॥ श्रीगणेशाय नमः ॥
वैशंपयनासि विनवी रावो ॥ येक असे जी संदेहो ॥ सूर्यासि जाहले अश्र्विनौदेवो ॥ कैशियापरी ॥१॥
आणि या सूर्यदेवाची संतती ॥ मूळापासूनि जाहली किती ॥ ते सकळ सांगिजे वचनोक्ती ॥ कृपा करोनी ॥२॥
मग मुनि ह्मणे गा भूपती ॥ त्वष्टा नामें प्रजापती ॥ त्याची कन्या रूपवती ॥ संज्ञा नामें ॥३॥
ते दीधलिसे दिनकरा ॥ कश्यपाचिया कुमरा ॥ ते प्रसवली कन्याकुमारां ॥ अनुक्रमें ॥४॥
प्रथम जाहला जो कुमर ॥ तो दक्षिणेचा नृपवर ॥ दुजा जाहला शनैश्र्वर ॥ पुत्र तयेसी ॥५॥
आणिक प्रसवली अंगना ॥ ते कन्या जाहली यमुना ॥ अस्ताचळा गा नृपनंदना ॥ जन्म तिघांसी ॥६॥
तंव कोणे एके वेळे ॥ विचार आठवला अबळे ॥ ह्मणे रवितेजें पोळे ॥ सर्वांग माझे ॥७॥
ऐसें विचारुनियां चित्ता ॥ छायेची निर्माण केली कांता ॥ ते सूर्यासि योजिली वनिता ॥ सुवर्णा नामें ॥८॥
ते सौंदर्य सुस्वरूप ॥ बरवी दिसे रविअनुरूप ॥ हाव भाव कटाक्षेप ॥ संज्ञेऐशी ॥९॥
तिये निरविला घराचार ॥ कीं तुवां पुजावा सूर्यवर ॥ परि हा माझा गुप्ताचार ॥ न सांगावा ॥१०॥
आणि माझिये स्वरूपता ॥ तुवां भोगावा सविता ॥ वेळ पडलिया आकांता ॥ सांगावें नाम ॥११॥
ऐसें सांगोनि सुंदरी ॥ आपण गेली वनांतरीं ॥ तपसाधना शरीरीं ॥ करावयासी ॥१२॥
मग ते होवोनि अश्र्विनी ॥ तप साधी महावनीं ॥ शरीरीं शीतोष्ण साहोनी ॥ भोजनें विण ॥१३॥
इकडे कथा ऐसी वर्तली ॥ सुवर्णा रविसंगें प्रसवली ॥ तयेसि अपत्यें जाहलीं ॥ तें ऐक आतां ॥१४॥
प्रथम जाहला सावर्णिक मनु ॥ मग व्यतीपात दारुणु ॥ भद्रा वैधृती लहानु ॥ कुलिक आणि अर्धयाम ॥१५॥
असो मग कोणे येके दिनीं ॥ मनीं विचारी दिनमणी ॥ तंव संज्ञा नव्हे कामिनी ॥ कळलें ऐसें ॥१६॥
आणिक ज्ञानीं पाहे सविता ॥ तव ते वडवा जाहली कांता ॥ ह्मणोनि स्वये जाहला धरिता ॥ अश्र्वरूप ॥१७॥
जेथें होती अश्र्वरूप कामिनी ॥ तेथें आला वेगें करुनी ॥ अवघ्राण केलें मुखघ्राणीं ॥ उभयवर्गीं पैं ॥१८॥
ते सहज होती ऋतुवंती ॥ घ्राणद्वारे जाहली गर्भसंभूती ॥ मग तेचि हे उपजली मूर्ती ॥ अश्र्विनौदेव ॥१९॥
आतां असो हें पुनरागत ॥ कथिलेंचि कथणें अनुचित ॥ हा वर्णिलासे वृत्तांत ॥ तृतियस्तबकीं ॥२०॥
मुनि ह्मणे गा भूपती ॥ ऐसी अश्र्विनौदेवांची उत्पत्ती ॥ आतां दुसरी सूर्यसंतती ॥ ऐक राया ॥२१॥
आणिक येक पुत्र जाहला ॥ तो कुंतीउदरीं जन्मला ॥ परि हा बाळपणींचा जाहला ॥ कर्णपुत्र ॥२२॥
तया कर्णाचा कुमर ॥ नामें वृषकेत धनुर्धर ॥ तो प्रौढीं आथिला डोंगर ॥ कीर्तिवंत ॥२३॥
अकरा क्षौणी कौरवदळ ॥ कुरुक्षेत्रीं आटलें सकळ ॥ परि हा वांचलासे बाळ ॥ वृषकेत राया ॥२४॥
पुत्र स्नेहें कोपोनि पार्थें ॥ सोडिलें होतं वज्रशस्त्रातें ॥ कीं मारावे समस्तें ॥ गर्भ शत्रूंचे ॥२५॥
कौरव निर्दाळिले सकळ ॥ परि वांचला कर्णबाळ ॥ कुंतीनें करोनि प्रतिपाळ ॥ राखिला हा ॥२६॥
ऐसी हे गा भूपती ॥ सूर्यदेवाची संतती ॥ प्रयागमहात्मींची युक्ती ॥ पद्मपुराणीं ॥२७॥
तंव रावो ह्मणे गा मुनी ॥ हें मानवलें माझिये मनीं ॥ परि येक पुसतों वचनीं ॥ तें सांगावें जी ॥२८॥
कौरवसंहार सर्व जाहला ॥ तरी वृषकेत कैसा वाचला ॥ आणि कुंतीनें वाढविला ॥ कैशियापरी ॥२९॥
मग ऋषि ह्मणे गा राया ॥ तुवां संभ्रमें पुसिलें जया ॥ तरी चित्त देऊनिया ॥ कथा ऐकें ॥३०॥
असो युद्धांतीं अठरावे दिवशीं ॥ संहार जाहला कौरवांसी ॥ मग येरे, दिवशीं समस्तांशीं ॥ संहार जाहला ॥३१॥
कौरव आणि पांडववीरीं ॥ येकमेकां केली मारी ॥ तरी कृष्णकृपेनें वैरियांचे घरीं ॥ वांचला बाळ ॥३२॥
जो कां भीमासेनाचा कुमर ॥ पद्मावतीपासाव परिकर ॥ तयाचा करोनि संहार ॥ आले सकळ ॥३३॥
तो वृत्तांत पार्थासि कळला ॥ मग क्रोधें आवेशला ॥ ह्मणे आमुचा पुत्र मारिला ॥ रणामाजी ॥३४॥
ह्मणोनि वज्रबाण घेतला करीं ॥ अभिमंत्रोनि बोले उत्तरीं ॥ कीं या कौरवपक्षींचे मारीं ॥ सकळ गर्भ ॥३५॥
कौरव नामें जो नरबुहुद ॥ त्याचा समूळ करावा वध ॥ ऐसा करोनि अनुवाद ॥ सोडिलें शस्त्र ॥३६॥
तें चालिलें धुंधुवात ॥ त्रिभुवनामाजी फिरत ॥ जो सांपडे तयासि मारित ॥ कौरववंशी ॥३७॥
तंव ते कर्णाची युवती ॥ तियेचं नाम प्रभावती ॥ ती जाहली असे प्रसुती ॥ पांचवा दिवस ॥३८॥
मग ते सठिचिये रात्रीं ॥ जागृत होती सुंदरी ॥ तंव ऐकीली महाहूंबरी ॥ वज्रबाणाची ॥३९॥
तेणें ते भ्यालीं सुंदर ॥ मग वोसगां घेतलें कुमर ॥ धांवत आली मंदिरा ॥ अंधाचिये ॥४०॥
तो दुःखें बैसला स्त्रियांसहित ॥ मनीं होवोनि चिंताक्रांत ॥ इतुक्यांत प्रभावती विनवीत ॥ घातला पुत्र पायांवरी ॥४१॥
ह्मणे मी आपुल्या पतिसवें ॥ सहगंमनीं जाईन स्वभावें ॥ दिन पांच असे राहिलें ॥ या बाळालागीं ॥४२॥
तंव धृतराष्ट्र गांधारीस ह्मणे ॥ जाहलें पार्थाचें कोपणें ॥ आतां आह्मी काय करणें ॥ या बाळकासी ॥४३॥
आणि ह्मणे एकोत्तरशत होते ॥ ते काय जाहले येथें ॥ तुवां आणिलें बाळका तें ॥ तें काय करूं ॥४४॥
आमुचें अकरा क्षौणी दळ ॥ तें अवघें आटलें सकळ ॥ तरी तुवां आणिलें बाळ ॥ व्यर्थ मजजवळी ॥४५॥
तंव रावो विनवी वचना ॥ कीं अकराअक्षौहिणी कौरवसेना ॥ तरी तयेची काय गणना ॥ तें सांगिजे मज ॥४६॥
ऋषि ह्मणे गा नृपनंदना ॥ ऐक अक्षौहिणीची गणना ॥ प्रत्यक्षावीण प्रमाणा ॥ सत्यत्व नसे ॥४७॥
पांच पायांचे येक सरथी ॥ तीन वारू येक हस्ती ॥ यासी नाम ह्मणती पत्ती ॥ सत्य राया ॥४८॥
हे पत्ती त्रिगुण केलिया ॥ सेनापती ह्मणती तया ॥ आणि तयाचे त्रिगुण जाहलिया ॥ त्या नाम गुल्म ॥४९॥
मग तें नाम त्रिगुणिजे ॥ त्यातें वाहिनी बोलिजे ॥ तेही वाहिनी त्रिगुणिजे ॥ त्या नाम गण ॥५०॥
होतां गण त्रिगुणिक ॥ त्यांचे नाम पृतना येक ॥ ते पृतना त्रिगुणाधिक ॥ त्या नाम चमू ॥५१॥
ते चमू कीजे त्रिगुणी ॥ तये नाम अनीकिनी ॥ मग ते करितां दशगुणी ॥ अक्षौहिणी होय ॥५२॥
ऐसें अक्षौहिणीचें प्रमाण ॥ लेखी दोनशत अठरा सहस्त्र जाण ॥ वरी सातशत परिपूर्ण ॥ येकत्र मेळें ॥५३॥
आतां किती गज किती रथ ॥ अश्र्व पदाती समस्त ॥ हें तुज सांगो गणित ॥ विस्तारेंसीं ॥५४॥
एकवीस सहस्त्र आठशत ॥ आणि सत्तर रथ तेथ ॥ तितुकेचि गज उन्मत्त ॥ असती राया ॥५५॥
ऐसेंचि अश्र्वाचें गणित ॥ पांसष्ट सहस्त्र सहाशत ॥ वरी दशक येक परिमित ॥ जाण राया ॥५६॥
आणिक पदाती वीर उद्भट ॥ ते तुज सांगों गा सुभट ॥ येकलक्ष नवसहस्त्र स्पष्ट ॥ तीनशें आणि पन्नास ॥५७॥
या नाम येक अक्षौहिणी ॥ हे जैमिनीची असे वाणी ॥ पुढें ऐकें चित्त देवोनि ॥ भारता तूं ॥५८॥
असो ऐशी हे आडकथा ॥ जेवीं शाका रुचे जेवितां ॥ ते परिपूर्ण जाहली आतां ॥ पुढें ऐक ॥५९॥
मग तेथूनि निघाली प्रभावती ॥ ह्मणे हा नेऊं कुंतीप्रती ॥ तंव वाटेसि भेटला अवचित्तीं ॥ अग्निबाण ॥६०॥
जंव बाण आला जवळां ॥ तंव ते कांपें चळचळां ॥ परि धैर्य धरोनि अबळा ॥ बोलिली ते ॥६१॥
ह्मणे तुज पार्थाची आण ॥ जयाचें तूं पाळिसी वचन ॥ जंव मी बाळक येई निरवून ॥ तंव रक्षीं गा ॥६२॥
आणिक बुद्धि आठवली ॥ मनीं कृष्णमाउली स्मरली ॥ तेणें मोहनी असे पडली ॥ तया बाणा ॥६३॥
प्रभावती ह्मणे बाणा ॥ तुज आज्ञा नारदाची जाणा ॥ तरी वध न करावा प्राणा ॥ या बाळकाचे ॥६४॥
नारद त्रैलोकींचें दैवत ॥ जयासी हरिहर मानित ॥ तयाची आण घालितां सत्य ॥ मग तो करील काय ॥६५॥
बाण आज्ञेतें प्रतिपाळी ॥ परि आणिक मंदिरें घांडोळी ॥ तंव ते आली संकटवेळीं ॥ कुंतीप्रती ॥६६॥
न कळतां पांडवा सकळां ॥ पुत्र घातला कुंतीगळां ॥ ह्मणे राखा जी या बाळा ॥ तुमचा नातु ॥६७॥
प्रभावती विनती भावें ॥ ह्मणें मी जाईन पतिसवें ॥ हें बाळक प्रतिपाळावें ॥ कृपादृष्टीं ॥६८॥
ऐसें जव ती बोलत ॥ तंव बाण उठिला धुंधुवात ॥ मग ते काकुळती येत ॥ प्रभावती पैं ॥६९॥
तयेसि कुंती पुसे वचनें ॥ येरी ह्मणे पार्थाचें कोपणें ॥ मग बाणासी कुंती ह्मणे ॥ कोपोनियां ॥७०॥
पार्थ कुंतीचे लेंकरूं ॥ असोनि न चाले प्रतिकारु ॥ काय करील त्याचा शरू ॥ ऐकोनि बाण परतला ॥७१॥
संतोषल्या दोघीजणी ॥ बाळका वज्रर्पिजरा करोनी ॥ प्रभावती गेली रवि स्मरोनी ॥ अग्निकाष्ठेंसीं ॥७२॥
पुढें कोणे येके अवसरीं ॥ भीम आला कुंतीमंदिरीं ॥ तो कुंतीसी पुसे उत्तरीं ॥ पैल काय हें ॥७३॥
येरी ह्मणे पुत्रराया ॥ पोषिलासे वेळ गमाया ॥ भीमा गेला वेळे तया ॥ तेथूनि पें ॥७४॥
ऐसीं अकरावर्षे जाहलीं ॥ बारावियाची छाया पडली ॥ तंव काय बुद्धि आठवली ॥ तया बाळकासी ॥७५॥
मग मातेसि बोलिला ॥ कीं मज काढीं हो वहिंला ॥ किती दिवस रक्षिसी मजला ॥ पंचरामाजी ॥७६॥
कुंतीमाता ह्मणे मनीं ॥ भीमार्जुन देखतील नयनीं ॥ ह्मणवोनि केली तुज पळणी ॥ पुत्रराया ॥७७॥
तो ह्मणे काय भिऊन ॥ ललाटीं लिहिलें जें जाण ॥ तें न चुके निर्वाण ॥ भोगिल्याविना ॥७८॥
मग तो बाहेर निघाला ॥ तंव नारद तेथें पातला॥ तेणें पुत्र दृष्टीं देखिला ॥ पुसे कुंतीसी ॥७९॥
हा पुत्र कोणाचा तुजपाशीं ॥ येरी ह्मणे कर्णाचा परियेसीं ॥ मग घातला चरणासी ॥ वृषिकेत तो ॥८०॥
तंव नारद संतोषोनी ॥ आशीर्वाद दिला वचनीं ॥ ह्मणे विजयी होई रणीं ॥ शिरी हात ठेविला ॥८१॥
नारद निघाला तेथूनी ॥ तंव द्रौपदी आली तेच क्षणीं ॥ परि भय वाटलें देखोनी ॥ कुंतीमाते ॥८२॥
द्रौपदी ह्मणे हें कोणाचें लेंकरूं ॥ येरी ह्मणे कर्णाचा कुमरु ॥ मग मांडिये बैसवूनि आदरू ॥ करी द्रौपदी ॥८३॥
खोंपांहूनि धनुष्य काढिलें ॥ तें वृषकेतासि अर्पिलें ॥ जें द्रुपदें होतें दीघलें ॥ आंदण देखां ॥८४॥
त्याचीं सर्वांगें स्पर्शोनी ॥ ह्मणे विजयी होई बा रणीं ॥ मग निघाली तेथूनी ॥ द्रौपदी ते ॥८५॥
तंव कुंती विचारी मनीं ॥ कीं यासी विद्या होय कैसेनी ॥ ह्मणोनि स्मरिला दिनमणी ॥ तये वेळीं ॥८६॥
पूर्वी दुर्वासें मंत्र दीधला ॥ जये मंत्रें कर्ण जाहला ॥ त्याचा मंत्रें सतीनें स्मीरला ॥ दिनकरू पैं ॥८७॥
तंव तो तत्काळ उभा ठाकला ॥ ह्मणे कां वो हुंकार केला ॥ मग येरीनें पुत्र घातला ॥ चरणावरी ॥८८॥
त्यासीं कुंती सांगे सकळ ॥ हें कर्णाचें वाचलें बाळ ॥ तेव्हां देव सांगे सकळ ॥ शस्त्र विद्या ॥८९॥
आणिक बोलिला सविता ॥ माझें स्मरण करीं सर्वथा ॥ तेणें मी असेन तत्वता ॥ तुजपासीं वत्सा ॥९०॥
ऐसा विद्यावरु लाधला ॥ तंव कुंतीनें विचार केला ॥ मग गुप्तहेर पाठविला ॥ धर्माजवळी ॥९१॥
हेर जावोनि आला पालथी ॥ तो सांगतसे कुंतीप्रती ॥ कीं पांचही बैसले एकांतीं ॥ अश्र्वमेघकारणें ॥९२॥
मग पुत्र घेवोनि कडियेसी ॥ भेटली येवोनि पांचासी ॥ तंव धर्म पुसे मातेसी ॥ कीं हें बाळक कोणाचें ॥९३॥
तंव कुंती ह्मणे धर्मासी ॥ बारे जरी अभय देसी ॥ तरीच मी सांगेन तुजसे ॥ कथा याची ॥९४॥
असो इतुकें जंव वर्तलें ॥ तंव वृषकेतें मातेसि बोलिलें ॥ कीं जेणें मम पित्यासि मारिलें ॥ तो दाखवीं मज ॥९५॥
ऐकतां मातेनें दडविला ॥ ह्मणे बारे राहें उगला ॥ भीमपार्थ ऐकती या शब्दाला ॥ मग न चाले कांहीं ॥९६॥
तंव येरू तयेसि ह्मणे ॥ म्यां पुसिलें याचि कारणें ॥ कीं भ्रात्यांसि अंतर देणें ॥ हें अयोग्य ॥९७॥
जेणें धर्मासि अंतर दीजे ॥ आणि वैरियां मिळिजे ॥ तेणें राज्य कैसें कीजे ॥ चिरकाळ पै ॥९८॥
जेणें धर्मभ्रातें वंचिले ॥ त्या कर्णासि भलें मारिलें ॥ आतां पार्थासि दावी वहिलें ॥ कुंतीमाते ॥९९॥
तंव येरीनें अर्जुन दाविला ॥ धर्माचे वामभागीं बैसला ॥ आणि दक्षिणभागीं मिरवला ॥ भीमसेन तो ॥१००॥
दोंहींबाहीं नकुळ सहदेवो ॥ तया माझारी धर्म रावो ॥ मग धर्माचे धरोनि पावो ॥ भेटला तो ॥१॥
तो भेटला पांचाजणां ॥ धर्में मांडीवरी घेतला जाणां ॥ आणि मातेसि करी प्रश्र्ना ॥ युधिष्ठिर तो ॥२॥
येरी ह्मणे कर्णाचा तान्हुला ॥ तरी वज्रबाणें कैसा वांचला ॥ कुंतीनें वृत्तांत सांगितला ॥ प्रभावतीचा ॥३॥
ऐसा वृत्तांत परिसिला ॥ तंव धर्म फार गहिंवरला ॥ प्रेमें हृदयीं आलिंगिला ॥ वृषकेत तो ॥४॥
ह्मणे थोर उत्साह जाहला ॥ आह्मीं अश्र्वमेध मांडिला ॥ आतां हा आह्मां सौंगडा झाला ॥ कर्णपुत्र ॥५॥
मग जाहलें वाघावणें ॥ घरोघरीं गुढिया तोरणें ॥ आणि दीघलीं वस्त्राभरणें ॥ कर्णसुतासी ॥६॥
मुनी ह्मणे गा भूपती ॥ वृषकेत वाचला ऐशारीती ॥ हे सूर्यदेवाची संतती । आणिक असे ॥७॥
हे महाभारतींची वाणी ॥ संस्कृतमतें जयमिनी ॥ जन्मेजया सत्य मानीं ॥ माझिये वचनें ॥८॥
मागुती ह्मणे मुनीश्र्वर ॥ राया ऐक पां विचार ॥ सूर्यासि जाहला आणिक कुमर ॥सुग्रीव नामें ॥९॥
ऐकोनि ह्मणे जन्मेजयो ॥ वाळी सुग्रीवांचा कैसा उद्भवो ॥ हा फेडावा संदेहो ॥ माझे मनींचा ॥११०॥
मुनि ह्मणे गा भारता ॥ वाळी सुग्रीव जन्मवार्ता ॥ हे रामायणींची कथा ॥ परिसें तूं गा ॥११॥
तरी विरिंचिनेत्रांपांसुन ॥ वानरांचें जन्मस्थान ॥ आतां तें सर्व मूळकथन ॥ अवधारीं पां ॥१२॥
ब्रह्मा आपुलिये आसनीं ॥ बैसला होता सचिंतमनीं ॥ तंव अश्रु पडले नेत्रीहुनी ॥ ते रक्षिले हातें ॥१३॥
कांहीं नेत्रजळ पडतां धरणीं ॥ वानर जन्मला तत्क्षणीं ॥ त्यासी माता पिता दोनी ॥ ब्रह्माचि असे ॥१४॥
तो विरंचीचा पढियंता ॥ लडिवाळपणें आवडता ॥ त्यासि प्रतिपाळी नियंता ॥ फळींमूळीं ॥१५॥
तो ब्रह्मयाचे आसनासी ॥ नृत्य करी विनोदेंसीं ॥ नृत्यांगनागोवूनि पूच्छीं ॥ एकाएकीं पाडीत ॥१६॥
मागुती उडोनि बैसे शिराशीं ॥ वांकुल्या दावी देवांसी ॥ तेणें आनंद ब्रह्मयासी ॥ अतिप्रीतीं ॥१७॥
जैसें पोटीचें लडिवाळ ॥ तैसें पुरवी त्याचें कोड ॥ त्याचा विनोद वाटे गोड ॥ कौतुकें करोनी ॥१८॥
ऋक्षराज ठेवोनि नांव ॥ ब्रह्मा पाळीतसे वैभवा ॥ तंव येक वर्तलें अपूर्व ॥ तें ऐकावें पैं ॥१९॥
वनीं विचरे अहर्निशी ॥ नित्य येई विरिंचीपाशीं ॥ येकायेकीं खांडमिशीसी ॥ चुंबन करी चारीमुखां ॥१२०॥
असो मग कोणे येके दिवशीं ॥ सांडुनियां सत्यलोकासी ॥ स्वेच्छें गेली कैलासासी ॥ ऋक्षराज तो ॥२१॥
तंव तये कैलास प्रदेशीं ॥ उमाशापबद्ध सरोवरासी ॥ स्नान घडतां वानरासी ॥ पावला स्त्रीवेष ॥२२॥
निर्मळ जळ उमावनीं ॥ एकदां तेथें शिवभवानी ॥ जलक्रीडा करिती दोनी ॥ अतिउल्हासें ॥२३॥
इतुक्यांत तये स्थानासी ॥ स्नानासि आले महाऋषी ॥ तंव उमा लाजिन्नली त्यांसी ॥ मग जाहली जळी गुप्त ॥२४॥
परि उमा क्रोधें बोले वचन ॥ कीं येक शिव वेगळा करुन ॥ जो नर येथें करील स्नान ॥ तो स्त्रीहोईल तत्काळ ॥२५॥
ऐसा ऐकोनि शाप दारुण ॥ कोणीही न करिती आचमन ॥ ऋषी पळाले आपण ॥ सरोवरीचे ॥२६॥
तंव ऋक्षरायें आपणासी ॥ श्रृंगार करूनि सुमनेंसीं ॥ सरोवरीं आला तंव रूपासी ॥ देखिले आंत ॥२७॥
ह्मणे माझा मुख्य वैरी ॥ राहिला या सरोवरीं ॥ मज ऐसाच मातला मजवरी ॥ याची बोहरी करीन मी ॥२८॥
ऐशी निजबळाची थोरी ॥ साटोपें धरूनि शरीरीं ॥ मग परमावेशें त्या सरोवरीं ॥ उडी घालित ॥२९॥
अति क्रोधें वाहूनि दृष्टी ॥ वळूनियां पुच्छवेंटी ॥ उगारोनी वज्रमुष्टी ॥ पडला उदकीं ॥१३०॥
सरोवरीं उडी घालितां ॥ वैरी न लागे पैं हाता ॥ मग वेंगे बाहेरि निघतां ॥ मुकला पुरुषपणासी ॥३१॥
लोपलासे पुरुषभाव ॥ आलेस्तनादि अवयव ॥ नयनकटाक्ष हावभाव ॥ आले स्त्रीरूपाचे ॥३२॥
ते परम सुंदर देखोनि कांता ॥ कामें भुलला ॥ असे सविता ॥ आणि उपजला सुरनांथा ॥ अत्यंत काम ॥३३॥
जरी ऋक्षराजासि जाण ॥ स्त्रीतत्व बाणलें होतें पूर्ण ॥ तरी स्त्रीपणाची आठवण ॥ न स्फुरे त्यासे ॥३४॥
ते देखोनि अतिसुंदर ॥ वेग केला सूर्यदेवेंद्री ॥ म्ग्स घाविन्न्ले कामाभिचारी ॥ तंव तो पळे ऋक्षराज ॥३५॥
सांगावया विरिंची जवळी ॥ वानर पळे भूमंडळीं ॥ तंव शक्रसूर्य अंतराळीं ॥ काममेळीं धांवती ॥३६॥
परि न होता संगासी ॥ तये कामांचे आवेशीं ॥ वीर्यद्रव जाहला दोघांसी ॥ काममेळें ॥३७॥
संस्कृतभाषा ॥ विख्यात ॥ केशां नामें वाल ह्मणत ॥ इंद्र्वीर्य पडलें तेथ ॥ वालाग्रांवरी अमोघ ॥३८॥
तेणें मस्तकीं महाबळी ॥ जन्म पावला वालमेळीं ॥ त्या नाम ठेविलें वाळी ॥ वानर बळिया ॥३९॥
काय पडिलें मस्तकावरी ॥ ह्मणोनि पाहिलें जंव वरी ॥ तंव सूर्यवीर्य कंठावरी ॥ पाडिलें देखा ॥१४०॥
ग्रीवेमाजी जन्मसंभव ॥ यालागीं नाम सुग्रीव ॥ ऐसें दोघांचें जन्मलाघव ॥ सांगितलें राया ॥४१॥
तरी ऐकें गा भूपती ॥ सुग्रीवाची ऐशी उप्तत्ती ॥ हेही सुर्यदेवाची संतती ॥ कथिली तुज ॥४२॥
हे रामायणींची वाणी ॥ वाल्मिकोक्त संस्कृतवचनीं ॥ ते श्रोतयां लागुनी ॥ केली प्रकृत ॥४३॥
तरी सूर्यदेवाची संतती ॥ ऐशी असे गा भूपती ॥ तंव पुशी आठवली चित्तीं ॥ जन्मेजयाचे ॥४४॥
आतां याचिये पुढील कथा ॥ ऋषि सांगेल भारता ॥ ते ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥४५॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ सूर्यसंततीकथनप्रकारू ॥ नवमाऽध्यायीं कथियेला ॥१४६॥
॥ शुभंभवतु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके नवमोऽध्यायः समाप्तः ॥