श्रीगणेशाय नमः
गांधार ह्नणे शकुनीसी ॥ आतां बुद्धि कीजे कैसी ॥ येरु ह्नणे वैरियांसी ॥ लाक्षागृही जाळावें ॥१॥
मग बोलावूनि पुरोचन ॥ आज्ञा करी दुर्योधन ॥ कीं त्वां लाक्षागृह रचोन ॥ जाळावें पांडवांसी ॥२।
तुज देईन देश भांडारें ॥ ऐसी भाष दीधली गांधारें ॥ तंव तो द्रव्यें घेवोनि सत्वरें ॥ गेला तेथें ॥३॥
कामगार लावोनि अपार ॥ निर्मिलें भव्य राजमंदिर ॥ वारुणावतासि परिकर ॥ नानाकुसरीं ॥४॥
कापूर राळ मेण लाख ॥ सनकाडिया गुग्गुळू देख ॥ तळ भिंती खांब अशेष ॥ कळसपरियंत ॥५॥
ऐसी करोनि भरोवरी ॥ हिंगुळ लेपिला कुसरी ॥ असो हें सांगतां विस्तारीं ॥ जाईल ग्रंथ ॥६॥
यापरि केली गृहनिष्पत्ती ॥ तंव कर्ण आला वारुणावतीं ॥ रचना देखोनि हरुषला चित्तीं ॥ कीं अमरावती दूसरी ॥७॥
पुरोचना उचित देवोनी ॥ कथिलें दुर्योधना येवोनी ॥ हर्ष जाहला कौरवमनीं ॥ कपटकरणीचा ॥८॥
येरीकडे नवल जाहलें ॥ तें विदुरासि अवघें कळलें ॥ मग पत्र लिहूनि धाडिलें ॥ श्रीकृष्णासी ॥९॥
ब्राह्मणें दीधली पत्रिका ॥ कृष्णें मनीं आणिलें देखा ॥ अंतरीं ह्नणे धर्मादिकां ॥ संरक्षणें सत्य ॥१०॥
मग पुसोनि वसुदेवासी ॥ कीं जाणें पांडवां संभाळावयासी ॥ ह्नणोनि देव इंद्रप्रस्थासी ॥ गेला देखा ॥११॥
येरीं पूजिला षोडशोपचारीं ॥ आरोगणा जाहली कुसरीं ॥ मग सांगता होय देव रात्रीं ॥ करणी कौरवांची ॥१२॥
ह्नणे जावें वारुणावता ॥ जैं गांधार नेईल समस्तां ॥ परि रात्रीं असावें जागृता ॥ चारीप्रहर ॥१३॥
अग्नि लागलिया मंदिरीं ॥ तेव्हां वांचावें कैशियापरी ॥ तें विदुर सांगेल निर्धारी ॥ येवोनि तुह्मां ॥१४॥
तुह्मी जावें कापडीवेषें ॥ वनीं कीर्ति जोडेल यशें ॥ मग स्त्रीरत्न तुह्मी भरवसें ॥ पावाल येक ॥१५॥
मी जातों हस्तनापुरा ॥ उपाय सांगावया विदुरा ॥ तो सांगेल तें अगत्य करा ॥ मग निघाला श्रीकृष्ण ॥१६॥
देव विदुराचे मंदिरीं पातला ॥ येरें प्रीतिभावें पूजिला ॥ तंव दुर्योधन तेथ आला ॥ ह्नणे चला जी ममगृहीं ॥१७॥
कृष्णें ऐकोनियां बोला ॥ ह्नणे तुमचा भावो पावला ॥ स्वकीयपणें प्रशंसिला ॥ आणि वानिला दुर्योधन ॥१८॥
मग दुर्योधना पामकोनी ॥ विदुरा सवें चक्रपाणी ॥ भोजन करोनि ह्नणे तववचनीं ॥ गेलों होतों इंद्रप्रस्था ॥१९॥
तैं धर्मादिकां श्रुत करोनी ॥ आलों सांगाया तुह्मांलागुनी ॥ तरी पांडव वांचविण्या करणी ॥ करुं काहीं ॥२०॥
वारुणावताहूनि योजनें बारा ॥ भागीरथीतीर अवधारा ॥ तेवढ्या पाडवोनि विवरा ॥ मार्ग करणें सत्य ॥२१॥
जैं निपजेल लाक्षामंदिर ॥ तैंचि तें निपजेल विवर ॥ विश्वकर्मा हें वृत्त शीघ्र ॥ सांगेल तुह्मां ॥२२॥
मग तुह्मी धर्मादिकांसी ॥ सांगावें नकळतां कोणासी ॥ शिळा सारोनियां विवराशीं ॥ प्रवेशणें आंत ॥२३॥
तो विश्वकर्मा बोलावोनी ॥ तयासि हें कार्य सांगोनी ॥ द्वारके गेला चक्रपाणी ॥ येरु आला भागीरथीये ॥२४॥
खनक लाविले असंख्यात ॥ उपसा गंगोदकीं वाहवित ॥ निपजवोनि विवर अद्भुत ॥ आला विदुराजवळी ॥२५॥
मग विदुर विश्वकर्मा दोनी ॥ गेले वारुणावतराजभुवनीं ॥ द्वारशिळा दाविली नयनीं ॥ धर्मादिकां ॥२६॥
इकडे पुरोचनें गृह रचोनी ॥ सांगे दुर्योधनासि जावोनी ॥ येरें गौरविला आलिंगोनी ॥ दीधलें द्रव्यभांडार ॥२७॥
मग गांधार शकुनीसि ह्नणे ॥ कीं अग्निलावक विचारणें ॥ येरु ह्नणे द्रव्यलोभानें ॥ मिळेल कोणी ॥२८॥
तैं चोरोनियां भीष्मादिकां ॥ बोलावोनि आणिलें अनामिकां ॥ दुर्योधन ह्नणे त्या सकळिकां ॥ द्रव्य देईन अपार ॥२९॥
परि पांडव गेलिया मंदिरीं ॥ तुह्मीं अग्नि लावावा रात्रीं ॥ येरु ह्नणती राया अवधारीं ॥ ऐसें न घडे कदापी ॥३०॥
जळो तें तुमचें अपार धन ॥ कैसें करावें पांडवदाहन ॥ होईल पूर्वजांसी पतन ॥ अघोरनिरयीं ॥३१॥
जातीचे चांडाळ सत्य आह्मी ॥ परि हें पातक न करुं स्वामी ॥ येरु कोपोनि ह्नणे जारे तुह्मी ॥ परि कोणा हें न सांगावें ॥३२॥
चिंताग्रस्त होवोनि दुर्योधन ॥ ह्नणे अग्नी लावील कोण ॥ तंव बोले दुःशासन ॥ पुरोचन गौरवाव ॥३३॥
गांधारें त्याचे धरोनि चरण ॥ ह्नणे गा आमुचें तूं जीवन ॥ तरी यश घेई परिपूर्ण ॥ होऊं सेवक सकळही ॥३४॥
तुझिये उफ्कारां नव्हे उत्तीर्ण ॥ ह्नणोनि पूजिला देवोनि धन ॥ येरें मानिलें तें वचन ॥ रायें दीधला काशिदेश ॥३५॥
मग तो जावोनि इंद्रप्रस्थीं ॥ बोलतां जाहला धर्माप्रती ॥ कीं द्यावया वारुणावत प्रीतीं ॥ बोलाविलें गांधारें ॥३६॥
पांडवीं स्मरोनि कृष्णोत्तर ॥ हस्तनापुरीं आले शीघ्र ॥ तेथें पांडवां कुंतिये सानथोर ॥ भेटले कौरवादी ॥३७॥
गांधारीसह अंध ह्नणे ॥ कीं वारुणावतं दिलें तुह्माकारणें ॥ तेथें सुखें राज्य करणें ॥ परि राखणें आपणासी ॥३८॥
विश्वासावें ना कवणासी ॥ तें मानलें पांडवांसी ॥ मग चालिले कौरवेंसी ॥ तया स्थाना ॥३९॥
सवें भीष्मादि कृप विदुर ॥ महोत्साह वाद्यगजर ॥ राज्यीं स्थापाया युधिष्ठिर ॥ नेला वारुणावतासी ॥४०॥
राजगृहें सर्व दाविलीं ॥ जाणों अमरावती उभविली ॥ सकळांचीं मनें तोषलीं ॥ परि नकळे मावरुप ॥४१॥
धर्मासि ह्नणे दुर्योधन ॥ हा राजपुरोहित पुरोचन ॥ तुह्मी करोनियां सन्मान ॥ राखावा जवळी ॥४२॥
ऐसें सांगोनि कौरव ॥ आले हस्तनापुरीं सर्व ॥ राहिलीं कुंती आणि पांडव ॥ करोनि घररिघवणी ॥४३॥
नगरलोकां जेवविलें ॥ थोर महोत्साह जाहले ॥ तंव विदुरें गुप्त बिजें केलें ॥ पांडवांजवळी ॥ ॥४४॥
तयांसि विवर दाखविलें ॥ ह्नणे शिळा लोटोनि जावें वहिलें ॥ ऐसें सांगोनि बिजें केलें ॥ हस्तनापुरीं ॥४५॥
परमेश्वर होता रक्षिता ॥ ह्नणोनि पांडवां नुपजे व्यग्रता ॥ तंव मावळोनियां सविता ॥ आले अतीत पांचजण ॥४६॥
सहावी तयांची जननी ॥ गृहीं राहिलीं एके कोनीं ॥ ऐसी पुराणांतरीं वाणी ॥ व्यासदेवांची ॥४७॥
आणिक पांचां पुत्रांसहित ॥ भिल्लिणी राहिली भिक्षा मागत ॥ ऐसें संस्कृत भारतीं मत ॥ आदिपर्वी ॥४८॥
असो पांडव जागृत राहिले ॥ पुरोचनें तेचि मुहूर्ता साधिलें ॥ माघशुद्धचतुर्दशीसि केलें ॥ जोहर देखा ॥४९॥
सितें पीडिलों ह्नणोनी ॥ शेकावया आणिला अग्नी ॥ तंव भीमें कवाड देवोनी ॥ भीतरीं त्यासी कोंडिलें ॥५०॥
जंव हा जाळील आमुतें ॥ तंव आह्मीचि जाळूं ना कां यातें ॥ मग ह्नणे पुरोहितातें ॥ मजही तापाया दे वन्ही ॥५१॥
ह्नणोनि हातपाय अंग शेकी ॥ तंव पुरोहिता निद्रा आली देखीं ॥ अधरात्री भरली निकी ॥ सुप्त नगर आघवें ॥५२॥
वन्ही घेवोनि वृकोदरें ॥ गृहीं लाविला चौफेरें ॥ मग बंधुमाता घेवोनि विवरें ॥ निघाला असे तेसमयीं ॥५३॥
पांचां घेवोनि पाठीवरी ॥ भीम जातसे विवरद्वारीं ॥ शीघ्र भागीरथीतीरीं ॥ प्रकटावया ॥५४॥
अवघे राजभोग टाकिले ॥ कापडी होवोनि चालिले ॥ इकडे हाहाःकार वर्तले ॥ वारुणावतासी ॥५५॥
ज्वाळा धडधडां लागती गगनीं ॥ लाख उते खदखदोनी ॥ धूम्र दाटला तेणें नयनीं ॥ न दिसे काहीं ॥५६॥
आतां असो हे जोहरकथा ॥ पंचमस्तबकीं कथिली भारता ॥ परि काहीं काहीं अपूर्वता ॥ ह्नणोनि बोलणें पुनरपी ॥५७॥
असो पांचपांडव आणि कुंती ॥ विवरमार्गी चालताती ॥ तंव पावलीं भागीरथी ॥ पुण्यतटाक ॥५८॥
पुढें चालिलीं उल्लंघोन ॥ तंव लागलें घोर वन ॥ तेथें बैसलीं दुःखें करुन ॥ तये वेळीं ॥५९॥
ऐसीं बैसलीं चिंतातुर ॥ ह्नणती टळलें विघ्न थोर ॥ तंव येक आला निशाचार ॥ किर्मीर नामें ॥६०॥
तो ह्नणे हें माझें वन ॥ चालूनि आलें पिशितभोजन ॥ तरी येकयेकासि मारुन ॥ भक्षीन यांसी ॥६१॥
संकट ओढवलें पांडवांसी ॥ ह्नणती हे उठिली दुसरी विवशी ॥ आतां काय कीजे ययासी ॥ नकळे देवा ॥६२॥
भीम ह्नणे जी दादा परियेसा ॥ मी मारीन या राक्षसा ॥ हा तुह्मी जाणोनि भरंवसा ॥ प्रथम मजलाचि पामकिजे ॥६३॥
मग भीम दीधला तयासी ॥ येरु देखतां तोषला मानसीं ॥ ह्नणे तृप्ती होईल मजसी ॥ स्थूळपणें ययाचे ॥६४॥
तेथोनि पांडव गेले परते ॥ राक्षसें काढिलें कांतीयेतें ॥ तंव भीम पुसे राक्षसातें ॥ हें शस्त्र काढिलें कासया ॥६५॥
येरु ह्नणे कराया तुझा घात ॥ ऐकोनि बोले वायुसुत ॥ कीं रक्त गेलिया काय भक्षित ॥ निस्वाद मांस ॥६६॥
मी गा पूर्वी येके वनीं ॥ सगळेंचि मनुष्य भक्षीं प्रतिदिनीं ॥ मांसल जाहलों असें ह्नणोनी ॥ धष्टपुष्ट ॥६७॥
मीं पूर्वी होतों रोड पाताळ ॥ मनुष्य भक्षितां जाहलों स्थूळ ॥ तरी तूं पसरीं आपुलें आवाळ ॥ मग मी उडी घालितों ॥६८॥
येरु राहिला मुख पसरोन ॥ तंव काय करी भीमसेन ॥ थोरशी येक शिळा घेवोन ॥ टाकिली वदनीं तयाचे ॥६९॥
तेणें दांत पडिले चूर्ण होवोनी ॥ राक्षस राहिला खळबळोनी ॥ तंव भीम ह्नणे गा तुझ्या वदनीं ॥ मी नसमायें ॥७०॥
आतां पैसें केला शिळा टाकोन ॥ तूं कां कोपसी मजकारण ॥ ऐसी तया थाप देवोन ॥ आपण धरिलें सूक्ष्म रुप ॥७१॥
मग उडी घालोनि भीतरी ॥ स्थूळ होवोनि करपाद पसरी ॥ आंतीं तटतटां विदारी ॥ राक्षसा उठिला पोटशूळ ॥७२॥
तो धरणीये गडबडां लोळे ॥ अवघे राक्षस मीनले ॥ तंव धर्मसहदेवें बिजें केलें ॥ वैद्यरुपें ॥७३॥
ह्नणती दुग्ध घृत पाजाल ॥ तरीच हा कृमिशूळ शमेल ॥ येरु रिचवती तये वेळ ॥ कावडींवरी ॥७४॥
तेणें भीम जाहला तृप्त ॥ अंतरीं आंतडीं फाडित ॥ राक्षसा वधोनि वायुसुत ॥ प्रकटला बाहेरी ॥७५॥
सर्वही राक्षस पळाले ॥ ऐसें किमींरासि वधिलें ॥ मग आनंदें पांडव चालिले ॥ कुंतियेसहित ॥७६॥
ते प्रवेशले हिडिंबवनीं ॥ तेथ राक्षसी शाकिनी डाकिनी ॥ त्या पांडवांतें देखोनी ॥ पळालिया बारावाटां ॥७७॥
इतुक्यांत सूर्य मावळला ॥ तंव येक वटवृक्ष देखिला ॥ तेथें उतारा घेतला ॥ साहीजणीं ॥७८॥
भीमें वनफळें आणिलीं ॥ अवघीं आरोगणा सारिली ॥ मग श्रमें निद्रा केली ॥ पांचांजणीं ॥७९॥
भीम जागत असे बैसला ॥ तंव हिडिंब बाहेरि आला ॥ गिरिशिखरीं उभा ठेला ॥ इतुक्यांत आली मनुष्यगंधी ॥८०॥
हिडिंब हेडंबीसि ह्नणे ॥ तुवां जावोनियां पाहणें ॥ येरी गेली तत्क्षणें ॥ वटवृक्षातळीं ॥८१॥
तियें देखतांसि भीमासी ॥ मदनें व्यापिली मानसीं ॥ तेव्हां भीम पुसे तियेसी ॥ तूं कवणाची कोणगे ॥८२॥
ह्नणे मी हिडिंबाची बहिणी ॥ हेडंबी नामें राक्षशिणी ॥ तरी तूं भ्रतार मजलागुनी ॥ होई सुंदरा ॥८३॥
ऐकोनि ह्नणे वृकोदर ॥ माझा वडील असे सहोदर ॥ तया पुसोनि अंगिकार ॥ करीन तुझा ॥८४॥
हेडंबी ह्नणे तुह्मी कवण ॥ येरु सांगे आदिअवसान ॥ लाक्षागृहींचें व्यसन ॥ वंशकुळगोत्र ॥ ॥८५॥
तियेसि उशीर लागला ह्नणोनी ॥ हिडिंब आला धांवोनी ॥ तेव्हां हेडंबी भीमालागुनी ॥ ह्नणे काय ॥८६॥
कीं पैल येतसे राक्षस ॥ हा तुमचा करील ग्रास ॥ तरी ऐका माझा उपदेश ॥ आपण जाऊं इंद्रलोका ॥८७॥
तयेसि ह्नणे वृकोदर ॥ याचा मी करीन संहार ॥ तुज न वाटे निर्धार ॥ तरी कौतुक पाहें पां ॥८८॥
आतां असो हें तिये क्षणीं ॥ हिडिंब कोपें आला धांवोनी ॥ ह्नणे उशीर लाविला बहिणी ॥ धिक्कार असो तुजलागीं ॥८९॥
मग ग्रासाया धाविन्नला ॥ तंव भीम तयासी बोलिला ॥ तूं सांभाळ रे वहिला ॥ कां आलासि अविचारें ॥९०॥
येरु धांवला मुख पसरोन ॥ तंव काय करी भीमसेन ॥ तयांची निद्रा भंगेल ह्नणोन ॥ संघठ्ठला अंगेंसी ॥९१॥
राक्षस ठेलोनि नेला दूरी ॥ पाठीं राहिली हेडंबा सुंदरी ॥ ह्नणे भीमा पराक्रम करीं ॥ होईल जय ॥९२॥
मग मुष्टिघातें भीमसेनें ॥ राक्षस हाणिला सत्राणें ॥ मूर्छा मानोनि असुरें तेणें ॥ सांवरोनि धांविन्नला ॥९३॥
दोघां जाहला थोर धडका ॥ मुष्टिलाथा हाणिती देखा ॥ भूगोळ गर्जला अशेका ॥ भिडतां तयां ॥९४॥
तंव पांचजणें जागीं जाहलीं ॥ संग्राम तटस्थ पाहूं ठेलीं ॥ पार्थे पूर्णकानाडी भरिली ॥ धांविन्नला विंधावया ॥९५॥
तेव्हां भीम ह्नणे पार्था ॥ आड न यावें दोघां झुंजता ॥ तूं आरुता येसी तरी सर्वथा ॥ आण धर्माकुंतियेची ॥९६॥
पार्थ उगाचि राहिला ॥ येरां संग्राम थोर जाहला ॥ भूगोळ सर्व कांपिन्नला ॥ कोण वर्णू शकेल ॥९७॥
असो हें भीमें तत्क्षणी ॥ हिडिंबासि धरिलें चरणीं ॥ सत्राणें आपटोनि मेदिनीं ॥ घेतला जीवें ॥९८॥
ऐसा तो राक्षस वधिला ॥ बंधुमातां भीम आलिंगिला ॥ तंव चरणीं लागली सकळां ॥ येवोनि हेडंबी ॥९९॥
ते विनवी धर्मादिकांसी ॥ कीं म्यां वरिलें या भीमासी ॥ आज्ञा द्यावी निश्वयेंसी ॥ घालीन माळ ॥१००॥
तंव धर्म ह्नणे तूं कवणी ॥ येरी वृत्तांत सांगे मांडोनी ॥ कीं मी हिडिंबाची बहिणी ॥ हेडंबी राक्षसी ॥१॥
धर्म ह्नणे मारिला तुझा बंधु ॥ तरी केवीं घडेल संबंधु ॥ येरी ह्नणे म्यांचि वधु ॥ करविला देखा ॥२॥
हा भीमासि पुसतां वृत्तांत ॥ ऐकोनि धर्म हांसत ॥ व्यवस्था आणोनि मनांत ॥ आज्ञा देता जाहला ॥३॥
दोघां गंधर्व लग्न लागलें ॥ मग हेडंबियें विनविलें ॥ कीं आतां चलाजी वहिले ॥ आमुचीये मंदिरा ॥४॥
धर्म विश्वासला मनीं ॥ येरीं भाष दीधली त्रिवचनीं ॥ मग गेले तयेच्या स्थानीं ॥ गृह देखोनि हर्षले ॥५॥
त्या हिडिंबाच्या मंदिरीं ॥ धर्म राहिला संवत्सरभरी ॥ ते कथा असे पुढारीं ॥ विनंती करी हेडंबा ॥६॥
जी जी तुह्मी राहिजे येथें ॥ मी स्वगृहीं भीमासि नेतें ॥ तंव धर्म ह्नणे तियेतें ॥ हा प्राणचकीं आमुचा ॥७॥
येरी ह्नणे चिंता न करा ॥ तंव धर्म ह्नणे वृकोदरा ॥ जाई इयेचे मंदिरा ॥ मागें सांभाळीं आमुतें ॥८॥
येरी भीमासि पृष्ठीवरी ॥ वाहूनि गेली निजमंदिरीं ॥ अष्टभोग सुखशेजारीं ॥ भोगिती दोघें ॥ ॥९॥
वनवनांतरीं हेडंबी ॥ नानाअपूर्वता दाखवी ॥ भीम वेंघोनि विसरला जीवीं ॥ धर्मादिका ॥११०॥
तंव कोणे येके अवसरीं ॥ भीम ह्नणे हो सुंदरी ॥ धर्म करीत असेल अवसरी ॥ चालें झडकरी त्या ठाया ॥११॥
येरीनें भीम आणिला मंदिरीं ॥ तंव जाहली नवलपरी ॥ ते पुढें ऐकावी चतुरीं ॥ ह्नणे मधुकरकवी ॥१२॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ किर्मीरहिडिंबवधप्रकारु ॥ पंचविंशाऽध्यायीं कथियेला ॥११३॥ ॥