॥ श्रीगणेशाय नम:॥ ॥
मुनि ह्मणे गा जन्मेजया ॥ ब्रह्महत्या नासतील तुझिया ॥ ते कथा चित्त देओनियां ॥ परिसें आतां ॥१॥
शंतनु तुमचा पूर्वज ॥ जो पूर्वील श्रावण महाराज ॥ तेणें प्रसन्न करोनि दशभुज ॥ वसे शिवभुवर्नीं ॥२॥
ते समूळकथा अवधारी ॥ कवणीयेके अवसरीं ॥ कैलासीं बैसले त्रिपुरारी ॥ सभेमाजी ॥३॥
देवगण गंधर्व किन्नर ॥चारण यक्ष विद्याधर ॥ अष्टौदिक् पाळ समग्र ॥ ब्रह्मा हिमवंतादी ॥४॥
अष्टनायका नॄत्य करिती॥ नारद तुंबर सरस्वती ॥ रंग राहिला गायनगतीं ॥ डुल्लत तेथें ॥५॥
ते गायनाची झणत्कृती ॥ समुद्रें ऐकिली रसवृत्ती ॥ मग चालिला पशुपती ॥ दर्शनाशी ॥६॥
रत्नें घालोनि परियेळीं ॥ सभोसि गेलात तत्काळीं ॥ तंव वामाभागीं देखिली बाळी ॥ गौतमी ते ॥७॥
इतुक्यांत वायु झुळुकला ॥ तेणें कंचुकीपांखा उचलला ॥ सिंधुअवलोकिता जाहला ॥ कामद्दष्टीं ॥८॥
तें अवलोकितां महेशें ॥ समुद्रा शापिलें आवेशें ॥ कीं फल्गुतटीं वृक्षवेषें ॥ जन्मसील तूं ॥९॥
येरु ह्मणे देवाधिदेवा ॥ हा कोप क्षमा करावा॥मजलागीं उ:शाप द्यावा ॥ चंद्रमौळी ॥१०॥
उपरी ह्मणे पिनाकपाणी ॥ ऋषि जातां काशियेस्थानीं ॥उत्धार होईलत्यांचे चरणीं ॥ प्रथमतुज॥११॥
दुसत्यानें तूं होसील श्रावण ॥ तिसत्यानें शंतनु प्रतीपनंदन ॥ तैं जोडले गंगा कामिनीरत्न ॥ ते अकल्पित ऐकें॥१२॥
तियोचि समयीं गंगा देवी ॥उघडी देखिली अष्टवसुवीं ॥ ह्मणोनि शापिलें स्वभावीं॥महारुद्रें ॥१३॥
कीं तुह्मी व्हाल गंगानंदन ॥ अल्पायुषी सत्पही जण॥ आठवा वर्तेल पुण्यपावन ॥स्त्रीविरहित ॥१४॥
ऐसें शापिलें त्रिपुरारीं॥ असो सिंधु जन्मला फल्गुतीरीं॥सावो जाहला अवधारीं॥ वृक्षजाती उंचतर ॥१५॥
तो येकदा उन्मळोनि पडिला॥नदीसि सांडोवा जाहला ॥ तंव ऋषिसमुदाय पातला ॥ काशिये जातां॥१६॥
फल्गुतीरा पातले मुनो॥ परि उतारु न दिसे जीवनी ॥ मन थडिये थडिये तेक्षणीं॥ पाहतीउतार॥१७॥
तंव तो सावो पडिला देखिला ॥ तयार सांडोवा असे जाहला ॥ हर्षनवलावो वर्तला ॥ ऋषीश्र्वरांसी ॥१८॥
करिती ज्ञानदृष्टीं निहारु ॥ तंव तो सायरुपें समुद्रु ॥मग करावया उध्दारु चालिले वरुनी ॥१९॥
ऋषि उतरोनि पैल गेले ॥ तेणें शापांत असे जाहलें॥ बाळ्क होवोनि राहिलें ठेलें ॥ तरुवराचे॥२०॥
मुनि गेले काशियेसी ॥ बाळ्क होतें नदीतीरासी ॥ तंव कौरवराजे सोमवंशी ॥ पारधीसी पातले ॥२१॥
जन्मेजय करी प्रश्र्न ॥ कौख्नाम कवणगुण॥ वैशंपायन ह्मणे सावधन ॥ परिसें राया ॥२२॥
सोमवंशीं ययातिनृपमणी॥ तयाचिया दोनी कामिनी॥ शर्मिष्ठा ते दैत्यनंदिनी॥ देवयानी शुत्र्कात्मजा॥२३॥
तरी तयांची साग्र कथा॥ प्रथमस्तबकीं असे भारता ॥ पूर्वी कथियेला संक्षेपता॥ तुझेनि प्रश्र्नें ॥२४॥
असो दोघींचे चारी कुमरु ॥ यदु तिर्वसू देव्यानिपुत्रु ॥ आणि दुर्जय तैसाचि पुरु॥ शर्मिष्ठात्मज॥२५॥
मन ते ययातीची जरां॥ पुरुनें घेतली अवधारा॥ ह्मणोनि राज्य तया कुमरा॥ दीधलें बापें॥२६॥
येरीं पितृवचन भंगिलें॥ह्म्णोनि सिंहासन वर्जिलें॥ पुरुसि कुरु ऐसें नावं ठेविलें ॥वाक्य केलें ह्मणोनी॥२७॥
त्या कुरुपासोनि पुत्र जाहले॥ते कौखनाम पावले ॥ इक्षु यक्षु शौर्यें आथिले ॥ नृपु आणि जन्मेजय ॥२८॥
ते चौथे व्याहाळी खेळ्ती ॥ एकदा आले फल्गुतीराप्रती ॥ तंव बाळ्क देखतां सुंदरमूर्ती ॥ उचलोनि कडिये घेतला ॥२९॥
कौतुकें हस्तनापुरीं नेला ॥ वंशीं कुमर जोडिला ॥ आनंदें महोत्साह केला ॥ वाढविला कौखीं ॥३०॥
परी तो शिवशापित वरदानी॥ ह्मणोनि जाय शिवभुवर्नी ॥ वोळंगत असे नित्यानी ॥ शंकरासी ॥३१॥
मागुती तो जाचंदोदरीं ॥ जन्मा घातला त्रिपुरारीं ॥ तो निरंतर भक्ति करी ॥ मातृपितरांची ॥३२॥
तो श्रावणनाम पावला॥ जाचआअकाशिये घेवोनि चालिला ॥ कावडीं घालोनिया वहिला ॥ असे जात ॥३३॥
दिन मावळोनि रात्री जाहली॥ जाचंदांसी तृषा लागली॥ ह्मणोनि कावडी वृक्षीं लाविला॥ आपण निघाला उद्कार्थ ॥३४॥
झारी घेवोनियां करीं ॥ पाणिया गेला सरोवरीं ॥ तें पाणी राखितसे निरंतरीं ॥ दशरथरावो॥३५॥
तो चाहूळ ध्वनि ऐकिका ॥ रायें मृगव्याजे बाण सोडिला ॥ तंव श्रावण हदयीं भेदोनि वहिला ॥ पडिलातेथ॥३६॥ रायाचा हेतु निवारला॥ह्मणे म्या मृगाचे वधिला ॥ परि पहावया जंव आला ॥ तंव देखिला ब्राह्मण॥३७॥
रायें त्तांत विचारला ॥ येरें जाचंदांचा कथिला ॥ आणि ह्मणे तूं सूर्यवंशीय भला ॥ तरी करीं कार्य येक॥३८॥
नबोलतांचि जाउनी ॥ ममपितरांसि पाजीं पाणी ॥ तंव येरु सागंळ्या होउनी ॥ लावी वदनीं तयाच्या ॥३९॥
माता ह्मणे बा श्रावणा ॥ कां मौनत्वें पाजिसी जीवना ॥ रात्रीं धाडिला ह्मणोनि मना ॥ राग आला कीं तूझिये ॥४०॥
तंव बोलिला नृपनाथ ॥ जी मी श्रावण नव्हें दशरथ ॥ मग कथिला वृत्तांत ॥ श्रावणाचा ॥४१॥
ऐकतां त्यांहीं राव शापिला ॥ ह्मणती पुत्रवियोग होवो तुजला ॥ देह पडेल अंतवेळां ॥ पुत्रशोकें ॥४२॥
येरें बांधिली शकुनगांठी ॥ ह्मणे पुत्र देखेन जरी दृष्टीं ॥ तरी पुत्रशोकें होवोनि कष्टी ॥ पडो कां देहो ॥४३॥
आतां असो हें तत्त्क्षणी ॥ प्राण सोडिला त्या वृध्दानी ॥ मग तिघांसही संस्कारोनी ॥ राव गेला अयोध्ये ॥४४॥
ऐसा श्रावण निधन पावला ॥ मग तोसोमवंशीं जन्मला॥प्रतीपाकिळीं उपजला ॥ शंतनुनामें ॥४५॥
तयाचें जातक वर्तविलें ॥ तंव सावो पूर्वील प्रकाशला ॥मग शंतनु नाम ठेविलें॥ सायात्मक ह्मण्वोनी ॥४६॥
तो दिसांमाशीं वाढिन्नला ॥ प्रतीपें राज्यपट दीधला ॥ शंतनु राज्य करुंलागला ॥ हस्तनापुरींचें ॥४७॥
इकडे शिव ह्मणे गंगेसी ॥ सिंधु जन्मला सोमवंशीं ॥ तरी तूं जाई मृत्युलोकासी ॥ होईल दोघां संयोग ॥४८॥
ऐसी शिवाज्ञा जाहली ॥ मग ते मृत्युलोकीं जन्मली ॥ तपसाधना करुं लागली ॥ब्रह्मगिरीशिखरीं ॥४९॥
तप साधूनि गौतममुनि ॥ आणिता जाहला मेदिनी ॥ ह्मणोनि ब्रह्मगिरिपासूनी ॥ जन्मसत्य इयेतें ॥५०॥
लिंगाकार तो पर्वत ॥ असो शंतनुगिरि लंघित ॥ पारधी खेळ्तखेळ्त ॥ आला तेथें ॥५१॥
तंव त्या पर्वताचे शिखरीं ॥ शंतनुरायें देखिली सुदंरी ॥ मग दुतव्दारें पृच्छा करी॥ कीं तूं कुमरी कवणाची ॥५२॥
येरी सेवकासि बोले ॥ तुज जेणें रे पाठविलें ॥ तयासि येथें येतां वहिलें ॥ सांगेन वृत्त ॥५३॥
येरेम जावोनि निवेदिले ॥ तैं शंतनूनें बिजें केलें ॥ ह्मणे कां वनवासा सेविलें ॥ सुंदरे तुवा ॥५४॥
जरी तूं अससी अपर्णित ॥ तरी मजसी वरावें सत्य॥ येरी ह्मणे माझें भाषित॥ करिसील जरी ॥५५॥
तरीच धडेल संयोग जाण ॥ नुलंघितां माझें वचन पाणी ॥ येरु ह्मणे तवआज्ञेविण ॥ मी उदकही न स्वीकारीं ॥५६॥
तूं वो राज्याची स्वामिणी ॥ ह्मणोनि भाके दीधला प्राणी ॥ न करी काय ॥५७॥
मग तियें घेवोनि पुष्पमाळा ॥ घातली शंतनूचे गळां ॥ राव तियेसह त्या वेळां ॥ हस्तनापुरासी ॥५८॥
आनंदें नगर श्रॄंगारिलें ॥ म्होत्साह थोर केले ॥रायासि रत्रीरत्न जोडलें ॥ गंगादेवी ॥५९॥
पुढें कितियेकां दिनीं ॥ पुत्र प्रसवली ते कामिनी ॥ तो तियेंचि घातला जीवनीं ॥ राव जाहला वचनबध्द ॥६०॥
ऐसे सातही वसु जन्मले ॥ ते त्र्कमें उदकीं घातले ॥ त्याचेम शापमोचन जाहलें ॥ मग ते नेले स्वर्गासी ॥६१॥
लोक ह्मणती शंतनूसी ॥ कीं पुत्र नाहीं तुझे वंशीं ॥ तूं लुब्धलासि विषयरसीं ॥ कां स्त्रीसी वारिसी ना ॥६२॥
रायें मनीं धरिलें भावें ॥ तंव अपत्य जाहलें आठवें ॥ तें उद्कीं जंव घालावें ॥ तंव रावो विनवित ॥६३॥
ह्मणे अवशारीं विचार ॥ ममवंशीं नाहीं कुमर ॥ तरी भिक्षा देई हा पुत्र ॥ तंव येरीनें दीधला ॥६४॥
आणि ह्मणे गा नृपनंदना ॥ उत्तीर्ण जाहलासि माजे वचना ॥ ऐसेम ह्मणोनि गंगा जीवना ॥ माजि गुप्त जाहली ॥६५॥ राव होवोनि मूर्छागत ॥ करुणा भाकी शोकात्र्कामत ॥ मग प्रधानेम केला शांत ॥ नीतिमार्गोपदेशें ॥६६॥
त्या बाळका नावं ठेवी रावो ॥ भिक्षे दिला ह्मणोनि भीष्मदेवो ॥ नगरीं केला उत्साही ॥ दानधर्मेसीं ॥६७॥
तो दिवसमासीं वाढिन्नला ॥मग परशुराम गुरु केला ॥ धनुर्विद्यें पूर्ण जाहला ॥ गंगात्मज ॥६८॥
पुढें कितीयेकां दिनीं ॥रामें अठवोनि गंगाकामिनी ॥ विरहज्वरें व्याप्त मनीं ॥ अंत:करणी सुख नाहीं ॥६९॥
तें प्रधानवर्गा जाणवलें ॥ त्याहीं भाष्मासि निवेदिलें ॥ ह्मणती वर्हाड करणें भेलें ॥ शंतनूचें ॥७०॥
तें मानवलें भीष्मासी ॥ मग कन्या पाह्ती देशोदेशीं ॥ परि जैसी योग्य रायासी ॥ तैसी य दिसे ॥७१॥
कोणी ह्मण्ती भीष्मासी ॥ ढीवरकन्या रुपराशी ॥ नाव राखिते भागीरथीसी ॥ मत्स्योदरी नामें ॥७२॥
तंव जन्मेजयो पुसे ॥ जी जी मत्स्योदरी नावं कैसें ॥ मग वृत्तांत सागंत असे ॥ व्यासशिष्य ॥७३॥
कीं ते मत्स्याउदरीं जन्मली ॥ ह्मणोनि हें नांम पावली ॥ राव ह्मणे कैसी जन्मली॥ तें सांगा सकळ ॥७४॥
मग ह्मणे वैशंपायन ॥पूर्वी वेणुवत्स राव पावन ॥ तो अध्यात्ममार्गी निपुण ॥ प्रतापदिन कर ॥७५॥
त्याची शुभाक्षी नामें कामिनी ॥ ऋतुरत्रात असतां कोणणैकदिनीं॥ पांजरींचा शुक काढोनी ॥ सांगे तया निजगुज ॥७७॥
ह्मणे गा परदेशीं सैन्यासहित॥ गेला असे माझा कांत ॥ आणि मज जाहला ऋतु प्रात्प ॥ तरी तूं जाई तेथवरी॥७८॥
मग लिहूनियां चिटी ॥ ते बांधिली शुकाचे कंठीं ॥ येरु गेला उठाउठी ॥ जेथें नाथ असे तिचा ॥७९॥
मग तो समग्र वृत्तांत ॥ वेणुवत्सासि जाहला श्रुत॥ रायें जाणोनियां त्वरित ॥ केला उपाय ॥८०॥
योगबळें वीर्य द्रवविलें ॥ तें पुडियेमाजी घातलें ॥ पुसे याच्या कंठीं बांधिलें ॥ ह्मणे हें देयीं प्रियेसी ॥८१॥
येरु झडकरोनि उडाला ॥ भागीरथीतीरा आला ॥ तंव स्वजातीयें झडपिला ॥ नखे. पुडी चिरियेली ॥८२॥
तेथोनि बिंदु गळिन्नला ॥ भागीरथीउदकीं पडिला ॥ तंव मत्सी ग्रासायाला ॥ धाविन्नली वेगें ॥८३॥
दोनी मत्स्य झोंबिन्नलें ॥ वीर्य समान व्दिधा जाहलें ॥ परि एकेचि उदरीं वाढिन्नले ॥ कन्याकुमर ॥८४॥
हें व्यासवचन भारतीं ॥ आणि नारदपुराणीची संमती॥ कीं दोनगर्भी जन्मलीं असती ॥ बाळकें दोनी ॥८५॥
असो मत्स्य आणि मत्स्योदरी ॥ नावें ठेविलीं ढिवरीं ॥मग तीं वाढिन्नलीं घरीं ॥ दासाढीवराचे ॥८६॥
ढीवर चालवी नावेतें ॥ तेथें हीं खेळती अपत्यें ॥ सदा रक्षिती नौकतें ॥ ढीवर घरीं गेलिया ॥ ८७॥
आतां त्या मत्स्यपुत्राची कथा ॥ कैसी जाहली अपूर्वता ॥ ते ऐकें गा भारता ॥ द्त्तचित्तें ॥८८॥
दक्षिणदिशे विराटनगरी ॥ तेथें वैराट राज्य करी " तो निपुत्रिक ह्मणोनि रविवारीं ॥ जाय स्त्राना तापिये ॥८९॥
व्दादशवर्षीच्या सिहास्थासी॥ ऋषि चालिले त्र्यंबकासी ॥ तंव भेटि जाहली भागीरथीसी ॥मत्स्येंसिं देखा ॥९०॥
त्या ऋषींचिये संगतीं॥ मत्स्योदर चालिला पंथीं ॥ सदा वर्ते सेवावृत्तीं ॥ कांपडीया ॥९१॥
वैराट आला तापियेसी ॥ तंव भेटी जाहली ऋषीश्र्वरांसी ॥ रायें षोडशोपचारें तयासी ॥ पूजिलें भावें ॥ ९२॥
रायें तो कापडी देखीला ॥ बत्तीस लक्षणीं ओळखिला॥ रावो सर्वज्ञ असे भला ॥ जाणें सकळ शास्त्रें ॥९३॥
पाचारोनि पुसे तयासी ॥ कीं मातापिता कवणिये देशीं ॥काय नावें असती त्यांसीं ॥ तें सांगें विप्रात्मजा ॥९४॥
येरु ह्मणे गा नृपनाथा ॥ मी ब्राह्म ण नव्हें सर्वथा ॥ मत्सी माझी असे माता ॥ पिता दास ढीवर ॥९५॥
वास्तव्य भागीरथी तीरीं ॥ दुसरे नेणें संसारीं ॥ ऐसें ऐकतां विस्म्य करी ॥ राजा वैराट ॥९६॥
तंव नारद पातला तत्क्ष्णीं ॥ रायें पूजिला स न्मानो नी ॥ मग मत्स्याश्र्वर्य पुसिले मुनी ॥ नारादसी ॥ ॥९७॥
येरें राव एकां तीं नेला ॥ सकळ वृत्तांत श्रुत केला ॥ जो वेणुवत्सापासोनि वर्तला ॥ मच्छापंर्यत ॥९८॥
मुनि ह्मणे तरी गा नृपवरा ॥ तुवां पाळावें या कुमरा ॥ राज्याधिकारी दुसरा ॥ नाहीं जाण ॥९९॥
तुवां तापियेची सेवा केली ॥ ह्मणोनि हे प्रसन्न जाहली ॥ पुत्रप्राप्ती जाहली भली ॥ वंशी तुझिये ॥१००॥
हाचि राज्याधिकारी जाण ॥ लटिकें नव्हे तापीची आण ॥ मग तें नारदोत्क वचन ॥ मानवलें रायासी ॥१॥
राव त्या कुम रा घेवोनि आला ॥ महोत्साह नगरीं ॥ केला वैराटासी पुत्र जोडला ॥ मत्स्योदर नामें ॥२॥
कापडीवेष सांडविला ॥ वस्त्रालंकारें श्रृंगारिला ॥ राज्यपट सारोनि वहिला ॥ बैसविला सिंहासनीं ॥३॥
जन वोळंगती परिवारीं ॥ मत्स्य वैराटीं राज्य करी ॥ तंव निमाला काळांतरीं ॥वैराटरावो॥४॥
येरु वैराटनाम पावला महारात्र्कमें आथिला ॥परि वेणुवत्सवीर्ये जन्मला ॥मच्छाउदरीं ॥५॥
तो मत्स्योदरीचा सहोदर ॥ ह्मणोनि पांडवांसि प्रीतिभर॥ धर्म आवडे निरंतर ॥ सत्पुरुष ह्मणोनि ॥६॥
असो मत्स्य वैराटें नेल्यावरी ॥ नाव राखी मत्स्योदरी ॥ तंव जाहली नवलपरी ॥ ते ऐकें पूर्वकथा ॥७॥
भारता कोणे येके दिवशीं ॥ पराशर आला भागीरथीसी ॥ तंव नावाडे गेले घरासी ॥ एकली होती मत्स्योदरी ॥८॥
ऋषि ह्मणे वो सुंदरी ॥ मज उजरीं पैलातीरीं ॥ येरी ह्मणे धीर धरीं॥ आतां येतील नावकर ॥९॥
ते अवयवीं काम कलिका ॥ पराशरें देखिली नायका ॥ मग कंदर्पे व्याप्त देखा॥ जाहला ऋषी ॥११०॥
मुनि तयेची प्रार्थना करी॥ ह्मणे संग देई सुंदरी ॥ थोर जाकळिलों कामशरीं॥ नाहीं उरी न देतां ॥११॥
तूं कव णाची नंदिनी ॥ तें सांगे मज लागोनी ॥ तुझें स्वरुप देखतां नयनीं ॥ मनीं उपजला विरहज्वर ॥१२॥
येरी ह्मणे जी ऋषीश्र्वरा॥ मी न जाणें मातापितरां ॥ एका जाणें दासाढिवरा ॥ मत्स्योदरी नाम माझें ॥१३॥
येरु पाहे ज्ञानद्दष्टीं ॥ तंव तेवे णुवत्सकन्या बरवंटी ॥ आणि रुप पाहतां दृष्टीं ॥ अनुपम्य दिसे ॥१४॥
विरहें ह्मणे अहो कामिनी ॥ मज वांचवीं आजिच्या मरणीं ॥ येरी ह्मणे जी तापसमुनी ॥ संग कैसा घडले ॥१५॥
तुह्मीं स्वकार्य करोनि जावें ॥ मग मातें कोणी वरावें ॥ लज्जायमान हीनस्वभावें ॥ राहणें मग स्वामिया ॥१६॥
येरु ह्मणे चिंता न करीं ॥ तुज पुनरपि करीन कुमरी ॥ जेणें लज्जा न ये संसारीं ॥ तुजलागीं वो ॥१७॥
यावरी ह्मने मत्स्योदरी ॥ आह्मी मद्यमांसआहारी ॥ दुर्गंधी वसे शरीरीं॥ सदाचारी पवित्र तुह्मी ॥१८॥
तुह्मी तपसामर्थ्ये आगळे ॥ कां कामें जालेति आकुळे ॥ आह्मी ढीवरें हीनकुळें ॥ न घडे संग सर्वथा ॥१९॥
ऋषि ह्मणे हो मत्स्योदरी ॥ तूं वेणुवत्सरायाची कुमरी॥ नव्हेसि जातीची ढीवरी ॥ बत्तीसलक्षणी मी जाणें ॥१२०॥
मग तिची मूळउत्पत्ती॥ऋषीनें कथिली तियेप्रती ॥ ह्मणे आतां उपावो निरुती॥ दुर्गधीसी आचरितों ॥२१॥
अंगींची विभूती अभिमंत्रोनी॥ काढिली कस्तूरीमिश्रित चंदनीं॥ माजी सुंगध आकर्षोनी॥ घातली मस्तकीं तियेच्या ॥२२॥
तेणें दुंर्गर्धी पळोनि गेली॥ योजनगंधा नांव पावली ॥ भ्रमरपंत्की वेंधती परिमळीं॥ दाहीदिशां गंध फांके ॥२३॥
मुनि ह्मणे योजनगंधेसी ॥ आतां संगे देई मजसी॥तंव ते ह्मणे यासी॥ येक परियेसीं तपोधना ॥२४॥
तुह्मीं कराल तें नव्हे काय ॥ परि दिवसा संग करुंनये ॥ कां जे कोणी देखिलिया पाहें ॥ तरी मज जिणें नाहीं ॥२५॥
येरें तमोगुण आकर्षिला ॥ दाहीदिशां अंधकार पडला ॥ धुकें भृगोल दाटला ॥ तियेवेळीं ॥२६॥
मगसंग जाहला नावेवरी ॥गर्भ संभवला तिचे उदरीं ॥ ऋषि नागवोनि तपसामुग्री ॥ हरिली योजनगंधनें ॥२७॥
असो ऋशि चालिला ते वेळीं ॥तंव विनवी मत्स्यबाळी॥ ह्मणे गर्भसंभूती जाहली ॥ तुमचोनि वीर्यें ॥२८॥
तरी हे गर्भछाय देखोनी ॥ मज हांसतील मायबहिणी ॥ ते असह्य लज्जा जाणोनी ॥ करणें लागे प्राणघात ॥२९॥
तयेवेळीं पराशर॥ थोर जाहला चिंतातुर ॥ तंव आठवला मत्रोच्चार ॥ मनामाजी ॥१३०॥
ऋषि सामर्थ्यवंत कैसा ॥ कीं स्त्री प्रसवे नवांमासां ॥ ते नवपळें परियेसा ॥ केली प्रसूती ॥३१॥
तचि जन्मला वेदव्यास ॥ दोघां जाहला संतोष ॥मग तो निघाला तापस ॥ तपश्र्वर्येकारणें॥३२॥
जंव पराशर चालिला॥ तेव्हा व्यास पाठीं लागला ॥ ह्मणोनि जननियें धरिला ॥ करकमळांहीं ॥३३॥
ह्मणे बारे तूंही जासी ॥ तरी मज निरविलें कोणीसी ॥ येरु ह्मणे चिंत्ता मानसीं ॥ करुंनको जननीये ॥३४॥
जेव्हा अवघड पडेल तुज ॥ तयेवेळीं चिंतीं मज ॥ मग मी शीघ्र करीन काज ॥ आण तुझी हो ॥३५॥
ऐसें मातेसि संबोखिलें ॥ मग ज्ञान उपदेशिलें ॥ तेणें तियेसि भासलें ॥ यथार्थपण ॥३६॥
मग व्यास गेला तपासी ॥ माता राहिली नावेपाशीं ॥ तंव नाश होवोनि अंधकारासी ॥ उजळल्या दिशा ॥३७॥
तें पराशरा कर्षित गगनीं ॥ धुकें येतसे तैं पासोनी॥ तोचि अंधकार देखिजे जनीं ॥ भारता गा ॥३८॥
हे व्यासोत्पत्ती ऐकोनी ॥ जनमेजय ह्मणे हो मुनी ॥ उत्पत्ती सांगा मजलागोनी ॥ पराशराची ॥३९॥
मग ह्मणे मुनीश्र्वर ॥ कीं भारव्दाज ब्रह्मकुमर ॥ तो सकळविद्यांचा सागर ॥ योगमार्ग जाणें ॥१४०॥
त्याची दुर्मताकीर्ति युवती ॥ दुजें सैरंध्री नाम महासती ॥ तिये गृहीं टाकोनि तपाप्रती ॥ गेला मुनी भारव्दाज ॥४१॥
तो गौत मीच्या तटीं असतां ॥ इकडे पुष्प वती जाहली कांता ॥ मग थोर उपजली चिंता॥ कीं नाहीं पुत्र स्वोदरीं ॥४२॥
जरी जाइजे पतीच्या स्थानीं॥ तरी तो शाप देईल झणी॥ यास्तव आतां पाठवोनि कोणी॥ मागोनि आणावा वीर्यबिंदु॥४३॥
मग तो समग्र वृत्तांत ॥ केला पुसेया शुकाश्रुत ॥ह्मणे हा करि सील कार्यार्थ ॥ तरी सोडीन तुजलागीं ॥४४॥
ऐकोनि येरु ह्मणे माते ॥ हें हो अगत्य करणें मातें॥ पत्र लेहूनि देतां निरुतें॥ मी जाईन ऋषिजवळी ॥४५॥
ऐसा निश्र्वयो करोनी ॥ येरीनें पत्रिका लिहोनी ॥ ते बांधिली कंठीं तत्क्षणीं ॥ पुसेयाचे ॥४६॥
मग तो उडोनि वेगवत्तर ॥गौतमीतीरा गेला शीघ्र ॥ नमस्कारोनि ऋषीश्र्वर ॥ पुढेंपत्रिका ठेविला ॥४७॥
येरें जाणोनि पत्रिकार्थ ॥ ह्मणे पुरवूं मनोरथ ॥ मग योगमार्गें ऊर्ध्वरेत॥ लोटिला वीर्यबिंदु ॥४८॥
निर्मोनियां पर्णद्रोण ॥ माजी द्रवला बीजपुर्ण ॥ तो पक्षियाकंठीं बांधोन ॥ पामकिला वेगेंसीं ॥४९॥
गौतमीहुनि वेगवंत ॥ पक्षी आला आकाश त्र्कमित ॥तंव एक कारला त्वरित॥ धाविन्नला तयावरी॥१५०॥
तेणें पांखी झडपिला तंव तोपुडा नखीं चिरला ॥ वटपारंब्यावरी पडला ॥ आंतील बिंदु॥५१॥
कांहीं उरलें होतें पुडां ॥ तें जावोनि गेला वेढाला ॥ ठेवोनि सैरंध्री पुढां ॥ह्मणे घेई वीर्यबिंदु ॥५२॥
तंव ते हर्षोनियां सुंदरी॥ वीर्य घेतसे मुखाभीतरीं ॥ तें अविनाश गा अव धारीं ॥ ऋषीश्र्वराचें॥५३॥
तें जठमारुतेंवहिलें ॥ गर्भकोशीं वीर्य नेलें ॥ तेथें बाळक संभवलें॥ आणि पुरला मनोरथ॥५४॥
पुसा ह्मणे सैरंध्रिये ॥ मज निरोप देई माये ॥येरी ह्मणे सुखें जायें॥ रुचले तेथें ॥५५॥
मग तो प्रवेशला वनीं ॥ इकडे यथाकाळीं प्रसवली कामिनी॥ पुत्र जाहला ह्मणवोनी॥ मिळाले ऋषीश्र्वर॥५६॥
महोत्साह करोनियां॥ नावं ठेविला द्रोणाचार्या ॥ गुरु होईल सोमवंसशियां ॥ ऐसें जातक वर्तविलें ॥५७॥
परे याचेनि विद्याबळें ॥ परस्परें आटतील कुळें॥ ऐसें जातक करु निवहिलें ॥ ऋषि गेले स्वस्थाना ॥५८॥
ऐसा हा उपज ला द्रोण ॥ सैरंध्रीभरव्दाजनंदन ॥ तो सकळ्विद्या परिपूर्ण ॥ सामर्थ्यमेरु ॥५९॥
आतां पराशराची उत्पती ॥ ऐकें जन्मेजया भूपती ॥ तरी जें वटपारंबिया वरती ॥ पडिलें बीज ॥१६०॥
त्या वटपारंबीच्या उदरीं ॥ पुत्र जन्मला तिये अवसरीं ॥ तेथें प्रकटली अंबा खेचरी ॥ तियें केला प्रतिपाळ ॥६१॥
पारांबियेमाजी जन्मला॥ ह्मणोनि पराशर नाम पावला।तंव ब्रह्मा तेथें आला ॥ करें स्पर्शिला बाळक ॥६२॥
ब्रह्मविद्या उपदेशोनी ॥ विधि गेला निजस्थानीं ॥येरु तेथेंचि आश्रम करोनी॥ राहिला देखा ॥६३॥
तोतरी तपसामर्थ्यराशी॥ परिसंगघडलाढीवरीसी॥ तेथें जन्मला व्यासऋषी ॥ केवळ्ज्ञानी॥६४॥
ऐसी पराशराची उत्पत्ती॥तुज कथिली गा भूपती॥ आणि बाळपणीं सत्यवती॥प्रसवली व्यासी॥६५॥
असो ऋषि गेलिया वनांतरीं॥नौका राखी मत्स्योदरी ॥ परि जाहली बाळकुमरी ॥ ऋषिसामर्थ्यं॥६६॥
ते दासाढीवराचे घरीं॥नांव राखी मत्स्योदरी ॥परिमळ फांके योजनभरी ॥ तिचे अंगींचा ॥६७॥
ढीवरा नांव असे दास॥हेम भारतीबोलिले व्यास ॥ परि भविष्योत्तरींचाविशेष ॥ कृपानाथ नाम ॥६८॥
तो सत्यनगरींचा वासकरिता ॥ इकडे भीष्म जाहला विचारिता ॥ कीं शंतनूलागीं सुरुप कांता॥मिळेल कैसी ॥६९॥
तंव दोतमुखें आयकिलें ॥ कीं कन्यारत्न असे भलें ॥ तें शंतनूसि श्रुत केलें ॥ येरु निवाला मानसीं ॥१७०॥
मग सन्नध्द करोनि दळभार ॥ पारधीमिसें नृपवर ॥ तयेसि पहावया शीघ्र॥ चालिला वनांतरीं ॥७१॥
मनींचा हाचि अनुभावी ॥ ह्मणे आधीं तियेसि पाहों ॥ मग महोत्साहें विवाहो ॥ करणें सत्य॥७२॥
ऐसा गंगातीरीं गेला ॥ तंव योजना येका परिमळ आला ॥ ह्मणोनि तेचि मार्गे चालिला॥सपरिवार॥७३॥
तंव देखिली ते सुंदरी ॥रावोजवळी गेला झडकरी ॥ तियेसि ह्मणे हो अवधारीं ॥वचन माझें ॥७४॥
तुज देखोनियां नयनीं ॥मज व्यापिलें कामबाणीं ॥ तरी तूं आतां कामिनी ॥ वरींमजला ॥७५॥
येरी ऐकोनि ह्मणे राया ॥ हें पित्यासि पुसावें माझिया ॥ यावरी राव गेला ठाया ॥ढीवराचे ॥७६॥
त्यासि ह्मखे गा अवधारीं ॥मज देई तुझी कुमरी ॥ ढीवर बोलिला याउपरी॥रायाप्रती ॥७७॥
ह्मणे ऐकितों येक विचार ॥ कीं तुजसी असे प्रथमकुमर ॥ तो राज्याधिकारी नृपवर ॥ हस्तनापुरींचा ॥७८॥
ह्मणोनि तुज नेदीं नंदिनी ॥ कीं जे पुत्र होतील तियेलागुनी ॥ ते सेवकत्वें नित्यानी॥वोळंगती त्यासी ॥७९॥
तंव रावो मनीं दवकला॥ न बोलतांची मुरडला ॥स्वमंदिरा माजि आला परि व्यापिला विरहज्वरें॥१८०॥
रुप आणोनि अंत: करणीं ॥ ह्मणे दैवें जोडणें कामिनी ॥तेसौदर्याची दिव्य खाणी ॥ केविं पाविजे ॥८१॥
ऐसें पुन :पुन आठवी ॥ विरहज्वरें तप्त जीवीं॥ मग सांगीतलें स्वभावीं॥ भीष्माप्रती ॥८२॥
ह्मणे त्वां योजिली हो ती कांता ॥ते म्या देखिली पारधी खेळ्तां ॥ परि आतां मेळवीं सर्वथा ॥ यत्न करोनी ॥८३॥
ते न मिळतां जाईल प्राण॥तापोपशांती नव्हे अन्यें ॥भीष्म ह्मणे पितयालागुण॥ धरा धीर स्वामिया ॥८४॥
मगपरिवारेंसीं निघाला ॥ भीष्म ढीवराघरीं गेला ॥ ह्मणे कन्या दे गा वहिला॥ शंतनूसी ॥८५॥
ढीवर ह्मणे नृपनंदना॥ हें आणावें तियेच्या मना॥ भीष्म चालिला यया वचना ॥ भागीरथीये ॥८६॥
तंव आला तिचा गंध ॥ सकळां उपजला आनंद ॥ भीष्म जावोनि तिये सन्निध ॥ करी विनंती ॥८७॥
ह्मणे आइके हो माते ॥ त्वां वरावें ममपित्यातें॥ तुझी आज्ञा सर्वार्थें ॥करणें मज ॥८८॥
येरी ह्मणे गंगानंदना ॥ हें आलें माझिये मना ॥ परि येक असे विज्ञापना ॥ ते अवधरीजे॥८९॥
तूं राज्य करिशील हस्तनापुरीं ॥ आणि पुत्र होतील माझे उदरीं ॥ ते वोळंगतील निरंतरीं ॥ तुज सेवकत्वें ॥१९०॥
मग भीष्म ह्मणे तियेतें ॥ मी राज्य न करीं हो माते ॥ देईन तुझिया पुत्रातें ॥ छत्रसिंहासन ॥९१॥
जरी हें अन्यथा होईल वचन ॥तरी मज गंगेचीच आण ॥मग बोलिली आपण ॥ सत्यवती ते॥९२॥
तूं न करिसील हें खरें ॥ घेइजेल तुझे कुमरें॥ येरु ह्मणे ऐक सुंदरे ॥माझें वचन ॥९३॥
मी सर्वथा विवाह न करीं ॥ गंगेसमान सकळ नारी ॥हे माझी भाक निर्धारिले ॥घेई माते ॥९४॥
ह्मणोनि बोल दीधला ॥ विवाहाचा निश्र्वय केला ॥ लग्न निर्धारिलें ते वेळां भीष्मदेवें ॥९५॥
ह्मणे कन्या नेलियाविण ॥ मी न करीं पितृदर्शन ॥ मग तेथेंचि लाविलें लग्न ॥ खांडेयासी॥९६॥
खांडाशंतनु नोवरा ॥ केला तये अवसरा ॥सोहळा जाहला अवधारा॥ चारी दिवस॥९७॥
मग सत्यवतीसि घेउनी भीष्म निघाला तये क्षणीं॥ वाजंत्राची येक ध्वनी ॥ महोत्साह वर्तला ॥९८॥
ढीवर बोळवीत चालिला ॥भीष्म नग रीं प्रवेशला ॥समारंभ थोर जाहला ॥ तोरणमखरीं ॥९९॥
नागरीं नगर श्रृंगारिलें ॥ ढीवरासि सन्मानिलें ॥नानापदार्थ समर्पिले ॥ फेडिलें दरिद्र ॥ २००॥
भीष्म ह्मणे ढीवरासी॥ सत्यवतीनगर दिलें तुह्मासी ॥ आतां राज्य परिवारेंसीं॥ करावें निर्भय ॥१॥
ऐसी व्यवस्था करोनी ॥ प्रवेशला राजभुवनीं॥ शंतनूसि नमस्कारुनी ॥ह्मणे आणिली योजनगंधा ॥२॥
मग विधीनें लाविलेंलग्न ॥ शंतनूचें निवालें मन ॥ह्मणे जोडलें स्त्रीरत्न ॥ पुत्रप्रसादें ॥३॥
परिभीष्म प्रतिज्ञाव्यवस्था ॥ श्रुतजाहली नृपनाथा ॥ तेव्हां शंतनु ह्मणे सुता ॥ हें वोखटें केलें तुवां ॥४॥
गंगेसमान मानिल्या नारी ॥हे अधठ्ठ जाहली परी ॥ आतां वचन माझें अवधारीं ॥ करुं विवाह तुझा पैं ॥५॥
तंव भीष्मह्मणेजीताता ॥हें मज नघडे सर्वथा ॥ सद्नती पितृभक्ति करितां॥होईल मज निश्र्वयें ॥६॥
पूर्वी श्रावणादि बहुत॥ पितृभक्तीनें तरलेसुत ॥ तयांचे थोर पुरुषार्थ ॥ पुरणांमाजी ॥७॥
माझें करणें तें केतुलें॥ त्वदर्थी तारुण्य समार्पिलें ॥येणें निमित्तें जोडिले वहिलें ॥ उत्तम पद ॥८॥
तरी अवधारींगा पतिया ॥ जें बोलसी तेंजाईल वायां ॥ गंगेसमान सकळ स्त्रिया ॥ निश्र्वयें मज ॥९॥
राव न बोले या उपरी ॥ ढीवरबोलाविला झडकरी ॥ पदार्थ देवोनिनानाकुमरी ॥ पाठविला नगरासी ॥२१०॥
असो शंतनु आणि सत्यवती ॥ अष्टभोगांतें भोगिती ॥ तंव पुत्र जाहले भूपतीप्रती॥ चित्रविचित्र नामें ॥११॥
पुढें बहुत काळ त्र्कमला ॥ तंव शंतनु स्वर्गस्थजाहला॥मग राज्यतिलक सारिला ॥चित्रवीरासी ॥१२॥
ऐसीगंगाशंतनु व्यवस्था ॥ पराशरसत्यवती सुता॥ वैराटचित्रविचित्रकथा॥ सांगीतली अनुत्र्कमें ॥१३॥
पुढें चित्रविचित्रविवाहो ॥ मेळवील भीष्मदेवो ॥ तो ऐकावा कथान्वयो ॥ ह्मणे मधुकरकवी ॥१४॥
इति श्रीकथाकल्पतरु॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ शंतनु सत्यवतीप्रकारु ॥ षोडशोध्यायीं कथियेला ॥२१५॥