एक तूं ही निरंकार (१६१)
कुठे लिहिले त्यागुन जगता वनांत जाऊनी तप करा ।
कुठे लिहिले गृहस्थी सोडुन मनी अपुल्या संताप करा ।
कुठे लिहिले स्त्री पुत्रांना त्यागुन भलते सोंग धरी ।
कुठे लिहिले साधु होऊन ठोकर खावी घरोघरी ।
कुठे लिहिले त्यागून माया दान करुनी धन लुटवा ।
कुठे लिहिले कष्ट सोसूनी निज देहास बळी चढवा ।
ग्रंथ पुराणे हेच सांगती नत व्हावे सदगुरु चरणी ।
'अवतार' म्हणे संतानी ऐका क्षणी प्रभु घ्या पाहुनी ।
*
एक तूं ही निरंकार (१६२)
महतपाप नर जन्मा येऊन प्रभुदर्शन नाही केले ।
महत्पाप नर जन्मा येऊन नाही प्रभु यश गाईले ।
महत्पाप नर जन्मा येऊन अभिमना नाही त्यजीला ।
महत्पाप नर जन्मा येऊन शरण गरुला ना गेला ।
महत्पाप नर जन्मा येऊन मन गुरुचरणी न झुकले ।
महत्पाप नर जन्मा येऊन दसवे द्वार न जाणीयले ।
महतपाप नर जन्मा येऊन शुद्ध मनाला ना केले ।
महत्पाप नर जन्मा येऊन प्रसन्न गुरुला ना केले ।
सकलांचे कल्याण करावे महत्पाप हेची आहे ।
'अवतार' नाम जो दान करितो उत्तम दानी तो आहे ।
*
एक तूं ही निरंकार (१६३)
सुतदारा अन नाती गोती मावळती आहे छाया ।
धन दौलत अन महाल माड्या मिथ्या ही सारी माया ।
काळमुखी हे पडेल सारे जे जे आले या जगती ।
अपुले ज्य श्वासांना म्हणसी हक्क तुझा ना त्यावरती ।
एकवेळ पाहोनी प्रभुला जो याची महिमा गाई ।
'अवतार' म्हणे ऐशा भक्ताला चौर्याऐंशीं फिरणे नाही ।
*
एक तू ही निरंकार (१६४)
मिळून सूंदरता अन् यौवन भुलविले कां व्यर्थ मना ।
महाल माड्या पाहून प्राण्या वाढवीसी कां अभिमाना ।
एक हवेचा झोका आहे देहामाजी जो आत्मा ।
पंचभूत अन पंचवीकारे गृसित विसरला भगवता ।
आहे देव तुझ्या अती जवळी जाणी भेद हा गुरुकरवी ।
'अवतार' म्हणे संतानो तो नर जीवन मुक्तीला मिळवी ।
*
एक तूं ही निरंकार (१६५)
अनेक जिव्हा एक करूनी याचे गाऊ जरी यशागान ।
सफल कवि जगताचे आणुनी उपसांचे जरी करू लिखाण ।
विद्वानांच्या करवी आपण महिमा याचे ऐकु जरी ।
सात समींदर करून शाई केले याचे स्तवन जरी ।
तरिही या बेअंत प्रभुचे अशक्य गाणे गीत असे ।
'अवतार' म्हणे या परब्रह्माचा अंत पहाणे शक्य नसे ।
*
एक तूं ही निरंकार (१६६)
गुरुमार्गी गुरु आज्ञा मानी मनमार्गी करीतो प्रतिकार ।
गुरुमार्गी करी सेवा गुरुची मनमार्गी करीतो तक्रार ।
गुरुमार्गी करी प्रेम मनाने मनमार्गी तो सोंग करी ।
गुरुमार्गी सम अंतर्बाह्य मनमार्गी मनी द्वेष करी ।
गुरुमार्गीचा लाभ रोकडा मनमार्गी मिथ्या व्यवहार ।
गुरुमार्गी हा दृढ विश्वासू मनमार्गी ना करी विचार ।
गुरुमार्गी नित्य प्रभु पाहे मनमार्गी त्या शोध करी ।
गुरुमार्गी मनी मान न येई मनमार्गी अभिमान धरी ।
सम रूपें 'अवतार' तयांची भिन्न भिन्न गुण परी असती ।
गुरुमार्गी उपकारी असती मनमार्गी फूका वदती ।
*
एक तूं ही निरंकार (१६७)
डोळे मिटुनी कैसी प्राण्या गाढ झोप आली तुजला ।
जागा होऊन काम तूं ज्यालागी जगती आला ।
गेला समय न येई हाती अनुताप होईल अंती ।
या जगती तू केवळ प्राण्या काही दिवसंचा अतिथी ।
मानव तन अती दुर्लभ आहे सहज मिळाले नाही तुला ।
गर्भातुन तू येता बाहेर विसरलास भगवंताला ।
निजरूपाची जाण न तुजला गुरु करवी घे याची जाण ।
जाण वे वेड्या कोण हा स्वामी ज्याने दिधले तन मन प्राण ।
यमधर्माला काय सांगशी याचा थोडा करी विचार ।
'अवतार' म्हणे तव हाती आहे करी जीत किंवा तू हार ।
*
एक तूं ही निरंकार (१६८)
निज यत्नाने प्रीत न उपजे प्रभु इच्छेने होत असे ।
मालवलेल्या मन दीपाला गुरु प्रकाशित करीत असे ।
पूर्ण गुरुवाचोनी कोणी आजवरी ना झाला पार ।
पतीवीना जरी लाखो केले वृथा जाण नारी शॄंगार ।
सत्य पुरुषाला जो जाणी तोची असे सदगुरु पूरा ।
उपदेशी जो केवळ मंत्र ऐसा गुरु असे अधुरा ।
काय करावे अशा गुरुला मन दुविधा जो घालवीना ।
कैसा ज्ञानी जो प्रभुला समीप अपुल्या जाणी ना ।
पूर्ण सदगुरु क्षणात एका देवासंगे भेटवीतो ।
पुनः पुन्हा 'अवतार' गुरुला मस्तक अपुले झुकवीतो ।
*
एक तूं ही निरंकार (१६९)
सुवर्ण होते लोखंडांचे स्पर्श करावे जे परीसा ।
चंदनासवे वृक्ष उपजता होत असे चंदन जैसा ।
असता संगे हंसणार्याच्या दुःखी प्राणीही हंसतो ।
मिळतां औषध रोग ग्रसिता झोप सुखाची घेईल तो ।
साबण ज्यापरी मलीन कपडे क्षणत एक साफ करी ।
अशुद्ध जल गंगेत मिसळता गंगाजल होऊन जाई ।
असेल जरी कितीही पापी शरण येई जो संतजना ।
म्हणे 'अवतार' वेळ न लागे मिळेल मुक्ती त्याच क्षणा ।
*
एक तूं ही निरंकार (१७०)
किडा होऊनी अनेक जन्मी नाना दुःखे भोगीयली ।
विंचू मंडुक सर्प होऊनी विटंबना कैसी झाली ।
गाय म्हैस झालास कधी तू गर्दभही झालास कधी ।
कधी झालासी बदक कावळा बगळाही झालास कधी ।
रडत राहिला होता घाणीत विसरूनी अपुल्या प्रभुचे नाम ।
'अवतार' म्हणे गुरु भेटी घेई आता तरी पाहे निजधाम ।