श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे राव भारत ॥ सांगा स्वयंवरवृत्तांत ॥ तंव ऐकें ह्नणे सावचित्त ॥ वैशंपायन ॥१॥
हस्तिनीये चढोनि द्रुपदबाळा ॥ हातीं सुगंधसुमनमाळा ॥ सैन्यसन्नद्ध बंधु जवळां ॥ धृष्टद्युम्न ॥२॥
तयेतें देखोनि समस्त ॥ जाहले मदनमोहित ॥ परि यंत्र देखोनि भयभीत ॥ रायराणें ॥३॥
कृष्ण द्रुपदासि ह्नणे त्या वेळां ॥ कीं त्वां सांगावें भूपाळां ॥ यंत्र भेदील तयासि माळा ॥ घालील कुमरी ॥४॥
येरें सांगतां समस्तांसी ॥ अवघे रेषा काढिती भूमीसी ॥ कोणी न बोले कोणासी ॥ जाहला प्रहर येक ॥५॥
मनीं विचारिती आघवे ॥ हें कवणा यंत्र भेदवे ॥ बाण चुकलिया घेतील जीवें ॥ कवणें भोगावी द्रौपदी ॥६॥
पुनरपि राजा द्रुपद बोले ॥ कां गा राहिलेति उगले ॥ काय धनुर्धर निमाले ॥ विद्य जाहल्या निर्फळ ॥७॥
संकर्षण ह्नणे द्रुपदासी ॥ तूं यंत्रमिषें प्राण घेवों पाहसी ॥ कोण भेदील या लक्षासी ॥ काय नसरे द्रौपदीविण ॥८॥
तंव द्रुपद मागुता ह्नणे ॥ तुह्मां क्षत्रियां ऐसें बोलणें ॥ तरी आतां कवणासि ह्नणणे ॥ तें सांगा विचारोनी ॥९॥
यावरी बोलिलें दुर्योधनें ॥ मज दोनी बाण आगळे देणें ॥ श्रीकृष्ण ह्नणे तीन घेणें ॥ परि भेदणें लक्ष हैं ॥१०॥
येरु सहाबाण घेउनी ॥ आला धनुष्य चढवुनी ॥ लक्ष पाहे न्याहाळोनी ॥ तेल कळकळोनी कढतसे ॥११॥
श्रीकृष्ण ह्नणे यादवांस्सी ॥ तुह्मी उभे असा चौंपाशीं ॥ बाण सरलिया दुर्योधनासी ॥ घालावें कढईआंत ॥१२॥
सकळ ह्नणती दुर्योधना ॥ लक्ष न भेदवे पाहें मना ॥ शेवटी मुकसील गा प्राणा ॥ साही बाण सरलिया ॥१३॥
वारिती बलभद्र भीष्मद्रोण ॥ परिं तें न मानी दुर्योधन ॥ असो अधोदृष्टीं लक्षोन ॥ तेणें बाण सोडिला ॥१४॥
तंव तो मत्स्य उलंडला ॥ ह्नणोनि दुसरा बाण सोडिला ॥ भारता तोही वृथा गेला ॥ तयाचिपरी ॥१५॥
तेल कढे सळसळोनी ॥ वाफा बैसताती नयनीं ॥ धनुर्विद्या तिये स्थानीं ॥ वृथा दुर्योधनाची ॥१६॥
असो मागिलेचि परि जाण ॥ वृथा गेले पांच बाण ॥ तेव्हां धुसधुसाटती प्राण ॥ आधारचक्रीं ॥१७॥
तेथ गणेश देव ठेला ॥ तो संकोचें असे दाटला ॥ तंव श्वासोश्वास रोधला ॥ गांधाराचा ॥१८॥
हें जाणावें कैसेनी ॥ प्राणापानीं शकृतघाणी ॥ दुर्योधन तिये स्थानीं ॥ मरणभेणें कांपत ॥१९॥
पळाया पाहे चौफेर ॥ परि वेढोनि राहिले यादवभार ॥ मग घेतला सहावा शर ॥ निर्वाणींचा ॥२०॥
तंव भीष्मद्रोण बोलिले ॥ कोणी तरी सोडवा वहिलें ॥ नातरी दुर्योधन ये वेले ॥ जाईल जीवें ॥२१॥
हें ऐकोनि उठिला कर्ण ॥ आला जेथ दुर्योधन ॥ हातींचे घेवोनि धनुष्यबाण ॥ लक्ष आपण ग्याहाळी ॥२२॥
कृष्ण ह्नणे याचा निवाडा न होतां ॥ तूं प्राणघाता आलासि वृथा ॥ येरु ह्नणे याचियाहोतां ॥ लक्ष भेदिता होईन मी ॥ ॥२३॥
इतुकें येक करावें ॥ या रायासि राखावें जीवें ॥ लक्ष न भेदवे तरी घालावें ॥ कढयीआंत मजलागीं ॥२४॥
कर्णासि ह्नणे जगज्जीवन ॥ जायीं सोडिला दुर्योधन ॥ येणें हारविला कृतपण ॥ धनुष्यबाण देवोनि तुज ॥२५॥
आह्मी काय नेणों तुह्मांप्रती ॥ पुरुषार्थ बोलतां न लाजतां चित्तीं ॥ तेव्हां येवोनि कौरवांप्रते ॥ बैसले दोघे अधोवदनें ॥२६॥
मग कृष्णे रायांप्रती ॥ जयां विद्यागर्व असेल चित्तीं ॥ ते आजि दाखवा सामर्थ्यरीती ॥ न बैसावें अधोवदनें ॥२७॥
ऐकोनि राजे ह्नणती देवा ॥ येथ तुमची विद्या दाखवा ॥ वृथा थोरपण न मिरवा ॥ प्रत्यक्षा वांचोनी ॥२८॥
तंव कृष्ण ह्नणे रायांसी ॥ इतुकें बोलों नेदीं तुह्मासी ॥ आमुचें थोरपण मथुरेसी ॥ देखिलें असाल समस्ती ॥ ॥२९॥
तो येथेंही दावितों विनोद ॥ परि असे नातेसंबंध ॥ हांसोनि ह्नणे हलायुध ॥ कोठोनि नातें काढिलें ॥३०॥
श्रीकृष्ण ह्नणे सत्यवाचा ॥ द्रुपद शिष्य सांदीपनाचा ॥ तो गुरुबंधु आमुचा ॥ द्रौपदी पुतणी सहजची ॥३१॥
आणि पूर्वी हे आमुची बहिणी ॥ इये नाम नारायणी ॥ स्त्रीपणें अंगिकार ह्नणोनी ॥ करुं नये मजकारनें ॥३२॥
हें करितां घडे अनाचार ॥ मग उगचि राहिला हलधर ॥ तंव बोलाला शारंगधर ॥ पांचाळासी ॥३३॥
राया क्षत्रियांचा भ्रम फिटला ॥ आतां ब्राह्मणां सांगें वहिला ॥ जो लक्ष भेदील तया माळा ॥ घालील हे द्रौपदी ॥३४॥
द्रुपद ह्नणे ब्राह्मणांसी ॥ कोणीतरी भेदा लक्षासी ॥ माळ घालील तयासी ॥ द्रौपदी हे ॥३५॥
ब्राह्मण ह्नणती तयासी ॥ नरे पर्णोनियां देसी ॥ तरी औगि;ओक इयेसीए ॥ नातए घडे सर्वथा ॥३६॥
तयांचें ऐकोनि बोलणें ॥ धर्मासि पुसोनि अर्जुनें ॥ उभा राहिला तत्क्षणें ॥ धनुष्यबाण घेवोनी ।३७॥
मग तो श्रीकृष्णासि ह्नणे ॥ लक्ष भेदीन येके बाणें ॥ तीनबाण शिक्षेसि देणें ॥ त्रैलोक्याचे ॥३८॥
ह्नणोनि चारीबाण द्यावें ॥ देख ह्नणे सुखें घ्यावा ॥ ओरि हें कार्य सिद्धांसि न्यावे ॥ भलत्यापरी ॥३९॥
मग चारींबाण घेवोनि करी ॥ पार्थे नमिला श्रीहरी ॥ द्रोणा वंदोनि अंतरीं ॥ स्मरिला चित्रांगद ॥४०॥
दर्भशलाका अभिमंत्रिली ॥ ते कढयीमाजी टाकिलीं ॥ तेणें कडे उकळी शांत जाहली ॥ निवालें तेल ॥४१।
माजी निर्मळ लक्ष देखिलें ॥ अधोदृष्टीं न्याहाळिलें ॥ ऊर्ध्वमुष्टीनें मांडलें ॥ ठाण त्रिभंगी ॥४२॥
इतुक्यांत कृष्ण ह्नणे पहाहो हा दिसे जेवीं धनंजयो ॥ भीष्मद्रोणां महाबाहो ॥ भासला साच ॥४३॥
असो अर्जुनें तिये क्षणीं ॥ चाक्षुषी स्मरिली अंतःकरणी ॥ बाण गगनीं सोडोनी ॥ पाडिले लक्षें ॥४४॥
जयजयकार जाला ते क्षणीं ॥ द्रौपदीनें पेलिली करिणी ॥ पार्थाकंठीं माळ घालोनी ॥ बैसविला आपणार्यें ॥४५॥
तंव दुर्योधन कोपला ॥ समस्तां रायां बोलिला ॥ की भगणें मान खादला ॥ काय उगले पाहतां ॥४६॥
ह्नणतो तीं बाणीं जिंकीन त्रिजगती ॥ तें तुह्मी कैसे विसरलेती ॥ ऐकता उठावले भूपती ॥ संसारोनी ॥४७॥
चातुरंगाचिया चळथा ॥ उठल्य शस्त्रास्त्रें झळकतां ॥ चलिले हिरावय सुता ॥ पांचाळाची ॥४८॥
इतुक्यांत खाली उतरोनि पार्थ ॥ चालिला पूर्ण कानाडीए भरित । आणि उठिला वायुसुत ॥ मंडपस्तंभ उपटोनी ॥४९॥
पुढील आगळे झोडिले । थोर रणकंदन केलें ॥ एक आकाशीं गोफणिले ॥ एक पळाले दशदिशां ॥५०॥
तंव शल्य आला धांवत ॥ तया रेफाटी वायुसुत ॥ उचलोनि टाकिला रथासहित ॥ दुर्योधनाजवळी ॥५१॥
येरु आदळला ॥ थोर झणी होय वृकोदर ॥ लक्ष भेदिलें तो धनुर्धर ॥ अर्जुन सत्य ॥५२॥
ऐसे कौरव चिंतावले ॥ थोर आयणी उठावले ॥ द्रुपदें कन्येसि पळविलें ॥ तंव वारिलें गोविदें ॥५३॥
ह्नणे गा हे विप्रवेषें महावीरु ॥ करिती सर्वाचा संहारु ॥ तूं काहीं चिता नको करुं ॥ पाहें चमत्कार युद्धाचा ॥५४॥
इकडे भीमाचें महायुद्ध ॥ मोडिले अश्वगज पायद ॥ तंव महारथिये योघ विंधिती शस्त्रास्त्री ॥५५॥
ऐसें देखोनि धनुर्धरें ॥ कौरव निवटिले स्वशरें ॥ रायें घायवाटोनी सत्वरें ॥ सोडाविला भीमसेन ॥५६॥
चाक्षुषीविद्या चिंतीतीं तक्षणी ॥ दशदिशा व्यापिन्नला बाणी ॥ वीर पडिले बहुत रणीं ॥ येक पळाले जीवेंसीं ॥५७॥
आतां असो हें तिये अवसरीं ॥ चित्रागद पातला अंबरीं ॥ घोडे हिंसले तें समग्रीं ॥ ऐकिलें अदृश्य ॥५८॥
जंब वरुतें पाहती वीर ॥ तंव चातुरंग देखिले अपार । ह्नणती काय कोपले सुरवर ॥ आह्मांवरी ॥५९॥
तैं गगनींहूनि शर सुटले ॥ तळीं पारिके भेदिले ॥ युद्ध घोरांदर जाहलें ॥ तें असो आतां ॥६०॥
दुर्योधन ह्नणे भीष्मद्रोणा ॥ आजि वांचतां न देखों प्राणा ॥ द्रोण ह्नणे हें तुह्मी न जाणा ॥ कौशल्य मल्लांचें ॥६१॥
अद्यापि तरी विवेक धरा ॥ चला जावो हस्तनापुरा ॥ तें मानवलें गांधारा ॥ मग पळ काढिला ॥६२॥
मोद जाहला ऐसें देखोन ॥ झोडीत चालिला भी मसेज ॥ कौरवांचा घ्यावा प्राण ॥ तंव श्रीकृष धांवला ॥६३॥
भीमासि ह्नणे न मारी यांसी ॥ येरु लागला कृष्णचरणासी ॥ दोघे आले अरर्जुनापाशीं ॥ पळ सूटला सकळिकां ॥६४॥
वरुनि चित्रांगदें भेदिलें ॥ सन्मुख भीमार्जुनीं विंधिलें ॥ उरले ते अवघे पळाले ॥ न सांभाळितां ॥६५॥
आतां असो हें तिये क्षणीं ॥ सूर्य गेला अस्तमानीं ॥ मग पांचही जण मिळोनी ॥ ह्नणती जावों शाळेसी ॥६६॥
तेणें पांडवां मुरडोनि नेलें ॥ तैं त्यांहीं द्रुपदा ह्नणितिलें ॥ कीं आज्ञोत्तर दीजे आह्मां वहिलें ॥ जावया मातेजवळी ॥६८॥
मग ते रात्री जाणोनि रायें ॥ हत्तीवरी बैसविलें खरसदें ॥ पुढां द्रौपदीची हस्तिणी ॥ जाये ॥ मागां पांचही पांडव ॥६९॥
दीप दीपकाचे उजाळे ॥ आनंदेम चालि\ल कुलालशाळे ॥ द्वारीं उतरोनि तिये वेळे ॥ पाचारिली मातोश्री ॥७०॥
पुत्रवाक्य ऐकोनि ह्नणे कुंती ॥ बारे जाहली बहुत राती ॥ काय भिक्षा लागली हाती ॥ येरु ह्नणती अपूर्व थोर ॥७१॥
माता ह्नणे जरी असेल बरवी ॥ तरी पांचांजणीं वाटोनि घ्यावी ॥ जंव उठोनि आली कुंतमा देवी ॥ तंव देखिली द्रौपदी ॥७२॥
मग कडासन आंथुरिलें ॥ तेथ द्रौपदीसि बैसविलें ॥ येरीनें असे वंदन केलें ॥ श्वश्रूचरणीं ॥७३॥
वर्तला जो अवघा वृत्तांत ॥ तो पांडवीं मातेसि केला श्रुत ॥ आणि इकडे महातीं समस्त ॥ वृत्त कथिलें द्रुपदासी ॥७४॥
राव धृष्टद्युम्न विचारिती ॥ कीं ते विप्ररुपें असावे भूपती ॥ कां जे केली थोर ख्याती ॥ हे केवीं शक्ती ब्राह्मणां ॥७५॥
मग रायें पुसिलें कृष्णासी ॥ तंव हांसोनि ह्नणे हषीकेशी ॥ ते झणी होती द्विजवेषी ॥ कुंतीपुत्र पांडव ॥७६॥
तरी येक प्रकार करावा ॥ त्यांसी बरवा मान द्यावा ॥ वस्त्रें न घेती स्त्रान करवां ॥ येकमेकेंविण ॥७७॥
तयांचा कुळक्रम आघवा ॥ उदयीक सांगेन तुह्मां सर्वा ॥ तेथें धृष्टद्युम्न पाठवावा ॥ तें मानवलें द्रुपदासी ॥७८॥
असो राजा पाठविणार पुत्रासी ॥ तंव कृष्ण गेला पांडवांपाशी ॥ भेटोनियां साहीजणांसी ॥ आश्वासिलें नानायुक्तीं ॥७९॥
देव सांगे धर्मादिकांसी ॥ आतां धृष्टद्युम्न रुखवतेंसीं ॥ येथें येवोनि आदरेंसी ॥ नेईल सकळां ॥८०॥
तंव उपचारें तुरंगगजरीं ॥ धृष्टद्युम्न येवोनि राहिला दूरी ॥ रुखवत भरोनि सर्वोपचारीं ॥ पाठविलें शाळेसी ॥८१॥
तेथें जावोनि सेवकजनीं ॥ दुसें मंडप दीधले तत्क्षणी ॥ माजी पांडवां बैसवोनी ॥ पुढें ठेविलें रुखवत ॥८२॥
मागुती मंगलवाद्यध्वनीं ॥ धृष्टद्युम्न आला तिये स्थानीं ॥ थोर सन्मान होवोनी ॥ आसनीं बैसले परस्पर ॥८३॥
मग संभ्रमें पुसे प्रधान ॥ तुह्मांमाजी वडील कोण ॥ तेव्हां ह्नणे भीमसेन ॥ कीं वडील आह्मांत जयंत ॥८४॥
येर विनवोनि जयंतासी ॥ अर्जुना उठवी मंगलस्त्रानासी ॥ तंव येरु ह्नणे न्हाणें नाहीं मजसी ॥ वडिलांवांचोनी ॥८५॥
मग पांचांसही तये वेळीं ॥ मंगलस्त्रानें करविलीं ॥ अलंकार वस्त्रें वाहिलीं ॥ धृष्टद्युम्नें ॥८६॥
सुवासिनी जावोनि भीतरीं ॥ कुंती पूजिली उपचारीं ॥ मग आरोगणा समग्रीं ॥ सारिली महोत्साहें ॥८७॥
तेथोनि धृष्टद्युम्न निघाला ॥ येवोनि पितया वृत्तांत कथिला ॥ समग्रां आनंद वर्तला ॥ क्रमिली रजनी ॥८८॥
रायें प्रभातीं जाउनी ॥ सर्व कथिलें कृष्णालागुनी ॥ तंव तो ह्नणे सन्मानोनी ॥ राजभुवनीं आणा तयां ॥८९॥
मग द्रुपदें महोत्साहेंसीं ॥ पांडव आणिले राजभुवनासी ॥ पाचारोनि संबंधियांसी ॥ दीधले मेळिकार ॥९०॥
सकळां समवेत चक्रपाणी ॥ जानवसागृहीं जावोनी ॥ धर्माकुंतीसि भेटोनी ॥ पुसे वंशान्वयो ॥९१॥
तैं युधिष्ठिरें कृष्णाप्रती ॥ सांगीतली पूर्वस्थिती ॥ कीं पंडु पिता माता कुंती ॥ आह्मी पांचही पांडव ॥९२॥
ऐसें ऐकतां हषीकेशी ॥ स्नेंहें आलिंगी धर्मादिकांसी ॥ अवघे भेटले उत्साहेंसीं ॥ द्रुपदादिक ॥९३॥
ऐसें पांडव प्रकटले ॥ तेणें त्रिभुवन आनंदलें ॥ मग लग्न निर्धारिलें ॥ द्रौपदीचें ॥९४॥
अर्जुन ह्नणे गा श्रीपती ॥ आह्मी पांचही द्रौपदीपती ॥ मग कुंतीवचनाची स्थिती ॥ कथिली सकळ ॥९५॥
तंव कृष्ण ह्नणे कुंतियेसी ॥ कीं पांच पती द्रौपदीसी ॥ हे तुझी वाणी आह्मासी ॥ करणें सत्य ॥९६॥
तरी पुसाया येईल द्रुपदरावो ॥ तया सांगावा अवघा भावो ॥ ह्नणावें बोलावोनि व्यासदेवो ॥ पुसा तयांसी ॥९७॥
मग तो सांगेल तें करावें ॥ ऐसें कुंतिये शिकविलें देवें ॥ यावरी बिजें केलें सद्भावें ॥ सभेमाजी ॥९८॥
द्रुपद येवोनि धर्मापाशी ॥ ह्नणे लग्न लावों पार्थासी ॥ तंव भीम ह्नणे पांचांजणांसीं ॥ लावणें लग्न ॥९९॥
द्रुपद राहिला चमकोनी ॥ ह्नणे अघटित करितां पडिजे पतनीं ॥ मग श्रीकृष्णाजवळी येवोनी ॥ पुसता जाहला ॥१००॥
तैं कृष्ण ह्नणे द्रुपदासी ॥ चला पुसोनि पाहों कुंतीसी ॥ मग जावोनि तियेपाशीं ॥ पुसिलें वृत्त ॥१॥
कुंती ह्नणे गा अनंता ॥ द्रौपदी पांचांसि द्यावी सर्वथा ॥ जरी न माने तुह्मं व्यवस्था ॥ तरी पुसावें व्यासांसी ॥२॥
तें द्रुपदासि मिथ्या भासलें ॥ ह्नणोनि व्यासांचें स्मरण केलें ॥ ते येतांचि तिये वेळे ॥ पूजिलें सकळीं ॥३॥
पांडवांची सकळ स्थिती ॥ व्यासांसि पुसे श्रीपती ॥ कीं द्रौपदीये पांच पती ॥ हें नीतिशास्त्रीं मिळेना ॥४॥
ऐकोनि व्यास ह्नणती सर्वा ॥ येथ अन्यभावो न धरावा ॥ सुखें विवाहो करावा ॥ पांचांजणांसी ॥५॥
मग द्रौपदीचें आदिअवसान ॥ रुद्रपार्वतीगोशापवचन ॥ आणि पंचइंद्रोपाख्यान ॥ सांगीतलें पृथकत्वें ॥६॥
ह्नणती ही अंबेचा अवतार ॥ पांडवरुपें पंचवक्त्र ॥ ऐसा असे पूर्वील विचार ॥ संबंधाचा ॥७॥
एतद्विषयीं चिंता न करावी ॥ हे विवाहीं पांचांसि द्यावी ॥ द्रुपद चाकाटोनि ह्नणे जीवीं ॥ हें मज सत्य न वाटे ॥८॥
तंव विंदान केलें व्यासमुनीं ॥ द्रुपदशिरीं ठेविला पाणी ॥ अवघें दाविलें दिव्यलोचनीं ॥ प्रत्यक्षरुपें ॥९॥
आतां असो हा विस्तार भारता ॥ हे पंचमस्तबकीं असे कथा ॥ मग तें मानवलें द्रुपदचित्ता ॥ आणि समस्तां रायांसी ॥११०॥
थोर महोत्साहें करोनी ॥ पांचांसही पाटीं बैसवुनी ॥ माळा घाली द्रुपदनंदिनी ॥ परमोल्हासें ॥११॥
धवलें मंगळें वाजंतरें ॥ वर्हाड जाहलें संभ्रमें थोरें ॥ द्रुपदें पूजिलें वस्त्रालंकारे ॥ पांडवांसी ॥१२॥
समस्त राजे पूजिले ॥ ऋषिब्राह्मण संतोषले ॥ मागतीयां अभर केले ॥ दानमानें ॥१३॥
ऐसे चारी दिवस जाहले ॥ रायें पांडवां आंदण दीधलें ॥ अर्धराज्य समर्पिले ॥ दासी शतें पांच ॥१४॥
भांडारें वस्त्रालंकार ॥ धनधान्य दीधलें अपार ॥ मग पामकिले नृपवर ॥ मानसन्माने ॥१५॥
बलभद्रादि भूपाळ ॥ रायें बोळविले सकळ ॥ कृष्ण राखिला केवळ ॥ प्रीतीस्तव ॥१६॥
येरीकडे समस्त स्थिती ॥ जावोनि दुर्योधनाचे दूतीं ॥ सांगीतली कौरवांप्रती ॥ कीं प्रकटले पांडव ॥१७॥
तेणें गांधार अपमानला ॥ पळोनि हस्तनापुरीं गेला ॥ तो धृतराष्ट्रें बोलाविला ॥ करावया मनोहर ॥१८॥
मग भीष्मद्रोणादिक ॥ ह्नणती दुर्योधना ऐक ॥ पांडव प्रकटले विशेष ॥ राज्य घ्यावया आपुलें ॥१९॥
त्यांचे सखे द्रुपद श्रीपती ॥ येखादा अनर्थ नेमें करिती ॥ तरी अर्धराज्य बरव्यारीतीं ॥ देवोनि तयां समजावीं ॥१२०॥
आतां कृष्णा द्रुपदा देखतां ॥ जावोनि समजावीं पंडुसुतां ॥ कलहो चुकवोनि सर्वथा ॥ वाढवावें महिमान ॥२१॥
तंव दुर्योधन ह्नणे तयांसी ॥ कैसें राज्य द्यावें पांडवांसी ॥ एकलें इंद्रप्रस्थचि सर्वासी ॥ देऊं आपण ॥२२॥
ऐकोनि द्रोणासह भीष्म ह्नणे ॥ तवमना येईल तैसें करणें । परि पांडवांसी समजाविणें ॥ टाळावया अनर्थ ॥२३॥
असो धृतराष्ट्र गांधारी विदुर ॥ करोनि समस्तीं विचार ॥ केला द्यावया निर्धार ॥ इंद्रप्रस्थची ॥२४॥
धृतराष्ट्र ह्नणे दुर्योधना ॥ कर्णा शकुनिया दुःशासनां ॥ धर्मा समजावोनि आणा ॥ जावोनि पांचाळनगरीं ॥२५॥
मग दुर्योधन गांधारी ॥ सवें धृतराष्ट्र सपरिवारीं ॥ जावोनियां पांचाळनगरीं ॥ भेटले श्रीकृष्णासी ॥२६॥
व्यवस्था सांगतां कृष्णासी ॥ देवें करीं धरिलें दुर्योधनासी ॥ प्रथम लावोनि धर्मचरणासी ॥ मग भेटविला समस्तां ॥२७॥
भेटल्या गांधारी आणि कुंती ॥ पांडव धृतराष्ट्रचरणीं लागती ॥ तंव भीष्मादि कौरव ह्नणती ॥ कीं आमुचें आइका ॥२८॥
आजवरी जाहलें होणार तें ॥ परि इंद्रप्रस्थ देतों तुह्मांतें ॥ संघमेळें करावें तेथें ॥ राज्य निर्वेर ॥२९॥
ऐकोनि धर्म ह्नणे त्यांसी ॥ राज्य नको गा आह्मांसी ॥ कुंती ह्नणे आतां कौरवांसी ॥ विश्वासावें केउतें ॥१३०॥
तंव दुर्योधन चरणावरी ॥ लोळणी घाली विनीतकंधरीं ॥ इतुकें घेवोनि स्नेह धरीं ॥ मी अपराधी चांडाळ ॥३१॥
धर्मासि ह्नणे श्रीपती ॥ कीं जें भीष्मादिक ह्नणती ॥ तें अंगिकारीं गा सन्मती ॥ सुखें युधिष्ठिरा ॥३२॥
ऐसा द्रुपदादिकी समस्तीं ॥ धर्म बोधिला नानायुक्तीं ॥ श्रीकृष्ण ह्नणे न धरा चित्तीं ॥ संदेह कांहीं ॥३३॥
तुमचे सकळ मनोरथ ॥ आह्मां पूर्ण करणीय सत्य ॥ मग अंगिकारिलें इंद्रप्रस्थ ॥ धर्मरायें ॥३४॥
ते निशाणांच्या गजरीं ॥ चालिले इंद्रप्रस्थनगरीं ॥ धृष्टद्युम्नादि सपरिवारीं ॥ चालिले बोळवित ॥ ॥३५॥
पांडवां जालिया वनवास ॥ नगर पडिलें होतें ओस ॥ तेथें धर्म जातांचि संतोष ॥ प्रवर्तला मागुतीं ॥ ॥३६॥
नागरिकीं श्रृंगारिली नगरी ॥ पांडव प्रवेशले मंदिरीं ॥ कौरव गेले हस्तनापुरी ॥ सर्व राजे स्वदेशीं ॥३७॥
राज्यपट धर्मासि सारिला ॥ श्रीकृष्ण द्वारकेसि गेला ॥ महोत्साहो प्रवर्तला ॥ सकळांलागीं ॥३८॥
हें सांगतां सविस्तर ॥ येथेंचि ग्रंथा होईल पसर ॥ ह्नणोनि कथिलें सारसार ॥ ग्रंथांतरींचें ॥३९॥
पांडवां दीधलें इंद्रप्रस्थ ॥ हें आदिपर्वी संस्कृत ॥ परि ग्रंथांतरीं अन्यमत ॥ कीं वारुणावत दीधलें ॥१४०॥
ऐसें द्रौपदीसैंवर जाहलें ॥ पांडव इंद्रप्रस्थीं स्थापिले ॥ तें संक्षेपता सांगीतलें ॥ नानाग्रंथानुसार ॥४१॥
यानंतरें अपूर्व कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी संतश्रोतां ॥ ह्नणे मधुकरकवी ॥४२॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ द्रौपदीस्वयंवरकथाचारु ॥ येकोनत्रिंशाध्यायीं कथियेला ॥१४३॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥