॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॥
ओं नमोजी अनंतपारा ॥ चराचराचिया आधारा ॥ कृपासागरा सर्वेश्र्वरा ॥ सज्जनमाहेरा आदिदेवां ॥१॥
जयजयाजी ब्रह्मांडाधीशा ॥ परंज्योती पुराणपुरुषा ॥ करीं माझिये बुद्धिप्रकाशा ॥ भुवनाधीशा जगत्पते ॥२॥
तूं अनंत तुझीं नामें अनंत ॥ चरित्रें अनंत गुण अनंत ॥ ब्रह्मादि गाती संतत ॥ परि अंत नलागेची ॥३॥
तुझी होतां कृपादृष्टी ॥ संतुष्ट होय सकल सृष्टी । ह्मणोनि भावें उठाउठी ॥ पाई मिठी घातली ॥४॥
तूंचि होवोनि कृपाघन ॥ विघ्नाचें करिसी निरसन ॥ ह्मणोनि वक्रतुंड अभिघान ॥ विद्दज्जन बोलती ॥५॥
ऐसा तूं देव गणराज ॥ सिद्धीस पावविता भक्तकाज ॥ भक्तां देसी परमगुज ॥ निजांतरीचें ॥६॥
ऐसिया तुज नमस्करु ॥ तूंचि प्रेरिता कल्पतरु ॥ आणि बोलविता विचारु ॥ वागीश्वरीसी ॥७॥
हे अंतरीं करितां स्तुती ॥ प्रत्यक्ष पावला श्रीगणपती ॥ ज्ञानांकुश घेवोनि हातीं ॥ दावीं वोप्तत्ती वत्सलपणें ॥८॥
मग नमिली शारदामाता ॥ जे पितामहाची निजदुहिता ॥ कुंदकुसुमापरिस धवलता ॥ वसनीं विलसे जीचिये ॥९॥
वीणापुस्तक शंख कमळ ॥ घवघवीत शोभा बहळ ॥ भक्तवरदानीं उतावीळ ॥ जगज्जननी वागूदेवी ॥१०॥
प्रसन्नपणें उपजवीं स्फूर्तीं ॥ कीं वदूनि कुळदैवतांप्रती ॥ श्रीगुरुसि करूनि प्रणती ॥ बोलें भारती दिव्यवाणी ॥११॥
कुळदेवतेनें दधिला आयास ॥ प्रसन्न होवोनि आसमास ॥ वोपिला कृपेचा सौरस ॥ निजदासासी ॥१२॥
यावरी नमिले श्रीव्यासगुरु ॥ ज्यांचा शिष्यजनां परमाधारु ॥ भवसंसारसमुद्रपारु ॥ दाविते जे ॥१३॥
आतां नमूं संतश्रोतां ॥ जयां हरिकथेची अपूर्वता ॥ तयां नमूं विष्णूभक्तां ॥ सद्बावेंसीं ॥१४॥
मागां स्तबक संपला दाहवा ॥ भीष्मद्रोणपवोंद्भवा ॥ पुढां एकादश ऐकावा ॥ श्रोताजनी ॥१५॥
तुमचिये संगतीकरणीं ॥ कथा बोलेन प्राकृतवाणी ॥ तेणें होईल माझे मनीं ॥ आनंदभरितें ॥१६॥
जैसा विंझुणा वारितां नरेंद्रा ॥ आपुलाही निवे उबारा ॥ तैसा मी निवेन शरीरा ॥ तापत्रयांपासोनी ॥१७॥
आतां होवोनि सावधान ॥ पांडवकथा कीजे श्रवण ॥ तेणें उल्हासे अंतःकरण ॥ वक्तयाचें ॥१८॥
जन्मेजय राजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥ या दोहींची सुख संगती ॥ घडली येकीं ॥१९॥
तो परस्परअनुवाद ॥ हरिकथेचा परमानंद ॥ श्रोतीं ऐकावा भेदाभेद ॥ ह्मणे मधुकरकवी ॥२०॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ एकादशस्तबक मनोहरू ॥ मंगलाचरणप्रकारु ॥ प्रथमाध्यायीं कथियेला ॥२१॥