॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ अजमीढाचा विवाहो ॥ जाहला की नाहीं तो अन्वयो ॥ सांगिजे मज ॥१॥
वैशंपायन ह्मणती राजमा ॥ त्रेतांती द्वापार लागलिया ॥ तेथोनि अजमीढाचे राज्या ॥ प्रवृत्ती हस्तनापुरी ॥२॥
गंधमादनींचा नृसिंहरावो ॥ तयाचा पुत्र निर्मळदेवो ॥ तत्कन्या सुभद्रा तिशीं विवाहो ॥ जाहला महोत्साहें ॥३॥
मग हस्तनापुरनगरीं ॥ अजमीढराव राज्य करी ॥ देवधर्म परोपरी ॥ आचरती लोक ॥४॥
तंव वर्तली येकी व्यवस्था ॥ ते ऐकेम मत्स्यपुराणींची कथा ॥ अजमीढाराव राज्य करितां ॥ धर्म वृद्धीतें पावला ॥५॥
एकदां सभे बैसला नृपमणी ॥ तंव जाहली आकशवाणी ॥ काय गा निश्चिंत बैसोनी ॥ राहिलासि राया ॥६॥
तेणें चिंता वर्तली समस्तां ॥ तंव नारद आला अवचिता ॥ रायें नम्स्कारितां विधिसुता ॥ येरें आशिर्वाद दीधला ॥७॥
रायें पुजिलिया उपचारीं ॥ नारद ह्मणे गा अवधारीं ॥ मी गेलों होतों पाताळविवरीं ॥ तेथें वासुकी भेटला ॥८॥
तेणें तुझी निंदा केली ॥ ह्मणे सोमावंशीची महिमा गेली ॥ अजमीढें लज्जा आणिली ॥ पूर्वजांसी ॥९॥
म्या तुझाचि पक्ष धरिला ॥ तरी तो मजवरी कोपला ॥ ह्मणे सोमादिकी स्वर्ग घेतला ॥ तो पराक्रम अद्भुत ॥१०॥
ऐसें नारदवाक्य ऐकोनी ॥ अजमीढ खवळला मनी ॥ मग प्रधान बोलावोनी ॥ केला निर्धार युद्धाचा ॥११॥
ह्मणे दूत धाडोनि पाताळासी ॥ बरेवें पुसावें वासुकीसी ॥ तंव कोप येवोनि नारदासी ॥ ह्मणे जारे शरण तया ॥१२॥
यावरी नारद अद्दश्य जाहला ॥ परि सेनासमुद्र गजबजिला ॥ अजमढि कोपें बोलिला ॥ कीं धरारे वासुकीसी ॥१३॥
निशाणीं घावो देवोनी ॥ वेगें उठिला नृपमणी ॥ सैन्य सन्नद्ध होवोनी ॥ चालिलें देखा ॥१४॥
तये निशाणाचे गजरों ॥ देव खळबळले अंबरीं ॥ बह्माविष्णुत्रिपुरारी ॥ जाहले भयभीत ॥१५॥
आणि त्या नादें गजबजिला ॥ नारद स्वर्गीहूनि पडिला ॥ सहस्त्रयोजनें आदळला ॥ अभिघात जाहला थोर पैं ॥१६॥
जिव्हा दातें रगडिली ॥ मेदिनी थोर कांपिन्नली ॥ मग उठोनि तिये वेळीं ॥ मुरझावोनि बैसला ॥१७॥
राव ह्मणे मुनीश्वरा ॥ त्रिलोकीं गमन ब्रह्माकुमरा ॥ तरी कैसा पडला येकसरां ॥ वाद्यनादें क्षितीवरी ॥१८॥
वैशंपायन ह्मणती भारता ॥ अनृतभांषणें ब्रह्मसुता ॥ पात घडला गा निरुता ॥ भुमंडला माजी ॥१९॥
असो उपरी मूर्छा भंगुनी ॥ नारद गेला अमरभुवनीं ॥ इकडे अजमीढें नृपमणी ॥ बोलविले समस्त ॥२०॥
द्दीपोद्दीपींचे येवोनि राजे ॥ स्वसैन्येसिं मीनलें वोजे ॥ ते अवलोकिले सांजे ॥ अजमीढरायें ॥२१॥
मानसन्मानी वस्त्रालंकार ॥ टिळेविडे जाहले अपार ॥ मग ह्मणे महावीर ॥ कां पां न आला बिभीषण ॥२२॥
तंव कौचद्दीपींचा राक्षस ह्मणे ॥ समुद्रा अवर्तिलें रघुनंदनें ॥ ह्मणोनि बिभीषणा येणेंजाणें ॥ न होय साच ॥२३॥
असो हें वचन ऐकोनी ॥ रथीं आरुढला नृपमणी ॥ मग दळवैय्या पाठवोनि ॥ घेतली सैन्यगणती ॥२४॥
भविष्योत्तरपुराणीं ॥ गणित केलें असे मुनीनी ॥ तें सांगतों अनुलक्षोनीं ॥ ऐकें जन्मेजया गा ॥२५॥
एक्यायशीं लक्ष अक्षौहिणी ॥ अवघे भूपाळ मुकुटमणी ॥ कुंतकार खर्व क्षोणी ॥ समस्त रायांचे ॥२६॥
आठपद्मक्षोणी धनुर्धर ॥ नवखर्वक्षोणी लढाऊवीर ॥ दीडकोटी अधिकतर ॥ तीननवलक्ष पायदळ ॥२७॥
छपन्नप्रयुतें असिवार ॥ अकराक्षोणी रहंवर ॥ अंर्बुदें तीनक्षोणी कुंजर ॥ जाहली गणती ॥२८॥
ऐसे पूर्वदिशेस निघाले ॥ भागीरथीतील उतरले ॥ पुढां प्रयागा पातले ॥ त्रिवेणीस्थानीं ॥२९॥
मग काशियेसी जाउनी ॥ काशीश्वरातें नमस्कारुनी ॥ समभारें चालिले तत्क्षणीं ॥ निशाणगजरें ॥३०॥
मग मूर्तींतीर्थ पावले ॥ तेथें अकरादिन राहिले ॥ तंव जन्मेजयें प्रश्निलें ॥ कीं तेम तीर्थ कवणेपरी ॥३१॥
मुनि ह्मणे भागीरथीतीरीं ॥ गुप्ततप करी त्रिपुरारी ॥ तरीतयाची अवधारीं ॥ फळश्रुती थोर ॥३२॥
तेथें तपकरी जो नर ॥ तो कैलासभोगी दुजा रुद्र ॥ येकदा तें लोपवोनि शंकर ॥ गेला कैलासीं ।३३॥
मग तेथें अटव्य वाढलें ॥ तेणें महातीर्थ लोपलें ॥ हें जन्मेजयें ऐकोनि वाहिलें ॥ ह्मणे सांगा अग्रकथा ॥३४॥
मुनि ह्मणे तेथोनि निघाल्यावरी ॥ सकळ पावले समुद्रतीरीं ॥ यानंतरें अग्रपरी ॥ ऐकें राया ॥३५॥
अजमीडें भूपाळांसी ॥ पुसिलें वयबुद्धवडिलांसी ॥ कीं समुद्र तरिजे ऐसी ॥ सांगिजे बुद्धी ॥३६॥
तंव ते ह्मणती ऐसें कीजे ॥ हा सागर शरीं बांधिले ॥ जैसा शिळीं बांधिला रघुराजें ॥ त्रेतायुगांतीं ॥३७॥
ऐसें विचारिती परस्पर ॥ इकडे स्वर्गी पातला ब्रह्मकुमरा ॥ तयासि कणतकुंथता इंद्र ॥ देखता जाहला ॥३८॥
इंद्र ह्मणे गा नारदा शरीरीं काय उठिली बाधा ॥ येरु सांगता जाहला विबुंधां ॥ पूर्वकथन ॥३९॥
कीं अजमीढ जातां वासुकीवरी ॥ म्यां वारोनि ह्मणितलें नकरीं ॥ तंव वाद्यनादें येवोनि गिरगिरी ॥ पडिलों भुवरी अकस्मात ॥४०॥
ऐकोनि तटस्थ सुरवर ॥ ह्मणती हें मांडलें अखंर ॥ इंद्र ह्मणेजी स्वामी शीघ्र ॥ श्रुत करावें त्रिदेवां ॥४१॥
येरु तत्क्षणी निघाला ॥ जावोनि ब्रह्मया भेटला ॥ वृत्तांत अवघा सांगीतला ॥ ह्मणे जी चला अमरावती ॥४२॥
ब्रह्मा दचकोनि ह्मणे नारादा ॥ वेगीं जाणवीं शिवमुर्कुदा ॥ येरं जावोनि कथिलें प्रसिद्धा ॥ हरिहरांसी ॥४३॥
ऐसे तिन्ही देव मिळोनी ॥ निघाले सपरिवार तत्क्षणीं ॥ येवोनि पावले स्वर्गभुवनीं ॥ जाहली भेटी इंद्रादिकां ॥४४॥
तेथें सभा धनवटली ॥ एकांतविचारणा मांडली ॥ पुढां कथा कैसी वर्तली ॥ ते अवधारिजे ॥४५॥
इकडे अजमीढें काय केलें ॥ धनुष्य सत्राणें टणत्कारिलें ॥ तेणें त्रैलोक्य गडगडलें ॥ देव भ्याले समस्त ॥४६॥
मग आरुढोनियां विमानीं ॥ देव पाहों पातले गगनीं ॥ तंव शरासि शर सांधोनी ॥ बांधिला सेतु अचाट ॥४७॥
तो सघन अभंग बांध पडिला ॥ चातुरंगभार उतरला ॥ पैलतीरीं मेळिकार आला ॥ पालाशद्दीपीं ॥४८॥
तें पालशद्दीप भयंकर ॥ वनस्पती आणि महाकुंजर ॥ तेथोनि चालिला दळभार ॥ पुढिले समुद्रीं ॥४९॥
सेतु उतरोनि झडकरी ॥ मार्गी चालतां वनांतरीं ॥ तंव हर्ष जाहला भारी ॥ वनस्पती कुंजरां ॥५०॥
तिया वनस्पती स्तविती ॥ धन्यधन्य कीं परद्दीपपती ॥ कुंजर स्वभाषा बोलती ॥ मानिताती अजमीढा ॥५१॥
रायें तें कौतुक देखोनी ॥ भेटला वनस्पतीसि धांवोनी ॥ तंव गज पुष्पेंफळें घेवोनी ॥ भेटावया पातले ॥५२॥
तयां प्रेमें भेटला रावो ॥ येरीं नमस्कारिला महाबाहो ॥ हा महा अद्भुत नवलावो ॥ कथिला मुनीनें ॥५३॥
ऐकोनि जन्मेजय ह्मणे ॥ हत्ती स्वभाषा बोलती हें मानें ॥ परि वनस्पतींचें बोलणें ॥ वाटे असत्य ॥५४॥
मुनि ह्मणे ऐकें भारता ॥ वसिष्ठाभाषित रामकथा ॥ कीं रामें वधोनि लंकानाथा ॥ पाडिलीं शिरें दहाही ॥५५॥
तंव रावणाचें उसळलें शिर ॥ तें रामासि ग्रासाया आलें शीघ्र ॥ तेणे भयें श्रीरघुवीर ॥ तटस्थ जाहला ॥५६॥
मंत्रें शिरनिःपात केला ॥ परि मनीं राग धरिला ॥ आणि नगरलोक वारिला ॥ कीं जल्पेल तो वधणें ॥५७॥
तेणेंगुणें तये नगरीं ॥ मौन धरिलें नरनारी ॥ बोलणें खुंटोनियां वक्रीं ॥ राहिला सर्व व्यापार ॥५८॥
वेदशास्त्र मार्ग खंडले ॥ देवधर्मही खुंटले ॥ ह्मणोनि विप्रकुळ निघालें ॥ अन्यदेशीं ॥५९॥
ऐसें देखोनि नारदमुनी ॥ श्रुता करिती इंद्रलागुनी ॥ कीं अयोध्येमाजे कार्मुकपाणीं ॥ मांडिलें विचित्र ॥६०॥
मग समस्तही सुस्वर ॥ केलासा निघोनि गेले शीघ्र ॥ शिवासि श्रुत केलें समग्र ॥ रामकरण ॥६१॥
ब्रह्माविष्णु तेचि अवसानीं ॥ भेटों पातले शूळपाणी ॥ त्याहीं ऐकिलें वृत्त कणीं ॥ देवभाषित ॥६२॥
अवघे तटस्थ जाहले ॥ विचार करूं लागले ॥ तंव महादेवें बोलिलें ॥ सकळिकांसी ॥६३॥
कीं राम रावणाचेनि धाकें ॥ रागें न बोले स्वमुखें ॥ परि हें करणें लीलाकौतुकें ॥ झणी होय ॥६४॥
असो तेणें वार्जिलें बोलणें ॥ तरी कैसा उपावो करणें ॥ कोणेप्रकारें भेदरा दवडणें ॥ राघवाचा ॥६५॥
महेश ह्मणे चतुर्मुखासी ॥ तुवां अवतरोनि अयोध्यासी ॥ अश्वत्यरूपें राघवासी ॥ प्रबोधावें ॥६६॥
ब्रह्मा ह्मणे नघडे ऐसें ॥ म्यां पिपळ व्हावे कैसें ॥ छेद करितील कीं मनुष्यें ॥ माझा तेथ ॥६७॥
तंव विष्णु आणि सुरवर ॥ ह्मणती न कीजे आन विचार ॥ तुजवरी घाय घालिती पामर ॥ ते साहणें आह्मां ॥६८॥
पहिले तीन म्या साहणें ॥ ऐसें महादेव ह्मणे ॥ दुसरेम विष्णूनें तीन घेणें ॥ येरां सुरवरीं सहावें ॥६९॥
पिंपळा घावो हाणीला ॥ तो क्षयासि निश्चयें जाईला ॥ ऐसा वर पावतां सोज्वळ ॥ संतोषला ब्रह्मा ॥७०॥
समस्त सुरवर ह्मणती ॥ आह्मी होवोनि गा वनस्पती ॥ तुझे घाय साहों समस्तीं ॥ परि हें करीं कार्य ॥७१॥
मग ब्रह्मा संतोषोनी ॥ अश्वत्थ जाहला मेदिनीं ॥ अयोध्यप्रदेशानिकटवनीं ॥ महाथोर ॥७२॥
पिंपळीं ब्रह्मा अवतरला ॥ चहूंमुखांहीं गर्जिन्नला ॥ चारीवेदांचा ध्वनी उठिला ॥ पांचव्यानें खरध्वनी ॥७३॥
गोवारी चारी गोधनें ॥ तंव तो शब्द ऐकिला तेणें ॥ मग हांसत हांसत ह्मणे ॥ कीं हें नवल देखा ॥७४॥
पाणिवठां जाती कामिनी ॥ त्या हांसती भारितां पाणी ॥ ते वार्ता ऐकोनि नगराजनीं ॥ केलें हास्य ॥७५॥
तो परंपरा वार्ताकल्लोळ ॥ लोक करिताति सकळ ॥ भद्रीं होता रामभुपाळ ॥ ऐकिला तेणें ॥७६॥
राम आल्हादला मनीं ॥ तंव परिवार उठिला हांसोनी ॥ अवघी सभा तिये क्षणीं ॥ नमाय हांसता ॥७७॥
वसिष्ठ ह्मणे गा रामचंद्र ॥ तुजसी बोल लागला खरा ॥ मौन धरविलें होतें समग्रां ॥ तें वृथा गेलें ॥७८॥
राम ह्मणे प्रधानासी ॥ कीं प्रथम हास्य केलें तयासी ॥ धरोनी आणीं मजपासी ॥ वेगवत्तर ॥७९॥
तेवेळीं प्रधान उठिला ॥ सकळिकां वृत्तांत पुसों लागला ॥ ऐसा फिरताफिरत पातला ॥ द्वारवेशीं ॥८०॥
धांडोळिता अनेकांपरी ॥ तंव ठायीं पडिला गोवारी ॥ तो बांधोनि आणीला झडकरी ॥ श्रीरामापें ॥८१॥
रामचंद्रें तो सोडविला ॥ मग वृत्तांत तया पुसिला ॥ येरें अश्वत्थाचा सांगीतला ॥ शब्दघोष ॥८२॥
उपरी राम ह्मणे प्रधानासी ॥ वेगें छेदावें अश्वत्थासी ॥ प्रधानें पाठविले छेदनासी ॥ भिल्लजाती ॥८३॥
तंव ते देखतां घातक ॥ अश्वत्थें केला शब्दघोष ॥ मग चालिला झोडित देख ॥ पल्लेवरी ॥८४॥
डाहळे लागती सटसटां ॥ भिल्ल पळाले झडझडां ॥ ऐसें देखोनि वेगाढां ॥ धांवला प्रधान अ॥८५॥
तोही झोडिला डहाळेंवरी ॥ पाळतां प्रवेशला नगरीं ॥ तें देखोनि सपरिवारीं ॥ चालिला रामचंद्र ॥८६॥
पुढां बारालक्ष सैन्येंसीं ॥ प्रधान वेढी अश्वत्थासी ॥ तंव मार केला समस्तांसी ॥ अश्वत्थें तेणें ॥८७॥
सैनिक शस्त्रास्त्रें मोकलिती ॥ परि तीं वृक्षासि न लागती ॥ येरें सैन्या लोळविलें क्षितीं ॥ लत्ताघातें ॥८८॥
जींजीं शस्त्रें प्रेरिती ॥ तीतीं मागुती मुरडती ॥ ज्यांचीं त्यांसीच भेदिती ॥ जाहली शांती सैन्याची ॥८९॥
मग तें जाणोनि अखर ॥ राम चालिला वेगवत्तर ॥ तेव्ह निशाणनादें अंबर ॥ गर्जिन्नलें देखा ॥९०॥
रामें सिहनाद केला ॥ अश्वत्थ वेदध्वनी बोलिला ॥ रामें बाण गुणीं लाविला ॥ धाक पडिला सुरवरां ॥९१॥
मग ब्रह्माविष्णु सुरवर ॥ मृत्युलोकीं आले समग्र ॥ त्याहीं केला नमस्कार ॥ श्रीरामासी ॥९२॥
राम संतोषला निजमनीं ॥ अवघें आलिंगिले धावोनी ॥ सभा जाहली तिये स्थानी ॥ बैसले मानसन्मानें ॥९३॥
देव ह्मणती गा रघुपती ॥ आमुची परियेसी विनंती ॥ त्वां मौन धरिलें कवणेगती ॥ कां वेदोच्चार वर्जिलें ॥९४॥
तंव राम ह्मणे देवांसी ॥ कीं म्यां वधिलें रावणासी ॥ तेव्हां त्याचें शिर ग्रासावयासी ॥ आलें मज ॥९५॥
तो धाक मनीं संचरला ॥ ह्मणोनि शब्द म्यां वर्जिन्नला ॥ पुढें येणें अश्वत्थें केला ॥ नवलाव थोर ॥९६॥
मग ह्मणे नारायण ॥ रामा तुं परमात्मा ॥ जगज्जीवन ॥ तरी कां विसरलारि मागील प्रश्न ॥ रावणाचा ॥९७॥
दशशिर हा महाभक्त ॥ जया प्रसन्न जगन्नाथ ॥ तो तुझाही साक्षांत ॥ दारवंठेकरी ॥९८॥
तयाचा हा महिमा थोर ॥ तुवां जगीं केला विस्तार ॥ येरवीं निर्भय अजरामर ॥ अनादिसिद्ध तूं ॥९९॥
रामा तुझिये निकरशरें ॥ मुक्ति मागीतली दशशिरें ॥ तेंचि तुझें सामर्थ्य तरुवरें ॥ वर्णिजतें आनंदें ॥१००॥
नारद ह्मणे देवांसी ॥ कीं जो वर्णील रामकीर्तीसी ॥ हा अश्वत्व रक्षील तयासी ॥ सर्वथैव ॥१॥
तरी देव हा या वृक्षातें ॥ रक्षावें लागेल निरुतें ॥ ऐसें विचारिती जंव समस्तें ॥ तंव पावले ऋषीश्वर ॥२॥
मग त्यांपरती सविस्तर ॥ अश्वत्थरामाचें चरित्र ॥ श्रतु केलें असे समग्र ॥ देवत्रयांहीं ॥३॥
मार्कंडेय ह्मणे गा महेशा ॥ अश्वत्थ ब्रह्मांश हा भरंवसा ॥ जन उद्धरेल जगन्निवासा ॥ कीतींस्तव ययाचे ॥४॥
आणि रामगुणवर्णनें समस्त ॥ उद्धरतील जीवजंत ॥ परि वनस्पतीबोलणें करावें गुप्त ॥ वेदशास्त्ररहस्त्र तें ॥५॥
ऐकोनि शिव ब्रह्मा ह्मणे ॥ ऐसेंचि आणिक येक करणें ॥ प्राणिमात्रां उद्धरणें ॥ कीर्ति करणें रामाची ॥६॥
जेणें गुप्त प्रकट हास्यक ॥ मनुष्यमात्रां साजे सम्यक ॥ ऐसें करणें सिद्धांतिक ॥ आजपासोनी ॥७॥
मग मार्कंडेय बोलिला ॥ काहीं आश्वर्य जरी देखिले ॥ तरी करावें हास्य वहिलें ॥ गुप्तप्रकट ॥८॥
मुखाआड वस्त्र धरूनी ॥ हास्य करावें नम्रवदनीं ॥ परि वर्जावी गंभीरध्वनी ॥ सभेमाजी ॥९॥
इतुकेनि सर्व आनंदले ॥ रामें क्रोधातें सांडिलें ॥ तेंहूनि अश्वत्थाचें प्रकटलें ॥ ब्रह्माचरित्र ॥११०॥
राम ह्मणे ब्रह्मयासी ॥ भलें फसविले होतें अह्मासी ॥ तंव येरू ह्मणे उपायें तुह्मासीं ॥ जाणविलें म्या ॥११॥
असो राम लागला ब्रह्मचरणीं ॥ सभा विसर्जिली तत्क्षणीं ॥ आणि देव गेले निजभुवनीं ॥ कोदंडपाणी बुजावितां ॥१२॥
हे नारदपुराणींची कथा ॥ भविष्योत्तरपुराणमता ॥ तुज कथिली गा भारता ॥ कार्यनिमित्तें ॥१३॥
हे कथा अगस्तिरामायणीं ॥ प्रकट बोलिले व्यासमुनी ॥ ते संक्षेपें तुजलागोनी ॥ केली श्रुत ॥१४॥
तूं ह्मणसी वनस्पती ॥ कैसियापरी बोलती ॥ तरि देव अवतरले क्षितीं ॥ वनस्पतीरूपें त्या द्दीपीं ॥१५॥
ते ब्रह्मायाप्रती बोलिला होते ॥ कीं आह्मी अवतरूं निरुतें ॥ ह्मणोनीच अवतरले तेथें ॥ समस्त सुरवर ॥१६॥
तिया वनस्पती बोलती ॥ येथें कांहीं न धरावी भ्रांती ॥ हें ऋषिवाक्य पुराणसंमती ॥ ह्मणे मधुरकरकवी ॥१७॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ अजमीढप्रयाणप्रकारू ॥ चतुर्दशोऽध्यायीं कथियेला ॥११८॥
॥ शुभंभवतु ॥