॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ सांगा पुढील कथान्वयो ॥ तंव ह्मणे ऋषिरावो ॥ ऐकें राया ॥१॥
प्रथदिवशीं युद्ध जाहलें ॥ कौरव चिंतेने व्यापिले ॥ रात्रीं विचार करूं लागले ॥ आपुलाले शिबिरीं ॥२॥
आतां संग्रामीं प्रातःकाळीं ॥ जिंकितील पार्थवनमाळी ॥ तंव कर्ण ह्मणे तिये वेळीं ॥ आजि जीवें वांचले ॥३॥
उदयीक पाचारोनि रणीं ॥ लोळवीन पार्थचक्रपाणी ॥ असो मग क्रमलिया रजनी ॥ जाहला प्रातःकाळ ॥४॥
उभयभार सन्नद्धला ॥ धर्में दुर्जय व्यूह रचिला ॥ इकडे कर्ण सांगता जाहला ॥ गांधारासी ॥५॥
राया प्रतिज्ञा करितों ऐशी ॥ कीं मी आजी मारीन पार्थासी ॥ त्यावांचोनि शिबिरासी ॥ नाहीं येणें ॥६॥
आजि पाहें माझा पण ॥ लाघव आणि आपतन ॥ त्वरे बाण विसर्जन ॥ मजसमान पार्थ नव्हे ॥७॥
आयुधां आणि अस्त्रांचें ॥ बळ पाहिजे त्वां पार्थाचें ॥ परि न पुरवेचि साचें ॥ झुंजतां मजसीं ॥८॥
त्याचें धनुष्य गांडीव सत्य ॥ माझे तरीं इंद्रदत्त ॥ विश्वकर्में निर्मित ॥ जाहलें प्राप्त मजलागीं ॥९॥
तेणें करोनि दैत्यादी ॥ इंद्रें जिंकिले महायुद्धीं ॥ गर्भ गळती ज्याचिये नादीं ॥ अरिकांताचे ॥१०॥
तें धनुष्य परशुरामासी ॥ इंद्रे दीधलें दैत्यनाशासी ॥ गुरुनें दीधलें मजसी ॥ दिव्यधनुष्य ॥११॥
एकवीसवेळां पाहीं ॥ रामें निःक्षत्रीय केली मही ॥ ऐसियासी नपवे कहीं ॥ सरी गाडीव ॥१२॥
येणें पार्थासि मारून ॥ कौरवांतें संतोषवीन ॥ भुमंडळीचें राज्य देईन ॥ राया तुजसी ॥१३॥
परि मजलागीं न्यून ॥ इतुकेंचि एक असे जाण ॥ त्याचा सारथी श्रीकृष्ण ॥ परब्रह्मा साक्षात ॥१४॥
स्वर्णभूषणीं अग्निदत्तरथ ॥ अभेद्य अच्छेद्य कवच सत्य ॥ अश्व मनोजव शोभिवंत ॥ द्युतिमंत ध्वज ॥१५॥
इतुके पदार्थी मी न्यून ॥ सारथी नाहीं मजलागुन ॥ तरी ऐकें मद्दचन ॥ दुर्योधन गा ॥१६॥
हा शल्य कृष्णासमान ॥ माझा सारथी होईल जाण ॥ तरी निःसंदेहें आपण ॥ पाचों जय ॥१७॥
शल्य कृष्णाहूनि बळिवंत ॥ आणि पार्थाहूनि मी समर्थ ॥ तरी तो करितां सारथ्य ॥ मी मारीन अर्जुनासी ॥१८॥
ऐसें गांधारें आयकिलें ॥ मग शल्यापें गमन केलें ॥ ह्मणे मातुळा ऐकें वहिलें ॥ मदुक्त वाक्य ॥१९॥
त्या अर्जुनासी अनंत ॥ सर्वापरी असे रक्षित ॥ तैसाचि तुवां हा सूर्यसुत ॥ रक्षावा आजी ॥२०॥
माझा तरी मनोजय ॥ नवांठायीं वांटिला आहे ॥ भीष्म द्रोण कृपाचार्य ॥ तूं आणि कर्णवीर ॥२१॥
भोज शकुनी दुःशसन सौबळ ॥ हे नववीर माझे प्रबळ ॥ न्य़ुन भीष्मद्रोण दुर्बळ ॥ वार्धक्यास्तव ॥२२॥
यांचें अभिमानास्तव बरवी ॥ आजि पृथ्वी निःपांडवी ॥ कर्ण करील गा आघवी ॥ तूं सारथी जालिया ॥२३॥
ऐसा शब्द आयकिला ॥ शल्य क्रौधें उठोनि चालिला ॥ मार्गें गांधार धांविन्नला ॥ सामोत्तरें बोलत ॥२४॥
ह्मणे मातुळा ऐक वचन ॥ तुं पराक्रमी कृष्णाहून ॥ जाणसी अश्वहृदय पूर्ण ॥ तैसें कोणा कळेना ॥२५॥
यावरी सक्रोध होवोनि शल्यें ॥ त्यासी बोलों आरंभिलें ॥ अरे मी एकलेनें सकळें ॥ जिंकावया समर्थ ॥२६॥
मजसी तृणप्राय कर्ण ॥ परि तुवां श्रीकृष्णाहून ॥ अधीक बळ ह्मणवोन ॥ स्तविले मज ॥२७॥
यास्तव तूं जे सांगती ॥ तें करणीय असे मजसी ॥ परि मी टाकीन सारथ्यपणासी ॥ वाटेल तेव्हां ॥२८॥
ऐसें बोलोनियां वचन ॥ निंदु लागला कर्णासि जाण ॥ तैं हंसककीय आख्यान ॥ कथा येकी सांगीतली ॥२९॥
एक वैश्य होता सिंधुतीरी ॥ तया बहुपुत्र अवधारीं ॥ उच्छिष्टदानीं समग्रीं ॥ पोशिला असे काक येक ॥३०॥
त्या बाळांही येके वेळीं ॥ स्पर्धा केली हंसांजवळी ॥ कीं आमुचा काउळा निराळीं ॥ तुह्मासवें उडेल ॥३१॥
यावरी त्या पुत्री समस्ती ॥ आपुल्या र्काका शिकविल्या गती ॥ प्रडीनं उड्डीन निरुती ॥ संडीनादी ॥३२॥
मागुते जवोनि हंसाप्रंती ॥ ह्मणती काक जाणे सर्व गती ॥ हंस ह्मंणती इयागती ॥ नेणो आह्मी ॥३३॥
परि आह्मी शतयोजने शीघ्र ॥ जाऊं एकगतीनें सागर ॥ यावरी काकें गतिप्रकार ॥ दाविले हंसासी ॥३४॥
मग हंसासवें हरिखें ॥ गमन आरंभिले मूर्खें ॥ परि शेवटी पडिला दुःखे ॥ उदकामाजी ॥३५॥
तेथोनि काढिला पक्षिवरीं ॥ परि जाववेना त्या वरोवरी ॥ मग राहिला ऐलतीरी ॥ निर्लज्जपणे ॥३६॥
पैलतीरा गेले हंस ॥ ह्मणोनि हंस पार्थ परेश ॥ त्यांसी कर्ण तूं वायंस ॥ समान केवीं ॥३७॥
तंव क्रोधे ह्मणे कर्ण ॥ की मीं कपटी ब्राह्मण होऊन ॥ अनिनाशगुरुपासोन ॥ घेतली ब्रह्मास्त्रविद्या ॥३८॥
तेणेंचि अस्त्रेंकरून ॥ अरे हे ब्रह्मांड संपूर्ण ॥ क्षयासि पाववीन जाण ॥ कथा काय येरांची ॥३९॥
असो शल्य तये वेळा ॥ कर्णवीराचा सारथी जाहला ॥ पांडवसेने सन्मुख आला ॥ घेवोनि रथ ॥४०॥
संजय ह्मणे ऐक राया ॥ कर्ण ससैन्य युद्ध आलिया ॥ देखोनि धर्म धनजंया ॥ बोलत असे ॥४१॥
ह्मणे नीतियुद्ध कराल ॥ तिरिचि जय पावाल ॥ नाहीं तरी हा पराभवील ॥ सकळवीरां ॥४२॥
तेव्हां युद्धमार्ग युधिष्ठिरें ॥ सांगितलें पृथकाकारें ॥ ह्मणे कर्णासि धनुर्धरें ॥ पायें झुंजिजे ॥४३॥
भीमसेनें दुर्योधनासीं ॥ नकुळें आवरिजे वृषसेनासी ॥ शतानीक दुःशासनेंसी । सौबळेंसी सहदेव ॥४४॥
ऐसी आरंभिली युद्धस्थिती ॥ तंव शल्ये पार्थश्रीपती ॥ दाखविले कर्णाप्रती ॥ रथीं वर्तमान ॥४५॥
ह्मणे तुं रथीं आरुढलासी ॥ तेव्हां मज बोलिला होतासी ॥ कीं दावीं कृष्णार्जुनासी ॥ तरी ते पाहें ॥४६॥
ज्याच्या रथा जुंपिले वारु ॥ जेवीं अग्नि सूर्य ब्रह्मा इंद्रु ॥ श्वेतछत्र आणि वानरु ॥ ध्वजस्तंमीं ॥४७॥
काळांतक समान उमय ॥ येर तैसेचि वीर पाहें ॥ ह्मणोनि क्रमें दाविता होय ॥ शल्य कर्णासी ॥४८॥
यावरी कणें काय केलें ॥ महाअस्त्रजाळ प्रेरिले ॥ पांडवदळ आच्छादिलें ॥ क्षणामाजी ॥४९॥
पांडवमार पळविला ॥ तंव धर्मे कर्ण विंधिला ॥ रथी निश्वेतन पाडिला ॥ तये वेळीं ॥५०॥
कौरवीं केला हाहाःकार ॥ परि सावध होवोनि कर्णवीर ॥ पांडवसेनेचा करी संहार ॥ देखोनि धर्म कोपला ॥५१॥
पांडववीर उठावले ॥ मागुतें घोरांदर जाहलें ॥ भीमें कर्णा विधोनि पाडिले ॥ रथाखाली ॥५२॥
तो मूर्छागत देखिला ॥ मग शल्यें रथीं वाइला ॥ मागुता मूर्छा भंगोनि उठिला ॥ विंधीत कर्ण ॥५३॥
येरीकडे भीमें पाहें ॥ बात्यमेयासि केलें ॥ यावन सैघव सृंजय ॥ मद्ररायाद ॥५४॥
हे सर्व पाराभविले ॥ तैंसेचि धृष्टद्युम्रें वाइले ॥ अश्वत्यामेयासि केलें ॥ पराभुत ॥५५॥
मग येरु क्रोधें बोलत ॥ करीन आजी याचा घात ॥ अथवा याचिले बाणीं निश्चित ॥ मेलोंचि मी ॥५६॥
तरी स्वर्ग न व्हावा मातें ॥ ह्मणोनि चालिला शरघातें ॥ धृष्टद्युम्रावरे तेथें ॥ केली वृष्टी बाणांची ॥५७॥
ऐसा उभयां संग्राम जाहला ॥ द्यृष्टद्युम्र विरथ केला ॥ मग मूछागत पाडिला ॥ करोनि प्रहार ॥५८॥
जंव निश्चित करावा प्राणें ॥ तंव सोडविला अर्जुनें ॥ रथीं वाहोनि माद्रिनंदनें ॥ गेला शिबिरीं ॥५९॥
यावरी पार्थें द्रोणी विंधिला ॥ रथीं मूर्छागत पाडिला ॥ तद्रक्षणार्थ उठावला ॥ कर्णवीर ॥६०॥
तयासि ह्मणे दुर्योधन ॥ तुझ्या ठायीं जयाशा संपूर्ण ॥ धरिली परि अवस्था दीन ॥ प्राप्त जाहली आह्मासी ॥६१॥
ऐसें वाक्य आयकिले ॥ मग कर्ण काय केलें ॥ भार्गवास्त्र प्रयुंजिलें ॥ निर्वाण जें कां ॥६२॥
तेणें भूगोळ कांपिन्नला ॥ थोर हाहाःकार जाहला ॥ धर्मही मूर्छागत पडिला ॥ शिबिरीं गेला सारथियें ॥६३॥
आणि पार्थासी समसप्तकही ॥ निकुरें नेटले तत्समयीं ॥ तंव भमि ह्मणे पार्था नाहीं ॥ दिसत धर्मराव ॥६४॥
काय भार्गवास्त्रप्रतिघाई ॥ धर्म पडिला असे मही ॥ पार्थ ह्मणे शुद्धी लवलाही ॥ करीं तयांची ॥६५॥
मी सेनामुखों राहत असे ॥ भमिमान ह्मणे विशेषें ॥ मज पळोनि गेला ऐसें ॥ ह्मणतील अरी ॥६६॥
तुंचि जाई न लगतां क्षण ॥ मी आवरीन शत्रुसैन्य ॥ मग जावोनि कृष्णार्जुन ॥ पाहती धर्मासी ॥६७॥
धर्म डेरां असे पडिला ॥ देखोनि पार्थें प्रणाम केला ॥ येरु संतोषें बोलिला ॥ पार्थाप्रती ॥६८॥
ह्मणे सखया सांग त्वरित ॥ जो देवांदैत्यां अजित ॥ तो तुं मारिला सूर्यसुत ॥ धन्य रे पार्था ॥६९॥
तरी कैसा कोणें उपायें ॥ कर्ण पाडिला धरणीये ॥ हें सांगावे लवलाहें ॥ बंधुराया ॥७०॥
त्या कर्णें माझा रथ ॥ तोडोनि पाडिला ध्वजासहित ॥ मज केलें मूर्छागत ॥ तेणें हे दशा पावलों ॥७१॥
यावरी ह्मणे धनंजय ॥ कर्ण त्रैलोक्यासी अजेय ॥ तो सहसा मारिला जाय ॥ कैसियापरी ॥७२॥
येणें बोलें युधिष्ठिर ॥ कोपाविष्ठ जाहला थोर ॥ मग अर्जूना वाक्य निष्ठुर ॥ बोलता जाहला ॥७३॥
ह्मणे त्वां लाजविलें कुतींसी ॥ प्रतिज्ञा केली होती आह्मासी ॥ कीं मी मारीन कर्णासी ॥ निश्वयपणें ॥७४॥
ह्मणोनि आरंभिले युद्धासी ॥ शेवटीं पावलों व्यसनासी ॥ प्रतिज्ञा जरी न बोलतासी ॥ तरी युद्ध कां येतों ॥७५॥
ऐसें ऐकोनि अर्जुन ॥ धर्माप्रति बोले वचन ॥ न करितां स्वगुणविवेचन ॥ वृथा आह्मां निंदिजतां ॥७६॥
द्युतव्यसनाचे दोष ॥ त्यांचा मनीं नाहीं लेश ॥ स्वयें खेळोनियां क्लेश ॥ उपजविले आह्मांसी ॥७७॥
आह्मीं पावलोंक दुर्दशा ॥ क्षय जाहला कौरववंशा ॥ तूचि निमित्त या दोषा ॥ परि हें मुखें बोलूनयें ॥७८॥
यापरेइ हृदयभेदक भाषण ॥ धर्माप्रति बोले अर्जुन ॥ ते युधिष्ठीरें ऐकोन ॥ अंतरीं दुःख पावला ॥७९॥
ह्मणे मी अनर्थाचें कारण ॥ तरी केरीं मस्तकहनन ॥ जरी न करिसी तरी चरण ॥ धरिलेचि तुझे ॥८०॥
ऐसें बोलोनि अश्रुजीवन ॥ टाकी धर्माचा नंदन ॥ तंव श्रीकृष्ण करी सांत्वन ॥ धर्मरायाचें ॥८१॥
ह्मणे गा राया अजांतशत्रु ॥ हें बोलणार नव्हे धनुर्धर ॥ तेणें तुज कथिला मंत्रु ॥ प्रतिज्ञेचा ॥८२॥
पार्थें वंदिले धर्मचरण ॥ चित्ताचें केलें समाधान ॥ ह्मणे कर्ण वधिलाचि जाण ॥ अद्यप्रमृति राजेंद्रा ॥८३॥
ययाउपरी युधिष्ठिरें ॥ पार्थ आलिंगिला परमादरें ॥ आशिर्वाद जयजयकारें ॥ देता जाहला ॥८४॥
श्लोकः
यशोऽक्षयं जीवितमीप्सित च बलं तथा वीर्यमरिक्षयं च ॥
सुखं च वृद्धिं च दिशंतु देवा यथाहमिच्छामि तथास्तु तुभ्यमु ॥१॥
ऐसें आशिर्वाद घेवोन ॥ सत्वर निघाला फाल्गुन ॥ सवें देवकीनंदन ॥ सांगे हित ॥८५॥
यद्यपि नाहीं त्रिभुवनीं ॥ तुजऐसा वीरमणी ॥ तथापि कर्ण शंकावा मनी ॥ असामान्य जो ॥८६॥
ऐसें बोलत बोलत गेले ॥ तंव कौरव उठावले ॥ पांडवसेनेवरी आले ॥ चालोनियां ॥८७॥
तुंबळ मांडिलें युद्धातें ॥ कृपाचार्य शिखंडितें ॥ दुर्योधन सात्यकीतें ॥ चित्रसेन श्रुतश्रवा ॥८८॥
युद्ध होता घोरांदर ॥ उत्तमौजें सुषेणशिर ॥ पाडिले तोडोनि सत्वर ॥ महासत्राणें ॥८९॥
धृष्ठद्युम्रें तया वेळां ॥ कृपाचार्य विरथ केला ॥ तंव कौरवभार वर्षला ॥ भीमावरी शस्त्रास्त्रीं ॥९०॥
प्राप्तसमयीं पर्जन्यकाळीं ॥ सूर्य झांकिये मेघपटळीं ॥ तैसा भीम बाणजाळीं ॥ केला अलक्ष्य ॥९१॥
भीमासि विव्हळ देखिलें ॥ ह्मणोनि सारथिये तिये वेळे ॥ धैर्य द्यावया मांडिलें ॥ ह्मणे ऐकें मारुतंजा ॥९२॥
अजुनि आपणाजवळी बाण ॥ उरले सहाअयुतें जाण ॥ आणि क्षुरसादृश्य दारुण ॥ अयुत एक ॥९३॥
भल्ल एकअयुत निर्वाणीं ॥ नारांच असती सहस्त्र दोनी ॥ विशाळमुख सहस्त्र तीनी ॥ आयुधें सात शत ॥९४॥
तवहस्तीं गदा सत्य ॥ आणि वज्रसमान हस्त ॥ येणें अरिभार समस्त ॥ तुं मारिसी वीरोत्तमा ॥९५॥
ऐसा उत्साह उपजविला ॥ पुढें कौरवमार देखिला ॥ तंव देखे पार्थ आला ॥ साह्यकरणार्थ ॥९६॥
ध्वजीं वानर असे बैसला ॥ पाहोनि द्दिगुण उत्साह जाहला ॥ मग कौरवांवरी लोटला ॥ सिंहनाद करोनी ॥९७॥
तंव पार्थेही तिये वेळीं ॥ भुमिका नदीरूप केली ॥ गजकलेवरें पाडिलीं ॥ दहासहस्त्र ॥९८॥
भीमें दोनी शतसहस्त्र ॥ रणीं मारिलें मत्त कुंजर ॥ अश्व मारिले पांचसहस्त्र ॥ आणि रथ येकशत ॥९९॥
ऐसें सैन्य मारोनि बहुत ॥ रक्तनदी वाहवीत ॥ तिये नदीचें जळ रक्त ॥ रथ आवर्त हस्ती ग्राह ॥१००॥
मनुष्यें तरी मनीकुळ ॥ केश ते जाणावी शेवाळ ॥ तेथें मज्जारुपी चिखल ॥ मस्तकें पाषाण ॥१॥
काशकुश तेचि शर ॥ परिघ लघुपक्षिवर ॥ हारभूषणें पद्माकर ॥ दंत बाळुका ॥२॥
श्वेतध्वज ते राजहंस ॥ धनुष्यें तरंग बहुवस ॥ ऐसें उग्रकर्म विशेष ॥ केलें भीमसेनें ॥३॥
तें देखोनि दुर्योधनें ॥ शकुनी धाडिला युद्धाकारणें ॥ थोर पराक्रम करोनि तेणें ॥ भीमाकेला अपकार ॥४॥
ह्मणोनि क्रोधे तयें वेळां ॥ भीमें हाणोनि मूच्छित केला ॥ मग तो रथें वाहुनि नेला ॥ दुर्योधनें ॥५॥
ऐसें देखोनियां कर्णें ॥ पांडवसैन्य खंडिलें बाणें ॥ तें देखोनियां अर्जुनें ॥ कर्णा सन्नद्ध जाहला ॥६॥
तेव्हा पार्थें पूर्विल्यापरी ॥ नदी वाहविली समरीं ॥ हस्ती रथमार अवधारी ॥ निःशोष तटें ॥७॥
वृक्षवत वीर दिसती ॥ रक्तपुर वेगें वाहती ॥ खेडीं वोडणें शोभती ॥ भ्रमरावर्त ॥८॥
नौकारूपी महारथ ॥ आतां असो हें प्रस्तुत ॥ कोल्हाळ ऐकोनी अद्भुत ॥ उठावला दुःशासन ॥९॥
तो बाणीं वरुषता जाहला ॥ लाहें भीमसेन कष्टविला ॥ तंव भीमसेनें विधिला ॥ हृदयावरी ॥११०॥
यावरी तयासी खालीं पाडुन ॥ केलें त्याचें रक्तपान ॥ साच केलें प्रतिज्ञावचन ॥ पूर्वील जें कां ॥११॥
मग छेदोनि नेलें शिर ॥ ऐसा दुःशासनाचा संहार ॥ तंव येरीकडे कर्णकुमर ॥ वृषसेन उठावला ॥१२॥
तेणें अनेक पांडववीर ॥ मारिले सोडोनियां शर ॥ दळीचे सर्व धनुर्धर ॥ आकुळ केले ॥१३॥
परि पार्थें प्रेरोनि बाण ॥ घेतला कर्णसुताचा प्राण ॥ कर्णासमक्ष नंदन ॥ रणीं मारिला ॥१४॥
ऐसें दुःशासन कर्णनंदन ॥ भीमार्जुनी मारिले जाण ॥ मग कर्ण करोनि पण ॥ मांडिली महाझुंजारी ॥१५॥
मुनि ह्मणे राया भारता ॥ रण पाहूं आल्या देवता ॥ तें कथिजेल सकळ श्रोतां ॥ ह्मणे मधुकर कवी ॥१६॥
इती श्रीकथाकल्पतरु ॥ एकादशस्तबक मनोहरू ॥ दुःशासनवधकथनप्रकारू ॥ तृतीयाध्यायीं कथियेला ॥११७॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥