कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायन वेदमूर्ती ॥ जन्मेजयराजा भारती ॥ या दोहींची सुखसंगती ॥ घडली येकीं ॥१॥

या दोहींचा संवाद ॥ प्रेमसुखाचा आनंद ॥ तो ऐकावा प्रमोद ॥ हरिकथेचा ॥२॥

जैसा गगनीं सुधांश ॥ कमळा मेळवी अंशे अंश ॥ कीं सागरीं होय पैस ॥ आपगां जेवीं ॥३॥

ऐसें दोहींचें अंतःकरण ॥ एकरूप असे जाण ॥ जन्मेजय वैशंपायन ॥ श्रोते वक्ते ॥४॥

जनमेजयें प्रश्र्न केला ॥ छपन्नकोटींचा विस्तार पुशिला ॥ तो ऐकोनि बोलता जाहला ॥ वैशंपायन ॥५॥

रायसि ह्मणे मुनेश्र्वरू ॥ बरवा पुसिला गा विचारु ॥ तरी छपन्नकोटी विस्तारू ॥ या पृथ्वीचा ॥६॥

माजी चौदाकोटी अंधकार ॥ तेथें असती अकरा रुद्र ॥ आणिक महादीप्तिकर ॥ नव मनू ते ॥७॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ नवमनूंचा कोण भावो ॥ यांचे नामाचा गर्भभावो ॥ सांगा मज ॥८॥

मग ह्मणे ऋषिराणा ॥ ऐक राया तया वचना ॥ नवमनूंचिया अभिधाना ॥ सांगो तुज ॥९॥

प्रथम जाणावा स्फटिक ॥ आणि दुसरा शिवहस्तक ॥ गंभीर गरुडघ्न लोथुंबक ॥ नीलोदर साहवा ॥१०॥

हरमळणी तो सप्तम ॥ केयूरमणी अष्टम नाम ॥ आणि सक्षुरमणी उत्तम ॥ आणि सक्षुरमणी उत्तम ॥ ऐसे नवमनू हे ॥११॥

यांचे तेज महादीप्ती ॥ एकादशरुद्र तेथें असती ॥ ते कोण कोण गा भूपती ॥ सांगो तुज ॥१२॥

तंव ह्मणे राजा भारतु ॥ रुद्रनामाचा सांगा संकेतु ॥ मग बोलतसे ऋषिसुतु ॥ वैशंपायन ॥१३॥

अमरु अकळु अभेदु ॥ संध्या वामदेवो अछदु ॥ तपता आणि आठवा प्रसिद्धु ॥ अविनाश तो ॥१४॥

अघोर ह्मणती नववा ॥ दहावा तन्मुख असे बरवा ॥ आणि रुद्र जाणिजे अकरावा ॥ ईशान तो ॥१५॥

याहीं चौदाकोटी योजनें व्यापिलीं ॥ आतां बेचाळीसकोटी उरलीं ॥ तेथें सूर्य व्यापारें आथिली ॥ वसुंधरा हे ॥१६॥

ययामध्यें प्रकाश संतत ॥ आणि अष्टकुळ पर्वत ॥ सदा दीपासम होत ॥ आणि चारी वर्ण ॥१७॥

तेथें असे मध्यमेरु ॥ जैसा तारागण माजी चंदु ॥ ऐसा असे हा विचारु ॥ या भूगोलाचा ॥१८॥

ही भागवतींची कथा ॥ तुज सांगीतली गा भारता ॥ तरी द्वीपांची मूळकथा ॥ असे ऐशी ॥१९॥

परि आणिक असे पुराणांतरीं ॥ कीं पन्नासकोटी धरित्री ॥ माजी चौदाकोटी अंधारीं ॥ तेथें मनुंचा उजेड ॥२०॥

आतां छत्तीसकोटी उरली ॥ त्यांत नवकोटी समुद्रीं वेष्टिली ॥ आणि नवकोटी रोधिली ॥ कुळाचळीं गा ॥२१॥

तंव रावो ह्मणे हो मुनी ॥ कवणे किती रोधिली मेदिनी ॥ हें आणावें सकळ मनीं ॥ माझिये गा ॥२२॥

मग ह्मणे ऋषेश्र्वरू ॥ राया सर्व विचारू ॥ तयाविणें तरी निर्धारू ॥ न वाटे तुज ॥२३॥

अगा सप्तकोटी योजनें ॥ तेथें असती चारी वनें ॥ आणि बत्तीसलक्ष मेरुचरणें ॥ रोधिली असे ॥२४॥

एकशत अडसष्ट लक्षवरी ॥ सप्तद्दीपीं रोधिली धरित्री ॥ ऐशी वांटणी यापरी ॥ मेदिनीची गा ॥२५॥

मागुती राव ह्मणे हो मुनी ॥ हें मानवलें माझे मनीं ॥ परि येक पुसणें तें वचनीं ॥ सांगा मज ॥२६॥

समुद्र वनें आणि पर्वतीं ॥ मेरु आणि सप्तद्दीपावती ॥ यांहीं रोधिली जे क्षिती ॥ ते समूळ सांगा ॥२७॥

मुनि ह्मणे तये वेळीं ॥ नवकोटी समुद्रें वेष्टिली ॥ माजी क्षीरसमुद्रें रोधिली ॥ कोटी चार ॥२८॥

घृत आणि इक्षुरससमुद्र ॥ सुरोद पांचवा क्षीरसागर ॥ या सागरीं असे विस्तार ॥ तीनकोटींचा ॥२९॥

दधिसमुद्राखालीं ॥ येककोटी असे रोधिली ॥ ऐशियाची असे चाली ॥ सत्य जाणा ॥३०॥

आतां येककोटी जे उरली ॥ ते क्षारसमुद्रें रोधिली ॥ आणिक नवकोटी गोंविली ॥ कुळाचळीं गा ॥३१॥

या पृथ्वीसी दडपण ॥ अष्टदिशांसी अष्ट गिरि गहन ॥ पूर्वेसि उदयाचळ जाण ॥ तो सवाकोटी ॥३२॥

पश्चिमे अस्ताचळ पर्वत ॥ तो सवाकोटी रोधित ॥ तैसाचि दक्षिणे विख्यात ॥ मलयगिरी पैं ॥३३॥

आणि उत्तरे हिमाचळ ॥ अग्निकोणीं मंदराचळ ॥ तैसाचि गंधमादन प्रबळ ॥ ईशान्येसी ॥३४॥

या दोहींसि दोनकोटी असे ॥ आणि येककोटी नैऋत्यदिशे ॥ ते भूमिई रोधीली असे ॥ हेमकूटें ॥३५॥

वायव्यकोणींचिया पर्वता ॥ येककोटी असे गणिता ॥ नीळ नाम गा भारता ॥ असे त्याचें ॥३६॥

तंव ह्मणे भूपती ॥ वनीं रोधिली किती वसुंमती ॥ हें सांगावें मजप्रती ॥ वैशंपायना ॥३७॥

मग ह्मणे ऋषेश्र्वरु ॥ तोही सांगो गा विचारु ॥ आतां ऐक पां निर्धारु ॥ जन्मेजया ॥३८॥

जे सप्तकोटी मेदिनी ॥ ते रेधिलीसे चहूंवनीं ॥ प्रथम पूर्वदिशेचे स्थानीं ॥ चित्ररथवन ॥३९॥

उत्तरदिशे नंदनवन ॥ पश्र्विमेसी वैभ्रांजन ॥ आणि रोधूनि राहिलें गंधमादन ॥ दक्षिणदिशा ॥४०॥

आतां सातांद्दीपीं सात तरुं ॥ तोचि नांवांचा उच्चारु ॥ तो ऐक पां विचारु ॥ जन्मेजया ॥४१॥

जंबू प्‍लक्ष प्रथम नाम ॥ शाक कुश क्रौंच उत्तम ॥ शाल्मल वृक्ष अनुक्रम ॥ आणि पुष्करवृक्ष ॥४२॥

ऐसे हे सप्ततरु ॥ यांचा माथां असे विस्तारु ॥ यांचेनि नामें उच्चारु ॥ सप्तद्दीपांचा ॥४३॥

शाकद्दीप असे उद्दस ॥ क्रौंचद्दीपीं राक्षस ॥ आणि पुष्करद्दीपीं बहुवस ॥ वर्ण चारी ॥४४॥

शाल्मलद्दीपींची वस्ती ॥ किंपरूष तेथें वसती ॥ आणि तेतीसकोटी नांदती ॥ गोमेदद्दीपीं ॥४५॥

कुशद्दीपामाझारी ॥ तेथें देवकन्या सुंदरी ॥ नांदती सप्त अप्सरी ॥ सदाकाळ ॥४६॥

वृद्धावस्थें वृद्ध जाहली ॥ मेनिका रंभा भरली ॥ तैसीच अळंकारें आथिलीं ॥ उर्वशी ते ॥४७॥

आणि पांचवी ते तिलोत्तमा ॥ ते रूपें असे श्यामा ॥ सुकेशी जाणे कळावर्मा ॥ आणि मध्ययोषा ते ॥४८॥

ऐशिया अप्सरा सात ॥ राया असती कुशद्दीपांत ॥ देवकन्यांसमवेत ॥ नांदती तेथें ॥४९॥

आतां जंबुद्दीपींची वस्ती ॥ तेथें नरंलोक असती ॥ तेथोनि जाहली असे वस्ती ॥ जंबूद्दीपाची ॥५०॥

तें जंबूद्दीपाचें मूळावसान ॥ प्रथमचि कथिलें गा जाण ॥ खंडें नद्या पर्वत गहन ॥ कथिलें तुज ॥५१॥

आतां हीं नवखंडें होती ॥ तेथें चारी अरण्यें असती ॥ ती ऐक गा भूपती ॥ देवोनि चित्त ॥५२॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ हा फेडाजी भ्रांतिभावो ॥ कवण वन नामें ठावो ॥ सांगा मज ॥५३॥

मग ह्मणे वेदमूतीं ॥ चार वनें ऐकें भूपती ॥ माजी प्रथम नाम ह्मणती ॥ दंडकारण्य ॥५४॥

दुसरें चंपकारण्य ॥ तिसरें असे नैमिषारण्य ॥ आणि तें धर्मारण्य ॥ चौथें जाण गा ॥५५॥

चारी पीठें पुण्यतर ॥ प्रथम वोडियाणा पीठ पातर ॥ तैसाचि पूर्ण गिरिवर ॥ जालंधर मनोहर तें ॥५६॥

आणि चारी क्षेत्रें पवित्र ॥ हरिक्षेत्र कीं कुरुक्षेत्र ॥ तिसरें जाणिजे पुष्करक्षेत्र ॥ प्रयागक्षेत्र चौथें पैं ॥५७॥

ऐसें कथिलें राया सकळ ॥ या नाम जंबू असे प्रबळ ॥ जैसे हस्तपादादि सकळ ॥ शिरकमळ श्रेष्ठ तें ॥५८॥

पाहतां वेगळा उच्चार ॥ परि भिन्न नव्हती येरां येर ॥ कीं काष्ठपाषाणीं दामोदर ॥ रचिलें जैसें ॥५९॥

जेवीं संवत्सराची थोरी ॥ ऋतु दिनमान घटिका विस्तारीं ॥ पक्ष पळें असती भारी ॥ या नाम वरुष ॥६०॥

ऐसें जंबूद्दीप विस्तारलें ॥ तें तुजप्रती सांगीतलें ॥ आतां पुढती ऐक वहिलें ॥ जन्मेजया गा ॥६१॥

आणि या द्दीपामाझारी ॥ देश असती नानापरी ॥ तैसेचि स्थुळसुक्ष्म गिरी ॥ असंख्यात ॥६२॥

ऐसें असे गा भारता ॥ तुज सांगीतली हे वार्ता ॥ तंव रावो जाहला विनविता ॥ वैशंपायनासी ॥६३॥

ह्मणे ऋषे तूं ज्ञानमूर्ती ॥ वाचेचा निर्मळ गभस्ती ॥ मज उद्धरिलें सर्व पद्धती ॥ सांगोनियां ॥६४॥

आवडीं पुसे नृपवरु ॥ देशांचा सांगा जो विस्तारु ॥ जेणें चित्त होय स्थिरु ॥ मुनि राया ॥६५॥

ऐकोनि बोलिले ऋषी ॥ राया सादर ऐकें कथेसी ॥ चित्त देवोनि परियेसीं ॥ देशसंख्या ॥६६॥

चवेचाळीस सहस्त्र गंगापार ॥ चारीलक्ष वडवान थोर ॥ वेणु असे चौदा सहस्त्र ॥ माळवा सहस्त्र अठरा ॥६७॥

नवलक्ष असे डाहाळी ॥ दहालक्ष कुशस्थळी ॥ आणि इतुकीच भूमी रोधिली ॥ सज्जनदेशें ॥६८॥

अठरासहस्त्र देश कोळी ॥ हे रोधिली पंचगौडीं ॥ अठरासहस्त्र बाबरोडी ॥ येककोटी नेमाड ॥६९॥

देश नामें असे काश्मीर ॥ येककोटी सहस्त्र सत्तर ॥ आणि देश जालंधर ॥ सहस्त्र तीस ॥७०॥

मग सत्तरीं लक्ष गणित ॥ तें असे कांकरदेशांत ॥ तैशीच ते गुजराथ ॥ सहस्त्र सत्तरी ॥७१॥

सतरालक्ष जाणिजे भोट ॥ अठरालक्ष महाभोट ॥ आणि बरवें सोरट ॥ येकलक्ष ॥७२॥

कर्नाटक लक्षतीन ॥ तैसेंचि ब्रह्मवाहाळ जाण ॥ अठराकोटी खुरासन ॥ असे देश ॥७३॥

सौराष्ट्र आणि सोमनाथ ॥ सप्तलक्ष गणित तेथ ॥ आणि असे लक्ष गणित ॥ स्त्रीराज्य पैं ॥७४॥

नव लक्ष तैलंगण ॥ दहालक्ष लंकाभुवन ॥ मग अकरालक्ष जाण ॥ ज्वालामुखी ॥७५॥

बारालक्ष नंदिदेश ॥ तितुकाचि असे पायांस ॥ आणि सर्पमेखणेराचा पैस ॥ लक्ष तेरा ॥७६॥

चौदालक्ष हस्तनापुर ॥ तेथें कौरव होते समग्र ॥ ते वधिले राज्यघर ॥ पंडुपुत्रीं ॥७७॥

चौदालक्ष कोंकण ॥ तेथें राम रेणुकानंदन ॥ तैसेंचि असे प्रमाण ॥ हस्तिमुखदेशा ॥७८॥

चौदालक्ष चीनदेश ॥ पंधरालक्ष नवसांस ॥ तैसेंचि आसाम लक्ष पंचदश ॥ वेषरमुख ॥७९॥

आणि कोटी एकादश ॥ भालुकांचा देश ॥ सिंधुदेशाचा सौरस ॥ नवलक्ष गा ॥८०॥

चौसष्टलक्ष जालंधर ॥ ऐशीलक्ष शुकमुख चतुर ॥ आणि असे नंदनपुर ॥ नवलक्ष पैं ॥८१॥

महिपाळदेश अवधारा ॥ तो असे कोटी सतरा ॥ उंचियश्र्वा आणि स्वयंपरा ॥ हे दोनीलक्ष ॥८२॥

नव सहस्त्र मारवाड ॥ तेरासहस्त्र नेमाड ॥ नवकळंब आणि कानड ॥ दोनी लक्ष ॥८३॥

पांचलक्ष असे कामरु ॥ चौसष्टीसहस्त्र जाल्हरू ॥ आणि असे देशाल्हरू ॥ दहा सहस्त्र ॥८४॥

अकरासहस्त्र हुर्मुज ॥ छत्तीससहस्त्र कांबोज ॥ येक सहस्त्र आनंदभोज ॥ वैराट देश ॥८५॥

पंधरालक्ष चंदेरी ॥ त्याचे त्रिगुण भामरी ॥ आणि सनकसन नगरी ॥ लक्ष तीन ॥८६॥

देश बरवा देमान ॥ त्याचें बावीसलक्ष प्रमाण ॥ आणि दोनकोटी गाजीन ॥ देश असे ॥८७॥

नवसारी लक्ष नवां ॥ ब्याण्णवलक्ष माळवा ॥ द्राविडदेश बरवा ॥ चौदा लक्ष ॥८८॥

देशा नाम महेंद्री ॥ ते असे लक्ष बाहात्तरीं ॥ आणि येकलक्ष धरित्री ॥ उज्जयिनीची ॥८९॥

मागधदेशाची गणना ॥ येकतीससहस्त्र जाणा ॥ आणिक देश संजिणा ॥ दशसहस्त्र ॥९०॥

स्वशी देश द्वादशसहस्त्र ॥ जयंती पंधरा सहस्त्र ॥ आणि वैरागर सहस्त्र ॥ षोडशे पैं ॥९१॥

तेतीससहस्त्र ते दिल्ली ॥ बत्तीससहस्त्र वनमाळी ॥ सतरासहस्त्र रोधिली ॥ पारिजात देशें ॥९२॥

ऐसे हे सकळ देश ॥ तेथें आपुलाली भाष ॥ परि वेळाऊ लक्ष छत्तिस ॥ असे राया ॥९३॥

ऐसें वसिन्नलें चराचर ॥ ब्रह्मयापासाव समग्र ॥ तया त्रिभुवनींचा व्यापार ॥ उत्पतीचा ॥९४॥

विष्णूनें कीजे पोषण ॥ संहार करी त्रिनयन ॥ परि हेही असती निर्गुण ॥ नाशिवंत ॥९५॥

तरी ऐकें गा भारता ॥ तुवां पुसिली हे कथा ॥ ते हे वेदवाणी प्राकृता ॥ कथिली तुज ॥९६॥

ऐसें ऋषीनें बोलतां ॥ तेणें संतोष जाहला भारता ॥ मग आक्षेप जाहला करिता ॥ जन्मेजयो ॥९७॥

मुनीसि ह्मणे नृपवरु ॥ ब्रह्मा विष्णु आणि रुद्रु ॥ यांचा उत्पत्तिविचारु ॥ कैसा असे ॥९८॥

ययांपासूनि चराचर ॥ कैसा जाहला विचार ॥ तरी हें सांगा सविस्तर ॥ कृपा करोनी ॥९९॥

ऐसी हे पुण्यपावनकथा ॥ ऐकतां उद्धरे श्रोतावक्ता ॥ पीडा तापत्रय सर्वथा ॥ नपवे कांहीं ॥१००॥

आतां उत्पत्तिआख्यानें ॥ जें श्रीहरीचें कीर्तन ॥ तें श्रोतयां करूं श्रवण ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ भूगोलकथाप्रकारू ॥ षष्ठाऽध्यायीं सांगितला ॥१०२॥

॥ शुभंभवतु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठ्स्तबके षष्टोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP