कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे राव भूपती ॥ काहीयेक आठवलें चित्तीं ॥ तरी दंडकारण्य ह्मणती ॥ काय निमित्तें ॥१॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ आतां राया ऐक वचन ॥ तें दंडकारण्याचें कथन ॥ सांगों तुज ॥२॥

जन्मे जया परियेसीं ॥ पूर्वी दंडकराजा दक्षिणदेशीं ॥ तो अतिगर्वित अहर्निशीं ॥ राज्यमदें उन्मत्त ॥३॥

असो पारधी खेळतां दंडकासी ॥ जो च्यवनाचा श्रृंग ऋषी ॥ तो अपमानिला गर्वेंसीं ॥ ह्मणोनिक तेणें शापिलें ॥४॥

दंडक मुनिशापें भस्म जाहला ॥ आणि सर्वही देश जळाला ॥ यास्तव ह्मणती त्या वनाला ॥ दंडकारण्य ॥५॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ कां अपमानिला ऋषिरावो ॥ हा फेडावा संदेहो ॥ माझिये मनींचा ॥६॥

ऐसें ऐकोनि ह्मणे मुनी ॥ ऐकें राया चूडामणी ॥ ऋषी अपमानिला तें कथनीं ॥ सांगों तुज ॥७॥

ऋषि स्नान करोनि येत होता ॥ तंव रावो भेटला अवचिता ॥ ऋषीतें ह्मणे सर परता ॥ तंव ऋषि ह्मणे तूंचि सर ॥८॥

ऐसें दोघे बोलतां तेथ ॥ अहंते पडिले गा बहुत ॥ राजा राज्यमदें उन्मत्त ॥ ॠषि उन्मत्त तपोबळें ॥९॥

ऐशी होतां होडिकनाडिक ॥ रायें हाणिला चाबुक ॥ ऋषीनेंही शापिलें देख ॥ रायासि पैं ॥१०॥

शाप दीघला कोपेंसीं ॥ कीं भस्म होवो रे सराज्येंसीं ॥ ऐसें बोलतां ऋषीसी ॥ रावो देशेंसीं भस्मला ॥११॥

विंध्याचळाचे दक्षिणदेशीं ॥ जंव पाविजे सेतुबंधासी ॥ राया इतुकिया प्रदेशासी ॥ दंडकारण्य बोलिजे ॥१२॥

असो ऋषिशाप होतां दारूण ॥ राजा भस्मला सहस्वजन ॥ आणि भस्मलें वृक्षवृण ॥ जळाले पक्षी ॥१३॥

भस्मले सरिता तडाग ॥ श्वापदे आणि वनमृग ॥ जळाले देश सवेग ॥ ऐसा शाप ऋषीचा ॥१४॥

ऋषीनें शापिला दंडक जाण ॥ शाप बाधें जाहलें वैराण ॥ ह्मणोनि ह्मणती दंडकारण्य ॥ सत्य राया ॥१५॥

आणिकही भार्गवशापभयेंसीं ॥ पर्जन्य न वर्षे तये देशीं ॥ न प्रकाशती रविशशी ॥ सदा अंधकार ॥१६॥

तंव राव ह्मणे हो ऋषी ॥ ऐसा विध्वंस होतां देशासी ॥ मग वस्ती तेथें जाहली कैशी ॥ तें सांगावें जी ॥१७॥

मुनि ह्मणे राया परियेसीं ॥ वसावया दंडकारण्यासी ॥ नारदें विनविलें मेरूसी ॥ आरंभी गा ॥१८॥

मग तो उंचावला मेरु ॥ तेणें त्रैलोक्या अंधकारु ॥ मेरूहुनि पर्वत थोरु ॥ नसे आणिक ॥१९॥

परि ते ऐकोनिया ख्याती ॥ मेरूसि मांडी स्पर्धास्थिती ॥ खंडूनिया रविशशिगती ॥ विध्याचळ वाढिन्नला ॥२०॥

तेणें राहिले श्र्वसोद्नार ॥ आणि धर्मकार्मांचे आचार ॥ राहिले जपतपविचार ॥ नुगवतां रविशशी ॥२१॥

लोपले स्वाहास्वधाकार ॥ निराश जाहले देवपितर ॥ भुकें तळमळती ऋषेश्वर ॥ संध्येविण ॥२२॥

गाई रानीं न चरती ॥ वत्से हंबरडे हाणिती ॥ आकांत मांडता त्रिजगतां ॥ सुर्याविणें ॥२३॥

ऋषी सकळ ब्रह्मयाप्रती ॥ अवघे जाऊनि गार्‍हाणें देती ॥ मग तिन्ही देव विचारिती ॥ कीं तेथें अगस्ती पाठवावा ॥२४॥

देव ह्मणती अगस्तीसी ॥ तुवां त्यजोनि वाराणसीसी ॥ दमावया विंध्याद्रीसी ॥ दक्षिणदिशे जाइजे ॥२५॥

नमवोनियां विंध्याद्री ॥ तो निजवावा भूमीवरी ॥ अहोरात्र वाहते करीं ॥ सूर्यचंद्र ॥२६॥

थोर पुण्य होईल ऋषी ॥ देवपितर पावती तृप्तीसी ॥ द्विज आचरती स्वधर्मासी ॥ तव‍उपकारें ॥२७॥

तुझें सामर्थ्य वानूं किती ॥ आचमनें प्राशिला अपापती ॥ विंध्याद्री बापुडें तें किती ॥ तरी उपकारा तुवां जावें ॥२८॥

पुनःन करी उत्थापन ॥ ऐसें त्यासी नमवून ॥ स्थापावे देव ऋषि ब्राह्मण ॥ दक्षिणदेशीं ॥२९॥

हें चन ॥ आणि नारदाचें अंतःकरण ॥ ऋषि निघाला तेथून ॥ दंडकारण्य वसवावया ॥३०॥

मुनि ह्मणेराया पारिक्षिती ॥ ऐकें अगस्तिगमनाची स्थिती ॥ ते अलोलिक वित्पत्ती ॥ सांगो तुज ॥३१॥

बीजें पर्जन्येंशीं मेघ ॥ सवें घेवोनियां अमोघ ॥ सुरकार्य साधावया चांग ॥ आला विंध्याद्रीसी ॥३२॥

ऐकें राया चूडामणी ॥ अगस्तीसि येतां देखोनी ॥ गिरि गेला लोटांगणीं ॥ पूजूनि पुसे ॥३३॥

जीजी कवणकार्या उत्तरेसी ॥ टाकोनियां वाराणसीसी ॥ को‍उता येथें आलासि ऋषि ॥ सांगिजे मज ॥३४॥

काय धरोनि अपेक्षेसी ॥ तुह्मी आलां मजपाशीं ॥ तें म्या दीधलें तुह्मासी ॥ भाष्यवचन ॥३५॥

मग ते उत्तरेची वार्ता ॥ अगस्ति सांगे पर्वता ॥ ह्मणे गा शैला तुज मी आतां ॥ सांगेन यथार्थ ॥३६॥

तरी ऐक गा तुझा प्रताप ॥ ऐकोनि मेरूसि आला कोप ॥ सुरां असुरां अति संताप ॥ तुझं रूप देखतां ॥३७॥

पाहतां पृथ्वीमाझारी ॥ विध्याद्री तुझी बहुत थोरी ॥ ते वानिजे सुरासुरीं ॥ कीं तुजसम नाहीं दुजा ॥३८॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ येरू उल्हासला आपण ॥ पुनःघाली लोटांगण ॥ चरणावरी मुनीचे ॥३९॥

ह्मणे तूं आलासि भाग्यकरी ॥ तरी हें गमन कोठवरी ॥ मजसी सांगें उत्तरीं ॥ ऐसें पुसिलें ॥४०॥

मुनि ह्मणे दक्षिणयात्राविधान ॥ करावया मी करितां गमन ॥ तरी मज देई पंथान ॥ शयन करूनी ॥४१॥

तुझी पाहतां देहथोरी ॥ वाढींव रविचंद्राउपरी ॥ मज न जाववे तेथवरी ॥ तरी निद्रा करीं आतां ॥४२॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ गिरीनें केलें भूमिशयन ॥ मुनि ह्मणे मी येईन दक्षिणेहून ॥ तंववरी उठों नको गा ॥४३॥

तेथवरी निजें गा पर्वता ॥ जंव तीर्थें करूनि येई मागुता ॥ ऐसी करोनि भाषणिकता ॥ गेला अगस्ती ॥४४॥

मग रविचंद्रा जाहली वाट ॥ देवाद्विजांचे चुकले कष्ट ॥ दिनमानही वाटे स्पष्ट ॥ मार्ग देतां विंध्याद्री ॥४५॥

ऋषींचे होतां आगमन ॥ श्रृंगशाप गेला पळोन ॥ देशीं वर्षो लागला घन ॥ तृणधान्यें वाढलीं ॥४६॥

येथें साक्षेपाचें कारण ॥ की न चुके कदा ब्रह्मवचन ॥ आणि अगस्तीचें तप गहन ॥ ह्मणोनियां सांवरिलें ॥४७॥

मग हिमाचळापाशीं ॥ मागीतलें सर्वबीजांसी ॥ तीं फोकिम्ता भूमीसी ॥ विरूढलें धान्य तृण ॥४८॥

वाहती नद्यांचे निर्मळ ओघ ॥ पद्मपूरीं प्रमत्त मृग ॥ पक्षिगणां व्याप्त अनंग ॥ गज गजींसी क्रिडती ॥४९॥

त्या अगस्तसिवेचें ऋषी ॥ ते जाहले दंडकारण्यवासी ॥ उत्तरेचिया आणूनि जनासी ॥ वसविला देश ॥५०॥

ह्मणोनि दक्षिणेच्या भूमिका ॥ जळोनि पांढर्‍या जाहल्या देखा ॥ परि उत्तरेसि भुमी देखा ॥ पांढरी नाहीं ॥५१॥

ऐसें दंडकशापें दंडकारण्य ॥ तुज सांगीतलें गा कथन ॥ हें भविष्योत्तरींचें कथन ॥ रामायणीं असे ॥५२॥

अगस्ति पुण्यें परिकर ॥ तेणें दंडकारण्य केलें पवित्र ॥ तैसाचि पुण्यवंत द्विजवर ॥ सुमंतु नामा ॥५३॥

जैसें जाहलें दंडकारण्यांत ॥ तैसेंचि आचरोनि पिठोराव्रत ॥ सुमंतु जाहला पुण्यवंत ॥ सत्य राया ॥५४॥

मुनि ह्मणे राया अवधारीं ॥ दंडकारण्य जाहलें यापरी ॥ जे कथा श्रवणमात्रे हरी ॥ महादुरितां ॥५५॥

तंव ह्मणें पारिक्षिती ॥ हें कळलें हा वेदमूर्ती ॥ परि आणिक येक चित्तीं ॥ आठवलें मज ॥५६॥

कीं श्रावणवद्य अमावास्येसी ॥ स्त्रिया आचरिती पिठोरीसी तरी ते कथा आहे कैसी ॥ सांगिजे मज ॥५७॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ परिसे राया तें वचन ॥ पूर्वी धर्मरायें हाचि प्रश्न ॥ केला होता कृष्णासी ॥५८॥

कीं मृतवत्सा ज्या असती ॥ त्यांचीं कवणेव्रतें बाळें वांचती ॥ तें सांगा जी श्रीपती ॥ विस्तारूनी ॥५९॥

ऐकोनि ह्मणे लक्ष्मीपती ॥ श्रावण‍अंवसेसि पिठोरा पूजिती ॥ त्यांची कल्याण होय संतती ॥ तंव धर्में मागुती आक्षेपिलें ॥६०॥

कीं पिठोरा ह्मणिजे काय ॥ आणि हें व्रत कैसें आहे ॥ पूर्वीं कोणीं केलें पाहें ॥ तें सांगिजे देवराया ॥६१॥

मग देव असे सांगत ॥ पूर्वी होता कृतयुगांत ॥ पवित्र द्विज नामें सुमत ॥ त्याची भार्या हेममालिनी ॥६२॥

तयेसि पुत्र असती सात ॥ परि ज्येष्ठसून सवत्समृत ॥ तयेचें नाम ह्मणत ॥ चंपा ऐसें ॥६३॥

प्रसुती होतां चंपसी ॥ बालक पावे मृत्युसी ॥ श्रावणवद्य अमावास्येसी ॥ होय ऐसें ॥६४॥

ऐसें जाहलें षटगर्भांसी ॥ मगा ते सातवे वेळेसी ॥ कलहो करूनि सासू तिसी ॥ घाली गृहाबाहेरी ॥६५॥

ते ह्मणे हा चांडाळिणी ॥ कैसी भेटलीस मजलागुनी ॥ माझिया बाळसि पापिणी ॥ नाहीं संतान तुझेनी ॥६६॥

ऐसें ह्मणोनि तयेसी ॥ बाहेर घातलें परियेसीं ॥ येरी रडत अरण्यासी ॥ चालिली पैं ॥६७॥

चंपा जाऊनि अरण्यांत ॥ बैसली असे शोक करित ॥ इतुक्यांतचि होतां प्रसूत ॥ जाहला पुत्र ॥६८॥

परि तो मेलाचि पडिला ॥ चेतना नाहीं तयाला ॥ ऐसें पाहतां तयेला ॥ दुःख अपार जाहलें ॥६९॥

असो मग सभोंवतें पाहत ॥ तंव सरोवर देखिलें अकस्मात ॥ तेथें नारी बैसल्या सात ॥ आचरिती वसा ॥७०॥

रक्तांबरें नेसल्या असती ॥ बरव्या सालंकृता दिसती ॥ पिठोरा लेहोनि भूमीप्रती ॥ पूजिती भावें ॥७१॥

ऐसें देवता आचरिती ॥ अवघ्या जणी पूजिती ॥ जंव चंपा गेली त्यांप्रती ॥ तंव त्यांहीं तें आच्छादिलें ॥७२॥

मग चंपा तयासी बोलत ॥ हें काय जी असा आचरित ॥ मज देखोनि आच्छादित ॥ केलेंति कांहो ॥७३॥

तंव त्या सांगती तयेप्रती ॥ कीं यासीं पिठोराव्रत ह्मणती ॥ हें आचरितां स्वसंतती ॥ चिरायु होय ॥७४॥

श्रावणवद्य अमावस्येसी ॥ पिठोरा लिहावी भावेंसीं ॥ सप्त अप्सरा योगिनीसी ॥ आणि ल्याहावी राहटी ॥७५॥

कांडण दळण घुसळण ॥ रंधन उतरडी आदिकरून ॥ तेथें सातपुतीही जाण ॥ आणि शिवालयें ल्याहावीं ॥७६॥

त्यांचें करूनियां पूजन ॥ मग वाटीसि अन्न घालून ॥ पुत्राप्रति द्यावें वाण ॥ मातेनें पैं ॥७७॥

ह्मणावें अतीत कोण ऐसें वचन ॥ तंव पुत्रें ह्मणावें मीचि जाण ॥ मग त्याचे हाती देवोनि वाण ॥ पाठिमोरें पाहूं नये ॥७८॥

चंपा ह्मणे तयांप्रती ॥ श्रावणांअवसेसि मज प्रसूती ॥ तैं मृताचि बाळें पडती ॥ ऐसें षड्‍गर्भां जाहलें ॥७९॥

सातवा प्रसूतिसमय आला ॥ तंव सासूनें बाहेर घातलें मजला ॥ तें दुःख सांगू हो कवणाला ॥ देवचि जाणे ॥८०॥

ऐसी ऐकोनि दुःखरीती ॥ चंपेप्रति नारी ह्मणती ॥ कीं तूं आचरें हो यथास्थिती ॥ हे व्रत भावें ॥८१॥

बरवी पिठोरा करणें ॥ पूजा करोनि पाठिमोरें बैसणें ॥ वाटीत अन्न घालोनि बोलणें ॥ अतीत कोण ह्मणवुनी ॥८२॥

पुत्रें अतीत मीच ह्मणोनि ॥ वडिल हतीं द्यावें वाण ॥ ऐसें आचरितां व्रत जाण ॥ येतील पुत्र ॥८३॥

मग ते चंपा परियेसीं ॥ करिती जाहली त्या व्रतासी ॥ पूजा करोनि पिठोरीसी ॥ आळवी पुत्रां ॥८४॥

ह्मणे कोण अतीत असती ॥ तंव आलों पुत्र ह्मणती ॥ अतीत ह्मणता ज्येष्ठाप्रती ॥ दीधलें वाण ॥८५॥

ऐसे आले सातही पुत्र ॥ चंपा जाहली हर्षनिर्भर ॥ मग चरणीं ठेवी शिर ॥ देवतांचे ॥८६॥

तंव अदृश्य जाहल्या नारी ॥ येरी घरा आली झडकरी ॥ आनंदें सहपुत्रपरिवारीं ॥ जाहली येती ॥८७॥

हरुषें आली गृहासी ॥ तंव हेममालिनी देखे पुत्रांसी ॥ चंपा लागली चरणासी ॥ तियेचिया ॥८८॥

तीं देखोनियां बाळकें ॥ हरिखें लोटली विशेषें ॥ मग उतरोनि कौतुकें ॥ जाहली पुसती ॥८९॥

सासू ह्मणे चंपेप्रती ॥ कोण देव त्वां अर्चिला भक्तीं कोणासि केली विनंती ॥ कोणे अनुष्ठानें ॥९०॥

कीं आचरिलीस तपाला ॥ कोण देव प्रसन्न केला ॥ मग तयेनें सांगीतला ॥ वृत्तांत सर्व ॥९१॥

ह्मणे मी गेलिया नगरबाह्यदेशीं ॥ सरोवराचे तटाकासी ॥ तंव तेथें मज प्रसूतीसी ॥ मृत बाळक पडियेलें ॥९२॥

मग मी करितां रुदना ॥ तें दुःख न साहवे कवणा ॥ तंव तेथे आल्या अंगना ॥ जळदेवता ॥९३॥

त्यांहीं आचरितां व्रतासी ॥ ह्मणोनि म्यां पुसिलें तयांसी ॥ कीं हा कोण वसा तें मजसी ॥ सांगा देवी ॥९४॥

मग त्याहीं कथिलें मजप्रती ॥ कीं यासी पिठोरव्रत ह्मणती ॥ हें आचरितां होय संतती ॥ चिरंजीव ॥९५॥

मग म्यां तयातें प्रर्थिलें ॥ मज हें व्रत द्या ह्मणितलें ॥ तंव मजकरवीं करविलें ॥ त्याहींच हें ॥९६॥

म्यां आरंभिलें व्रतासी ॥ पिठोरा लिहूनि भूमीसी ॥ प्रसन्न व्हावया पूजेसी ॥ केलें षोडशोपचारें ॥९७॥

मग अन्नें भरोनि पांटी ॥ दुग्धघृतेंसीं भरिली वाटी ॥ बैसोनियां तयासकटी ॥ आळविलें पुत्रा ॥९८॥

ऐसें आचरितां व्रतासी ॥ हीं बाळें आलीं परियेसी ॥ मग तें वाण दीधलें तयांसी ॥ सानंदजळें ॥९९॥

जंव मागें पाहें परतोनी ॥ तंव अदृश्य जाहल्या कामिनी ॥ मग मी चालिलें तेथोनी ॥ घेवोनि बाळें ॥१००॥

आणिक मामिसें काहीं नेणें ॥ देवता प्रसन्न तुमचे पुण्यें ॥ ह्मणोनि व्रत हें फळलें तेणें ॥ मग चरणी लागली ॥१॥

असो होवोनि आनंदित ॥ तैं पासोनि तो ब्राह्मण सुमंत ॥ हें व्रत असे आचरित ॥ पांडवा गा ॥२॥

तंव बोलिला युधिष्ठिर ॥ कीं देवा व्रत सांगीतलें मनोहर ॥ तरी याचें उद्यापन पवित्र ॥ तें सांगावें जी ॥३॥

मग ह्मणे यादवराणा ॥ श्रावणी अमावास्या जाणा ॥ तैं करावें उपोषण ॥ भक्तिभावें ॥४॥

सांतवंशपात्रें आणावीं ॥ गौधूमपूरित असावीं ॥ कंचुकी आभरणयुक्त द्यावीं ॥ वायनें ती द्विजांसी ॥५॥

ऐसें व्रत आचरती ॥ त्यासी होय संतती संपत्ती ॥ ऐसें सांगोनियां श्रीपती ॥ गेला द्वारके ॥६॥

श्रीकृष्ण द्वारकेसि गेला ॥ युधिष्ठिर राज्य करूं लागला ॥ हा वृत्तांत मुनीनें कथिला ॥ जन्मेजयासी ॥७॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया त्वां पिठोरा पुसिली जाण ॥ तरी श्रीकृष्णें धर्मालागुन ॥ सांगीतलें हें व्रत ॥८॥

हें व्रत ज्या स्त्रिया आचरती ॥ त्या दुःखबाधा कदा नेणती ॥ पोटीं होय चिरायु संतती ॥ मंगलदायक ॥९॥

जैसें फाल्गुनपौर्णिमेसी ॥ प्रज्वलितां हुताशनीसी ॥ नाश होय महाविघ्नांसी ॥ बालकनाशादि ॥११०॥

तैसेंचि करितां पिठोरीसी ॥ भय नाही बाळकांसी ॥ संतती संपत्तीसी अहर्निशीं ॥ होय वृद्धी ॥११॥

हे कथा भविष्योत्तरपुराणीं ॥ सांगीतली व्यासमुनीनीं ॥ तेचि कथा श्रोतयांलागुनी ॥ कथिली असे ॥१२॥

आतां कथा याचिये पुढती ॥ ऋषी सांगेल रायाप्रती ॥ ते परिसावी संतश्रोती ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥११३॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ दंडकारण्यपिठोराप्रकारू ॥ अष्टादशोऽध्यायीं कथियेला ॥११४॥

॥ श्रीजगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP