मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय २७

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

विप्राज्ञा घेवोनि प्रातःकाळीं ॥ पाडवांसह कुंती निघाली ॥ उभी ठाकली तळेयापाळीं ॥ तंव पातले व्यासमुनी ॥१॥

जाहलीं क्षेमालिंगनें सर्वा ॥ मग लाक्षागृहवृत्तांत आघवा ॥ सांगीतला व्यासदेवां ॥ धर्मरायें ॥२॥

आश्वासोनि व्यास ह्नणे ॥ आतां पांचाळनगरीं जाणें ॥ माळ घालील पार्थाकारणें ॥ द्रौपदी तेथ ॥३॥

ऐसें ह्नणोनि अदृष्टले मुनी ॥ पांडव गेले गंगा टाकोनी ॥ तंव मावळला दिनमणी ॥ येरीं आन्हिक सारिलें ॥४॥

आंधारी पडली जाणोनी ॥ शिसवीची लाविली चुडणी ॥ भीम मातेसि खांदीं घेवोनी ॥ चाले मार्ग ॥५॥

उजूचि जाती गंगापाळीं ॥ तंव चित्रांगद स्त्रियामेळीं ॥ खेळत असे जळकेली ॥ मार्गी ठेवोनि परिवार ॥६॥

ते रक्षक ह्नणती पांडवांतें ॥ तुह्मीं जावें आणिके पंथें ॥ चित्रांगद गंधर्व येथें ॥ खेळत असे जळकेली ॥७॥

दीपिकाप्रकाश दावीत पार्थ ॥ अवघ्यांपुढें होता जात ॥ तो त्या सेवकांसि बोलत ॥ जाऊं येणेंचि मार्गे ॥८॥

तंव ते मार्ग रोधोनि राहिले ॥ देखोनि भीमें माते उतरिलें ॥ परियेसीं मग काय केलें ॥ भारता गा ॥९॥

सरकटोनि धरिले चरणीं ॥ कित्येक गोफणिले गगनीं ॥ येक गेले पळोनी ॥ श्रुत करिती चित्रांगदा ॥१०॥

मग तो क्रोधें आला विंधित ॥ देखोनि संधान करी पार्थ ॥ बाणीं बाण निवारित ॥ जाहला अद्भुत संग्राम ॥११॥

पार्थे येक युक्ती केली ॥ जळती चुडी अभिमंत्रिली ॥ ते गंधर्वावरी टाकिली ॥ तेणें येरु प्रज्वळिला ॥१२॥

पुढां गंधर्व असे पळत ॥ मागां अग्निकल्लोळ जात ॥ गेला आकाशपोकळीआंत ॥ परि ते पाठी न सोडी ॥१३॥

तो सर्वागें पोळोनी ॥ मूर्छागत पडिला धरणीं ॥ तंव भीमें पायीं धरोनी ॥ उचलिला देखा ॥१४॥

भवंडोनि त्राहाटावा क्षितीं ॥ तंव तयाची कुंभिनी युवती ॥ येवोनि करी विनंती ॥ रक्षीं पती भीमसेना ॥१५॥

आह्मी कुमरी तूंचि पिता ॥ चुडेदान देयीं ताता ॥ मग करुणा येवोनि पार्था ॥ तेणें भीमा निवारिलें ॥१६॥

युधिष्ठिर कृपेनें ह्नणे ॥ इयेचा भ्रतार रक्षिणें ॥ ह्नणोनि सोडिला भीमसेनें ॥ चित्रांगद ॥१७॥

तयासि ह्नणे धनुर्धर ॥ तुझा भ्रम होता थोर ॥ परि संग्रामीं न धरितां धीर ॥ पळालासि क्षणांत ॥१८॥

जीवें गेलाहोतासि वायां ॥ आतां जायीं आपुल्या ठाया ॥ येरु पुसता जाहला तयां ॥ कवण तुह्मी सांगिजे ॥१९॥

धर्म ह्नणे गंधर्वासी ॥ पंडुराज पिता आह्मासी ॥ मग सर्व स्थिती तयासी ॥ केली श्रुत ॥२०॥

व्यासें आज्ञा दिली आह्मासी ॥ तुह्मी जावें सैंवरासी ॥ माळ घालील पार्थासी ॥ द्रुपदात्मजा ॥२१॥

गंधर्व ह्नणे पार्था ऐक ॥ तें अवघड असे लक्ष ॥ तरी येक विद्या अलोलिक ॥ देईन तुज ॥२२॥

दर्भशलाका मंत्रोनी ॥ द्यावी कढयीमाजी टाकोनी ॥ तेणें तैल शीतळ होवोनी ॥ दिसेल लक्ष ॥२३॥

मग चाक्षुषीविद्या जपोनी ॥ शर सोडावा नेत्र मिटोनी ॥ तरी लक्षातें भेदोनी ॥ पाडील मनोवेगें ॥२४॥

चाक्षुषी ह्नणिजे चक्षुरुप जाणा ॥ जपतां येती नेत्र बाणा ॥ लक्ष भेदितां तत्क्षणा ॥ न पडे संदेह ॥२५॥

आणिक संग्रामाच्या समयीं ॥ बाण असंख्यात पाहीं ॥ होवोनियां दिशां दाही ॥ प्रसवती शर ॥२६॥

तरी हे विद्या घेई पार्था ॥ परि मी अग्य्रस्त्राचा मागता ॥ कोलितें जाळिलें सर्वथा ॥ सर्वाग माझें ॥२७॥

मग परस्परें विद्या दोन्हीं ॥ घेतलिया साक्षी करोनी ॥ तंव गंधर्व बोलिला वचनीं ॥ धर्माप्रती ॥२८॥

जीजी तुह्मासि मंत्री नाहीं ॥ ह्नणोनि गेलेति लाक्षागृहीं ॥ राज्य दवडोनि सर्वही ॥ ऐसी दशा पावलां ॥२९॥

आतां मंत्री येक देतों तुह्मा ॥ ह्नणोनि बोलाविलें धौम्या ॥ तो जोडला राय धर्मा ॥ बुद्धिमंत ॥३०॥

धर्मे वंदोनि धौम्यासी ॥ ह्नणे तूंचि गुरु आह्मासी ॥ जैं आह्मी पावों राज्यासी ॥ तैं यावें तुवां ॥३१॥

असो गंधर्वे तिये अवसरीं ॥ पांडव पूजिले षोडशोपचारीं ॥ वस्त्रें अलंकार कुसरी ॥ रत्नें नानाद्रव्ये ॥३२॥

धर्म बोलिला गंधर्वासी ॥ आह्मां जाणें स्वयंवरासी ॥ येरु ह्नणे चातुरंगसैन्येंसीं ॥ जावें तेथ ॥३३॥

उपरी धर्मराज ह्नणे ॥ आह्मां गुप्तवेषेंचि जाणें ॥ इष्टकार्य सिद्धीसि नेणें ॥ वळें श्रीकृष्णाचे ॥३४॥

गंधर्व ह्नणे सैंवरासी ॥ मीही येईन चातुरंगेंसीं ॥ अंतरिक्ष राहोनि साह्यासी ॥ प्रवर्तेन तुमचिया ॥३५॥

मग पुसोनि पांडव चालिले ॥ गंधर्वे अंतरिक्षीं गमन केलें ॥ नगर द्रुपदाचें पावले ॥ पंडुपुत्र ॥३६॥

तें पांचाळनगर वर्णितां ॥ विस्तार येथेंचि होईल ग्रंथा ॥ दाटणीं होतसे नृपनाथां ॥ त्रैलोकींचे ॥३७॥

नगरा अंतर्बाह्य प्रदेशीं ॥ दुसें दीधलीं संभ्रमेंसीं ॥ येक देव राहिले आकाशीं ॥ ठावो न मिळे ह्नणोनियां ॥३८॥

मग कुलालशाळे जाउनी ॥ पांडव उतरले तत्क्षणी ॥ कापडीवेष अंगिकारोनी ॥ कुंतिये सहित ॥३९॥

कुंभारासि ह्नणे युधिष्ठिर ॥ तुझिये भाग्या नाहीं पार ॥ श्रमलियांसि विश्रामकर ॥ ठावो तुमचा ॥४०॥

कीं तीर्था गेलियाचें सुकृत ॥ तुजसी घरींचि होय प्राप्त ॥ ऐसें ऐकोनि धर्मोक्त ॥ संतोषला येरु ॥४१॥

तो जावोनि स्त्रियेसि ह्नणे ॥ कैसें पवित्र यांचें बोलणें ॥ यांसी अभ्यागत करणें ॥ उद्धरतील पूर्वज ॥४२॥

मागुती धर्माप्रति ह्नणे ॥ आजी ममगृहीं भोजन करणें ॥ ऐकोनि धर्म ह्नणे न करणें ॥ आग्रहो तुवां ॥४३॥

अथवा भीमावेगळें पाहीं ॥ पांचही जेऊं तुझ्या गृहीं ॥ हा भिक्षा मागोनि सही ॥ करील भोजन ॥४४॥

तंव कुंभार करी विनंती ॥ सांगा यासीचि लागेल किती ॥ येरु ह्नणे नव्हे तृप्ती ॥ सर्वथा याची ॥४५॥

असो गोष्टी करितां परस्परीं ॥ निघोनि गेल्या घटिका चारी ॥ कुंभार ह्नणे अवधारीं ॥ जाणें असे मातियेसी ॥४६॥

तंव धर्म ह्नणे तयाप्रती ॥ भीम आणूनि देयील माती ॥ येरु ह्नणे पाप अती ॥ लागेल मज ॥४७॥

धर्म ह्नणे चिंता न करीं ॥ आतां तवपापा होईल बोहरी ॥ मग भीमासि आज्ञा करी ॥ आणीं मृत्तिका ह्नणोनी ॥४८॥

भीम गेला नदीतीरीं ॥ दरडी हाणोनि फांपरी ॥ पाडोनि उदका भीतरीं ॥ घडिला पेड ॥४९॥

वामकरी घेवोनि चालिला ॥ जाणों पर्वत उभारला ॥ तंव मार्गी सैन्यासह भेटला ॥ दुर्योधन ॥५०॥

ह्नणे हें काय उठावलें ॥ ऐकोनि कर्णे ह्नणितलें ॥ कीं कापडीयें चालविलें ॥ मृत्पिंडासी ॥५१॥

अवघियां जाहला चमत्कार ॥ ह्नणती मोठा ह्नणतसों वृकोदर ॥ परि त्याहोनि द्विगुण थोर ॥ हा कापडीया ॥५२॥

दुःशासन ह्नणे पुसों यासी ॥ तंव गांधारें वारिलें तयासी ॥ कीं हा सांडितां पेडासी ॥ स्वसैन्या होईल संहार ॥५३॥

मग ते राहिले निश्वितीं ॥ येरें कुलालशाले टाकिली माती ॥ धर्म ह्नणे आणिली किती ॥ भीम ह्नणे मुष्टि येक ॥५४॥

कुलाल जावोनि जंव पाहे ॥ तंव पर्वत उलथला आहे ॥ स्त्रियेलागीं ह्नणे पाहें ॥ खाणी जाहली गृहींचि पैं ॥५५॥

उपरी भीमा कुलाल ह्नणे ॥ हे खंडियागणीत असती चणे ॥ तैसाचि समृद्ध गूळ खाणें ॥ जें लागेल तें भातुकें ॥५६॥

यावरी भीम ह्नणे कुलाला ॥ विभाग करोनी देयीं वेगळा ॥ येरु ह्नणे भलाभला ॥ लागेल तें सुखें खावें ॥५७॥

कुलाल घरांत गेला ॥ भीमें सर्व स्वीकार केला ॥ धर्माजवळी येवोनि बैसला ॥ तंव पुसिलें धर्मरायें ॥५८॥

काहीं जाहला पाण्या आधारु ॥ येरु ह्नणे जाऊं भिक्षा करुं ॥ जंव पाहों गेला कुंभारु ॥ तंव काहींच नाहीं ॥५९॥

मग आश्वर्य करोनि ह्नणे ॥ इतुकें जरी खादलें येणें ॥ तरी भिक्षेसि लागेल जाणें ॥ ह्नणत असे ॥६०॥

चतुर्मासींची वरोसी होती ॥ ते भातुकें ह्नणोनि केली शांती ॥ तंव भीम करी विनंती ॥ कीं आज्ञा द्यावी भिक्षेसी ॥६१॥

मी येखादे रायापाशीं ॥ मागेन फाटके तुटके झोळीसी ॥ धर्म ह्नणे आसुडिसी ॥ झणी दुसें येखादें ॥६२॥

भीम ह्नणे न कीजे चिंता ॥ मग धर्म जाहला आज्ञा देता ॥ येरु निघाला शीघ्रता ॥ मळां द्रुपदाचिये ॥६३॥

प्रचंड ताड उन्मळोनी ॥ ते काठी खांदी घालोनी ॥ दुस आसुडिलें जाउनी ॥ दुर्योधनाचें ॥६४॥

तैसेंचि कर्णाचें घेतलें ॥ दुःशासनाचें ओढिलें ॥ तंव दुःशासनें पाचारिलें ॥ झणीं पळसी कापडीया ॥६५॥

तया दुर्योधनें वारिला ॥ ह्नणे ताड काठिये घेतला ॥ तो वीर नव्हे भला ॥ तरी उगला जावों देयीं ॥६६॥

ऐसा लौकिक चुकविला ॥ गांधारें दुःशासन वारिला ॥ तंव भीम दुसें घेवोनि गेला ॥ सिंपाटिये ॥६८॥

भीम ह्नणे शिंपियांसी ॥ याची झोळी करुनि द्या आह्मासी ॥ येरीं भिवोनियां तयासी ॥ दीधली करोनी ॥६९॥

मग ते कांखे घातली ॥ पुढां भिक्षा कैसी मागितली ॥ कथा अपूर्व वर्तली ॥ ते ऐकें राया ॥७०॥

भवतिभिक्षांदेहि ॥ ऐसें उच्चारी जयाचे गृहीं ॥ भिक्षा घालिती त्यांचें काहीं ॥ न करी कुचिष्ट ॥७१॥

परि चाल होयीं पुढारां ॥ ऐसें ह्नणती ज्या सुंदरा ॥ तेथ काठी घालोनि त्या घरा ॥ घाली येरु वाहणी ॥७२॥

मग घरांत रिघोनि बळेंची ॥ झोळिये घालावया वेंची ॥ तेणें धाकें जन अवघेची ॥ देखत खेवो वाढिती ॥७३॥

तंव ह्नातारी येक भेटली ॥ ते भीमासि काय बोलिली ॥ अगा गृहें दिसताति पैलीं ॥ तेथ झणी जासील ॥ ॥७४॥

तैं उग्र नावें पुरोहित ॥ कापडियां वधितो नित्य ॥ केला बहुतांचा निःपात ॥ शस्त्रें हाणोनी ॥७५॥

तेणें पृथ्वीचे रायांसीं ॥ आजि आम्रभोजन मांडिलें परियेसीं ॥ भीम ह्नणे मज जावयासी ॥ अगत्य तेथ ॥७६॥

मग ते आळी झडकरी ॥ चुकोनि गेला त्याचेचि घरीं ॥ भिक्षाशब्द केला द्वारीं ॥ जाणों मेघ कडाडला ॥७७॥

तो बैसोनि पाकस्थळीं ॥ रांधवणी करी सर्व काळीं ॥ स्वस्त्रियेसि करी रळी ॥ खेदखिन्नपणें ॥७८॥

रांधिलेंचि पुनः रांधवी ॥ भाजिलेंचि पुनः भाजवी ॥ मोडोनि तोडोनि सांडी दावी ॥ ऐसें करी नित्यानें ॥७९॥

असो भीमाचा शब्द ऐकोनी ॥ द्वारासि आली ब्राह्मणी ॥ उपद्रवें पतीचेनी ॥ कृश असे जाहली ॥८०॥

तियें कापडी देखोनि अद्भुत ॥ ह्नणे हाचि पुरवील मनोरथ ॥ मग आक्रंदोनि बहुत ॥ अंग घाली धरणीये ॥८१॥

कपटें ह्नणे हायहाय माये ॥ मज मारिलें कापडीयें ॥ ऐकतां घेवोनि शस्त्र लाहें ॥ द्वारा आला पुरोहित ॥८२॥

भीमाकडे जंव पाहिलें ॥ तंव पर्वतप्राय देखिलें ॥ मनीं अद्भुत भय संचरलें ॥ ह्नणे काय करील नेणिजे ॥८३॥

मग वोजेंचि मागिले कडोनी ॥ खङ्ग घरांत दीधलें टाकोनी ॥ काय ह्नणता जाहल कोपोनी ॥ स्त्रियेलागीं ॥८४॥

रांडे हे गोसावी ईश्वरपुरुष ॥ महंत कृपाळु विद्वेष ॥ मारिलें ह्नणतेसि हें मिष ॥ मांडिलें तुवां ॥८५॥

मग चरणीं लागला ॥ तंव भीम तयासि बोलिला ॥ अरे तुवां बहुतां केला ॥ घात कापडीयां ॥८६॥

ह्नणोनि काठी फिरविली झरझरां ॥ येरु कांपे थरथरां ॥ ह्नणे मारुं नको दातारा ॥ ऐकें विनंती माझी ॥८७॥

आह्मी रायाचे पुरोहित ॥ धर्म कारण चालवूं सत्य ॥ ह्नणोनि लोक चालवित ॥ द्वेष आह्मांसी ॥८८॥

कोणी लटिकें सांगितलें तुह्मातें ॥ कीं मारितों कापडीयांतें ॥ येणें उपायें वधावें मातें ॥ तुह्मी ह्नणवोनी ॥८९॥

भीम ह्नणे आजि राखिलासी ॥ परि आह्मां वास आकाशीं ॥ जरी कापडींचे वाटेसि जासी ॥ तरी तुज वधीन ॥९०॥

मग येरु ह्नणे स्त्रियेसी ॥ अन्न आंबे द्यावे यासी ॥ येणें जीवें राखिलें मजसी । अन्न घालीं झोळिये ॥९१॥

अवघे आंबे मांडे घेतले ॥ जे रायांलागीं होते केले ॥ भीम निघाला कुलालशाळे ॥ तया उपरी ॥९२॥

तैं पासोनि तो पुरोहित ॥ कापडीयांलागीं नमित ॥ असो भीम करी दृष्टिभूत ॥ पदार्थझोळी ॥९३॥

ह्नणे कंदमुळें सेवितां वनांतरीं ॥ काजळी पडली असे जठरीं ॥ ते फिटेल इये नगरीं ॥ ऐसें दिसे अनुमान ॥९४॥

असो मग तेणें कुलालें ॥ पांचांसही अभ्यागत केलें ॥ आणि भीमसेनातें वाढिलें ॥ भिक्षान्न कुंतियें ॥९५॥

तें अवघेंचि भक्षिलें ॥ मग पांचलाडु वाढिले ॥ तेणें मानस तृप्त जाहलें ॥ दीधला ढेंकर ॥९६॥

ऐसी ते निशी क्रमिली ॥ तंव प्रभात प्रकाशली ॥ पांडवीं नित्यकर्मे सारिली ॥ मग बैसले येकांतीं ॥९७॥

काय केलें युधिष्ठिरें ॥ नावें ठेविली परस्परें ॥ तीं ऐकावी सविस्तारें ॥ ह्नणे मधुकरकवी ॥९८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ कष्टमस्तबक मनोहरु ॥ कुलालगृहप्रवेशप्रकारु ॥ सप्तविंशाध्यायीं कथियेला ॥९९॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पमस्तु ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP