांचें सदा भोजन ॥ वलीपलित व्याधि निर्वाण ॥ नेणती काहीं ॥३५॥

त्या फाळांचेनि रससारें ॥ चारीं उललीं ग पुष्करें ॥ तयांपासाव वसुंधरे ॥ नद्या चारी लोटल्या ॥३६॥

येकी आम्ररसाची सरिता ॥ ते अरुणोदा गा भारता ॥ इलावृतीं उगवोनि पूर्वता ॥ स्थापिलें तेथें ॥३७॥

दुजी जांबुरसाची सरिता ॥ तो चालिली दक्षिणपंथा ॥ परि संपली गा भारता ॥ तया पर्वतींच ॥ स्थापिलें तेथें ॥३८॥

तये नदीची पंकमाती ॥ हेमरूपी होय धातुजाती ॥ दोहीं तटाकीं सुवर्ण निश्र्वितीं ॥ जांबूनद नामें ॥३९॥

त्या सुवर्णाचे अलंकार ॥ ते देवांगना घेती श्रृंगार ॥ तें सुवर्ण गा महापवित्र ॥ असे इलावृतखंडींचें ॥४०॥

आतां कदंबाचिया कोटरां ॥ त्या पासाव पंचमधुधारा ॥ ते नदी राहिली गा अवधारा ॥ केतुमालखंडीं ॥४१॥

तयेचें सेविलीया जळ ॥ दहायोजनें करी परिमळ ॥ आणि कांती करी उज्वल ॥ दिव्यतेजाची ॥४२॥

वटापासाव दहा नद ॥ ते उत्तरे चालिले प्रसिद्ध ॥ दशप्रकारीं वस्तुभेद ॥ उदेले पैं ॥४३॥

पय घृत दघि अन्न ॥ मधु गोड शय्या आसन ॥ वस्त्रें वस्तु आभरण ॥ परिपूर्ण कामना ॥४४॥

एवं इलावर्तखंडीं चहूंदिशां ॥ जन सुखी सर्वदा स्वेच्छा ॥ व्याधी आणि काळपाशां ॥ नेणती ते ॥४५॥

ऐसे हे चारी गिरिवर ॥ ते मेरूचे चरणकर ॥ यांचे मस्तकींचे तरुवर ॥ कथिले तुज ॥४६॥

आतां मेरूभोंवते नानापर्वत ॥ ते केसरस्थानीं शोभिवंत ॥ पूर्वाआदि गा समस्त ॥ केसरगिरी ॥४७॥

कपिल शिनीवास कुरंग ॥ वैकंक त्रिकूट पतंग ॥ रुचक निषध आणि नाग ॥ देवकूट पैं ॥४८॥

शंख वैडूर्य कुरर ॥ जारुधि नारद आणि शिशिर ॥ ऋषभ कुसुंभ कालंजर ॥ हंस आणि आदि पैं ॥४९॥

हे अठरास हस्त्र उंच गिरिवरु ॥ केसरांसारिखे कर्णिकारु ॥ मेरूभोंवते गिरिवरु ॥ स्थूळता सहस्त्र दोनी ॥५०॥

आणिक आठ गिरिवर ॥ केसरांमागें कर्णिकारु ॥ ते कोण कोठें हें सविस्तर ॥ सांगों तुज ॥५१॥

जठर देवकूट पूर्वदिशे ॥ पावन पारियात्र पश्र्विमदिशे ॥ कैलास करवीर दक्षिणदिशे ॥ आणि त्रिश्रृंग मकर उत्तरे ॥५२॥

हे अठरासहस्त्र उंच तर ॥ मूळीं स्थूळ दोनी सहस्त्र ॥ शोभती मेरुचे केसर ॥ इलावर्तखंडीं ॥५३॥

आतां मेरूच्या मध्यशिखरीं ॥ तेथें ब्रह्मयाची नगरी ॥ दहासहस्त्र गांवें निर्धारीं ॥ कनकमय ॥५४॥

आणि मेरूच्या आठही दिशां ॥ दिक्पाळ असती गा राजसा ॥ अडीचसहस्त्र गांवें पैसा ॥ सुवर्णरचना ते ॥५५॥

पूर्वेसि इंद्र गजवाहन ॥ आग्नेये मेषारूढ कृशांन ॥ वृषभीं ईशान्ये पंचानन ॥ यम दक्षिणे महिषावरी ॥५६॥

पश्चिमे वरुण वाहन मगरु ॥ नैऋत्यें निऋति सूकरू ॥ उत्तरे मृगवाहित चंद्रु ॥ वायव्ये शशंक प्रभंजन ॥५७॥

ऐसा असे हा कनकगिरी ॥ मेरू मिरवला अवधारीं ॥ पृथ्वीकमळकासेभोवतीं ॥ कनकगिरी तो ॥५८॥

ययाभोंवतीं नवही खंडें ॥ माजी अष्टकुळांचे वेढे ॥ आणि जंबूद्दीपाभोंवतें वेढें ॥ सप्त सागरांचे ॥५९॥

स्वायंभुवमनूचा सुत ॥ जया नाम बोलिजे प्रियव्रत ॥ तयाचा फिरलासे रथ ॥ पृथ्वीवरी ॥६०॥

तैं सात वेढे भोंवतीं ॥ तेणें पृथ्वी कापली गा भारता ॥ आणि सागर जाहले ही वार्ता ॥ भागवतींची ॥६१॥

आतां जंबुद्दीपींची रचना ॥ ते तूं ऐक गा नॄपनंदना ॥ नवही खंडांची गणना ॥ सांगों तुज ॥६२॥

जैसा असे शिरीं साठा ॥ तैसा तिहीं खंडांचा लागवटा ॥ पूर्वपश्चिमे सिघुतटा ॥ मर्यादा त्यांची ॥६३॥

उत्तरे नील श्र्वेत श्रुंगवान ॥ निषध हेमकूट हिमालय दक्षिण त्रिखंडांत ॥ असती हे ॥६४॥

गंधमादन माल्यवंत ॥ पूर्वपश्चिमे बाहुगिरि आंत ॥ उत्तरदक्षिण त्रिखंडांत ॥ असती हे ॥६५॥

ऐसी पूवपश्चिम त्रिखंडी ॥ उत्तरक्षिण तीन तीन देहुडीं ॥ हे नवखंडांची राखडीं ॥ नटली ऐसी ॥६६॥

परि इलावती महामेरू ॥ तेथें नवसहस्त्र गांवें विस्तारू ॥ संकर्षणदेव पूजाकारू ॥ महादेवाची तेथें ॥६७॥

हें भूंमडळ मोहरीपरी ॥ जेणें राखिलें स्वशिरीं ॥ तो संकर्षण गा निर्धारीं ॥ जन्मेजया जाण ॥६८॥

सर्वलोकांचा सूत्रधारी ॥ ब्रह्मा विष्णु आणि त्रिपुरारी ॥ हे आदिकरोनि निर्धारीं ॥ संकर्षणाचे ॥६९॥

आंता भद्राश्चखंडींचीं प्रौढी ॥ तो मेरुच्या पूर्वतोडीं ॥ तेथें हयग्रीवाची मेढी ॥ भक्त भद्रश्रवा ॥७०॥

तेथें घोडमुखींचा रहिवास ॥ अकरासहस्त्र गांबें पैसे ॥ समुद्रतटेंसीं सौरस ॥ असे त्याचा ॥७१॥

आतां मेरूचें पश्चिमदिशे ॥ तेथें केतुमाल खंड असे ॥ कामदेवो तेथें वसे ॥ लक्ष्मीसेवक ॥७२॥

तेथें काळकन्या सहस्त्र अकरा ॥ त्या अनुपम्य महासुंदरा ॥ सेवा कारती गा नरेंद्रा ॥ लक्ष्मीदेवीची ॥७३॥

आतां मेरूचे उत्तरे ॥ श्र्वेतनीलांचेनि अंतरे ॥ श्र्वेतनीलांचेनि अंतरें ॥ त्यामाजी गा निर्धारें ॥ रमण खंड ॥७४॥

त्याचा अकरासहस्त्रगांवे विस्तारू ॥ देवो मत्स्यरूपें अवतारू ॥ तेथें मनुदेवो निर्धारु ॥ भक्त त्याचा ॥७५॥

मग श्र्वेताचळाचे उत्तरदिशे ॥ आणि श्रृंगाचे अवागदिशे ॥ अकरासहस्त्र गांवे पैसें ॥ हिरण्मय खंड ॥७६॥

तेथें कूर्मदेवो अवतार ॥ त्याचा भक्त अर्यमा पितर ॥ तो सर्वपितरांचा निर्धार ॥ राजा जाण ॥७७॥

पुढें श्रृंगार उत्तरभागीं ॥ समुद्राचें तटयोगीं ॥ तयांमध्यें दिव्यभोगी ॥ कुरुखंड तें ॥७८॥

तेथें देवो वराहावतारु ॥ जयाचा पृथ्वी भक्त निर्धारु ॥ अकरासह्स्त्र गांवें विस्तारू ॥ असे त्याचा ॥७९॥

आतां मेरुनिषधांचे दक्षिणे ॥ हेमकूटाचेनि उल्लंवने ॥ तयामध्यें साजिरवाणें ॥ हरिवर्ष खंड ॥८०॥

तेथें लक्ष्मीनृसिंह देवो ॥ त्याचा भक्त प्रल्हाद भावो ॥ अकरासहस्त्र गांवें वस्तीसि ठावो ॥ असे त्याचा ॥८१॥

हेमकूटाचें दक्षिणदिशे ॥ हिमाचळाचेनि आडवसें ॥ तयामध्यें वस्तिसुवासें ॥ किंपुरुष खंड तें ॥८२॥

तेथें रामसीता देवो ॥ त्याचा हनुमंत भक्तरावो ॥ वानरांसहित महाबाहो ॥ असे तेथें ॥८३॥

पुढें हिमाचळाचे दक्षिणपंथीं ॥ मर्यादा क्षारसरितापती ॥ तें भरतखंड गा भुपती ॥ जन्मेजया ॥८४॥

तेथें देवो नरनारायणू ॥ ज्याचा भक्त नारदमुनि जनु ॥ हा व्यासमुनीचा प्रश्रु ॥ कथिला तुज ॥८५॥

अकरासहस्त्र गांवें गणित ॥ त्याचिमध्यें जाणावे पर्वत ॥ निखळ भूमी उरली उर्वरित ॥ नवसहस्त्र पैं ॥८६॥

जे समस्त अष्टाचळ ॥ आढव सहस्त्र दोनी स्थूळ ॥ उंचपणें विशाळ ॥ सहस्त्र अठरा ॥८७॥

हिमाचळापासूनि गिरिवर ॥ हे दीर्घस्थूळ उत्तरोत्तर ॥ ते आणिकही सविस्तर ॥ ऐक राया ॥८८॥

हिमाचळाची उत्तररेखा ॥ सितसरिता नवशतें धनुष्या ॥ ते सीमा लंघूनि महादक्षा ॥ न जाववे तिकडे ॥८९॥

स्वायंभुवमनूचा सुत ॥ जया नाम बोलिजे प्रियव्रत ॥ त्याचा फिरला चक्ररथा ॥ पृथ्वीवरी ॥९०॥

तया सात वेढें भोंवतां ॥ तेणें पृथ्वी कापिली भारता ॥ ते समुद्र जाहले ही वार्ता ॥ भागवतींची ॥९१॥

तंव मुनीसि ह्मणे नरेंद्र ॥ सगरीं कोरिला सागर ॥ हा ऐकत असों विचार ॥ बहुतांमुखीं ॥९२॥

मग मुनी ह्मणे गा भारता ॥ ते शुभ गा सत्य वार्ता ॥ तरी त्यांचें मुख्य चरित्र आतां ॥ सांगों तुज ॥९३॥

यज्ञघोडा शोधितां भुमंडळी ॥ तंव ब्रह्मयानें सांगितला पाताळीं ॥ मग तिहीं शोधिली महीतळी ॥ जावया तेथें ॥९४॥

ते माती सांडितां उपसे ॥ तींचि जाहलीं अष्टद्दीपें ॥ असो मही कोरिली कोपें ॥ तया सगरीं गा ॥९५॥

अष्टदिशांतें सगर खणिती ॥ तीं उपद्दीपें जालीं गा भूपती ॥ माजी सुवर्णप्रस्थ पूर्वेप्रती ॥ प्रथम तें ॥९६॥

चंद्रशुक्क आणि आवर्तन ॥ रमणक तैसेंचि मंदरहरिण ॥ सिंहल आणि पांचजन्य ॥ लंका द्दीप आठवें ॥९७॥

ऐसीं उपद्वीपें आठें ॥ आणि नवखंडे प्रकटें ॥ तें जंबूद्दीप प्रथमपाटें ॥ बोलिजे राया ॥९८॥

या भोंवती लवणसागर ॥ तो एकलक्ष आडवा पार ॥ खोली एकलक्ष थोर ॥ योजनें जाणा ॥९९॥

आतां भरतखंडींच्या सरिता ॥ आणि नानामहापर्वतां ॥ तें ऐक गा नृपनाथा ॥ भारता तूं ॥१००॥

चित्रकूट वेंकट सह्याद्री ॥ नील गोवर्धन ब्रह्मगिरी ॥ पारियात्र आणि ऋक्षगिरी ॥ शूक्तिमान कूटक ॥१॥

मंगलप्रस्थ मलयाद्री ॥ त्रिकूट मैनाक देवगिरी ॥ ऋषभ कोल्ल्क द्रोणगिरी ॥ आणि वारिघार तो ॥२॥

महेंद्र आणि विंघ्याचळ ॥ गोकामुख कीं इंद्रकील ॥ ऋषिश्रृंग आणि श्रीशैल ॥ रैवत कामगिरी तो ॥३॥

हे भरतखंडी पुण्यपर्वत ॥ आणिकही असती अनंत ॥ नदी निघाया मूळभूता ॥ जाहले हेची ॥४॥

चंद्रवशा ताम्रपणीं ॥ अवटोदा यमुना कॄष्णा जाणीं ॥ रेवा कृतमाला आणि वेणी ॥ शर्करावर्ता ते ॥५॥

वैहायसी गोमती पयस्विनी ॥ भीमा तुंगभद्रा पयोष्णी ॥ निर्विंघ्या नर्मदा नंदिनी ॥ आणि शोणभद्र नद ॥६॥

सुरसा सुषोमा गोदावरी ॥ शतद्रु चंद्रभागा कावेरी ॥ मरुद्दृधा वितस्ता महेंद्री ॥ सिंधुरंध नद ॥७॥

असिक्नी विश्वस्ता सप्तवती ॥ तापी सरयू रोधस्वती ॥ कौशिकी ऋषिकुल्या चर्मण्वती ॥ मंदाकिनी ते ॥८॥

वेण्या आणि वेदवती ॥त्रिसामा तैसीच दृष्टद्दती ॥ महानदी आणि सरस्वती ॥ वैतरणी पैं ॥९॥

आतां असो हें भरता ॥ आणिकही असती अनंता ॥ यमुना सरस्वती सिता ॥ या वेदमुनींचिया ॥११०॥

परि सर्वखंडांमाजी वरटिक ॥ भरतखंड हें अलोलिक ॥ आप्तकाळीं पिके पीक ॥ कर्मभूमीये ॥११॥

वर्णाश्रमधर्म असतां ॥ आणि कर्मे करूनि अकर्मता ॥ तो मोक्ष पावे गा भारता ॥ व्यासवचनें ॥१२॥

येथें इंद्रादि गण गंधर्व ॥ कर्मभोगें भोगिती वैभव ॥ परि धर्माचरणें ज्ञाननाव ॥ तारी तयां ॥१३॥

तंव रावो ह्मणो गा वैशंपायना ॥ या अंतराळचिया गणना ॥ आणि रविशशितारागणां काय गणित ॥१४॥

मग मुनि ह्मणो गा भारता ॥ हेंह आणूं तुझिया चित्ता ॥ ती जीर्णयोगाची कथा ॥ ऐकें राया ॥१५॥

आतां पुढील पुण्यकथा ॥ वैशंपायन होय सांगता ॥ तें ऐकावें सकळश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१६॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ भूगोलजंबुद्दीपवर्णनप्रकारू ॥ द्वितीयोऽघ्यायीं कथियेला ॥११७॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके द्वितीयोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP