मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय १८

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय १८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

गांधाररायाची नंदिनी ॥ गांधारी नामें मृगनयनी ॥ ते मेळविली कामिनी ॥ धृतराष्ट्रासी ॥ ॥१॥

तियें भ्रतार अंध ऐकोनी ॥ पट बांधिला स्वनयनीं ॥ महापतिव्रता कामिनी ॥ धृतराष्ट्राची ॥२॥

तये गांधाराचा अनुज ॥ जया नाम कुंतिभोज ॥ थोर कुलीन महाराज ॥ त्याची कुंती कुमरी ॥३॥

ते शूरसेनाची नंदिनी ॥ दीधली पोसाया तयालागुनी ॥ कीं जे मित्रबंधु ह्नणवोनी ॥ शूरसेनाचा ॥४॥

वसुदेव आणि कुंती ॥ हीं भावंडें दोघें निरुतीं ॥ तियेसि पृथा ऐसें ह्नणती ॥ पाहिलें नांव ॥५॥

कुंतिभोजें वाढविली ॥ ह्नणोनि कुंती नांव पावली ॥ ते नोवरी मेळविली ॥ पंडुरायासी ॥६॥

कुंतीगांधारीची पूर्वकथा ॥ ऐकें रायाभारता ॥ त्या माहेरासी असतां ॥ जाहले वरप्रसाद ॥७॥

दुर्वासतपोधनाची भक्ती ॥ कुंती करी अतिप्रीतीं ॥ चरणसंवाहन होय करिती ॥ मुनीश्वराचें ॥८॥

येकदां दुर्वासा निद्रा लागली ॥ तंव गांधारी तेथें आली ॥ तियेसि कुंती बोलिली ॥ ऐकें बाइये ॥९॥

मी करितें उदकपान ॥ तंव तूं करीं चरणसंवाहन ॥ येरी मान्य करोनि वचन ॥ चरण तळहाती ॥१०॥

तंव ऋषीची निद्रा सरली ॥ चरणीं कुमारी देखिली ॥ मग वर दीधला तिये वेळीं ॥ कीं होतील पुत्र शत ॥११॥

ऐकतां कुंती धाविन्नली ॥ ह्नणे म्यां निरंतर सेवा केली ॥ ते आजि निर्फळ जाहली ॥ क्षणानिमित्त ॥१२॥

येका क्षणांचें दास्यत्व ॥ पुत्र दीधले येकशत ॥ तंव ऋषि विचारुनि मनांत ॥ बोलिला कुंतीसी ॥१३॥

कीं तुज पांच पुत्र होती ॥ ह्नणोनि सहामंत्र दिले प्रीतीं ॥ येकांची पाहें प्रचीती ॥ न करीं खंती शुभानने ॥१४॥

परि कुंती ह्नणे जी स्वामी ॥ इये शतपुत्र दिले तुह्मीं ॥ आणि सदा सेवा केली आह्मीं ॥ तरी पांचचि कां पां ॥१५॥

ऋषि ह्नणे चिंता न करीं ॥ ते त्रैलोक्य जिंकितील समरीं ॥ महावीर त्यांची सरी ॥ नपवती गांधारीचे ॥१६॥

सूर्य यम पवन इंद्र ॥ अश्विनौदेव उभंयमंत्र ॥ अनुष्ठिसी तो देवोनि पुत्र ॥ जाईल तुजसी ॥१७॥

ऐसें वरदान देवोनी ॥ ऋषि गेला बदरिकावनीं ॥ तंव येकमंत्र अनुष्ठोनी ॥ पाहिला कुंतीयें ॥१८॥

मग प्रत्यक्ष दिनमणी ॥ येकांतीं आला तत्क्षणीं ॥ चालिला कुंतियेसि रमोनी ॥ स्वर्गाप्रती ॥१९॥

कुंती प्रार्थोनि विनवित ॥ ह्नणे तुह्मीं केलें स्वकृत ॥ परि भंगलें कुमारित्व ॥ माझें स्वामिया ॥२०॥

मग कृपेनें बोलिलें सूर्जे ॥ कीं कुमारित्व नभंगे तुझें ॥ पुत्र जन्मेल शीघ्रवोजे ॥ कर्णद्वारें ॥२१॥

सूर्य गेला निघोनि देख ॥ तंव कर्णद्वारें जन्मलें बाळक ॥ तेजःपुंज समान अर्क ॥ देखतां कुंती चिंतावली ॥२२॥

रविअस्त होवोनि पडली राती ॥ मग घेवोनि गेली भागीरथी ॥ निजवोनि बाळ उवावरती ॥ कुंती आली मंदिरा ॥२३॥

परि सूर्यासि पडली चिंता ॥ ह्नणे रात्रीं कोण रक्षील सुता ॥ ह्नणोनि स्वयें जाहला येता ॥ बाळाजवळी ॥२४॥

कवचकुंडलें लेवउनी ॥ चारी प्रहर रक्षोनी ॥ पूर्वेसि गेला दिनमणी ॥ उषःकाळीं ॥२५॥

अमृत स्त्रवती कुंडलें ॥ तेंचि तया पेय जाहलें ॥ तंव नवल कैसें वर्तलें ॥ ऐकें जन्मेजया ॥२६॥

सूत नामक राजाचे भोई ॥ सहस्त्र येक होते पाहीं ॥ तयांचा नामें गोडभोई ॥ होता नायक ॥२७॥

ते राजगृहीं वहावया पाणी ॥ भागीरथी जातां गाडे जुंपोनी ॥ तंव बाळक देखिलें नयनीं ॥ सूर्यासमान ॥२८॥

मग त्यांहीं तत्क्षणीं येउनी ॥ वृत्त घातलें राजकर्णी ॥ राव गेला बाळ ऐकोनी ॥ आणावया ॥२९॥

त्या सूतराजाची धर्मपत्नी ॥ राधा नामें मृगनयनी ॥ तिथें बाळ वाढविला ह्नणोनी ॥ नांव ठेविले राधेय ॥३०॥

जोशियं जोशियें जातक वर्तविलें ॥ जन्मनाम कर्ण ठेविलें ॥ दुसरें नांव पावलें ॥ राधेय ऐसें ॥३१॥

यापरी सूतराजाचे घरीं ॥ कर्ण वाढला बरवियापरी ॥ विद्या अभ्यासिल्या समग्रीं ॥ दंडायुधें छत्तिस ॥३२॥

मग धनुर्विद्येकारणें ॥ अविनाश गुरु केला तेणें ॥ तो कथान्वय ऐकणें ॥ श्रोताजनीं ॥३३॥

कपटें विप्रवेष धरोनी ॥ कर्ण गेला भार्गवस्थानीं ॥ साष्टांग प्रणाम करोनी ॥ उभा ठेला बद्धांजुळी ॥३४॥

तंव माग ह्नणे परशुराम ॥ तूं वेषधारी कीं द्विजोत्तम ॥ येरु करोनियां प्रणाम ॥ ह्नणे ब्राह्मणश्रेष्ठ मी ॥३५॥

मज धनुर्विद्या देउनी ॥ यश द्याजी फरशपाणी ॥ येरु ह्नणे तिये क्षणीं ॥ देईन निर्धारें ॥३६॥

पूर्वी दीधली भीष्मासी ॥ परि तो परतला आह्मासी ॥ आण वाहिली तिये दिवशीं ॥ कीं विद्या क्षत्रिया न देणें ॥३७॥

तूं द्विज दिसतोसि भला ॥ तरी अभ्यासीं विद्या वहिला ॥ मग धनुर्वेद उपदेशिला ॥ कर्णालागीं ॥३८॥

लघुलाघवी संधान ॥ सांगीतलें सर्व विंदान ॥ शस्त्रास्त्रीं केला परिपूर्ण ॥ अविनाशें तो ॥३९॥

संतोष जाहला गुरुशिष्यांसी ॥ परि कर्ण नसांडीच गुरुसी ॥ तंव येक उठिली विवशी ॥ ते अवधारिजो ॥४०॥

देवलोकीं नारदमुनी ॥ वृत्तांत सांगती वज्रपाणी ॥ कीं द्विजवेषें भार्गवापासुनी ॥ कर्णे विद्या साधिल्या ॥४१॥

तो धनुर्विद्याबळें देखा ॥ जिंकोंशकेल त्रैलोक्या ॥ चिंता वर्तली सकळिकां ॥ ऐकोनि ऐसें ॥४२॥

मग बृहस्पतीसि पुसे इंद्र ॥ काहीं सागां जी प्रतिकार ॥ तंव गुरु ह्नणे उपचार ॥ न चले येथें ॥४३॥

परि येक आधारु असे ॥ नेम केला असे अविनाशें ॥ कीं क्षत्रियां विद्या विशेषें ॥ देणें नाहीं ॥४४॥

तरी फावेल प्रतिकार ॥ तो करावा वेगवत्तर ॥ हें ऐकोनि सुरेश्वर ॥ निघाला तेथुनी ॥४५॥

जंव तो रामाश्रमीं पातला ॥ तंव अविनाश असे पहुडंला ॥ उशिये मांडी देवोनि वहिला ॥ बैसला कर्ण ॥४६॥

मग भ्रमराचा वेष धरिला ॥ इंद्र मांडिये तळीं रिघाला ॥ तीक्ष्णकंटक जंव रोंविला ॥ तंव दचकला वीर कर्ण ॥४७॥

परि निद्राभंग झणी होय ॥ ह्नणोनि धैर्ये कर्ण राहे ॥ इंद्रें मांडी कोरिली लाहें ॥ परंतु येरु दृढासनीं ॥४८॥

रक्त लोटलें धरणीं ॥ मांडी कोरिली तेक्षणीं ॥ मग रामशिरीं वज्रपाणी ॥ रोंवी कंटक ॥४९॥

येरु गजबजोनि उठिला ॥ तंव भ्रमर उडोनि गेला ॥ राम अवलोकिता जाहला ॥ रक्तपूर मांडीचा ॥५०॥

कोपातिशयें राम ह्नणे ॥ तूं कवणरे शीघ्र सांगणें ॥ येवढें केवीं साहिजे ब्राह्मणें ॥ क्षत्रियावांचोनी ॥५१॥

येरु ह्नणे जी गुरुनाथा ॥ मज नाठवती मातापिता ॥ परि सूतराजें सर्वथा ॥ वाढविलें मज ॥५२॥

रामें ज्ञानदृष्टीं पाहिलें ॥ तंव त्याचें पूर्व प्रकाशलें ॥ मग कोपोनियां शापिलें ॥ कर्णासि देखा ॥५३॥

कीं निर्वाणसंग्रामीं तूंतें ॥ विद्या न पावे फळातें ॥ जे कपटें ठकविलें मातें ॥ ह्नणोनियां ॥ ॥५४॥

ऐसा शाप पावतां कर्ण ॥ संतोषला सहस्त्रनयन ॥ येरु हतोद्यम होऊन ॥ गेला स्वदेशीं ॥५५॥

जे पहिली विद्या अभ्यासिली ॥ तेवढीच तया स्फुरली ॥ परशरामें होती दीधली ॥ ते जाहली शापदग्ध ॥५६॥

असो कर्ण असतां स्वनगरीं ॥ एकी वर्तली नवलपरी ॥ दंतघटराजा राज्य करी ॥ कर्णकुज नगरीचें ॥५७॥

तेणें जिंकिले त्रिभुवन ॥ एकी क्षोणी तयाचें सैन्य ॥ तो महावीर दारुण ॥ इंद्रादिकां ॥५८॥

तेणें ऐकिलें कर्णोपकर्णे ॥ माझिये नगरीचेनि अभिधानें ॥ वर्तिजत असिजे कर्णे ॥ तरी झुंजणें तयासी ॥५९॥

ह्नणोनि पाठविले नागरी ॥ कीं नाम सांडिजे झडकरीं ॥ नातरी उभा राहें समरीं ॥ अथवा हारी पतकरें ॥६०॥

मग ते भाट निघाले ॥ जावोनि कर्णासि भेटले ॥ सर्ववृत्तांतासी कथिले ॥ दंतघटकाचे ॥६१॥

भाट ह्नणती कर्णवीरा ॥ तुज विद्या जाहल्या समग्रा ॥ तरी दंतघटकासि सामोरा ॥ होई युद्धीं ॥६२॥

कां जे कर्णकुज नगर त्याचें ॥ आणि कर्ण नाम असे तुमचें ॥ तरी झुंजें किंवा साडीं नामाचें ॥ अभिमानत्व ॥६३॥

कर्ण ह्नणे संग्राम कीजे ॥ परि उणेपण न साहिजे ॥ मारिजे अथवा मरिजे ॥ परि न सांडिजे अभिमान ॥६४॥

ह्नणोनि बंदिजनांसहित ॥ तेथें गेला सूर्यसुत ॥ भाटीं सांगितला वृत्तांत ॥ जाऊनि राया ॥६५॥

येरु सैन्य सज्ज करोनी ॥ चालिला थोर आयणी ॥ परस्परें पाचारोनी ॥ अमितबाणीं वर्षले ॥६६॥

तो सकळ संग्राम सांगतां ॥ विस्तारेल ग्रंथकथा ॥ असो सैन्य वधिलें समस्ता ॥ सूर्यात्मजें ॥६७॥

सर्वेचि दंतघटें काय केलें ॥ सातबाण प्रखर प्रेरिले ॥ धनुष्य कर्णाचें छेदिलें ॥ तंव येरु गदेंसीं धांवला ॥६८॥

शिरीं हाणोनि निघातीं ॥ मूर्छागत पाडिला क्षितीं ॥ परि कर्णे धरोनि हातीं ॥ केला सावध ॥६९॥

उदकें नेत्र परिमार्जिले ॥ येरें कर्णातें देखिलें ॥ ह्नणे धन्य धन्य केलें ॥ महावीरा ॥७०॥

जरी तेव्हांचि मारितासि मज ॥ तरी कवण वारिता तुज ॥ परि तूं क्षत्रियकुळबीज ॥ ह्नणोनि सत्व रक्षिलें ॥७१॥

ऐकोनि कर्ण ह्नणे राया ॥ घायीं शत्रु विकळ पडलिया ॥ जो उपकृतीनें रक्षील तया ॥ तोचि क्षत्रिय पुण्यवंत ॥७२॥

येरें करोनि नमस्कार ॥ ह्नणे तूं प्राणदाता सहोदर ॥ करीं अर्धराज्यांगिकार ॥ उपकार थोर मजवरी ॥७३॥

कर्ण ह्नणे पावलें आह्मासी ॥ आतां जाणें स्वनगरासी ॥ मग येरें वंदोनि त्यासी ॥ मुरडले दोघे ॥७४॥

दंतघट समरीं जिंकिला ॥ राज्यीं मागुता स्थापिला ॥ मग स्वदेशासी आला ॥ सूर्यात्मज ॥७५॥

ऐसा हा कुंतीनंदन ॥ बाळपणींच प्रतापगहन ॥ हा नारदपुराणीचा प्रश्न ॥ सांगीतला संक्षेपें ॥७६॥

संस्कृत आदिपर्वीची कथा ॥ पंचमस्तबकीं असे भारता ॥ परी कांहीं कांहीं अपूर्वता ॥ ह्नणोनि मांडिली पुनरपी ॥७७॥

येथे श्रोतीं न ठेवावें दूषण ॥ अपूर्वता ग्रंथभूषण ॥ साधिलें कथाअनुसंधान ॥ संकलित ॥७८॥

ऐसी कुंती कर्णजननी ॥ ते मेळविली पंडूसि कामिनी ॥ मग महोत्साहें करोनी ॥ जाहला विवाह ॥७९॥

यानंतरें दुसरी कांता ॥ मद्ररायाची ज्येष्ठसुता ॥ माद्री नामें स्वरुपता ॥ मेळविली पंडूसी ॥८०॥

हें भारती बोलिलें मत ॥ परि अनारिसें नारदोक्त ॥ तें ऐकावें प्राकृत ॥ दत्तचित्तें ॥८१॥

पंडूचा येक सभानायक ॥ जातिसेन नामें पाककारक ॥ तो माद्रीचा असोनि जनक ॥ जाहला श्वशुर पंडूचा ॥८२॥

ऐसें पंडूसी राज्य करितां ॥ अष्टभोग होय भोगिता ॥ प्रजा पाळी समस्ता ॥ नीतिमार्गे ॥८३॥

तेणें नव्याण्णव यज्ञ केले ॥ राजे पृथ्वीचे जिंकिले ॥ थोर कीर्तीते पावविले ॥ सोमवंशासी ॥८४॥

तया पारधीचें व्यसन होतें ॥ ह्नणोनि चालिला व्याहाळीतें ॥ तंव अपाव घडला अवचितें ॥ काहीं येक ॥८५॥

चित्रकूट नामें पर्वतीं ॥ होता कर्दम सवें युवती ॥ तंव कर्दमीनें देखिली रती ॥ कुरंगाची ॥८६॥

ते भ्रतारासि करी विनवणी ॥ आपण रमूं कुरंगें होउनी ॥ ऋषि ह्नणे तरी कामिनी ॥ पुरवूं मनोरथ ॥८७॥

मग कुरंगरुप धरोनी ॥ क्रीडाविनोदें रमती वनीं ॥ तंव पंडु आला तिये स्थानीं ॥ पारधीखेळत ॥८८॥

दुरोनि हरिणें देखिलीं ॥ मग येकेचि बाणें विंधिलीं ॥ दोनी धरणीये पाडिलीं ॥ रमतांचि पैं ॥८९॥

जंव राव आला धांवोनि ॥ तंव प्राण जातां बोलिलीं दोनी ॥ आह्मां रमतां वधिलें बाणीं ॥ तरी तो रमतां मरेल ॥९०॥

पंडूनें ऐकिलें शापदान ॥ पाहे तंव ऋषीचें हनन ॥ मग तयांसि संस्कारोन ॥ राहिला वनीं सचिंत ॥९१॥

सेवक नगरीं धाडिले ॥ त्यांहीं भीष्मादिकां कथिलें ॥ जी पंडूनें आह्मां पाठविलें ॥ त्यासी घडला अपावो ॥९२॥

आतां ब्रह्महत्या निमित्तें ॥ राव करुं पाहे तीर्थे ॥ तरी भेटणें नाहीं तुह्मांतें ॥ राज्य आपुलें सांभाळा ॥९३॥

ऐसें ऐकतां भीष्मादि विदुर ॥ कुंती माद्री आणि परिवार ॥ रुदतां करुणारसपूर ॥ दाटला नयनीं ॥९४॥

असो याचिये नंतरें ॥ प्रधान पाठविला गंगाकुमरें ॥ कीं द्रव्य वेंचोनियां समग्रें ॥ तीर्थयात्रा कराव्या ॥९५॥

तंव कुंती माद्री विनविती त्यांतें ॥ आह्मी जाऊं पतिसांगातें ॥ तीर्थयात्रा करितां समस्तें ॥ स्वामिसेवा घडेल ॥९६॥

मग रथीं वाहोनि कामिनी ॥ प्रधान गेला पंडूस्थानीं ॥ तंव तिया देखोनि दोनी ॥ रावो मनीं दचकला ॥९७॥

जया भेणें पळिजे तीर्थी ॥ तें पाठी न सोडी दैवगती ॥ असो त्या कर जोडोनि ह्नणती ॥ सेवावृत्तीं असों आह्मीं ॥९८॥

मग प्रधाना पामकोनि देशीं ॥ राव पत्नींसह जाय तीर्थासी ॥ पृथ्वी फिरोनि उत्तरदिशेसी ॥ सिद्धाश्रमीं पातला ॥९९॥

तेथें ऋषिसिद्धां भेटोनी ॥ त्रिवर्गे राहिलीं तियेस्थानीं ॥ पुढें कितियेका दिनीं ॥ वोलिले सिद्ध ॥१००॥

राया तीर्थे केलींस बहुतें ॥ आतां सेवीं मंदाकिनीतें ॥ पापें नासती समस्तें ॥ आह्मी जातों स्वर्गासी ॥१॥

तंव पंडु विनंती करी ॥ स्वामी मज न्यावें बरोबरी ॥ मुनी होय ह्नणोनि झडकरी ॥ चालिले स्वर्गपंथें ॥२॥

पुढें स्वर्गद्वार पावलें ॥ सिद्ध भीतरीं प्रवेशले ॥ पंडूसि द्वारपाळें वारिलें ॥ आडकाठीं घालोनी ॥३॥

अगा पुत्र नाहीं तुझे वंशीं ॥ तूं केवीं जाशील स्वर्गासी ॥ गती नाहीं अपुत्रिकासी ॥ ह्नणोनि पंडूसी वर्जिन्नलें ॥४॥

येरु सिद्धाश्रमीं आला ॥ कुंतिमाद्रिये बोलिला ॥ अवघा वृत्तांत सांगीतला ॥ चिंतावला मानसीं ॥५॥

ह्नणे मज ऋषिशाप दारुण ॥ कुळीं केवीं होईल नंदन ॥ मी हतभाग्य निरयभाजन ॥ जाहलों प्रिये ॥६॥

तंव येरी विनवी रायातें ॥ जीजी पुत्र होतील तुह्मातें ॥ राव ह्नणे सांग मातें ॥ उपाय कवण ॥७॥

मग दुर्वासाचें वरदान ॥ समूळ केलें तया श्रवण ॥ ह्नणे मंत्रानुष्ठानें नंदन ॥ सूर्ये दीधला पूर्वीच ॥८॥

आतां पांच मंत्र उरले असती ॥ आज्ञा द्याल तरी पुत्र होती ॥ पंडु ह्नणे भलतिया युक्तीं ॥ पुत्रमुख दिसो कां ॥९॥

मग कुंतीयें अनुष्ठान करोनी ॥ यम आव्हानिला निजमनीं ॥ तंव तो प्रत्यक्षरुपें येउनी ॥ रमला तियेसीं ॥११०॥

तेथें कुमर जन्मला ॥ राव देखोनि हरिखला ॥ उत्साहें नांव ठेविता जाहला ॥ युधिष्ठिर ऐसें ॥११॥

तैसाचि वायु आव्हानिला ॥ तयापासोनि भीम जाहला ॥ तैसाचि अर्जुन उपजला ॥ इंद्रापासोनी ॥१२॥

यावरी माद्री विनवी कुंतीसी ॥ कीं तिघे पुत्र जाहले तुजसी ॥ तरी उरले मंत्र मजसी ॥ उपदेशावे ॥ ॥१३॥

मग पंडूची आज्ञा घेउनी ॥ तिये मंत्र दिले दोनी ॥ येरी शुचिष्मंत होउनी ॥ अव्हानिले देववैद्य ॥१४॥

ते अश्विनौदेव आले ॥ रमोनि पुत्रफळ दीधलें ॥ मग तया नांव ठेविलें ॥ नकुळ ऐसें ॥१५॥

तैसाचि आव्हानिला कुमार ॥ तयापासोनि जाहला पुत्र ॥ त्यासी नांव ठेवी पंडुवीर ॥ सहदेव ऐसें ॥१६॥

ऐसे पांचपुत्र जाहले ॥ कितीयेक दिवस क्रमले ॥ तंव मंदाकिनीस्त्राना बिजें केलें ॥ पुत्रांसह कुंतीनें ॥१७॥

आश्रमीं असतां पंडुमाद्री ॥ राव जाकळिला कामशरीं ॥ मग झोंबिन्नला अविचारीं ॥ संभोगार्थ ॥१८॥

माद्री ह्नणे आठवा शाप ॥ कां मज बैसवितां अपलाप ॥ परि थोर कंदर्पव्याप ॥ राव रमला अविचारें ॥१९॥

परि रती न होतां पूर्ण ॥ रायें सांडिला स्वप्राण ॥ माद्रियें मांडिलें रुदन ॥ आक्रंदोनी ॥१२०॥

कुंती स्त्रान सारोनि आली ॥ व्यवस्था देखोनि आक्रंदली ॥ ते वेळीं माद्री बोलिली ॥ मी जाईन पतिसवें ॥२१॥

माझे पुत्र तुवां पाळावे ॥ तंव ऋषि पातले आघवे ॥ पंडुसंस्काराचिये सवें ॥ प्रवेश घडला माद्रीसी ॥२२॥

तिर्ये चितेंत उडी घातली ॥ पंडूसि स्वर्गती प्राप्त जाहली ॥ मग कुंती हस्तनापुरीं गेली ॥ पुत्रांसहित ॥२३॥

सवें ऋषीश्वर पातले ॥ त्यांहीं वृत्तांता निवेदिलें ॥ तेणें थोर दुःख जाहलें ॥ समस्तांसी ॥२४॥

धृतराष्ट्र दुःखें आहाळला ॥ विदुर करुणारसें पोळला ॥ भीष्मादिकीं हाहाःकार केला ॥ तयेवेळी ॥२५॥

भीष्में संबोखोनि समस्त ॥ आलिंगिले पंडुसुत ॥ मानिला युधिष्ठिर पंडुवत ॥ समस्तांहीं ॥२६॥

कुंती स्वमंदिरीं गेली ॥ प्रेमें गांधारीसि भेटली ॥ सर्व व्यवस्था सांगीतली ॥ गहिंवरलिया परस्परें ॥२७॥

पांचही पुत्रांची व्यवस्था ॥ गांधारीसि सांगे पृथा ॥ येरी ह्नणे शत सुतां ॥ प्रसवलें मी ॥२८॥

त्यांची व्यवस्था समग्र ॥ सांगीतली सविस्तर ॥ तो पुत्रप्रसूतिप्रकार ॥ असे पंचमस्तबकीं ॥२९॥

ऐसे कुंतीचे पांच सुत ॥ गांधारीचे येकशत ॥ कौरवपांडव समस्त ॥ जाहले सोमवंशीं ॥१३०॥

हें आदिपर्व संस्कृत ॥ पंचमस्तबकींचें अनुमत ॥ परि विशिष्ट संकलित ॥ कथिलें पुनरपि ॥३१॥

ऐसी उत्पत्ति कौरवपांडवां ॥ पुढील अनुक्रम आइकावा ॥ विद्याभ्यास करवी सर्वा ॥ कृपाचार्य ॥३२॥

आतां पुढ़ें अपूर्व कथा ॥ सावधान ऐकावी श्रोतां ॥ समस्तां जाहला विनविता ॥ मधुकरकवी ॥३३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ कौरवपांडवउत्पत्तिप्रकारु ॥ अष्टादशोऽध्यायीं कथियेला ॥१३४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP