कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ सांगा अग्रकथान्वयो ॥ मग बोलिला मुनिरावो ॥ वैशंपायन ॥१॥

ह्मणे ऐकें सावधान ॥ गांधारें केलिया र्‍हादोपसर्पण ॥ पांडवी तयाचें शेष सैन्य ॥ मारिलें समस्त ॥२॥

कौरवांचे सैन्यावास ॥ शुन्य देखोनि बहुवंस ॥ पांडव विश्रामले सर्वशः ॥ तेचि स्थानीं ॥३॥

तयां निद्रिस्थ देखोनी ॥ कृप कृतवर्मा आणि द्रौणी ॥ तिघे र्‍हदाप्रति येवोनी ॥ पाचारिती गांधारा ॥४॥

ह्मणती वीरा ऐकें विनवणीं ॥ आजि मारोनि जाई स्वर्गस्थानीं ॥ अथवा पांडवांतें जिंकोनी ॥ राज्य करीं पृथ्वीचें ॥५॥

परि सर्वथा अवधारीं ॥ युद्येद्यम निश्चयें करीं ॥ तंव येरू सुष्ठोत्तरीं ॥ बोलें त्यांसी ॥६॥

कीं तुह्मीं श्रांत खिन्न जालेति असा ॥ हा युद्धकाळ नव्हे परियेसा ॥ तरी आजिंची हे निशा ॥ विश्रांति घेणें ॥७॥

उदयीक युद्ध पांडवांसी ॥ आपण करूं निश्चयेंसीं ॥ तंव द्रौणीही रायासी ॥ ह्मणता जाहला ॥८॥

राया उदयीक प्रातःकाळीं ॥ पांचाळ सोमक सहदळीं ॥ लोळवीन भूमंडळीं ॥ तरीच कवच काढीन ॥९॥

ऐसें वाक्य बोलिलें ॥ तंव भीमाचे पारधी आले ॥ ते मृगमांस भारें गदगले ॥ ह्मणोनि विसावले तेठायीं ॥१०॥

त्यांहीं गांधाराचा निर्बध ॥ आणि कृपाद्निकांचा संवाद ॥ ऐकोनि बोलिले शब्द ॥ एकमेकां ॥११॥

अरे दुर्योधन रणींहूनी ॥ झुंजतां गेला पळोनी ॥ चिंतातुन जाहले ह्मणोनी ॥ भीमादि पांडव ॥१२॥

मग त्याहीं आपणातें ॥ निदेशवाक्यें ह्मणितलें होतें ॥ कीं कोठें तरी गांधारातें ॥ ठाउकें करा ॥१३॥

तरी सहजेंचि लागली शुद्धी ॥ आतां सांगों स्वामीसि आधीं ॥ कीं गांधार उदकामधी ॥ लपालासे ॥१४॥

आणि कृपादिकांचा विचार ॥ सांगों भीमासि समग्र ॥ तो देवोनि वस्त्रालकार ॥ सन्मानील आपणां ॥१५॥

ऐसें परस्परें बोलिले ॥ मग भीमापें शीघ्र गेले ॥ सर्व वृत्त सांगीतलें ॥ दुर्योधनाचें ॥१६॥

भीमें सन्मानोनि दीधलें धन ॥ मग धर्मासि केलें कथन ॥ कीं जळस्तंभकरून ॥ दुर्योधन लपालासे ॥१७॥

ऐकता धर्म पांचाळ सोमक ॥ सहर्षित जाहले अनेक ॥ तें भविष्य जाणोनि सम्यक ॥ काय केलें व्यासदेवें ॥१८॥

त्वरें द्वैपायनडोहा गेले ॥ दुर्योधनाजवळी बैसले ॥ इकडे प्रातःकाळीं सन्नद्धले ॥ पांडवभार ॥१९॥

शिखंडीं सहदेव नकुळ ॥ धृष्टद्युम्रादि शेष पांचाळ ॥ सहसैन्य पांडव सकळ ॥ चालिले र्‍हदाप्रती ॥२०॥

ते कृपादिकीं येतां देखिले ॥ मग दुर्योधनासि बोलिले ॥ कीं पांडव ससैन्य आले ॥ आपणाइतके ॥२१॥

तरी आह्मीं ओसरूं येथोनी ॥ ह्मणोनि राजाज्ञा घेवोनी ॥ शोकपरायण होवोनी ॥ वटाखालीं बैसले ॥२२॥

चिंताग्रस्त होवोनि मनीं ॥ ह्मणतीं दुर्योधन मायेकरूनी ॥ र्‍हादीं राहिलासे लपोनी ॥ करोनि उदकस्तंम ॥२३॥

जरी पांडव तेथ जाती ॥ तरी कैशी होईल गती ॥ ऐसी मनीं चिंता करिती ॥ तिघेजण ॥२४॥

मग रथीचें घोडे सोडोनी ॥ राहिले वटतळी लपोनी ॥ इकडे पांडव तत्क्षणीं ॥ आले र्‍हदाजवळी ॥२५॥

धर्म ह्मणे जी चक्रपाणी ॥ गांधार दैवीमाया करोनी ॥ स्तंभ करोनि राहिला जीवनीं ॥ निरुपायपणें ॥२६॥

तयाजवळी व्यास आहे ॥ तरी मारावा कोणे उपायें ॥ हें ऐकोनि यदुरायें ॥ ह्मणितलें धर्मासी ॥२७॥

अगा हा मायावी आहे ॥ असाध्य तरी सर्वोपायें ॥ यास्तव करणी करोनि लाहें ॥ मारावें यासी ॥२८॥

पूर्वी माव करणींचि करोनी ॥ दैत्य मारिले वज्रपाणीं ॥ आणि अंशावतार घरोनी ॥ म्याचि दैत्य मारिले ॥२९॥

बळी चक्रवती बांधिला ॥ हिरण्याक्ष हिरण्यकशिपू वधिला ॥ वृत्रासुरही मारविला ॥ मायालाघवें ॥३०॥

रामें वधिला रावण ॥ इंद्रजित आणि कुंमकर्ण ॥ इंद्रे मयदैत्य दारूण ॥ वधिला दानवैसीं ॥३१॥

विप्रचित्तीं तारकासुर ॥ वातापी इल्वल त्रिशिर ॥ सुंदोपसुंदादि अपार ॥ केला मायाघात ॥३२॥

तरी मायाक्रियोपायें ॥ गांधार मारावा लवलाहें ॥ यावरी बोलिलें धर्मरायें ॥ गांधाराप्रती ॥३३॥

अरे गांधारा कौरवनाथा ॥ तूं क्षत्रियां अंत करिता ॥ तरी युद्ध सांडोनि वृथा ॥ लपालासि जळीं ॥३४॥

हें युक्त नव्हें क्षत्रियासी ॥ धर्मयुद्ध करीं आह्मासीं ॥ हें ऐकोनि धर्मरायासी ॥ बोलिला येरू ॥३५॥

अरे धर्मा तूं जाण मनीं ॥ मी भय विषादें करोनी ॥ नाहीं लपालीं जीवनीं ॥ र्‍हदामाजी ॥३६॥

झुंजतां मज श्रम जाहला ॥ ह्मणोनि क्षणभरी रिघाव केला ॥ आतां बाहेर येवोनि वहिला ॥ करितों युद्ध ॥३७॥

सकळ पृथ्वीचे नृपवर ॥ मज बंधुसमान समग्र ॥ द्रोण कर्णादि सहोदर ॥ मारिलें तुह्मीं ॥३८॥

आतां साह्य नाहीं मजसी ॥ कैसें झुंजावें तुह्मांसीं ॥ ह्मणोनी राज्य‍इच्छा कैशी ॥ निर्बाधवा ॥३९॥

तरी हे पृथ्वी केवळ तुमची ॥ धर्मा त्वां भोगावी सुखेंची ॥ मी राज्य न करीं सत्यची ॥ न करीं युद्ध ॥४०॥

मज जीवितव्याची काहीं ॥ किंचिदपि इच्छा नाहीं ॥ अरण्यामाजी लवलाहीं ॥ जाईन आतां ॥४१॥

हें ऐकोनियां वचन ॥ धर्म बोलिला आपण ॥ कीं पुर्वीं सामपुर्वक कृष्ण ॥ आला होता तुजपाशीं ॥४२॥

मागीतला राज्यवांटा ॥ तेव्हां तुवां धरिला तांठा ॥ अवगणोनि वैकुंठपीठा ॥ मांडिला कुविचार ॥४३॥

सुईच्या अग्नीं लागे महीं ॥ आह्मां देणें नाहीं तेही ॥ बलात्कारें ते सर्वही ॥ हरिली वृत्ती आमुची ॥४४॥

तो तुं आजी देशील तरी ॥ प्रतिग्रहरूपें धरत्री ॥ घेणें नाहीं अवधारीं ॥ आह्मांलागीं ॥४५॥

तूतें संग्रामी जिंकोनी ॥ क्षत्रियधर्में घेईन धरणी ॥ तुवां लाक्षागृहीं वन्ही ॥ लाविला होता ॥४६॥

भीमसि विष दीधलें ॥ जळामाजी होतें बुडविलें ॥ आणि केशाकर्षण केलें ॥ द्रौपदीचें ॥४७॥

अनेक उपकार केले ॥ ते पृथक न जाती उच्चारिले ॥ अर बहुतांपरी कष्टविलें ॥ दुरात्मया ॥४८॥

आतां आह्मां राज्य देतोसी ॥ हें असबद्ध निश्वयेंसी ॥ वृथा प्रलाप कां करिसी ॥ निधें युद्ध बाहेर ॥४९॥

ऐसें धर्माचें वचन ॥ ऐकोनियां दुर्योधन ॥ युद्धी करोनी सावध मन ॥ बोलता जाहला ॥५०॥

अरे धर्मा मी आजी पाहें ॥ घायाळ आणि विरथ आहें ॥ तरी तुह्मां सर्वासि लाहे ॥ झूंजेन एकला ॥५१॥

बाल्हीक आणि भीष्मद्रोण ॥ जयद्रथ भगदत्त कर्ण ॥ मद्रराजा शल्य जाण ॥ तया सैन्याधिपती ॥५२॥

आणि भूरिश्रवसपुत्राचें ॥ तया शकुनी मित्र बांधावाचें ॥ उत्तीर्ण रूप समस्तांचें ॥ होईन एकलाची ॥५३॥

ऐसें वाक्य बोलोनी ॥ जळाबाहेरी निघोनी ॥ सर्व सन्नाय पाहोनी ॥ घेतलें गदाशस्त्र ॥५४॥

समरंगणीं राहूनि ठेला ॥ मग पांडवांतें बोलिला ॥ ह्मणे मी झुंजो येकला ॥ सांगा कवणासी ॥५५॥

काय तुह्मां पांचा बंधूसी ॥ कीं समस्त दळभारासी ॥ किंवा येकेचि जनेंसी ॥ करूं युद्ध ॥५६॥

हें धर्मा तुवां सांगावें ॥ तंव येरू बोलिला सद्रावे ॥ अगा दुर्योधना ऐकावें ॥ माझें वचन ॥५७॥

जेवीं तुह्मीं सकळ मिळोन ॥ चातुरंगामाजि वेढोन ॥ बाळ मारिला अभिमान्य ॥ कौशाल्येंसीं ॥५८॥

तैसें बहुतांसी झुंजतां ॥ तुज होईल कौरवनाथा ॥ ह्मणोनि येकेसींचि आतां ॥ त्वां झुंजावें ॥५९॥

जेणेंशीं तुं झुंजशील ॥ तोचि सन्मुख राहील ॥ हा युधिष्ठीराचा बोल ॥ ऐकिला गोंविंदें ॥६०॥

मग सक्रोध लोचनें ॥ धर्माप्रति श्रीकृष्ण ह्मणे ॥ अगा येणें दुर्योधनें ॥ केलें तें ऐकें ॥६१॥

तेरावर्षपर्यंत जाण ॥ भीमाचें कराया निर्धन ॥ येणें अभ्यासिलें दारूण ॥ लोहमय पुरुषासी ॥६२॥

हा थोर असे युक्तिमंत ॥ तैसा तुह्मां समस्तां आंत ॥ यासीं झुंजे ऐसा समर्थ ॥ नाहीं कव्हणी ॥६३॥

तूं पार्थ सहदेव नकुळ ॥ ययांमध्यें युद्धकुशळ ॥ नाहीं कोणी समबळ ॥ येर काय बापुडीं ॥६४॥

तरी यासी कैसी प्रतिज्ञा ॥ तुवां केली गा अज्ञाना ॥ कीं गदायुद्धीं येकाजणा ॥ पाचारावें ॥६५॥

भीमसेन तरी सर्ववा ॥ यासीं गदायुद्ध करितां ॥ जय पावेल तेही चिंता ॥ संशय मज ॥६६॥

हें ऐकोनि भीमसेन ॥ श्रीकृष्णासि ह्मणे आपण ॥ ऐकें देवा सावधान ॥ वाक्य माझें ॥६७॥

दुर्योधनदेहूनि देख ॥ माझी गदा गुणाधिक ॥ द्दिगुणपणें असे देख ॥ न करीं चिंता ॥६८॥

इयेंकरूनि येकलाचि जाण ॥ त्रैलोक्यवीरांतें जिंकीन ॥ तरी दुर्योधनातें मारीन ॥ येथ काय नवलावो ॥६९॥

हें ऐकोनि हर्षित जाहला ॥ श्रीकृष्ण भीमासि बोलिला ॥ महावीरा भलामला ॥ पराक्रमी पुरुष ॥७०॥

पाहें कलिंग मागध नृपवर ॥ कुरु यवन आणि तत्पुत्र ॥ हे त्वां मारोनि युधिष्ठिर ॥ निश्विंत केला ॥७१॥

आतां गदायुद्धीं प्रयत्‍न ॥ गांधारऊरुविदारण ॥ करूनि होई जयमान ॥ पावें प्रतिज्ञापार ॥७२॥

मग सात्यकी पांचाळ ॥ धर्मादि पांडव सकळ ॥ श्रीकृष्णवाक्य केवळ ॥ पूजिते जाहले ॥७३॥

धर्मासि ह्मणें भीमसेन ॥ गांधारें अपकार करोन ॥ शल्यें निक्षेपोनि बाण ॥ भेदिले तुज ॥७४॥

तीं शल्यें काढोनि पाहें ॥ आतां सुखियां होवोनि राहें ॥ हा धार्तराष्ट्र लवलाहें ॥ मारिलाचि जाण ॥७५॥

यावरी ह्मणे युधिष्ठिर ॥ जो शकुनियें केला अविचार ॥ तयाचें फळ हा गांधार ॥ पावो आतां तवहस्तें ॥७६॥

ऐसा आशीर्वाद देधला ॥ भीमा गदेंसीं उभा ठाकला ॥ मग बोलता जाहला ॥ दुर्योधनासी ॥७७॥

अरे गांधारा पापमती ॥ तुवां दुष्कृतें केलीं अती ॥ आणि समेमाजी द्युतीं ॥ वस्त्रें हरिलीं द्रौपदींची ॥७८॥

वनवासीं नानापरी ॥ आह्मां कष्टविलेंसि भारीं ॥ त्याचें फळ हातावरी ॥ देखसी आजी ॥७९॥

भीष्मद्रोण मारुनि समस्त ॥ आतां तुझा करीन घात ॥ हें ऐकोनि भीमोक्त ॥दुर्योधन बोलिला ॥८०॥

अरे वृथा बडिवार बोलोनी ॥ आजी काम नाहीं जाणीं ॥ पराक्रम बळ दावोनी ॥ करीं निर्वाण संग्राम ॥८१॥

तेथ पांडव बैसले असती ॥ आणि दोघे उठिले निर्घातीं ॥ तंव यात्रा करोनि शीघ्रगतीं ॥ बळदेव तेथें पातला ॥८२॥

तया समस्तीं नमन केलें ॥ परम संतोषातें पावले ॥ सकळ वीर बोलते जाहले ॥ रेवतीरमणा ॥८३॥

कीं तुमचें शिष्य दोघेजण ॥ भीम आणि दुर्योधन ॥ यांचें युद्धकौशल्य निर्वाण ॥ पाहिजे देवा ॥८४॥

पूर्वीं युद्धारंभ अवसरीं ॥ राम बोलिला होता वक्त्रीं ॥ कीं कौरवपांडवां माझारीं ॥ साह्म न करणें कोणाचें ॥८५॥

ऐसें बोलोनि श्रीकृष्णासी ॥ राम गेला तीर्थयात्रेसी ॥ परि कौरवक्षय निश्वयेंसीं ॥ होईल ऐसें जाणितलें ॥८६॥

कां जे हस्तनापुरीं पहिला ॥ श्रीकृष्ण शिष्टाईस गेला ॥ सत्याहितकारीं बोलिलां ॥ वचन देखा ॥८७॥

तें धृतराष्ट्र न आणी मनीं ॥ ह्मणोनि युद्धोद्यम चक्रपाणी ॥ करविता जाहला निदानीं ॥ दोन्हींदळें सन्नद्धलीं ॥८८॥

भळभद्र तया वेळां ॥ श्रीकृष्णासी होता बोलिला ॥ कीं कौरवांचिया दळा ॥ जेव्हां होईल संहार ॥८९॥

कृष्णा तिये समयीं तरी ॥ कौरवांचें साह्य करीं ॥ तंव बोलिला श्रीहरी ॥ ऐसें कदापि घडेना ॥९०॥

ऐसें अव्हेरिलें रामवचन ॥ ह्मणोनि बळभद्रें मागुतेन गमन ॥ केलें अनुतप्त होवोन ॥ तिये समई ॥९१॥

तंव सता जाहला भूपती ॥ बळभद्र गेला तीर्थाप्रती ॥ त्या सकळतीर्थाची विप्तत्ती ॥ कराजी कथन ॥९२॥

ऐसें रायें विन-लिया ॥ मुनी कथिता जाहला तया ॥ तें ऐका चित्त देवोनियां ॥ ह्मणे मधुकर कवी ॥९३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ एकदशस्तबक मनोहरू ॥ दुर्योधनपलायनप्रकारू ॥ सप्तमाध्यायीं कथियेला ॥९४॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP