कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥

पार्थें क्रोधें बाहिला कर्ण ॥ ह्मणे आतां घेईन प्राण ॥ तरी विद्यामान प्रेरण ॥ करीं रामोक्त ॥१॥

आणि जें कथिलें असेल भास्करें ॥ तें तें आठवीरें सारें ॥ द्रोणप्रणित शस्त्रास्त्रें ॥ झणीं न विसरें निर्वाणीं ॥२॥

यावरी कर्ण ह्मणे पार्था ॥ तुं भेडसाविशी मज आतां ॥ परि तवपराक्रम निरुता ॥ कळला असे मजलगीं ॥३॥

अरे जो असे एकांगवीर ॥ तयाचा स्वतंत्र बडिवार ॥ तो नधरीचि आधार ॥ आणिकाचा ॥४॥

तुवां श्रीकृष्णाचेनि बळें ॥ बांधिलें आह्मांसिं समफळें ॥ कपळ करोनियां गोपाळें ॥ वांचोविलें तुज ॥५॥

तुजसी श्रीकृष्णें रक्षिलें ॥ ह्मणोनि भीष्मद्रोण वधिले ॥ त्यांहीं निर्वाण नाहीं केलें ॥ ह्मणोनि वांचले प्राण तुझे ॥६॥

कृष्णावेगळा होवोनी ॥ कैसा भिडसी समरंगणी ॥ तुझी कीर्ती केली त्रिभुवनीं ॥ सारथी होवोनि श्रीकृष्णें ॥७॥

ह्मणोनि आमुचें काहीं नचले ॥ येरवीं तुह्मीं बापुडे केतुले ॥ परि बहुतां परि रक्षिलें ॥ तोचिं तुमचा सारथी ॥८॥

यावरी पार्थ ह्मणे कर्णासी ॥ अरे हें कळों आलें तुह्मासी ॥ तरी अद्यापि आठव मानसीं ॥ कां धराचिया ॥९॥

तुवां मिथ्यावाद बोलोन ॥ कां चाळविला दुर्योधन ॥ मी अर्जुनसि जिंकीन ह्मणोन ॥ रणवट कारें बांधविला ॥१०॥

आतां अभिमान सांडावा ॥ दुर्योधन वचनीं बोधावा ॥ आमुचा राज्यविभाग द्यावा ॥ जाई न मारीं तुजलागीं ॥११॥

शरण रिघोनि कृष्णचरणीं ॥ करा धर्माची विनवाणी ॥ जाई अद्यापि तरी मनीं ॥ करीं विचार ॥१२॥

कर्ण ह्मणें रे किरीटी ॥ आतां कायशा वृथा गोष्टी ॥ शरण होतां सकल सृष्टीं ॥ थोर अपकीर्तीं होईल ॥१३॥

प्राणि आलिया संसारीं ॥ जो प्रतिज्ञा सत्य न करी ॥ त्याचिये पितरां पात अवधारीं ॥ निरयीं होय ॥१४॥

बोलिला बोल करावा सत्य ॥ उरेल कीर्तिघोष लोकांत ॥ जिणें मरणें परि पुरुषार्थ ॥ सांडणें केवीं ॥१५॥

आतां दुर्योधनाचा अभिमान ॥ सिद्धीस नेईन मी कर्ण ॥ मग पूर्णकानाडी भरोन ॥ सोडीला बाण सत्राणें ॥१६॥

तो कडकडोनी प्राप्त जाहला ॥ पार्थें मध्येंचि चूर्ण केला ॥ ह्मणोनि कर्ण वर्षता जाहला ॥ खडतरबाणीं ॥१७॥

पार्थ वरिच्या वरी तोडी ॥ कर्ण प्रेरी लक्षकोडी ॥ ऐसी दोघांची अकळ प्रौढी ॥ झुंजिन्नले आयणी ॥१८॥

विमानीं इंद्रादि सुरवर ॥ पाहते जाहले कौतुक समग्र ॥ दोघेही निर्वाणीचें वीर ॥ कर्ण किरीटी ॥१९॥

परस्परें सोडिती बाण ॥ करिती परस्पर खंडण ॥ तेणें कडकडाटें गगन ॥ गर्जत असे ॥२०॥

महाशरांचा सरसराट ॥ सत्राणें होत झरझराट ॥ होतसे शब्द चटचट ॥ भिरभिराट नलक्षवे ॥२१॥

धनुष्यांचा टणत्कार ॥ प्रत्यंचेचा झणत्कार ॥ मार्गणांचा रुणत्कार ॥ एकचि नादीं ॥२२॥

ऐसें बाणाचें कल्लोळ ॥ सुटले असंख्यात प्रबळ ॥ पडती अग्नीचे महागोळ ॥ कीं नक्षत्रें नभींचीं ॥२३॥

दाहीदिशां लखलखाट ॥ होत बाणांचा धडधडाट ॥ जैसा विजांचा झगझगाट ॥ नमाये भूतळीं ॥२४॥

उभयदळीं हलकल्लोळ ॥ तडकुं पाहे ब्रह्मांडगोळ ॥ पार्थ आवेशें तये वेळ ॥ काय करिता जाहला ॥२५॥

खेचरीविद्यें अभिमंत्रिलें ॥ सातबाण प्रयुंजिले ॥ चारीं चहूं वारू भेदिले ॥ एक लागला सारथिया ॥२६॥

दोनी बाण लागले कर्णा ॥ मूर्छा येवोनि पडिला उताणा ॥ तंव पार्थ ह्मणे आपणा ॥ सांभाळीं वीरा ॥२७॥

येरू सावध होवोनि सत्वरीं ॥ चढला आणिके रथावली ॥ सांहेरें पार्था ह्मणोनि प्रेरी ॥ तेजशक्ति प्रचंड ॥२८॥

ते रुणझुणाटें कडाडली ॥ पार्थाची दृष्टी आंधारली ॥ सन्निध येतां मूर्छा आली ॥ टेंकला ध्वजस्तंभीं ॥२९॥

शक्ती आली अवचित्तीं ॥ ह्मणोनि कोपा चढला मारुती ॥ मग घांवोनि शीघ्रगती ॥ तोडिली तेणें ॥३०॥

कर्ण ह्मणे गा हनुमंता ॥ हा क्षात्रधर्म नव्हे सर्वथा ॥ आह्मां दोघां युद्ध करितां ॥ तुवां आड येऊं नये ॥३१॥

हनुमंत ह्मणे कर्णासी ॥ येथें दोष नाहीं मजसी ॥ आपणा वोडवोनि स्वामीसी ॥ रक्षावें हा सेवकधर्म ॥३२॥

तंव सावध होवोनि धनुर्धर ॥ ह्मणे कर्णा सांभाळीं अस्त्र ॥ ऐसें ह्मणोनि वेगवत्तर ॥ काढिला शर भातांचा ॥३३॥

जेव्हां खांडववन जाळिलें ॥ तेव्हां इंद्रें होतें दीधलें ॥ जेणें त्रैलोक्य जिंकिजे सकळें ॥ तें घातलें कर्णावरी ॥३४॥

तैं तेजपुंज प्रकाशले ॥ ऐसें कर्णें येतां देखिलें ॥ काहीं प्रतिकार न चाले ॥ मग स्मरिलें भास्करा ॥३५॥

तंव सूर्य आला तत्क्षणीं ॥ कर्ण लागला पितृचरणीं ॥ ह्मणें मज नाहीं कवणी ॥ साह्यकारी स्वामिया ॥३६॥

तरी या दिव्यास्त्रापासोनी ॥ मज वांचवीं दिनमणी ॥ मग अदृष्ट मंत्र कर्णीं ॥ देव सांगता जाहला ॥३७॥

ह्मणे हा घेई बीजमंत्र ॥ याचा केलिया उच्चार ॥ अदृष्ट होईल रहंवर ॥ आकाशामाजी ॥३८॥

दुसराही दिव्यबाण मंत्र ॥ दीधला अस्त्रनिवारण थोर ॥ मग गेला स्वयें भास्कर ॥ स्वस्थानासी ॥३९॥

कर्णें सूर्यमंत्र जपिन्नला ॥ पार्थ‌अस्त्रा निवारितां जाहला ॥ नभीं तेजपूजं प्रकटला ॥ मंत्रशक्तिस्तव ॥४०॥

पार्थ विचारी मानसीं ॥ हें कैसें निवारण यापाशीं ॥ तेज विस्तारलें आकाशीं ॥ जाहलें दिव्यांबर ॥४१॥

तेणें तेजें जाजावलें ॥ महापातें तापिन्नलें ॥ पांडवदळ व्यापलें ॥ उष्णत्वेंकरोनी ॥४२॥

पार्थ ह्मणे जी श्रीहरी ॥ या तेजासी प्रतिकार करीं ॥ तंव श्रीकृष्ण झडकरी ॥ प्रेरिलें सुदर्शन ॥४३॥

तेणें लोपलें मंत्रतेज ॥ मग बोलिला कृष्णराज ॥ मज असतां काइसें तुज ॥ सांकडे पार्था ॥४४॥

यावरी मागुतें दिव्यास्त्र ॥ पार्थें प्रयुंजिलें शीघ्र ॥ तेणें व्यापिलें अंबर ॥ दिव्यप्रकाशें ॥४५॥

तें येवोनि तेजोराशीं ॥ झगटलें ग्रासाया कर्णासी ॥ तंव स्मरिलें मंत्रबीजासी ॥ कर्णें देखा ॥४६॥

तेणें अदृश्य जाहला रथ ॥ कर्ण प्रवेशला गगनांत ॥ तेथोनि तेजमंत्रें प्रेरित ॥ दिव्यकळाबाण ॥४७॥

तंव श्रीकृष्ण ह्मणे पार्था ॥ मोकलीं दिव्यबाण आतां ॥ येरें नेत्रपातें न लवतां ॥ प्रेरिला वैश्वानर ॥४८॥

तेणें निवारली तेज ज्योती ॥ कर्णरथ देखिला क्षितीं ॥ मग बोलिला श्रीपती ॥ अर्जुनासी ॥४९॥

अगा अनिवार अस्त्रदिप्ती ॥ घालींघालीं शीघ्रगती ॥ आतां करीं कर्णशांती ॥ धनुर्धरा गा ॥५०॥

कां जे याचा पिता दिनकर ॥ तो देवोनि गेलासे मंत्र ॥ तंव बाण काढी धनुर्धर ॥ महातेजःपुंज ॥५१॥

संबोखोनि ह्मणे कर्णा ॥ तूं स्मरें सूर्यनारायणा ॥ संकटसमई तवप्राणा ॥ रक्षील कोण ॥५२॥

येकढावेळ वांचलासी ॥ आतां रक्षीं आपणासी ॥ कैसा प्रतिकार आचरसी ॥ तें लक्षवेना ॥५३॥

अभिमंत्रोनि सोडिला बाण ॥ महाअनिवार दीप्तिदारूण ॥ तो दशादिशांप्रति व्यापून ॥ धुंधुवाटला ॥५४॥

कर्ण ह्मणे यासि आतां ॥ प्रतिकर नाहीं सर्वथा ॥ कीजे कैसी व्यवस्था ॥ तंव बुद्धी आठवली ॥५५॥

सूर्यास्त होतें जवळीं ॥ तें प्रेरिलें तात्काळीं ॥ विस्तारलें आकाशपोकळीं ॥ द्दादशकळा ॥५६॥

तयाचेंही काहीं न चाले ॥ पार्थास्त्र प्राप्त जाहलें ॥ मग मयचकित जाहलें ॥ मन कर्णाचें ॥५७॥

ह्मणे हें अनिवार दारुण ॥ निश्चयेंसीं घेईल प्राण ॥ मग मंत्र स्मरिला अदृष्टिकरण ॥ तेणें न दिसे कर्णरथ ॥५८॥

तेव्हां कृष्णर्जुनादि ह्मणती ॥ कर्ण पळाला असे निश्चिती ॥ परि मागुती दिसे क्षिती ॥ रथ कर्णाचा ॥५९॥

तयापाठीं लागलें अस्त्र ॥ कराया कर्णाचा संहार ॥ मागुती मंत्रबळें रहंवर ॥ अदृष्ट जाहला ॥६०॥

क्षणीं दिसे क्षणीं न दिसे ॥ एकेठाई रथ नसे ॥ दाहीदिशां भ्रमत असे ॥ परि तेजास्त्र सोडीना ॥६१॥

श्रीकृष्णासि ह्मणे किरीटी ॥ कर्णरथ नलक्षवे दृष्टी ॥ तरी ऐसियापासी उपाय जगजेठी ॥ करणें काई ॥६२॥

तंव ह्मणे श्रीकरधर ॥ याचा पिता असे दिनकर ॥ तेणें रक्षाया स्वकुमर ॥ रचिलीं बीजाक्षरें ॥६३॥

तरीं करूं प्रतिकार ॥ जेणें हा तीं सांपडेलवीर ॥ येर्‍हवी संग्राम करितां थोर ॥ सहस्त्रवरुषां नागवे ॥६४॥

मग पृथ्वीसि ह्मणे वनमाळी ॥ तूं वो कर्णाचा रथ गिळीं ॥ येरीनें तैसेंचि करितां तत्काळीं ॥ रथ नढळे कर्णाचा ॥६५॥

ऐसा रथु गिळिला देखोन ॥ आणि अस्त्र आलें टाकोन ॥ येरें स्मरोनि सूर्यनारायण ॥ उच्चारिला मंत्र ॥६६॥

ते मंत्रशक्ति सूर्योक्त ॥ रथीं प्रवेशली अद्धुत ॥ तेणें रथ उसळोनि त्वरित ॥ गेला आकाशीं ॥६७॥

बापबाप मंत्रशक्ती ॥ रथ उडविला गगनाप्रती ॥ थोर चिंता वर्तली चित्तीं ॥ कृष्णार्जुनाचें ॥६८॥

अर्जुन ह्मणे देवदेवा ॥ कर्ण जाणे बहुत मावा ॥ तरी कवणेपरी वधावा ॥ सूर्यात्मज ॥६९॥

यावरी कृष्ण सांगे हनुमंत ॥ त्वां पुच्छें बांधावें कर्णरथा ॥ आजि न वधितां सूर्यसुता ॥ ठावो नाहीं आह्मासी ॥७०॥

मागुती रथ येतां भूतळीं ॥ चाकें गिळी महीतळी ॥ आणि हनुमंतही आकळी ॥ स्वलांगूलें कर्णरथ ॥७१॥

तंव शस्त्र आलें झुंझवात ॥ कर्ण मंत्रोज्चार करित ॥ परि रथ न उसळे निभ्रांत ॥ सुबद्धपणें ॥७२॥

ह्मणोनि जंव कर्ण पाहे ॥ तंव आकळिलासे कपिरायें ॥ आणि भूमीनें गिळिला आहे ॥ चाकेंवरी ॥७३॥

मग ह्मणेजी केशवा ॥ या अवचिया तुझ्या मावा ॥ आमुचा केतुला तो केवा ॥ तुजपुढें स्वामी ॥७४॥

तूं जयाचा अंगिकारी ॥ तया जय देशी भलत्यापरी ॥ बोल ठेवावा संसारीं ॥ कवणें तुज ॥७५॥

पाहें पृथ्वीनें गिळिलें चक्रांतें ॥ पुच्छी बांधिलें हनुमतें ॥ ऐसें चोखरोनि मातें ॥ पार्थहस्ते संहारणें ॥७६॥

हें पापपुण्य विचारितां ॥ नीति नदिसे अनंता ॥ आह्मी दवडिलें पुरुषार्था ॥ पैशून्यता थोर जाहली ॥७७॥

बांधोनियां मारवणें ॥ हें क्षत्रियासीं थोर उणें ॥ तुज सदोष कवण ह्मणे । देवराया ॥७८॥

कृष्णा तुझेनि बळें पार्थें ॥ प्राणें घेतलेंसे आमुतें ॥ येर्‍हवीं कवण पांडवांतें ॥ राखों शके ॥७९॥

ऐसें बोलतां ते क्षणीं ॥ दिव्यास्त्र आलें ठाकोनी ॥ कर्ण हदयावरी भेदोनी ॥ पडिला मूर्छित ॥८०॥

तयाचिये पाठोवाटीं ॥ बाण सोडीतसे कीरीटी ॥ ते खडतरोनि उठाउठी ॥ कर्ण पडिला भूमीये ॥८१॥

यापरि पडतां कर्णवीर ॥ थोर जाहला हाहाःकार ॥ मोडला कौरवदळभार ॥ पळाले जीव घेवोनी ॥८२॥

गांधार होता मागिले भारीं ॥ तेथ सर्व मिळाले परिवारीं ॥ कर्ण पडिला ह्मणोनि उत्तरीं ॥ करिती कोल्हाळ ॥८३॥

दुर्योधन ह्मणे कटकटा ॥ कोपलासि गा नीळकंठा ॥ कर्णा सारखिया सुभटा ॥ पाडिलें रणीं शत्रूनीं ॥८४॥

मग ह्मणे हायहाय ॥ आतां करांवे तें काय ॥ आतां कवण वीर आहे ॥ आधार आह्मां ॥८५॥

दैवें उणें पडलें आमुचें ॥ राज्यहीं गेलें हातींचें ॥ वीर आटले नांवाचे ॥ आतां कैसें जैत्य आह्मां ॥८६॥

कौशाल्य केलें हृषीकेशीं ॥ जय दीधला पांडवांसी ॥ मारिलें आमुचिये वीरांसी ॥ नानाउपायें ॥८७॥

सतरादिवस पूर्ण होतां ॥ तुवां मारविलें वीरां समस्तां ॥ अद्यापि जरी बळभद्र येता ॥ तरी पुरविता मनोरथ ॥८८॥

आह्मां कोणी नाहीं रक्षिता ॥ हायहाय जगन्नाथा ॥ दुःख न साहवे कौरवनाथा ॥ ह्मणोनि लोटला धरणीये ॥८९॥

कृपाचार्य ह्मणे दुर्योधना ॥ लोकापवाद विचारें मना ॥ ऐसी त्वां दावितां करुणा ॥ हांसेल जग ॥९०॥

शल्य अश्वत्थामा मुख्य ॥ आह्मीं असो बहुतेक ॥ करूं बुद्धीचा विवेक ॥ तंव हलायुध येईल ॥९१॥

तो संहारिल पांडवांसी ॥ जय देईल गा तुजसी ॥ तरी धीर धरूनि मानसीं ॥ उठे राया ॥९२॥

येणें बोलें संबोखिला ॥ दुर्योधना धीर आला ॥ मग मेळिकारीं चालिला ॥ सैन्यासहित ॥९३॥

येरीकडे वर्तलें कैसें ॥ कर्न रणीं पडिला असे ॥ तंव देवीं केली उल्हासें ॥ पुष्पवृष्टी ॥९४॥

विजयीं जाहला धनुर्धर ॥ वाद्यनादें कोंदलें अंबर ॥ जयघोषें सर्ववीर ॥ स्वस्वशिबिरीम पातले ॥९५॥

परि अंतरीं ह्मणे चक्रधर ॥ हा कर्ण सत्वाचा सागर ॥ ममभक्त उदारधीर ॥ ऐसा नसे त्रिमुवनीं ॥९६॥

आतां याचें सत्व पाहिजे ॥ मग काहीं अपुर्व दीजे ॥ ह्मणोनी विप्रवेष यदुराजें ॥ धरिला तत्क्षणीं ॥९७॥

कांपत कर्णाजवळी आला ॥ स्वस्तिवाचन करिता जाहला ॥ ह्मणे यजमाना भलाभला ॥ सत्ववंत तूं ॥९८॥

द्रव्य‍इच्छा होती मनीं ॥ आलों तुजजवळीं ह्मणोनी ॥ परि तुं पडलासि समरंगणीं ॥ तरी मीचि हतभाग्य ॥९९॥

तूं गा उदार चक्रवतीं ॥ तिहींलोकी तुझी कीर्ती ॥ असो तुज जाहली ऐसी गती ॥ आतां काय मागावें ॥१००॥

मनीं विचारीं वीर कर्ण ॥ मी पूण्यकीर्ती सूर्यनंदन ॥ विमुख जातो आनि ब्राह्मण ॥ तरी यासी काय देऊं ॥१॥

परि सुवर्णबद्ध माझ्या दांतीं ॥ अमोलिक रत्‍नें आहेती ॥ तीं पाडोनि द्यावीं हातीं ॥ ब्राह्मणा चे ॥२॥

मग ह्मणे विप्रा अवधारीं ॥ मजपें काहीं नाहीं ये अवसरीं ॥ परि दंती रत्‍नें असता चारे ॥ तीं घेई पाडोनियां ॥३॥

येरू ह्मणे तुज सत्व राखणे ॥ तरीं स्वहस्तें पाडोनि देणें ॥ आह्मी ब्राह्मणीं शस्त्र घेणें ॥ हें केविं घडे ॥४॥

मग कर्ण कलंडोनि क्षिती ॥ गडगडे पाषाण घ्यावया हातीं ॥ तंव बाण अंतर्गत जाती ॥ जे अंगीं होते रूपले ॥५॥

पाषाण घे बोनियां करीं ॥ प्रवर्तला दंत पाडों चारी ॥ तंव रूप दाखवी श्रीहरी ॥ चतुर्भुज आयुधेंसीं ॥६॥

अंगीं मेघवर्ण कांती ॥ पीतांबर पदकदीप्ती ॥ शंखचक्र गदा हातीं ॥ पद्ममंडित ॥७॥

देखोनि कर्ण विस्मित जाहला ॥ तंव देवो ह्मणे माग वहिला ॥ येरु श्रीचरणीं लागला ॥ मग बोलिला सद्रदीत ॥८॥

देवा तुं अनाथाचा नाथ ॥ भक्तवत्सल महासमर्थ ॥ परात्पर मोक्षपंथ ॥ देसी स्वदासां ॥९॥

मज तूं भेटलासि अंतीं ॥ तेणें पावलों उत्तमगती ॥ आतां काय मागूं श्रीपती ॥ पूर्ण जाहले मनोरथ ॥११०॥

स्वामिकाजीं प्राण वेंचिला ॥ अर्थ देवाब्राह्मणां वोपिला ॥ तारुण्यमोग असे भोगिला ॥ स्वकांतेसीं ॥११॥

याहूनि जरी देसी स्वभावीं ॥ तरी उत्तमकुळीं जन्मवीं ॥ स्वकीयस्थानी वास करवीं ॥ भक्ती देये चरणांची ॥१२॥

मार्गतेयांची पुरवीन इच्छा ॥ हेंचि देई गा जगदीशा ॥ ऐसें मागोनि परियेसा ॥ त्याजिला प्राण ॥१३॥

तया देवो जाहला प्रसन्न ॥ दीधलें वैकुंठीं कैवल्यस्थान ॥ मग आला जगज्जीवन ॥ शिबिरीं आपुलें ॥१४॥

तेणें कर्णाची दातुत्वकथा ॥ श्रुत केली कुंतीसुतां ॥ ह्मणें ऐसा उदारदाता ॥ नाहीं त्रिभुवनीं ॥१५॥

ह्मणोनि उदार तेचि धन्य ॥ जे वंचिती अर्थ प्राण ॥ तयांची पुण्यकीर्ती पुराण ॥ प्रसिद्ध होय ॥१६॥

पर्थासि ह्मणे सर्वेश्वर ॥ कर्ण महावीर सत्वधीर ॥ साहीजणीं मिळोनि संहार ॥ केला तयाचा ॥१७॥

पार्थ ह्मणे ते कोण नारायणा ॥ येरू ह्मणे ऐकें अर्जुना ॥ कुंतियें मागीतलें बाणां ॥ इंद्रें नेलीं कुंडलकवचें ॥१८॥

धरणींये गिळिलें चक्रातें ॥ हनुमंतें बांधिलें रथातें ॥ परशुरामें शापिलें होतें ॥ कीं यश नेदी हतियार ॥१९॥

ऐसा साहीजणीं वधिला कर्ण ॥ पांडवां आनंद जाहला जाण ॥ परि सचिंत दुर्योधन ॥ काय करिता जाहला ॥१२०॥

हें कर्णपर्व ग्रंथातरीं ॥ कथिलें असे कविश्र्वरीं ॥ तें ऋषिवाक्य सर्वत्रीं ॥ मान्य सकळां ॥२१॥

परि व्यासोक्त भारत ॥ शतसहस्त्र असे गणित ॥ तेथें कर्णशिर निभ्रांत ॥ छेदिलें पार्थें ॥२२॥

तेंचि ऐकें गा नृपनाथा ॥ रणीं पडलिया सूर्यसुता ॥ कौरवसैन्य तत्वता ॥ दाहीदिशां पळालें ॥२३॥

कर्ण पडतां रणमंडळीं ॥ दूःखाश्रु ढाळी अंशूमाळी ॥ निजकरें स्पर्शोनि अस्ताचळी ॥ सागरीं स्नान करितसे ॥२४॥

रिता रथ घेवोनि तेवेळीं ॥ शल्य प्रवेशला कौरवदळी ॥ धरणीवरी अंग घाली ॥ दुर्योधन ॥२५॥

त्याचिये नेत्रोदकें करोनि ॥ सिक्त जाहली असे अवनी ॥ ह्मणे बाळमित्र मज टाकोनी ॥ कर्णवीरा गेलासी ॥२६॥

अहा कर्णा परम उदारा ॥ अहाकर्णा रूपसुंदरा ॥ अहा कर्णा समरधीरा ॥ गुणगंभीरा आठवूं किती ॥२७॥

कर्णा प्रतापचंडकिरणा ॥ तुं पावलासि अस्तमाना ॥ उदयो आतां नव्हें पुनः ॥ पाडली सेना आंधारीं ॥२८॥

तुझिये स्वरूपावरून ॥ मन्मथ टाकावा ओंवाळून ॥ कवचकुंडले केलीं अर्पण ॥ पुरंदरासी ॥२९॥

तूं उदारराणा साच ॥ तत्काळ दीधलीं कुंडलें कवच ॥ कृपणता न धरिसी साच ॥ कायावाचा मानसें ॥१३०॥

औदार्य सत्वस्थ परोपकार ॥ धर्मरायासम गंभीर ॥ पराक्रमी पुण्यपवित्र ॥ तुज‍ऐसा नसेची ॥३१॥

असो इकडे रण सांडूनी ॥ पळे तेव्हां कौरववाहिनी ॥ तंव भीमें आनंदोनी ॥ हांक फोढिली आवेशें ॥३२॥

प्रतिशब्द उठिला निराळीं ॥ कौरवसेना कांपे चळीं ॥ कित्येक वीर तेकाळीं ॥ देशीं गेले जीवमये ॥३३॥

वीर ह्मणती भयेंकरून ॥ पैल आलारे अर्जुन ॥ कीं दुःशासनाचें रक्तपान ॥ करुनि आला वृकोदर ॥३४॥

असो तें भयसमुद्रांत ॥ कौरवसेना अवघी रडत ॥ परि कर्णाचें स्तवन अद्भुत ॥ शल्य करी तेघवां ॥३५॥

ह्मणे कर्णासम वीर पाहीं ॥ नोहेच कदा भुवनत्रयीं ॥ होणार न टळे सहसाही ॥ रणी मारिला अर्जुनें ॥३६॥

इकडे धर्म कृष्णार्जुनां ॥ प्रीतीनें देत आलिंगना ॥ ह्मणे हे कृष्णजनार्दना ॥ किती उपकार आठवूं ॥३७॥

आमुची शोभा संपत्ती बळ ॥ तूचि अवधा तमाळनीळ ॥ तुंचि ब्रह्मानंद निर्मळ ॥ सगुणपणा आलासी ॥३८॥

चिंतामणीचे धवलागारीं ॥ जो पहुडला सेजेवरीं ॥ तो वोसणूनि बोलिला जरी ॥ तरी सर्वही प्राप्त होय ॥३९॥

तैसा आमुचे मनोरथीं ॥ हरीं तूं जालासि सारथी ॥ जेंजें आह्मीं इच्छितों चित्तीं ॥ तें तें श्रीपती पुरविसी ॥१४०॥

इकडे खावोनि करकरां दांत ॥ दुर्योधन आला सेनेसहित ॥ पांडवसेना संहारित ॥ वीर पळती दशदिशां ॥४१॥

चापापासोनि सुटे बाण ॥ तैसा धांवला भीमसेन ॥ गदाप्रहारें करून ॥ कौरवसेना विभांडिली ॥४२॥

पंचवीस सहस्त्र वीर ॥ मारी तेव्हा वृकोदर ॥ धृतराष्ट्राचा ज्येष्ठकुमर ॥ पराभवूनी पळविला ॥४३॥

राज जाहली दोन प्रहर ॥ शिबिरीं पातला चिंतातूर ॥ कर्णा आठवूनि वारंवार ॥ दुर्योधन अश्रु गाळी ॥४४॥

ह्मणे जेणें द्रव्यपर्वत ॥ ब्राह्मणांसी दीधलें अमित ॥ रणा गेला सूर्यसुत ॥ करूनियां ग्रहदानें ॥४५॥

हरिवरध्वजाचे रथीं ॥ द्दिजवरध्वज जाहला सारथी ॥ ह्मणोनि अर्जुना जयप्राप्ती ॥ जाहली निश्चियें ॥४६॥

इकडे देवऋषी स्वस्थाना ॥ चालिले वर्णित भीमार्जुना ॥ कोणी वर्णिती वीरा कर्णा ॥ धीर उदार ह्मणवोनी ॥४७॥

धर्मराज रथीं बैसोन ॥ सुगंधस्नेहदीपका लावोन ॥ कर्पूरदीप पाजळोन ॥ सहस्त्र सेवक चालती ॥४८॥

कर्ण पडिला रणमंडळीं । धर्म येवोनि न्याहाळी ॥ पडिले वीर स्थळोस्थळीं ॥ अलंकारें मंडित ॥४९॥

जेवीम नक्षत्रें भूमीसि पडती ॥ तैसीं शस्त्रास्त्रेम झगमगती ॥ असो पांडव शिबिराप्रती ॥ राहिले स्वस्थ ॥१५०॥

कृष्णकृपेचें बळ अद्भुत ॥ रणीं मारिला सूर्यसुत ॥ सुखेम निद्रा पांडव करित ॥ सर्व चिंता सांडोनी ॥५१॥

यापरि घॄतराष्ट्रलागुन ॥ संजय सांगे वर्तमान ॥ रणीं पडिला वीर कर्ण ॥ जो कां प्राण कौरवांचा ॥५२॥

ऐकोनि धृतराष्ट्रागांधारी ॥ बुडालीं तेव्हां शोकसागरीं ॥ संजय विदुर नानापरी ॥ शांतविती तयांतें ॥५३॥

जन्मेजय नृपनाथ ॥ त्यासि वैशंपायन सांगत ॥ शौनकादिकांलागीम सुत ॥ नौमिषारण्यीं सांगे कथा ॥५४॥

कर्णपर्व संपलें येथून ॥ पुढें शल्यपर्व करा श्रवण ॥ पांडवांचा साह्यकारी पुर्ण ॥ असे श्रीरंग ॥५५॥

कर्णपर्व ऐकतां निर्मळ ॥ जोडेल अश्वमेघांचें फळ ॥ श्रवण करिती पुण्यशीळ ॥ इच्छिलें फळ पावतसे ॥५६॥

पुढें शल्यपर्व गहन ॥ रायासि सागे वैशंपायन ॥ तें अपूर्व करा श्रवण ॥ ह्मणे मधुकरकवी ॥५७॥

इति श्रीकथाक०॥ एकादशस्त०मनो० ॥ कर्णपर्वसमाप्तिग्र० ॥ पंचमा०कथियेला ॥१५८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP