कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥

संजय ह्मणे पणपूर्वक ॥ कर्णार्जुन भीडले देख ॥ युद्ध मांडिलें विशेष ॥ घोरांदर ते काळीं ॥१॥

तेव्हां उभयदळीं देवता ॥ समसमान आल्या समस्ता ॥ पृथ्वी पर्वत स्वरूपतः ॥ प्रत्यक्ष जाण ॥२॥

समुद्र रत्‍नें वेद सकळा ॥ इतिहास आणि ऋषिमंडळ ॥ पाताळाहोनि नागकुळ ॥ युद्ध पाहूं पातले ॥३॥

अष्टवसु पितर देव ॥ ब्रह्मार्षीं राजर्षी सर्व ॥ मौनेयादि वरि गंधर्व ॥ स्वस्वगणेंसीं ॥४॥

देव विमानीं बैसोनी ॥ अर्जुनपक्षीं स्थिरावोनी ॥ विनोद पहावया नयनीं ॥ आले अंतरिक्ष ॥५॥

अंतरिक्ष नक्षत्रगण ॥ देवदानव गंधर्व जाण ॥ पिशाच गुह्मक यातुधांन ॥ क्षुद्रपक्षीं ॥६॥

आणिकही मिळाले बहुत ॥ कर्णपक्षीं भूतजात ॥ पहावयालागीं समस्त ॥ संग्राम देखा ॥७॥

ऐसे मिळाले परस्पर ॥ कर्ण आणि पार्थवीर ॥ साक्षांत विष्णुरुद्रपरिकर ॥ प्रतिम दोघे ॥८॥

दोघे संग्रामी चढिन्नले ॥ तेणें ब्रह्मांड आंदोळलें ॥ अंतरिक्षचरें सकळें ॥ स्थळचर भूतादी ॥९॥

कंपायमान जाहलीं समस्तें ॥ परस्पर साटोपघातें ॥ रथगडगडाट वेगें बहुतें ॥ गमनमात्रें जाहला ॥१०॥

जेजे संग्रामीं प्रवर्तले ॥ तेते शतचूर्ण जाहले ॥ तें देखोनि द्रौणी बोले ॥ दुर्योधनासी ॥११॥

राया भीष्मद्रोण दुःशासन ॥ सुषेणादि वृषसेन ॥ आणीकही वीर जाण ॥ महायोद्धे ॥१२॥

हे सकळ पावले मरण ॥ तरी आतां पांडवांसी प्रमाण ॥ करोनी समत्वचि जाण ॥ सुखें रहावें ॥१३॥

ऐकोनि कोपला दुर्योधन ॥ मग तयासी बोले वचन ॥ कीं तूं मिळें पांडवां जाऊन ॥ पुर्वमैत्रस्तिव ॥१४॥

येरें यावरी मौनत्व धरिलें ॥ दुर्योधनें तिये वेळे ॥ सकळ सैन्य सिद्ध केलें ॥ युद्धलागीं ॥१५॥

शंखश्रृंगें मृदंग मेरी ॥ ढोल दमामे रणमोहरी ॥ वाद्यगजरें तये अवसरी ॥ श्रोत्रीं काहीं नायकिजे ॥१६॥

हय हिंसती गर्जती कुंजर ॥ श्येन करिताती क्रेंकार ॥ वीर क्ष्वेडानाद भयंकर ॥ खणखणाट शस्त्रांचा ॥१७॥

बाणांचा होत झुंझकार ॥ धनुष्यांचा टणत्कार ॥ ब्रह्मांड गर्जें घोरांदर ॥ भयंकर सूटला ॥१८॥

हा शब्द द्दिगुण होवोनी ॥ प्रतिध्वनी उठिला गगनीं ॥ ज्ञान हरपलें ह्मणोनी ॥ प्राणिमात्राचें ॥१९॥

आकांत मांडिला कल्पप्राय ॥ ऐसा भविन्नला तो समय ॥ धर्मही ऐकोनि लवलाहें ॥ पावला तेथें ॥२०॥

तंव सर्वदळसमवेत ॥ कर्णार्जुनांसीं युद्ध होत ॥ असो अश्र्वसेन नागसुत ॥ होता निद्रिस्थ पाताळीं ॥२१॥

तो प्राप्त जाहला ते समयीं ॥ कां जे खांडववनदाहीं ॥ पार्थं अपकार तया कांहीं ॥ केला होता ॥२२॥

भूमि होतां संकपित ॥ ह्मणोनि जाहला तो जागृत ॥ मग पातला असे त्वरित ॥ संग्रामभूमीसी ॥२३॥

तेणें पार्थासि तया वेळां ॥ वैरप्रतिकार आरंभिला ॥ स्वयें बाण होवोनि राहिला ॥ भांता कर्णाचिये ॥२४॥

असो तैं पार्थ आणि कर्ण ॥ युद्ध करिती अति दारूण ॥ तें सांगतां विस्तरेल कथन ॥ कल्पतरूचें ॥२५॥

पार्थबाणी तये वेळां ॥ सर्वथा कर्ण असे पोळला ॥ मग प्रतिज्ञा करिता जाहला ॥ शल्यापुढें ॥२६॥

ह्मणे आतां निर्वाणबाळें ॥ अर्जुनाचें शिर पाडणें ॥ ह्मणोनि रोषें काढिला तेणें ॥ जो सर्पबाण ॥२७॥

तो मोकलितांचि बाण ॥ उत्कापाताचिये समान ॥ प्रकाशलें सकळ गगन ॥ आला झुंझुकारें ॥२८॥

तये वेळीं पार्थरथ ॥ भूर्मीत गेला अर्धहस्त ॥ तंव बाणें पाडिला त्वरित ॥ किरीट अर्जुनाचा ॥२९॥

तेथें मणीं येक होता ॥ जो विर्धीनें दीधला सुरनाथा ॥ तोचि पुत्रभावें पार्था ॥ दीधला इंद्रें ॥३०॥

जेणें पराजय कधीं नोहे ॥ तोचि बाणसर्पें लाहें ॥ मस्तकीं धरूनियां जाय ॥ भूमीआंत ॥३१॥

ऐसा बान व्यर्थ जाहला ॥ तंव शल्य ह्मणे कर्णा वहिला ॥ टाकोनि शर दुसरा भला ॥ पाडीं शिर पार्थाचें ॥३२॥

यावरी कर्ण जाहला बोलता ॥ अरे दुसरा बाण टाकितां ॥ तेणें हानी होईल सर्वथा ॥ प्रतिज्ञेची ॥३३॥

इतुक्यांत सर्परूपी बाण ॥ नाग प्रत्यक्ष मूर्ति धरोन ॥ कर्णाजवळी येवोन ॥ बोलता जाहला ॥३४॥

ह्मणे मी अश्वसेन सर्प जाणीं ॥ माझी माता खांडववनीं ॥ अर्जुनें जाळिली दाहोनी ॥ तें वैर मनीं स्मरत असे ॥३५॥

ह्मणोनि मी तुझा होवोनि बाण ॥ घ्यावया अर्जुनाचा प्राण ॥ भांता राहिलो होतों लपोन ॥ आजवरी वीरा ॥३६॥

परित्वां वामहस्तांचें पाहीं ॥ बरवें लक्ष्य धरिलें नाहीं ॥ ह्माणोनि पार्थाचें सहसाही ॥ वांचलें शिर ॥३७॥

तरी असो मी मागुता आतां ॥ बाण होतों सूर्यसुता ॥ तुवां प्रयुंजावा निश्चिता ॥ छेदीन पार्थशिरासी ॥३८॥

कर्ण ह्मणे तूं जाई परूता ॥ मी पारक्याचोनि बळें सर्वथा ॥ जय इछीन तरी संविता ॥ अंबेरी पिता लाजेल ॥३९॥

येरू हतोद्यम त्या वेळां ॥ आकाशमागें जाता जाहला ॥ तो श्रीकृष्णें देखोनि वहिला ॥ बोलता जाहला पार्थासी ॥४०॥

अगा याचा वध करीं ॥ हा तुझा असे परमवैरी ॥ घेतला होता प्राण समरीं ॥ परि दैवें वांचलासी ॥४१॥

ऐसें ऐकोनियां पार्थें ॥ शतखंड केलें तयातें ॥ मग रथचक्रें कृष्णनाथें ॥ समान केलीं उद्धरोनी ॥४२॥

अर्जुणें वस्त्रें शिर गुंडिलें ॥ यावरी द्दंद्वयुद्ध मांडलें ॥ क्रोशें पार्थें काय केलें ॥ ऐकें राया ॥४३॥

कर्णाचिये वधार्थ पाहें ॥ सर्वाग्रि सर्वशस्त्रमय ॥ रौद्रस्त्र मंत्रुनि लाहें ॥ जाहला प्रयुंजिता ॥४४॥

कर्णरथाचीं चक्रें ते वेळीं ॥ भूमीनें उदरीं ग्रासिलीं ॥ आणि भार्गवास्त्र स्वस्थळीं ॥ तत्क्षणीं गेलें ॥४५॥

रामें शापिलें होतें त्यासी ॥ कीं कपटें विद्या शिकलासी ॥ तरी ते निर्फळ होईल समयासी ॥ जाईल शस्त्र हातीचें ॥४६॥

ब्राह्मणें शाप दीधला होता ॥ कीं जियेकाळीं सूर्यसुता ॥ प्राणांतसमय प्राप्त असतां ॥ भूमी रथचक्रें ग्रासील ॥४७॥

भार्गवास्त्र हातींचें गेलें ॥ ऐसें अर्जुनें देखिलें ॥ मग संधान आरंभिलें ॥ कर्णवधार्थ ॥४८॥

तें देखोनि सुर्यसुत ॥ नेत्रीं ढाळी अश्रुपात ॥ ह्मणे पार्था तूं वीर समर्थ ॥ तरी ये समयीं न प्रहारीं ॥४९॥

कां जे नीतिधर्म परिकर ॥ ऐसा असे पुर्वापार ॥ कीं अडलियांचा संहार ॥ करूं नये ॥५०॥

यास्तव तूं एक मुहूर्त ॥ स्थित राहें जोडोनि धन्यत्व ॥ रथचक्रें भूमिग्रस्त ॥ काढीन तोंवरी ॥५१॥

हा धर्ममार्ग असे वहिला ॥ ऐकोनि श्रीकृष्ण कोपला ॥ मग कर्णाप्रति बोलिला ॥ रथावरोनी ॥५२॥

अरे गांधारासमवेता ॥ द्रौपदीची वस्त्रें हरितां ॥ धर्म कोणें नेला होता ॥ कोठें सांगपां ॥५३॥

तुह्मी धर्मासि जाणतां ॥ परि द्यूतस्थित न जाणतां ॥ कपटें शकुनीसि खेळवितां ॥ गेला होता धर्म कोठें ॥५४॥

भीमसेना विष घालितां ॥ धर्म कोठें गेला होता ॥ तेरावर्षे वन सेववितां ॥ धर्म आठवला कां नाहीं ॥५५॥

लाक्षागूहीं जाळितां ॥ धर्म कोठें गेला होता ॥ कां न स्मरे तुमचिया चित्ता ॥ आतां वृथा बोलसी ॥५६॥

हे ऐकोनि कृष्णवाणी ॥ क्षोत्रनेत्रादि रंघ्रांपासोनी ॥ अग्निज्वाळा अंतरीहुनीं ॥ चाललिया कर्णाचे ॥५७॥

त्यांहीं गगन ग्रासूं मांडिलें ॥ कर्णें बीजाक्षर जपिन्नलें ॥ संकटीं ब्रह्मास्त्र प्रयुजिलें ॥ पार्थावरी ॥५८॥

तें ब्रह्मास्त्रोचि करोनी ॥ पार्थें वारिलें तिये क्षणीं ॥ मग प्रेरिलें झडकरोनी ॥ पार्थें आग्नेयास्त्र ॥५९॥

कर्णें वारुणास्त्रें वारिलें ॥ आणि मेघास्त्र प्रयुंजिलें ॥ तें अर्जुनें निवारिलें ॥ वातास्त्रें देखा ॥६०॥

ययाउपरी कर्णवीर ॥ प्रयुंजिता होय निर्वाणस्त्र ॥ पृथिवी आणि अंबर ॥ तडाडिला ते काळीं ॥६१॥

तें भुजांतरीं रिघोन ॥ मूर्च्छित जालासे फाल्गुन ॥ च्यवलें असे हस्तींहुन ॥ गांडीव धनुष्य ॥६२॥

घटिकांतरें त्या वेळां ॥ अर्जुन सावध जाहला ॥ कृष्ण ह्मणे गा भलाभला ॥ वृथ काळ विलंब ॥६३॥

रथें न चढिला कर्णवीर ॥ तोंचि छेदोनि टाकींशिर ॥ या आज्ञेवरी धनुर्धर ॥ काय करिता जाहला ॥६४॥

अग्निरूप शक्तिबळें ॥ पिनाकचक्र तिये वेळे ॥ ऐसियांचे निजबळें ॥ मंत्रिला शुर ॥६५॥

ह्मणे शिवाचें प्रसन्नपण ॥ समरीं लाधलें मजलागुन ॥ तरीच आतां हा बाण ॥ शिर पाडो अरीचें ॥६६॥

येणें प्रयोगें टाकिला शर ॥ तेणें कर्णाचें पाडिलें शिर ॥ घड राहिलें भूमीवर ॥ होवोनि मुंडावेगळें ॥६७॥

शिर आकाशीं उडालें ॥ जाणों सवित्याचे अंजूळीं पडिलें ॥ मागुतें भूवरी ते वेळे ॥ पडिलें मुंड ॥६८॥

तया आधीं पडिला देह ॥ देहानंतरें मस्तक पाहें ॥ जाणों अस्ताचळाहोनि सुर्य ॥ बिंबचि काय उतरलें ॥६९॥

येथें अनारिसें पुराणांतरीं ॥ तें तूं सकळ अवधारीं ॥ पार्था कर्णा दोघां समरीं ॥ जाहलें घोरांदर ॥७०॥

वैशंपायन ह्मणती राया ॥ पुराणांतर ऐकें संकलोनियां ॥ मग निरूपिता जाहला तया ॥ तें सांगिजेल मधुकरें ॥७१॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ एकादशस्तबक मनोहरू ॥ कर्णनिधनप्रकारू ॥ चतुर्थध्यायीं कथियेला ॥७२॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीमज्जगदीश्र्वरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP