कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ तुमचेनि जाहला पापक्षयो ॥ तरी करोनि कृपालाहो ॥ पुढील चरित्र सांगिजे ॥१॥

मग वैशंपायन बोलत ॥ ऐकें राया सावचित्त ॥ कर्णपर्वींचा वृत्तांत ॥ सुकृत अमित होय जेणें ॥२॥

द्रोण पडलिया समरंगणीं ॥ कौरव समस्त मिळोनी ॥ कर्ण सेनापति करोनी ॥ युद्धलागी उठावले ॥३॥

हें हस्तनापुरीं संजय ॥ घृतराष्ट्रा निवेदिता होय ॥ कर्णादिकांचा रणीं क्षय ॥ विस्तरेंसीं ॥४॥

ह्मणे नारदादिकांचा उपदेश ॥ तुह्मां मानला सदोष ॥ तया परिपाकाचा संतोष ॥ जाहला ऐसा ॥५॥

भीष्मद्रोणाचेनि शोकें ॥ धृतराष्ट्र सांडिला विवेकें ॥ पांडवांचेनि अतिरेकें ॥ द्विगुणदुःखी ॥६॥

ह्मणे संग्रामी पडतां द्रोणाचार्या ॥ मग काय करी दुर्योधन ॥ तो कर्णवृत्तांत संपूर्ण ॥ सांगें संजया ॥७॥

यावरी संजय ह्मणे राया ॥ रणीं पडिला द्रोणाचार्या ॥ मग कौरव मिळोनियां ॥ गेले कर्णाजवळी ॥८॥

देखोनि द्रोणार्कविनाश ॥ लोपला कौरवमदप्रकाश ॥ ह्मणोनि दुर्योधन निराश ॥ जयीं जाहला ॥९॥

वीरांची दुर्दशा देखोन ॥ दीनवाणी बोल दुर्योधन ॥ कीं आमुचें अभिमानजीवन ॥ कर्ण तूंचि आहेसी ॥१०॥

तरी समरीं जय पराजय ॥ वीरां अनियत असे उमय ॥ ऐसें असतां युद्धसमय ॥ प्रवर्तवावा ॥११॥

अश्वत्थामा येवोनि ह्मणे ॥ ऐकें राया माझें बोलणें ॥ आतां अगत्य संग्राम करणें ॥ पांडवांसी ॥१२॥

आपुला मित्र कर्णवीर ॥ ज्याचे निर्फळ नव्हती शर ॥ तो धीरवंत झुंजार ॥ असतां मय कायसें ॥१३॥

सेनानायक सूर्यसुत ॥ करील रिपूसैन्या निःपात ॥ कौरवां जयदातां समर्थ ॥ हाचि होय ॥१४॥

ऐसें बोले द्रोणपुत्र ॥ ऐकतां तोषला गांधार ॥ मग सेनापती कर्णवीर ॥ केला अभिषेकोनी ॥१५॥

समरीं भीष्में पितामहें ॥ पांडवीं रक्षिलें स्नेहें ॥ द्रोणेंही शिष्यमोहें ॥ नाहीं केलें निर्वाण ॥१६॥

ऐसें अश्वत्थामा बोलिला ॥ ऐकोनि कर्ण संतोषला ॥ रायें सेनापती केला ॥ प्रार्थोनि नानापरी ॥१७॥

कर्णेही उत्साहवचनीं ॥ राजा संतोषविला तेक्षणीं ॥ गांधारें कर्णोत्साह जाणोनी ॥ सैन्य केलें सन्नद्ध ॥१८॥

तें प्रातःकाळीं चातुरंग ॥ वाहनें शस्त्रें ध्वजादि अभंग ॥ सज्जतां देखोनि अनेग ॥ आवेश चढिला सैनिकां ॥१९॥

ते परस्परें बोलती ॥ कीं कर्ण करील पांडवां शांती ॥ आजि भीष्मद्रोण असती ॥ जाणों जीवंतची ॥२०॥

कां जे हा कुडावील तयां ॥ ऐसें भासे यासि देखोनियां ॥ तंव शंखवादन कर्ण‌आर्या ॥ करिता जाहला ॥२१॥

लागलिया दुंदुभी भेरी ॥ नानावाद्यें रणमोहरीं ॥ कर्ण मकराकर कुसरी ॥ व्यूह रचिता जाहला ॥२२॥

स्वयें मकरमुखी कर्णवीर ॥ शकुनी उलुक दोनी नेत्र ॥ अश्वत्थामा मकरशिर ॥ ग्रीवे सहोदर समस्त ॥२३॥

मध्यभागीं दुर्योधन ॥ वामापादीं कृतवर्मा जाण ॥ गौतमपुत्र दक्षिणचरण ॥ वामपादीं शल्य तो ।२४॥

दक्षिण‍अनुचरणीं सुषेण ॥ आणि दुसरा चित्रसेन ॥ चित्र पुच्छभागीं जाण ॥ स्थापिले सैन्यासह ॥२५॥

ऐसी व्यूहरचना देखोनी ॥ धर्म पार्था ह्मणे तेक्षाणीं ॥ कीं हें कौसवसैन्य जाणीं । निःसार समस्त ॥२६॥

यांत देवदैत्यां भयंकर ॥ एक कर्णाचि महावीर ॥ याचा केलिया संहार ॥ सिद्धि जाईल मनोरथ ॥२७॥

ऐसा धर्मशब्द आयकिला ॥ पार्थ उत्साहयुक्त जाहला ॥ मग ससैन्य व्यूह रचिला ॥ चंद्राकार देखा ॥२८॥

व्य़ूहा दक्षिणे धृष्टद्युम्र ॥ वामभागीं भीमसेन ॥ मध्यें राहिला अर्जुन ॥ अभंगपणें ॥२९॥

पृष्ठभागीं युधिष्ठिर ॥ नकुळसहदेव पांचाळीकुमर ॥ आणि चक्ररक्षक वीर ॥ पांचाल्य उत्तमौजा ॥३०॥

ऐसी उभयदळरचना ॥ ऐकें अंबिकानंदना ॥ युद्ध प्रवर्तले दारुणा ॥ परस्परेंसी ॥३१॥

अश्व रथ कुंजरांवरूनी ॥ शस्त्रें पडती कवण गणी ॥ जैसीं नक्षत्रें गगनींहुनी ॥ मेदिनीवरी रिचवती ॥३२॥

तेव्हां धृष्टद्युम्र शिखंडी ॥ सात्यकी प्रतिविंध्यादि प्रौढी ॥ उठावले कापखंडीं ॥ राजभारा सन्मुख ॥३३॥

व्यूहवामभागस्थित ॥ भीमसेन उठावला त्वरित ॥ शोभे जैसा आदित्य ॥ उदयाचळीं ॥३४॥

त्याचें वोडण सुंदर ॥ जैसें ताराव्याप्त अंबर ॥ ऐसा भीम देखोनि समोर ॥ आला क्षेमधूतीं ॥३५॥

तेणें भीमसेन पाचारिला ॥ तोही कुंजरारुढ भला ॥ दोघां सग्रांम थोर जाहला ॥ हस्तीवरोनी ॥३६॥

भीमसेनें गदाघातीं ॥ भूमें पाडिला क्षेमधूर्ती ॥ भयकंर देखोनि भीमाकृती ॥ शत्रुसेना विखुरली ॥३७॥

इकडे उठावला कर्ण ॥ तंव नकुळ भीमसेन ॥ तयासामोरे जाऊन ॥ झुंजते जाहले ॥३८॥

प्रतिविंध्यावरी चित्र ॥ चालिला धर्मावरी गांधार ॥ तंव उठावला धनुर्धर ॥ समसप्तकगणांवरी ॥३९॥

धृष्टद्युम्र कृपचार्या ॥ कृतवर्मा शिखंडिया ॥ ऐसें द्दंद्दयुद्ध त्या समया ॥ आरंभलें महघोर ॥४०॥

तेव्हां विंदानुविंद उमय ॥ आणि ससैन्य कैकेय ॥ हे सात्यकीयें धरणीये ॥ पाडिले देखा ॥४१॥

श्रुतकर्में चित्रसेन मारिला ॥ प्रतिविध्यें चित्र पाडिला ॥ तंव भीमाद्रौणीसिं मांडला ॥ नानाविध संग्राम ॥४२॥

भीमें ललाटीं द्रौणी भेदिला ॥ येरु किंशुकाऐसा शोभल ॥ मग बाणसंघ मोकलिला ॥ भीमावरी ॥४३॥

उभयवीरांच्या शस्त्रास्त्रीं ॥ प्रकाश भरला गगनोदरीं ॥ उल्कपात भ्रांति थोरीं ॥ देव पाहों पातले ॥४४॥

ते ह्मणती येकमेंका ॥ येरयुद्धें अभियुद्धें देखा ॥ परि हें अतियुद्ध आइका ॥ अदृष्ट पूर्वापरीं ॥४५॥

ऐसे निर्वाण झुंजिन्नले ॥ दोघेही शेवटीं मूर्छागत पडिले ॥ परस्परीं सैन्ये नेले ॥ रथीं वाहोनी ॥४६॥

इकडे समसप्तकगणेंसीं ॥ पार्थ युद्ध करी आवेशीं ॥ ते जिंकितां कौरवांसीं ॥ वर्तला हाहाःकार ॥४७॥

देवीं पार्थस्तुति केली ॥ थोर पुष्पवृष्टी जाहली ॥ हे असह्य स्थिति जाहली ॥ अश्वत्थामेयासी ॥४८॥

मग तो सावध हो‍उनी ॥ कृष्णार्जुनांप्रति येउनी ॥ मागता जाहला याचोनी ॥ युद्ध देखा ॥४९॥

हें ऐकोनियां पार्थ ॥ श्रीकृष्णासी असे बोलत ॥ कीं उभयतीं समसप्तकनिःपात ॥ करणें पाशजाळें ॥५०॥

ऐसा संकल्प आपुला आहे ॥ यांत हा ब्राह्मण प्रार्थिताहे ॥ तरी यासी करणें काय ॥ विचार देवां ॥५१॥

यांवरी तो स्वयें वनमाळी ॥ पार्थाप्रति ह्मणे वहिली ॥ येणें झूजारी याचिली ॥ तरी उठें याचिवरी ॥५२॥

ऐकत खेवीं चालिला पार्थ ॥ येरु दोघांसही विंधित ॥ चित्रयुद्ध द्रोणसुत ॥ करिता जाहला ॥५३॥

तयातेंही सांवरुन ॥ समसप्तकां वधी अर्जुन ॥ जैसा वडवानळ शोषी जीवन ॥ प्रळयकाळीं सिधूचें ॥५४॥

अश्र्वत्थामा बाणीं त्रासिला ॥ तो वाहनायुधभूषणीं भला ॥ पळोनियां जाताजाहला ॥ कर्णसैन्यांत ॥५५॥

सैन्या उत्तरभागीं तेवेळां ॥ थोर कोल्हाळ भविन्नला ॥ पाडंव भार अर्ध मारिला ॥ गजारूढें दंडधारें ॥५६॥

तंव अर्जुन आणि चक्रपाणी ॥ पांडवसैन्य व्याकुळ देखोनी ॥ तो गज कुंभस्थळीं बाणीं ॥ स्वर्णकिंकिणीक भेदिला ॥५७॥

तो शोभे जैसा पर्वत ॥ मस्तकीं औषधी तृणादियुक्त ॥ ज्यांचें सुवर्णकवच अत्यंत ॥ प्रकाशमान ॥५८॥

उलथोनि पडे हेमाद्रिशिखर ॥ ऐसा तो पाडिला कुंजर ॥ दंडधारही तदनंतर ॥ लोळविला धरणीये ॥५९॥

पाठीं तद्धंधु दंड नाम ॥ तोही मारिला करोनि संग्राम ॥ ऐसें देखोनि उग्रकर्म ॥ उठिले समसप्तक ॥६०॥

ते मेघवत् वर्षती शरीं ॥ अगम्य जाहली धरत्री ॥ परि पळविता जाहला दूरी ॥ वायुक्त पार्थ तयां ॥६१॥

तंव पार्थासि ह्मणे कृष्ण ॥ हा क्रिडाविलंब निष्कारण ॥ समसप्तकां मारोनि प्रयत्‍न ॥ करीं कर्णवधाचा ॥६२॥

ऐकोनि पार्थ उठावला ॥ तेव्हां कौरवराज आला ॥ थोर संग्राम करिता जाहला ॥ अर्जुनासवें ॥६३॥

अनेक योद्धें रथ हस्ती ॥ अश्व वाहने पदाती ॥ असंख्य पाडिले बाणघातीं ॥ परस्परांहीं ॥६४॥

इकडे पांड्य मलयध्वज वीर ॥ करिती कौरवसैन्यसंहार ॥ तें देखोनि द्रोणपुत्र ॥ करी प्रतिज्ञा गांधारेंसीं ॥६५॥

आतां करीन यांचा घात ॥ ह्मणोनि आला विंधित ॥ पांड्यराजा पाडिला तेथ ॥ द्रोणपुत्रें ॥६६॥

पांड्य मारिला देखोन ॥ वेगें पातले कृष्णार्जुन ॥ तंव त्यांप्रती धर्म येवोन ॥ बोलता जाहला ॥६७॥

आजी कौरवांचें दळ ॥ अश्वत्थामें केलें सबळ ॥ तरी जय दीसतो दुर्मिळ ॥ आपणालागीं ॥६८॥

हें ऐकोनि पाडंववीर ॥ एकदांचि उठिले समग्र ॥ मांदिला सकळसैन्यसंहार ॥ कौरवांसी ॥६९॥

धडधडाट प्रवर्तला ॥ वाजंत्रीं भूगोल कांपला ॥ अश्वकुंजरीं ध्वनि केला ॥ हिंसकार ॥७०॥

कितीएक वीर तेक्षणीं ॥ धृष्टद्युम्रावरी तुटोनी ॥ पडिले दाक्षिणात्यादि जाणीं ॥ अंगवंग मागध ॥७१॥

सहदेवें अंगाप्रती ॥ युद्ध मांडिलें निर्घातीं ॥ तो नकुळें वारोनि प्रीतीं ॥ स्वयें त्यावरी उठावला ॥७२॥

अर्धचंद्र बाण प्रेरिला ॥ तेणें अंगाचा शिरश्‍छेद केला ॥ इकडे सहसेवो धाविन्नला ॥ गजदळावरी ॥७३॥

खड्गभूघरवज्रघातीं ॥ असंख्य चूर्ण केले हस्ती ॥ अशुद्धनद्या वाहावती ॥ खळखळाटें ॥७४॥

तो सहदेव सरोष देखोन ॥ धांवत आला दुःशासन ॥ संग्राम वर्तला दारुण ॥ परस्परेंसीं ॥७५॥

तेणें थोर वृष्टी करोनी ॥ सहदेव पीडिला बाणीं ॥ परि तो व्याकुळत्व सांडोनी ॥ प्रेरिता जाहला प्रखरशर ॥७६॥

तो दुःशासनाचें कवच हृदय ॥ मेदोनि प्रवेशला धरणीये ॥ जेवीं फणिवर वेगें जाय ॥ वारुळाप्रती ॥७७॥

मग सारथियें दुःशासन ॥ राजभारांतनेला वाहून ॥ इकडे नकुळें घेतला प्राण ॥ कौरवदळाचा ॥७८॥

तो सैन्यक्षय देखिला ॥ ह्मणोनि कर्ण धाविन्नला ॥ परि नानापरी निर्भार्त्सिला ॥ माद्रिकुमरें ॥७९॥

ह्मणे तूं अनर्थमूळ पापिया ॥ तुझेनि कौरव गेले क्षय ॥ यावरी कर्ण ह्मणे तया ॥ कांरे वृथा बोलसी ॥८०॥

पुरुषार्थ करोनि बोलिजे ॥ तेंच बोलणें जगीं साजे ॥ तंव येरें विंधिला वोजें ॥ त्रिशतबाणीं ॥८१॥

कर्ण मूर्छागत पाडिला ॥ देखोनि देवां विस्मत जाहला ॥ परि सावध होवोनि उठिला ॥ कर्णवीर ॥८२॥

तेणें क्रोधें बाण सोडिले ॥ नकुळालागीं थोर पीडिलें ॥ अश्वसारथी मारिले ॥ केला निःशस्त्र ॥८३॥

मग धनुष्य कंठीं घातलें ॥ वेगें आपणापें ओढिलें ॥ आणी त्याप्रती काय बोले ॥ सुर्यात्मज ॥८४॥

अरे युद्ध करावें समानेंसीं ॥ न झुंजावें बळाधिकेंसी ॥ झुजसी तरी अवस्था ऐसी ॥ पाविजे मुर्खा ॥८५॥

आतां कृष्णार्जुनापें जाय ॥ संग्रामार्थ पाठवीं लाहें ॥ ऐसें बोलोनि कर्णें शौर्य ॥ सोडिया नकुळ ॥८६॥

कुंतिये ह्मणितलें होतें ॥ कीं न मारावें माद्रिसुतातें ॥ त्या आठवूनि मातृवाक्यातें ॥ सोडिला नकुळ ॥८७॥

तेथोनि कर्ण चालिला ॥ धर्मभारावरी उठावला ॥ बाणवृष्टी करिता जाहला ॥ अग्निप्राय ॥८८॥

जैसें दावानळ जाळी वन ॥ तैसें दग्ध कलें सैन्य ॥ कितीयेक पतंग प्राय होऊन ॥ सामावले तेथें ॥८९॥

युद्ध जाहलें दोनी दळांसीं ॥ रथी रथियां अश्व अश्वेसीं ॥ पायद झंजती पायदेंसी ॥ कुंजरांसी कुंजस ॥९०॥

अतिनिकुरें झुंजती ॥ कबंधे नृत्य करिताती ॥ नुसतींच धडें मारिती ॥ सशस्त्रवीरां ॥९१॥

कर्णें पांचाळवीरां पाडिलें ॥ अर्जुने त्रिगर्त मारिले ॥ मीमें जीवें कौरव घेतले ॥ तये वेळां ॥९२॥

आपपर नोळखवती ॥ तंव मावळत गभस्ती ॥ उरले दळ स्वस्थानाप्रती ॥ गेलें आपुलिया ॥९३॥

यानंतरें अपूर्व कथा ॥ वैशंपायन सांगेल मारता ॥ ती ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ एकादशस्तबक मनोहरु ॥ कर्ण प्रथमदिनयुद्धप्रकारु ॥ द्वितीयोध्यायीं कथियेला ॥९५॥

॥ श्रीजगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP