स्वात्मसौख्य - कर्मकांड ओवी संग्रह १३

श्रीस्वात्मसौख्य ग्रंथात कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक विज्ञानांतील मुख्य सर्व गोष्टी सूत्ररुपाने दाखविल्या आहेत


ग्रंथीं धरावा विश्वास । कर्मकांडीचा हा कोश ॥

कोटी कर्माची विशेष । श्रोते सारांश जाणती ॥१२१॥

कृष्णचैतन्य आदिपुरुष । वदता झाला तोचि अंश ॥

कर्मशोभा त्याची ज्यास । स्वानंदभास कर्माचा ॥१२२॥

कर्मकर्ता तोचि भोक्ता । वक्ता श्रोता समानता ॥

आनंदवरदायिनी माता । सदगुरुपिता व्यंकटेश ॥१२३॥

त्याचे पोटीं बाळ सानें । कृष्णचैतन्य उदरा येणें ॥

ग्रंथ निर्माण केला तेणें । सज्जनजनें परिसीजे ॥१२४॥

फळाशा इच्छिजे मानसीं । निष्काम पठण ग्रंथासी ॥

करितां ऋद्धिसिद्धि दासी । वरदवाक्यासी जाणिजे ॥१२५॥

व्याख्यान कर्मकांड निपुण । ग्रंथीं करील अवलोकन ॥

त्याचें संतुष्ट होईल मन । सायोज्य सदन पावती ॥१२६॥

यजन, याजन, अध्ययन । अध्यापन आणि दान ॥

प्रतिग्रहाचें भूषण । कर्मषट् कोण ब्राह्मणा ॥१२७॥

हे कर्मयोग धारणा । संत मानितील या वचना ॥

इतरास हे विवंचना । अगम्य जाणा सर्वथा ॥१२८॥

सदगुरुसी शरण रिघाले । तापत्रयातें निमाले ॥

आपआपणा उमजले । सूचित झाले कर्माविषयीं ॥१२९॥

संपूर्ण झाली कर्मरचना । पुढा सांगिजे उपासना ॥

भक्तिमार्गे करुनि श्रवणा । विकल्प दूषणा निवटीजे ॥१३०॥

स्वानंद चैतन्य ग्रंथवक्ता । कृष्णानंद लेखनकर्ता ॥

स्वात्मसुखाची निजवार्ता । संतसमर्था अर्पिजे ॥१३१॥

इति श्रीनरसिंव्हसरस्वतीस्वामिमहाराजकृते श्रीस्वात्मसौख्ये ग्रंथे कर्मकांडं संपूर्णमस्तु ॥

हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP