॥श्रीगणेशाय नमः ॥
मुनि ह्मणे राया अवधारीं ॥ सरस्वतीपुरामाझारी ॥ वीरवर्मा महाक्षेत्री ॥ होती पुण्यश्र्लोक ॥१॥
त्यासी सदा धर्मचिंता ॥ द्रव्य जोडी धर्मार्जिता ॥ नीतिमार्गाविणें सर्वथा ॥ नेणे काहीं ॥२॥
ऐसें तयासि राज्य करितां ॥ येकी कन्या जाहली तत्वतां ॥ ते स्वरूपें आथिली गुणवंता ॥ मालती नामें ॥३॥
चंद्राऐसें मुखकमळ ॥ ब्रह्मरसाचा ठसा केवळ ॥ उत्तमांगें अति निर्मळ ॥ रचिलें स्त्रीरत्न ॥४॥
ते अवयवीं दाटली थोर ॥ गृहीं नोवरी उपवर ॥ ह्मणोनि राव पाहे वर ॥ तिये योग्य ॥५॥
असो कोणे येके दिवशीं ॥ पिता पुसे कन्येसी ॥ कीं कोणता वर तुझे मानसीं ॥ येतसे कन्ये ॥६॥
तंव ते बोले मधुरस्वरें ॥ मी मनुष्य न वरीं निर्धारें ॥ हें पार्थिवशरीर असे खरें ॥ नाशिवंत ॥७॥
जो नाशिवंत तो काय करूं ॥ ऐसा मानींचा निर्धारू ॥ तंव बोलिला नृपवरू ॥ कन्येलागीं ॥८॥
तरी सूर्यवंशीं महाख्याती ॥ धर्मरावो अधिपती ॥ तोचि येक असे पती ॥ तुजसी योग्य ॥९॥
ऐसें जंव बोलिला भूपती ॥ तंव आनंद पावली मालती ॥ मग पुसती जाहली सती ॥ पितयालागीं ॥१०॥
त्यासी अधिकार कासयाची ॥ आणि आचारू पावली मालती ॥ मग निर्धार स्वमनींचा ॥ सांगेन ताता ॥११॥
तयेसि वीरवर्मा बोलत ॥ कीं हें समस्त भूतजात ॥ त्यासी कर्मानुसारें दंड करित ॥ तो यमरावो ॥१२॥
कन्या ह्मणे भलें जाहलें ॥ हें समस्त भूतजात मेळें ॥ त्यासी यमें जरी दंडिलें ॥ तरी तोचि वरीन ॥१३॥
मजसी हाचि व्हावा नवरा ॥ आणिक दुजा नये विचारा ॥ ऐकतां सुख जाहलें नृपवरा ॥ तिचेनि बोलें ॥१४॥
पुनःविनवी मालती ॥ जे मनुष्यदेह नाशिती ॥ ते यमसदनाप्रति जाती ॥ आणि तो दंडी समस्तां कीं ॥१५॥
तरी मी पतिव्रता चांग ॥ आणिकाचा न करीं संग ॥ जेणें व्रताचा होय भंग ॥ तो संबंध अयुक्त पैं ॥१६॥
आतां मज येकचि प्राणप्रियो ॥ दुजा कायसा पैं भावो ॥ पिता ह्मणे हा दृढ उपावो ॥ या सतीचा ॥१७॥
मग पितयानें स्तुति केली ॥ कन्येसि यमश्रुंति उपदेशिली ॥ येरी यमातें स्मरों लागली ॥ मंत्रानुष्ठानें ॥१८॥
ऐसे बहुत दिवस जाहले ॥ मग तें नारदासि कळलें ॥ तेणें यमासि सांगीतलें ॥ तप मालतींचे ॥१९॥
तंव यमरायें सिंहासनीं ॥ बैसविला तो महामुनी ॥ ह्मणे ते कोणाची कोण दुरोनी ॥ स्मरे आह्मां ॥२०॥
मुनि ह्मणे सरस्वती पुरीं ॥ वरिवर्मा रावो अवधारीं ॥ धार्मिक असे निरंतरीं ॥ विष्णुभक्त ॥२१॥
त्याची मालती नामें कन्या ॥ महासुंदरा सतिमान्या ॥ ते तुम्हां वांचोनि कोणा ॥ न वरी नेमें ॥२२॥
तुमचे तयेनें पुसिले गूण ॥ तेणें वेधलें तिचें मन ॥ आणिक नाहीं अनुमान ॥ तुह्मांवांचोनी ॥२३॥
तंव यमराव हर्षे बोले ॥ हें बरवें गा सांगीतलें ॥ तयेचें तप सिद्धीस गेलें ॥ आतां वरणें आह्मांसी ॥२४॥
ऐसें लग्न निर्धारुनी ॥ नारद निघाला तेथुनी ॥ येतां बैसविला आसनीं ॥ वीरवर्मा याणें ॥२५॥
नारदें रायासि सांगितलें ॥ कीं म्यां धर्माचे मनासि आणिलें ॥ लग्न निश्र्चयें विचारिलें ॥ वैशाखशुद्ध द्वादशीसी ॥२६॥
तेणें संतोषला वीरवर्मा ॥ मग प्रवर्तला साहित्यकर्मा ॥ आइती मांडिली उत्तमा ॥ नानापरींची ॥२७॥
हेमअळंकारमिश्रित ॥ बहुमूल्य रत्नखचित ॥ वस्त्रें विविध बहुत ॥ नानारंगी ॥२८॥
इकडे यमें काय केलें ॥ प्रधान सकळ बोलाविले ॥ मग तयांसी सांगीतलें ॥ लग्नविचारासी ॥२९॥
कीं मृत्युलोकीं सरस्वतनिगरी ॥ तेथें वीरवर्मा राज्य करी ॥ त्याची कन्या वरणें नोवरी ॥ आह्मासि पैं ॥३०॥
ऐसें सांगतां सविस्तर ॥ अष्टोत्तरशत प्रधान परिकर ॥ यमासि बोलिले उत्तर ॥ सिंधुपुत्र ते ।३१॥
त्यांतील वडील प्रधान ह्मणे ॥ तेथें आह्मां न घडे जाणें ॥ तें नगर सबळ धर्मगुणें ॥ आह्मां तिथे ठाव कैंचा ॥३२॥
मागुती सर्व वृतांत ॥ धर्में कथिल यथार्थ ॥ तरी ह्मणती न येववे तेथ ॥ पुण्यठाया ॥३३॥
तेथें असती पुण्यपुरुष ॥ मग आह्मा कैंचा वास ॥ गेलिया पडती सायास ॥ तुम्हांलांगी ॥३४॥
तंव आक्षेप करी नृपवर ॥ कैसे सिंधूसि जाहले कुमर ॥ आणि त्यांहि यमासि विचार ॥ कथिल कैसा ॥३५॥
मुने तरी हे मूळकथा ॥ श्रुत करीं गा समस्ता ॥ ऐकोनि जाहला बोलता ॥ वैशंपायन ॥३६॥
ह्मणे कोणे येके अवसरीं ॥ समुद्र मथिला सुरासुरीं ॥ रत्नें निघालीं ते कुसरी ॥ असो आतां ॥३७॥
परि मागुता मंथिला उदघी ॥ तंव अष्टोत्तरशत निघाल्या व्याधी ॥ आणि तैशाच दिव्यौषधी ॥ निघाल्या पैं ॥३८॥
राया मग त्या दिव्यऔषधी ॥ स्वयें घेतल्या अश्र्विनौवद्धीं ॥ तंव येर विनविती व्याधी ॥ राहोनि उभ्या ॥३९॥
व्याधी ह्मणती आह्मांसि ठावो ॥ वळंघितो कोण रावो ॥ याचा सांगा जी उपावो ॥ सकळ आह्मां ॥४०॥
मग मोळोनियां समस्तीं ॥ प्रार्थिला तो दक्षिणपती ॥ त्यासी व्याधीं देवोनि विनंती ॥ करिते जाहले ॥४१॥
कीं द्या व्याधीं सर्वजण ॥ तुजसी होतील गा प्रधान ॥ आणि सर्वदेहीं जाण ॥ स्थान यांसी ॥४२॥
तेचि हे प्रधान बहुवस ॥ प्राप्त जाहले धर्मरायास ॥ तयां धर्म सांगे वचनांश ॥ वर्हाडिकेचा ॥४३॥
वडील प्रधान रोजराजु ॥ तया नाम यक्ष्मराजु ॥ त्यासी यम ह्माणे उजु ॥ करीं प्रयाण ॥४४॥
येरु ह्मणे जी धर्मराया ॥ विनंती परियेसीं स्वामिया ॥ तेथें नेतां कासया ॥ आह्मालागीं ॥४५॥
घरोघरीं देवस्मरणें ॥ ठाईठाई तुळसीवृंदावनें ॥ रात्रंदिवस वेदपठणें ॥ गर्जे नभ ॥४६॥
धर्म यज्ञ हुताशन बहुवस ॥ तेथें आह्मी न करावा वास ॥ जेथें वैष्णव आसमास ॥ कीर्तनें करिती ॥४७॥
तेथें वस्ती कैंची आह्मां ॥ चहूं चरणीं नांदणूक धर्मा ॥ घरोघरींच्या संम्रमा ॥ आह्मी कैसें जाइजे ॥४८॥
आणि प्रमेह पुत्र देख ॥ तया वस्ती नाहीं सम्यक ॥ आणि शूळाची स्त्री विषूचि शेष ॥ प्राणांतकाळींची ॥४९॥
पांडूरोग पुत्र कारण ॥ त्यासी तेथें कैसें स्थान ॥ त्याची भार्या विचक्षण ॥ करील शोक ॥५०॥
तयेचा सुत जळोदर ॥ तयासि कोठें ठाणांतर ॥ जेथें लोक परमपवित्र ॥ तेथें आह्मां गमन कैसें ॥५१॥
ऐसे व्याधी अष्टोत्तरशत ॥ प्रमाणरूपें बोलती शांत ॥ सकळ वर्णीन तरी ग्रंथ ॥ वाढेल राया ॥५२॥
असो यांची निरसनरीती ॥ कर्म धारणा दानस्थिती ॥ ते ऐक गा भूपती ॥ देवूनि चित्त ॥५३॥
जे गुरुसि भेटती रिक्तहस्तें ॥ विन्मुख दवडिती अत्तीतातें ॥ अव्हेरूनि पाहती निरुतें ॥ तयां रोग जाचिती ॥५४॥
वर्णभार्या व्याभिचारिका ॥ तयां भगदरु होय निका ॥ गुरुतल्पग नरां देखा ॥ मूळव्याधी निश्र्वयें ॥५५॥
जये नगरीं ऐसी स्थिती ॥ छायागुरू नष्ट संगती ॥ गुरुसि परमपूज्य न मानिती ॥ गर्वभावे ॥५६॥
ते धनप्रिय जाणावे लोक ॥ तैसा वीरवर्मा नव्हे देख ॥ तरी ह पोटराज येक ॥ येणें कोठें बैसावें ॥५७॥
ह्मणोनि राजकुळदीपका ॥ तेथें गेलिया रोगअनीका ॥ कदाकाळीं न पडे सुखा ॥ पुण्यश्र्लोकांमाजी ॥५८॥
हे तरी सन्निपात तेरा ॥ तुझे गुरुनें केले दातार ॥ येकी जरा अतिसारा ॥ यांच्या परिवारा कोण ठावो ॥५९॥
तयांमाजी संग्रहणी प्रिया ॥ तयेसि तिघे पुत्र गा राया ॥ अरोचक कफ प्राणिया ॥ कफ प्राणिया ॥ धनुर्वात जीवघातीं ॥६०॥
यांसी तेथें स्थान मिळेना ॥ कीं शूळ विषूची विलक्षणा ॥ या धर्मनगरीं बलहीना ॥ होतील पैं ॥६१॥
हिक्का श्वास कुष्ठादिकां ॥ रोगां बळियां अनेकां ॥ तये नगरीं नये सुखा ॥ पुण्यश्र्लोकांमाजी ॥६२॥
धनुर्वात असती विविध ॥ कर्णमूळ व्याधी प्रसद्ध ॥ नेत्ररोगादि बहुविध ॥ मुखरोग शिरोव्यथा ॥६३॥
अरक्षिक गंडमाळा ॥ तैसेंचि अपस्मारां सकळां ॥ डवरा वमी खळाळा ॥ मुखें करूनी ॥६४॥
ऐसे सर्व रोग परियेसीं ॥ तेथें कैसी वस्ती यांसी ॥ आतां जरी आज्ञा देसी ॥ तरी ब्रह्मीं प्रवेशों ॥६५॥
मग बोले संयमिनीपती ॥ तुह्मी सर्व श्रृंगारा बहुतीं ॥ जैसी माझे नगरीं वस्ती ॥ तैसेंचि तेथें मानावें ॥६६॥
जे प्राणी दुष्कर्में करिती ॥ ते तुह्मां रोगरूप दिसती ॥ तेचि तुमचे क्केश भोगिती ॥ येरां तुह्मी समत्वें ॥६७॥
पहा कीं माझी प्रतीती ॥ जे मज पापदृष्टीं विलोकिती ॥ ते काळानळा परि देखती ॥ येरां मी पुण्यरूप ॥६८॥
जे पापकर्में करिती ॥ ते तुह्मां रोगरूप देखती ॥ आणि जे पुण्यपुरुष असती ॥ त्यासी तुह्मी सुखरूप ॥६९॥
ज्यासी ब्रह्महत्या सहज ॥ तेथें राहिजे रोग राज ॥ त्यासी प्रतीकार असे गुज ॥ रुद्राअनुष्ठानाचा ॥७०॥
मृत्युंजयमंत्र कल्पांतभद्र ॥ आचरितां तुष्टे महारुद्र ॥ द्वादशवर्षें परिकर ॥ सेविलिया पुरुषा ॥७१॥
ऐसा करिती जे आचार ॥ तेथूनि सोडावें बिढार ॥ आणिक सांगतों परिकर ॥ तें ऐका आतां ॥७२॥
पढती शास्त्रवेदाध्ययन ॥ अनेक व्रतें गंगास्नान ॥ त्यांचे तुह्मी सेवक होवोन ॥ द्वारीं राहावें तिष्ठत ॥७३॥
जो द्रव्य हरी परावें ॥ तुझे स्त्रियेनें तेथें असावें ॥ सर्वस्व होवोनि वसावें ॥ स्वार्थालागीं ॥७४॥
जो स्वजनीं वंचोनि भोजन करी ॥ कीं द्दिज जेवितां क्रोध धरी ॥ तेथें राहो तुझी अंतुरी ॥ तिसी निर्वाण ऐक पां ॥७५॥
जे नर नानापक्कान्नें ॥ द्विजांसि देती येकमनें ॥ तेथें तुझे प्रियेनें रा हाणें ॥ न कीजे सत्य ॥७६॥
जे स्वगोत्रींच्या कन्या भोगिती ॥ तेथें प्रियेनें करावी वस्ती ॥ जे सुवर्ण चोरोनि नेती ॥ त्यासी होय मूत्रकृच्छ्र ॥७७॥
देवासि सुवर्णवाल देती ॥ पलप्रमाण द्विजासि अर्पिती ॥ तेथें कदा न करावी वस्ती ॥ महारोगें ॥७८॥
पलप्रमाण सुवर्णकमळा ॥ ब्राह्मणा अर्पिती निर्मळा ॥ तेथें मूत्रकृच्छ्रादि सकळां ॥ नाहीं ठावो ॥७९॥
जे लिंगभेदी हरिती अलंकार ॥ प्रतिष्ठा दुसरियाची थोर ॥ तरी तयातें देखोनि नर ॥ करिती खंतीं ॥८०॥
तेथें या पंडुरोगासि स्थान ॥ परि निवारणीं ऐका विधान ॥ तेणें कीजे महिषीदान ॥ आणि शर्करापाणी ॥८१॥
आणि अश्र्विनी सुमनमंडित ॥ द्विजासि देती आर्तभूत ॥ त्यासी होय अल्पकाळांत ॥ मोचन पैं ॥८२॥
ऐसिया दानें करूनी ॥ तेथील वस्ती टाकिजे पंडूनीं ॥ नातारी बंधु आणि जननी ॥ पावती मृत्य ॥८३॥
जे ब्राह्मणां अजाजिनें देती ॥ तेथें सोफसि नाहीं वस्ती ॥ त्यांची सहजें होय निष्कृती ॥ शोकापासुनी ॥८४॥
आतां गर्भपाताच्या ठायीं ॥ जलोदरासि वस्ती पाहीं ॥ प्रतीकार कीजे उदकपोई ॥ अथवा तुळभार ॥८५॥
ऐसे आचरती जे नर ॥ मग त्यां कैसें जळोदर ॥ पुढती ऐकें उत्तर ॥ निश्र्वयाचें ॥८६॥
द्विज पूजिती अष्टोत्तरशतीं ॥ पापिया घरीं नसे वस्ती ॥ नातरी अर्धप्रसूति गौ देती ॥ तरी वर्णें नि घावें तेथूनी ॥८७॥
विषूचिका जयाचे शरीरीं ॥ तो जरी सुवर्णदान करी ॥ तरी तेथोनि निघिजे सुंदरी ॥ भयास्तव ॥८८॥
द्विजां अर्पिती रंभाफळें ॥ आणिकही नानारसाळें ॥ मग गर्भपात तेथूनि पळे ॥ समूळेंशी ॥८९॥
जे करिती विश्र्वासघातका ॥ तेथें वस्ती सन्निपातादिकां ॥ आणि रोगां अष्टपंचकां ॥ प्रौढीमत ॥९०॥
जे निर्मिती देवस्थान ॥ शिवप्रसांद उभवून ॥ मग निघावें तेथून ॥ सन्निपातें ॥९१॥
जो पूर्वीच्या मूर्तीभेदी ॥ दुसर्या मूर्तीं ठेवूं नेदी ॥ तया होय अतिसारव्याधी ॥ निरंतर ॥९२॥
परि रोगाचा निरसर विधी ॥ कीं निर्धार करी प्रसादीं ॥ मग तेथें नहोय व्याधी ॥ कदाकाळीं ॥९३॥
जो अधर्में द्रव्य मेळवीत ॥ अभिलाषें ॥ परस्त्रीठायीं चित्त ॥ तरी संग्रहणीं राहे तेथ ॥ त्यासी महिषीदानें निवृत्ती ॥९४॥
आणि अतिसारें निघावें ॥ महापुण्य दोखोनि जीवें ॥ रोगप्राय भजे भावें ॥ तया पृथ्वीदानें मोक्ष ॥९५॥
द्विजें जेवितां धरी दुःख ॥ तेथें रावो अरोचक ॥ दीधल्या नानाअन्नोदक ॥ तेथें वस्ती त्या नाहीं ॥९६॥
आमशूळादि दारुण ॥ त्यांचें तुज सांगों ज्ञान ॥ तरी सन्मानावे सज्जन ॥ सोयर्यांपरी ॥९७॥
जे सोयरियांसी मिष्टान्न इच्छिती ॥ परि वेळे येऊनि जे पडती ॥ त्याची आशा न पुरविती ॥ तयां होती शूळादिक ॥९८॥
जे धर्माचा अपमान करिती ॥ आतीं अतिताची न पुरविती ॥ नातरी निराशा करिती ॥ त्यांसी होती शुळ पैं ॥९९॥
पदीं पडलिया जे सोडविती ॥ कीं पाशींचे पक्षी उडविती ॥ मार्गी तस्करां पासोनि सोडविती ॥ ते होती शूळावेगळे ॥१००॥
जे वडिलांचें असत्य मानिती ॥ तेथें तिहीं राहावें निश्विती ॥ परि लक्षहोम जैं करिती ॥ तैं त्यांहीं निघावें ॥१॥
लक्ष होम केलिया जाण ॥ हिक्का निघावे तेथून ॥ जो न मानी सुचित देखोन ॥ धनुर्वाता वस्ती तेथें ॥२॥
माषमुद्रां तळीं वापी ॥ क्षोत्रियां द्विजां जो समपीं ॥ तेथे वस्ती नव्हे सोपी ॥ धनुर्वातासो ॥३॥
सादर नव्हती हरिकथे ॥ कर्णमुळें होती तेथें ॥ परि कपिलादान जालिया निरुतें ॥ न राहती तीं ॥४॥
जेथें होमहवन हरिकथा ॥ तेथें रोगीं नसावें सर्वथा ॥ जरी रहाल तरी प्राणघाता ॥ पावाल सत्य ॥५॥
निरंतर परवस्तु अवलोकी ॥ परकीयभोजें होय सुखी ॥ आणि परस्त्री अभिलाषी ॥ तयां होती नेत्ररोग ॥६॥
मग त्यां नाहीं अवलोकन ॥ सदा दुःखासि होय कारण ॥ तेथें सूर्य करी पीडण ॥ नेत्रतेजें ॥७॥
मग सालंकृत धेनु देऊन ॥ संतोपविती ब्राह्मण ॥ तेणें करूनि रोगनिरसन ॥ होय राया ॥८॥
जे वर्मचेष्टा वाढविती ॥ ते अपस्मारी जन्मती ॥ मग हेमकल्पद्रुम दान देती ॥ तेथे तेणें नसावें ॥९॥
जया दांभिकभक्ति निरंतर ॥ तया पोटफुगी अपार ॥ ऐशिया व्यथेसि उपचार ॥ येक असे गा ॥११०॥
सुवर्णमूति सालंकारा ॥ जे देती श्रोत्रियां विप्रां ॥ तैसीच राया हरिहरयात्रा ॥ करितां जाण ॥११॥
सुनेसि करी व्यभिचारू ॥ तो अभिचर्मक होय निर्धारू ॥ मग हंसतीर्थी स्त्रातां नरू ॥ व्यथा हरे तेणें ॥१२॥
विश्र्वासघातकां रोग होती ॥ परि ते सूर्यपूजनें जाती ॥ ऐसी होय हे प्राप्ती ॥ आणि निर्गती रोगां ॥१३॥
जे व्यथा तिचाचि उपावो ॥ हा सांगितला तुज भावो ॥ य़ेणें निरसे सर्व संदेहो ॥ श्रवणमात्रें ॥१४॥
हें श्रवण जाहलियावरी ॥ हृदयीं बैसे भयाची करी ॥ तेणें कंटाळोनि न करी ॥ दुष्कृत प्राणी ॥१५॥
जयमिनी ह्मणे गा भूपती ॥ हें यम सांगे रोगांप्रती ॥ तरी कर्मविपाकाची गती ॥ ऐशी असे ॥१६॥
ऐसा करोनि चावळ ॥ यमें दळ सज्जिलें सकळ ॥ वेगें आला तो भूपाळ ॥ सरस्वतीपुरा ॥१७॥
तंव वीरवर्मा आला सामोरा ॥ भेटी जाहली परस्परां ॥ मान देवोनि समग्रां ॥ दिधले जानिवसे ॥१८॥
वीरवर्मा राजा उत्तम ॥ तेणें मांडिला संभ्रम ॥ नीतिमार्गें दानधर्म ॥ अन्नउदक ॥१९॥
जरी सांगों सविस्तर लग्न ॥ तरी कथा वाढेल गहन ॥ आतां असे जें मुख्यार्थवचन ॥ तेंचि सांगो ॥१२०॥
मग चारींदिवस सोहळा ॥ उल्हास जाहला तये वेळां ॥ लेणीं लुगडीं दिलीं सकळां ॥ आणि पाठवणी ॥२१॥
राया मग तो दक्षिणापती ॥ सर्वे घेवोनि मालती ॥ निघोनि आला नगराप्रती ॥ सुमुहूर्तें पैं ॥२२॥
नगरीं जाहलें वाधावणें ॥ घरोघरीं गुढिया तोरणें ॥ वोहरां करिती अक्षयवाणें ॥ सुवासिनी ॥२३॥
तरी ऐसी गा भूपती ॥ पतिव्रता ते मालती सती ॥ तिची जाहली असे प्राप्ती ॥ यमरायासी ॥२४॥
आणि अष्टोत्तरशत व्याधी ॥ त्या सेवा करिती यथाविधी ॥ तैशाच वळंघती औषधी ॥ अश्र्विनौ देवां ॥२५॥
हे दोनी सूर्यदेवाचे नंदन ॥ योकें कीजे शिक्षा दंडपातन ॥ दुजेनें कीजे रोगशमन ॥ सकल शरीरां ॥२६॥
ऐसें हें मालतीआख्यान ॥ जया होय श्रवण पठण ॥ त्यासी भवभयाचें बंधन ॥ न बाधी कदा ॥२७॥
रोगराज आणि भूपती ॥ तैशीच पतिव्रता मालती ॥ यांची ऐकिलिया कीर्ती ॥ न बाधे कांहीं ॥२८॥
आतां याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तोचि सांगो सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥२९॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ यमविवाहकथनप्रकारू ॥ अष्टमोऽध्यायीं कथियेला ॥१३०॥
॥ श्रीरस्तु ॥
॥ इति श्रीकथाकअल्परौ षष्ठस्तबके अष्टमोऽध्यायः समाप्तः ॥