कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय २०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसी ह्मणे राव भारत ॥ येक मनींचें असे आर्त ॥ तरी तें अनंतदेवाचें व्रत ॥ जाहलें कैसें ॥१॥

येक दोरक करिती ॥ तया देती चौदा ग्रंथी ॥ आणि उजवे हातीं बांधिती ॥ कवणे गुणें ॥२॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया ऐकें चित्त देऊन ॥ पूर्वीं हेंचि कृष्णालागुन ॥ पुसिलें होतें धर्मरायें ॥३॥

तरीं जें कृष्णधर्मसंवादन ॥ तेंचि तुज करवूं गा श्रावण ॥ तें अनंतव्रताचें महिमान ॥ परिसें राया ॥४॥

वनवासीं धर्म करी विनंती ॥ कीं आमुचा साह्यकारी तूं श्रीपती ॥ परि आह्मा थोर विपत्ती ॥ घडली देवा ॥५॥

ऐकोनि ह्मणे हृषीकेशी ॥ धर्मा वचन परियेसीं ॥ पूर्वी ऐसेंचि कौंडिण्यऋषीसी ॥ घडलें विपत्त्य ॥६॥

तेणें अनंत करितां प्रसंन्न ॥ दारिद्र गेले पळोन ॥ तैसें तुह्मीहीं आचरितां जाण ॥ पळेल विपत्ती ॥७॥

तंव धर्में देवो विनविला ॥ कीं अनंत ह्मणिजे कवणाला ॥ येरू ह्मणे अंत नाहीं जयाला ॥ तोचि अनंत ॥८॥

तो येकचि अवघा जाण ॥ रिता ठावो नाहीं त्याविण ॥ सर्वव्यापक असे ह्मणोनि ॥ तोचि अनंत ॥९॥

धर्म ह्मणे गा श्रीहरी ॥ हें कौंडिण्या घडलें कवणेपरी ॥ मग सांगता होय मुरारी ॥ धर्मरायासी ॥१०॥

ह्मणे धर्मा ऐक वचन ॥ पूर्वी असितनगरीं जाण ॥ होता सुमंत नामा ब्राह्मण ॥ वासिष्ठगोत्रीं ॥११॥

दीक्षा कन्या भृगुऋषीची ॥ तें कांता होय सुमंताची ॥ तयेसि कन्या असे येकची ॥ सुशीला नाम तियेचें ॥१२॥

सुशीले असता धाकुटपण ॥ दीक्षा माता गेली निमोन ॥ सुमंत पिता अग्निहोत्री ब्राह्मण ॥ पुनःलग्न तेणें केलें ॥१३॥

ब्राह्मण पवित्र धर्मभूषा ॥ त्याचें कन्येचें नाम कर्कशा ॥ येरें पाहोनि सुदिन दिवसा ॥ तिशीं लग्न लाविलें ॥१४॥

कर्कशा सुशीला असतां घरीं ॥ कर्कशा नित्य कलहो करी ॥ तेणें कन्येचे अंतरीं ॥ थोर दुःख ॥१५॥

सर्वथा न गमे सुशीलेसी ॥ ह्मणोनि चित्रिलें भिंतीसी ॥ स्वस्तिकें चौक पुजेसी ॥ भरी नानारंग ॥१६॥

ऐसें रंजवी आपुलें मन ॥ येकदा सुमंत अनुष्ठान करून ॥ पाहे तंव स्वस्त्रीचें अवचिन्ह ॥ कन्येआगें उमटलें ॥१७॥

मग सुमंतें वर विचारितां ॥ तंव कौडिण्य आला अवचिता ॥ तया आपुली कन्या देता ॥ जाहला सुमंत ॥१८॥

बरव्या मुहुर्ता पाहिलें ॥ दोघांचें लग्न लाविलें ॥ मग सुमंतें विनविलें ॥ कर्कशेसी ॥१९॥

ह्मणे आंदण द्यावें यांसी ॥ तंव ते कोपली सुमंतासी ॥ येरें सिद्ध करितां शकटांसी ॥ कौडिण्य सुशिळेसह निघाला ॥२०॥

तंव कर्कशेनें काय केलें ॥ मृत्तिकेचें चूर्ण वहिलें ॥ तें पेटारां भरोनि ठेविलें ॥ शकटावरी ॥२१॥

आंणिक दुष्टेनें काय केलें ॥ ब्राह्मणाचें उच्छिष्ट राहिलें ॥ तेंही भरोनियां ठेविलें ॥ शकटावरी ॥२२॥

असो कौडिण्यें घेवोनि सुशीळा ॥ ऋषिपुराचा मार्ग धरिला ॥ जंव रवि मध्यान्हासि आला ॥ तंव सरिता देखिली ॥२३॥

क्षुधेनें असे बहु पीडला ॥ ह्मणोनि विश्रांतीसि राहिला ॥ कन्येनें जंव पेटारा पाहिला ॥ तंव मृत्तिका देखिली ॥२४॥

मग ते गहिंवरोनि क्षुधेंसीं ॥ उदकार्थ गेली नदीतीरासी ॥ तंव घवघवीत नारींसी ॥ देखती जाहली ॥२५॥

येरी गेली तयांपुढारी ॥ तंव त्या जळदेवता नारी ॥ वोवसा आचरती सुंदरीं ॥ अनंताचा ॥२६॥

चौक रचिला चतुष्कोण ॥ वरी अष्टदळ केलें जाण ॥ होत षोडशोपचारीं पूजन ॥ नानाविध ॥२७॥

हळदीकुंकुवाची गजबज थोरी ॥ पृथक पूजा नानापरी ॥ चवदा ग्रथीं देवोनि होरीं ॥ पुजिती दोरक ॥२८॥

येकी सांगती कथा पुजन ॥ येकी ऐकती चित्त देऊन ॥ येकी बांधिती येकीलागुन ॥ दोरक करीं ॥२९॥

तंव सुशीलेनें करोनि दंडवत ॥ ह्मणे हें काय असा करित ॥ यरी ह्मणती हें अनंतव्रत ॥ आचरों आह्मी ॥३०॥

ऐकोनि सुशीलेची विनंती ॥ ह्मणती ऐकें हो फळश्रुती ॥ ज्यासी प्राप्त असे आपत्ती ॥ त्यांसी हर्ष करील हें ॥३१॥

चिंतिलें मनीचें पाहें ॥ हा अनंत देत आहे ॥ तंव सुशीलेनें धरूनि पाय ॥ ह्मणे हें व्रत मज द्यावें ॥३२॥

मग कृपा येवोनि तयांसी ॥ दोरक बांधिला सुशीलाकरासी ॥ कीं भाद्रपदशुद्ध चतुर्दशीसी ॥ आचरावें व्रत ॥३३॥

स्त्रियेनें आचरितां पुरुषास ॥ पुण्य असे हो विशेष ॥ ऐसें सांगोनियां सुशीलेस ॥ नारी अदृश्य जाहल्या ॥३४॥

धर्मराया वचन परियेसीं ॥ मग ते आली शकटापाशीं ॥ तंव ध्यान विसर्जूनि कौडिण्यऋषी ॥ तोही तेथें पातला ॥३५॥

ऋषीसुशीलेप्रति ह्मणत ॥ पाहें काय पेटारियांत ॥ सुशीला जंव उघडूनि पाहत ॥ तंव हेम पक्कान्नें देखिलीं ॥३६॥

तिये अनंत जाहला प्रसन्न ॥ मृत्तिकेचें जाहलें सुवर्ण ॥ चूर्णाचें पक्कान्न जाहलें पाहून ॥ उभयतां हरूष ॥३७॥

मग करोनि आरोगणा ॥ तांबूल घेवोनि तत्क्षणा ॥ नगरा आलीं उभयतां जाणा ॥ हरुषवंत ॥३८॥

लोक सन्मान बहु करिती ॥ ऋषि आला गुंफेप्रती ॥ तंव तीं मंदिरें दिसती ॥ उभविलीं खणीं नव ॥३९॥

सोपे माडिया धवलारें ॥ मजलसा उपरिया गोपुरें ॥ रत्‍नखचित दामोदरें ॥ वोळंगे संपत्ती ॥४०॥

नानावस्त्रें अलंकार ॥ सुशीलेनें केला श्रृंगार ॥ गोधनें असती अपार ॥ कण धनांची समृद्धी ॥४१॥

अनंत जाहला प्रसन्न ॥ कन्यापुत्रीं नांदे कौडिण्य ॥ परि द्रव्यमदें भुलला जाण ॥ होवोनि उन्मत्त ॥४२॥

सुशीला प्रतिवर्षी आचरे व्रत ॥ संपत्तीसी कोण करील गणित ॥ द्रव्यलक्ष्मीसि नाहीं मित ॥ भाग्य वोडवलें ॥४३॥

कौडिण्य सौभाग्यें आथिल ॥ तयाचे अर्धांगीं वसे सुशीला ॥ तंव अकस्मात देखिला ॥ तिच्या दंडीं दोरकु ॥४४॥

ह्मणे मजघरीं काय उणी संपत्ती ॥ उदंड हिरे माणिकें मोतीं ॥ त्यांची तुज आली विकृती ॥ ह्मणोनि दोरक बांधिला कीं ॥४५॥

परि तयेनें विनविला भ्रतार ॥ जी हा सर्वश्रृंगारांचा श्रृंगार ॥ तंव कोपोनियां द्विजवर ॥ घेतला दोरक हिरोनी ॥४६॥

येरी ह्मणे हा अनंत ॥ याचेनि प्रसादें आलंकृत ॥ कौडिण्य ह्मणे दोर तो अनंत ॥ सत्य केवीं ॥४७॥

ती ह्मणे हें वचन असत्य नसे ॥ हा प्रत्यक्ष अनंत असे ॥ परि तो कोपाचिये आवेशें ॥ दोर टाकी अग्नींत ॥४८॥

तंव ते हाहा ह्मणोनि वचन ॥ सुशीला उठिली घाबरोन ॥ अग्नींतूनि दोरक काढून ॥ दुग्धामाजी घातला ॥४९॥

कौंडिण्यातें अनंत कोपला ॥ तेणे लक्ष्मीचा हारांश जाहला ॥ तस्करीं नेलें गोधनांला ॥ मंदिर अग्नीनें दाहिलें ॥५०॥

गुप्त जाहलें धनधान्य ॥ कलहो करिती पुत्रजन ॥ बुभुक्षित जाहले सर्व जाण ॥ नाश पावतां लक्ष्मीसी ॥५१॥

अन्नही न मिळे तयासी ॥ ह्मणोनि व्रत पुसे स्त्रियेसी ॥ येरी ह्मणे अनंत तुह्मासी ॥ सर्वोपरि क्षोभला ॥५२॥

ऐसें ह्मणोनि पूर्ववृत्तांत ॥ पतीसि कथियेला समस्त ॥ कीं देवतांचे कृपेनें अनंत ॥ भाळला होता ॥५३॥

मग अनुतापोनि ब्राह्मणें ॥ देहसंकल्प घातला तेणें ॥ कीं अनंत भेटेल तरीच रक्षणे ॥ जाण देहा ॥५४॥

धर्मा तुझाचि न्याय जाहला ॥ कौंडिण्य ग्रामंतूनि निघाला ॥ मार्गीं बोभाऊं लागला ॥ अनंत अनंत ह्मणोनी ॥५५॥

लक्ष लागलें अनंतासी ॥ नाहीं मनीं भय तयासी ॥ भेटतां व्याघ्र सिंहादिकांसी ॥ न धरी शंका ॥५६॥

शरीर अर्पिलें अनंता ॥ ह्मणे मज भलतें होकां आतां ॥ ऐसा वनोपवनीं हिंडतां ॥ नेघे अन्नोदक ॥५७॥

न ह्मणे मार्ग आडमार्ग ॥ न धरी कोणाचाही संग ॥ ऐसा तो विरागी निःसंग ॥ जातसे पैं ॥५८॥

ऐसें वनीं हिंडतां त्याला ॥ वृक्ष आंबियाचा तेणें देखिला ॥ फळीं पुष्पीं असे वोतला ॥ परि नातळती जीव कोणी ॥५९॥

येरु तयासी पुसे अनंत ॥ तो देखिला नाहीं ह्मणत ॥ विनती कीं तुह्मां भेटलिया वृत्तांत ॥ पुसा माझा ॥६०॥

पुढें देखिलीं वासरूं गाय ॥ वनीं हिंडतां तृण मुखा न ये ॥ पाषाणासी लागती पाय ॥ त्यांसी पुसे अनंत ॥६१॥

तंव तीं ह्मणती नाहीं देखिला ॥ परि आमुचा वृत्तांत पाहिजे पुसिला ॥ पुढें वृषभ येक देखिला ॥ उगाच हिंडे तो वनीं ॥६२॥

येरु अनंत पुसे तयासी ॥ तो ह्मणे ठावा नाहीं मजसी ॥ जरी तो भेटेल तुह्मासी ॥ तरी वृत्तांत पुसा माझा ॥६३॥

मग चालिला तेथूनी ॥ तंव पुष्करिणी देखिल्या दोनी ॥ माजी कमळांची दाटणी ॥ सारस राजहंस ॥६४॥

रम्य स्थळ मनोहर ॥ येकमेकींत त्यजिती नीर ॥ परि न करिती जळस्वीकार ॥ पक्षिश्र्वापदें ॥६५॥

तया पुष्करिणींसि अनंत पुसिला ॥ ह्मणती ठावा नाहीं आह्माला ॥ आतां जरी तुह्मासि भेटला ॥ तरी वृत्तांत पुसा आमुचा ॥६६॥

मग तो पुढें चालिला ऋषी ॥ तंव खरकुंजर भेटले तयासी ॥ त्यांप्रति पुसतां अनंतासी ॥ ह्मणती नाहीं देखिला ॥६७॥

असो निराशा होवोनि त्यासी ॥ गिरगिरी आली नेत्रांसी ॥ मूर्च्छित पडिला भूमीसी ॥ कौंडिण्य द्विज ॥६८॥

कंठी प्राण असे धीरला ॥ नेत्रीं पाझर सुटला ॥ तंव कृपा येवोनि अनंताला ॥ भेटला द्विजरूपें ॥६९॥

होवोनियां वृद्ध ब्राह्मण ॥ तयाच्या नेत्रां करीं स्पर्शन ॥ ह्मणे तूं गा अससी कोण ॥ कां ये वनीं पडिलासी ॥७०॥

येरु नेत्र उघडोनि तयाला ॥ ह्मणे तुह्मीं अनंत काय देखिला ॥ द्विज ह्मणे चाल गा वहिलां भेटवितों तुज ॥७१॥

मग करीं धरोनि उठविला ॥ कांपती सांवरिलें तयाला ॥ तंव काय देखता जाहला ॥ कौडिण्य तो ॥७२॥

अवघी कवणाची नगरी ॥ गुढिया तोरणें घरोघरीं ॥ गरुडटके महाद्वारीं ॥ रंगमाळा देखत ॥७३॥

तये नगरामाजी जाण ॥ आनंदरूप हरिभुवन ॥ तेथें जडित सिंहासन ॥ ठेविलें असें ॥७४॥

कोटिसूर्यांचा प्रकाश ॥ तेज न समाये दृष्टीस ॥ दिव्यदृष्टी होती दीधली त्यास ॥ ह्मणोनि तें भासलें ॥७५॥

तये सिंहासनीं पाहे ॥ अनंत देव बैसला आहे ॥ लावण्यदशा सांगवे काय ॥ बाणलें तारूण्य ॥७६॥

चर्तुर्भुज देखिली मूर्ती ॥ शंख चक्र गदापद्म हातीं ॥ गळां शोभे वैजयंती ॥ कंठीं मिरवे कौस्तुभ ॥७७॥

शिरीं मुकुट रत्‍नजडित ॥ नेत्रकमळीं शोभा अत्यंत ॥ कर्णी कुंडलें झळकत ॥ मकराकारें ॥७८॥

दंतीं विजू तळपे जाण ॥ केला पीतांबर परिधान ॥ तोडरें रुळतां शोभती चरण ॥ अनंताचे ॥७९॥

चरण सुकुमार रातोत्पलां ॥ ध्वजवज्रांकुश पद्मकळा ॥ तळवे तळपती सोज्वळा ॥ चंद्रबिबापरी ॥८०॥

अर्धांगी लक्ष्मी सुंदरी ॥ सन्मुख गरुड सेवा करी ॥ पाठींसीं असे स्तुतिविचारीं ॥ सहस्त्रवदन ॥८१॥

देवें घेतला अवतार ॥ नरनारी पृथकाकार ॥ देव करिती जयजयकार ॥ तेणे नभ गर्जिन्नलें ॥८२॥

कीं रूप दाविलें यशोदेसी ॥ वदनी देखिलें गोकुळासी ॥ तेंचि रूप कौडिण्यासी ॥ दाखविलें अनंतें ॥८३॥

वाजती मंगळतुरें निशाण ॥ षोडशोपचारीं होत पूजन ॥ ऐसें देखोनियां कौडिण्य ॥ त्राहें त्राहें ह्मणतसे ॥८४॥

देखतांचि अनंतचरण ॥ पातकें गेलीं पळोन ॥ ह्मणे आजिचा दिवस धन्य ॥ कृतकृत्यर्थ मी जाहलों ॥८५॥

माझे अपराध सहस्त्रवरी ॥ ते देवा मज क्षमा करीं ॥ ह्मणोनि लोटांगण चरणावरी ॥ घातलें कौंडिण्यें ॥८६॥

मग देवें चोंबाहीं आलिंगलें ॥ क्षेम ऋषीतें दीधलें ॥ ह्मणे आतां पावशी वहिलें ॥ ममवरें गा ॥८७॥

आतां तूं गा स्त्रियेसहित ॥ हें माझें चालवीं पवित्र व्रत ॥ नेम चौदावर्षे परियंत ॥ माझिये व्रतासी ॥८८॥

पहिली संपत्ती तुजलागुन ॥ त्याहूनि दशगुण जाहलों प्रसन्न ॥ अंतीं देईन मोक्षस्थान ॥ वैकुंठापद ॥८९॥

ऐकोनि सुख जाहलें द्विजासी ॥ देव सलगीचा भेटलात्यासी ॥ मग ह्मणे मार्गीचें हृषीकेशी ॥ सांगा मज ॥९०॥

जी जी आंबा तो असे कवण ॥ तंव ह्मणे तो विप्रवेदपरायण ॥ तेणें शिष्यांचे कष्ट घेऊन ॥ न दिली विद्या ॥९१॥

त्या पातकाचे प्रायश्वितीं ॥ फळें कोणीच न सेविती ॥ येरु ह्मणे धेनु ते क्षुधिती ॥ कोणे पापें ॥९२॥

देव ह्मणे रायें भुमी द्विजासी ॥ दिधली ते निर्फळ जाय त्यासी ॥ ह्मणोनि पावली पतनासी ॥ नमिळे आहार ॥९३॥

येरू ह्मणे वृषभ तो कोण ॥ देव ह्मणे तो स्वामीस गेला टाकुन ॥ ह्मणोनि क्षेत्र हिंडे रान ॥ त्या पातकास्तव ॥९४॥

आणि पुष्करिणी त्या पाहें ॥ वाणें देतीं येकमेकींये ॥ आग त्या दोघी बहिणी होय ॥ परस्परेंशीं ॥९५॥

आदरें दानधर्मासि करितां ॥ येकमेकींसि वाणें देतां ॥ कांहीं न देती आर्तवंता ॥ ह्मणोनि ऐसें ॥९६॥

तंव ह्मणे खर कुंजर ते काय ॥ ह्मणे क्रोध मत्सर तुझे होय ॥ ज्यांचिये योगें तुवां पाहें ॥ अनंत टाकिला अग्नींत ॥९७॥

मग ह्मणे ब्राह्मण तो कोण ॥ देव ह्मणे तो मीचि जाण ॥ ऐसी केली द्विजाची पूर्ण ॥ समस्या देवें ॥९८॥

मग देवासि करूनि नमस्कार ॥ हरूषें चालिला द्विजवर ॥ तंव लोक करिती आदर ॥ कौंडिण्यपुरींचे ॥९९॥

जें भाग्य होतें नाहिंसे जाहलें ॥ त्याच्या दशगुण देवें दीधलें ॥ सकळीं थोर सुख मानिलें ॥ व्रत चालविती उभयंता ॥१००॥

ऐसें आचरितां बहु दिवस ॥ अंती मोक्ष जाहला त्यांस ॥ तो नक्षत्रांमाजी पुनर्वस ॥ कौडिण्यऋषी जाहला ॥१॥

कौंडण्यासी मुक्ति दीधली ॥ हे भविष्योत्तरींची बोली ॥ परि आणिक वार्ता जे जाहली ॥ ते लोकवाजट ॥२॥

हे सविस्तर सांगतां ॥ विस्तरा जाईल ग्रंथकथा ॥ ह्मणोनियां ऐकावें श्रोतां ॥ दाविला अन्वयो ॥३॥

हे असो येथींची विप्तत्ती ॥ वैशंपायन सांगे जन्मेजयाप्रती ॥ आणि धर्म रायासि श्रीपती ॥ सांगते असे ॥४॥

हरीनें कथिलें धर्मरायासी ॥ ऐसें हें व्रत अनंतचतुर्दशी ॥ परि बैसों नेदी धर्मचित्तासी ॥ व्रत करणें ऐसें ॥५॥

जरी धर्म करिता हें व्रत ॥ तरी राज्य होतें प्राप्त ॥ मग पुढें न होतें भारत ॥ चरित्र हरीचें ॥६॥

असो आणिकही हृषीकेशी ॥ व्रतें सांगे धर्मरायासी ॥ जीं श्रवणमात्रें पातकांसी ॥ नाशिती सत्य ॥७॥

धर्मासि ह्मणे अनंत ॥ ऐकें संकष्टीचतुर्थी व्रत ॥ जें आचरितां असे अमित ॥ फलप्राप्ती तयाची ॥८॥

जें जें मनीं चिंतिजे ॥ तें तें तत्काळ पाविजे ॥ प्रतिमासीं आचरिजे ॥ निशीं वद्यचतुर्थी ॥९॥

आणिक द्वादश पूजनें ॥ सांगीतलीं नारायणें ॥ तैसीच कथिली श्रीकृष्णें ॥ श्रवणद्वादशी ॥११०॥

त्या आचारिता महाव्रतासी ॥ नाश होय सकळ विघ्नांसी ॥ कीं उपांगललिता प्रवेशीं ॥ चिंतिले कार्य होय ॥११॥

मागुती बोलिला अनंत ॥ धर्मा ऐकें कोकिलाव्रत ॥ तरी चिंतिलें पावे त्वरित ॥ जये व्रतें पैं ॥१२॥

आणिक ह्मणे नारायण ॥ ऋषिपंचमी व्रत जाण ॥ जें आचरितां दोषदारूण ॥ पळोनि जाती ॥१३॥

ऐसी नित्यव्रतें पाहें ॥ तीनशेंसाठ संख्या आहे ॥ येकाहूनि येक होये ॥ चिंतिलें देणार ॥१४॥

तों व्रतें पृथकें सांगतां ॥ विस्तारा जाईल ग्रंथकथा ॥ वैशंपायन सांगे भारता ॥ जन्मेजयासी ॥१५॥

तंव जन्मेजय आक्षेपित ॥ ह्मणे हें संकष्टचतुर्थींचे व्रत ॥ कोण पूर्वी आचरत ॥ कैसें स्वामी ॥१६॥

मग सांगे वैशंपायन आतां ऐकें राया वचन ॥ हें धर्मानें कृष्णालागुन ॥ पुसिलें होतें ॥१७॥

धर्म ह्मणे गा गोपाळा ॥ या संकष्टचतुर्थीला ॥ पूर्वी कोण असे आचरला ॥ तें सांगा मज ॥१८॥

तंव बोलिला श्रीपती ॥ पूर्वी आचरले पशुपती ॥ तेणें त्रिपुरासुराशीं ख्याती ॥ केली देखा ॥१९॥

तंचि षडाननें आचरिलें ॥ तेणें तारकासुरा वधिलें ॥ तेंचि हनुमंतें करोनि वहिलें ॥ सीताशुद्धी आणिली ॥१२०॥

आपणही आचरलों या व्रताला ॥ जैं मदन शंबरें होता नेला ॥ तो दैत्या व धूनि रतिसह आला ॥ याव्रतें करुनी ॥२१॥

हें व्रत गरुड आचरला ॥ मग तो अमृत साधूनि आला ॥ तेणें मातेचा शीण हरिला ॥ या व्रतप्रभावें ॥२२॥

तेंचि व्रत गौतम आचरला ॥ तेणें शुंभ प्रसन्न जाहला ॥ मग दीधली गंगेला ॥ ते आलीसे भूमीसी ॥२३॥

हें व्रत स्वर्गी आचरती ॥ त्याचें मनोरथ पूर्ण होतीं ॥ ऐसी असे फळश्रुती ॥ संकष्टचतुर्थीची ॥२४॥

तंव धर्म ह्मणे गा श्रीपती ॥ हें स्वर्गी देव आचरती ॥ परि आणिलें मृत्युलोकाप्रती ॥ कोणें व्रत हें ॥२५॥

मग देव ह्मणे गा अवधारीं ॥ चंद्रावती नामें नगरी ॥ तेथें चंद्रसेन राज्य करी ॥ नगरीं पारधी असे येक ॥२६॥

त्यासी अत्यंत पारधीचें व्यसन ॥ येके दिनीं काहीं न लभे जाण ॥ ऐसा हिंडतां वनोवन ॥ येक सरिता देखिली ॥२७॥

तेथें नारी देखिल्या सात ॥ त्या संकष्टचतुर्थी आचरत ॥ मग तो जाऊनियां तेथ ॥ पुसे तयांसी ॥२८॥

ह्मणे जी तुह्मी हें काय करितां ॥ तंव त्या ह्मणती तत्वतां ॥ आचरितों संकष्टचतुर्थींव्रता ॥ मागुती येरें विनविलें ॥२९॥

कीं संकष्टचतुर्थी ते काय ॥ तेथेचें फळ कैसें आहे ॥ आणि तेयेचें विधान लवलाहें ॥ सांगा मजसी ॥१३०॥

ऐसें पारधी बोलत ॥ नाना करूणा भाकित ॥ मग त्या होवोनि कृपावंत ॥ सांगती तया ॥३१॥

अगा पांच कीं षड्‍मासांत ॥ अथवा येका वरुणाआंत ॥ उद्यापन करावें त्वरित ॥ तेणें गणेश संतुष्टे ॥३२॥

येकमासा सोनियाचा ॥ गणेश करावा पैं साचा ॥ तया नैवेद्य पंचखाद्यांचा ॥ दाविजे पैं ॥३३॥

ब्राह्मण येकवीस निमंत्रावे ॥ बरवें पूजन करावें ॥ धोत्रें तांब्ये समर्पावे ॥ तयांलांगीं ॥३४॥

रौप्यपत्रीं क्षीर घालूनी ॥ शेवया पंचखाद्यें करूनी ॥ वरी बरवें वस्त्र झांकूनी ॥ गणेशापुढे ठेवावें ॥३५॥

षोडशोपचारी पूजा करून ॥ तोचि नैवेद्य समर्पून ॥ देवदक्षिणा आचार्या लागुन ॥ समर्पिजे मग ॥३६॥

उपरीं पंचामृत्तीं विप्रभोजन ॥ ताबूल वस्त्र दक्षिणा देऊन ॥ साष्टांग नमस्कार घालून ॥ जोडीजे कर ॥३७॥

ब्राह्मण व्रत संपूर्ण ह्मणती ॥ आपण तथास्तु ह्मणावें त्यांप्रती ॥ ऐसा प्रबोधिला जळदेवती ॥ पारधी तो ॥३८॥

मग पारधीयें संकल्प घातला ॥ व्रत करीन ह्मणोनि बोलिला ॥ परतोनि स्वगृहीसि पातला ॥ त्या जाहल्या अदृश्य ॥३९॥

इकडे राजा पारधीसि निघाला ॥ त्यासी सेवकीं वृत्तांत कथिला ॥ कीं नगरीं येक पारधी असे भला ॥ तो बोलाविजे ॥१४०॥

मग रायें बोलावूं घाडिलें ॥ गृहीं नाहीं ऐसें कळलें ॥ परि वाटेसि भेटला ते वेळे ॥ खांदी असे कावडी ॥४१॥

रायासि सेवकीं ह्मणितलें ॥ हाचि पारधी ऐसें बोलिले ॥ रायें समागमें पाचारिलें ॥ वारू दीधला संजुत ॥४२॥

त्याचेनि रायासि ते वेळीं ॥ बहुत पारधी मिळाली ॥ सर्वसैन्या पुरोनि उरली ॥ तेणें राव आभारला ॥४३॥

ह्मणे याचे पद्महस्तें करुन ॥ पारधी लाधली मजलागुन ॥ मग रायें तयासि वळित जाण ॥ दीधलें येका लक्षाचें ॥४४॥

तंव दुजी वद्यचतुर्थी आली ॥ पारधी विचारी तये वेळीं ॥ कीं येके चतुर्थीनें ख्याती केली ॥ गणेश जाहला प्रसन्न ॥४५॥

तरी आतां जन्मपरियंत ॥ करीन संकष्टीचतुर्थीव्रत ॥ ऐसें बोलोनि संकल्प तेथ ॥ घातला तेणें ॥४६॥

मग गणेश प्रसन्न जाहला ॥ तंव त्या रायें प्रधान केला ॥ युवराज्य देवोनि तयाला ॥ करीं घातली मुद्रिका ॥४७॥

जाहला संबंध मांडलिकांसीं ॥ कालांती स्त्रीपुत्र ह्मणती तयासीं ॥ कीं तुह्मा वृत्धत्व आलें परियेसीं ॥ व्रत आचरिता कष्टलां ॥४८॥

तरी हें व्रत आह्मां सांगावें ॥ तंव तेणें ह्यणितले बरवें ॥ ऐसें जंव कल्पिलें जीवें ॥ तंव हारांश जाहला लक्ष्मीचा ॥४९॥

तयावरी रावो कोपला ॥ हारांश लक्ष्मीचा जाहला ॥ क्रोधें रायें बाहेर घातला ॥ मारूनियां ॥१५०॥

गणेश क्षोभतां बहुत ॥ स्त्री बाळें पावलीं मृत्य ॥ आणि दरिद्र आलें बहुत ॥ तयालागीं ॥५१॥

अन्न नाहीं भक्षावयास ॥ ऐसे कष्ट जाहले बहुवस ॥ मग तोही पावला मृत्युस ॥ तये वेळीं ॥५२॥

गणेशा कृपा आली ते वेळे ॥ कीं येणें बहुत कष्ट केले ॥ येके चुकीचें काय नवल जाहलें ॥ ह्मणोनि देवें कृपा केली ॥५३॥

येका राजयाचे उदरीं घातला ॥ तो ज्येष्ठ पुत्र त्यासी जाहला ॥ त्या रायें थोर हर्ष केला ॥ आणिक पुत्र चार पैं ॥५४।

असो सोळा वरुषांचा जाहला ॥ तंव राज्यपट प्राप्त जाहला ॥ मग तयाचा पिता गेला ॥ वनीं तपासी ॥५५॥

राज्य केलें वर्ष येक ॥ तंव बंधू मिळोनि सकळिक ॥ राज्य हिरोनि घेतलें देख ॥ बंधुवर्गीं ॥५६॥

मग हा परियेंसी ॥ आरण्य निघे सहस्त्रियेसीं ॥ तृषित होवोनि देहेंसी ॥ जाहला विव्हळ ॥५७॥

ऐसा पुत्र त्या अटवींत ॥ हिंडत असे स्त्रियेसहित ॥ तंव ऋषी देखिला अकस्मात ॥ बहुशिष्यांसह ॥५८॥

शिष्यांसि तेणें उदक पुशिलें ॥ द्विजीं सरोवर दाखविलें ॥ तैं निर्मळ उदक प्राशिलें ॥ हरला श्रम ॥५९॥

स्थळ देखोनि आनंदभरित ॥ दोघें बैसलीं असती तेथ ॥ तंव गुरु येवोनियां तेथ ॥ पाहती त्यांसी ॥१६०॥

ऋषींनें परमादरें करून ॥ स्वाश्रमीं आणिलें दोघांलागुन ॥ फळपुष्पीं भोजन देऊन ॥ संतुष्ट केलीं ॥६१॥

मग तो रावो ऋषीप्रती ॥ कर जोडोनि करी विनंती ॥ ह्मणे आह्मासि घडली विपत्ती ॥ कवणे गुणें ॥६२॥

धर्मासि ह्मणे हृषीकेशी ॥ ऐसी विपत्ती प्राप्त त्यासी ॥ तुमच्याचि न्यायें तयासी ॥ घडलें असे गा ॥६३॥

असो मग तो राजकुमर ॥ ऋषीतें करी नमस्कार ॥ त्याचिये संगती सुविचार ॥ करितसें पैं ॥६४॥

ह्मणे अहो जी महामुनी ॥ तुह्मी निजज्ञानीं पाहोनी ॥ कोणे पापें दंडिलों ह्मणोनी ॥ सांगिजे मज ॥६५॥

ऐसें ऐकोनि ह्मणती ऋषी ॥ राया पाहे आपुलेचि मानसीं ॥ आणि हात उतरिती त्यासी ॥ देहावरूनी ॥६६॥

तंव तयासि ज्ञान जाहलें ॥ मनीं पुर्वींचें आठवलें ॥ कीं आपण संकष्टीव्रत सांडिलें ॥ त्याचें फळ हें ॥६७॥

मग तो काय करिता जाहला ॥ मनीं संकल्प दृढ घातला ॥ कीं आतां चालविणें व्रताला ॥ निश्र्वयेंसीं ॥६८॥

भारता मग तो स्त्रियेसहित ॥ आपण चालवी हें व्रत ॥ तंव लक्ष्मी राज्यसहित ॥ मोहरली तया ॥६९॥

तया राज्य प्राप्त जाहलें ॥ सकल वृत्तीं सुख पावलें ॥ ऐसें देवें धर्मासि कथिलें ॥ मग मेला द्वारके ॥१७०॥

मुनि ह्मणे राजचूडामणी ॥ हे कथा भविष्योत्तरपुराणीं ॥ संपूर्ण जाहली येथुनी ॥ जन्मेजया गा ॥७१॥

आतां असो गा भारता ॥ हे संपूर्ण जाहली कथा ॥ पुढें ऐकिजे संतश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥७२॥

इति श्रीकथाक० ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ अनंतव्रत आणि संकष्टीप्रकारू ॥ विंशातितमोऽध्यायीं कथियेला ॥१७३॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके विंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP