श्रीगणेशाय नमः
। श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीकृष्णाय नमः ।
आदीं वंदू गणनायका । नरकुंजरा अलोलिका । नरगजस्वरुपें तूं एका । नमन श्रीविनायका सदगुरु ॥१॥
तुज सदभावें करितां नमन । विघ्नचि होय निर्विघ्न । यापरी तुझी कृपा पूर्ण । चैतन्यघन गणराजा ॥२॥
सालंकृतशुक्लांबरी । हंसारुढी परमेश्वरी । सदगुरुरुपें वागेश्वरी । म्यां मजमाझारीं वंदिली ॥३॥
वाच्यवाचक वदता । तिहींसी आली एकात्मता । यापरी येथें वाग्देवता । गुरुत्वें तत्त्वतां वंदिली ॥४॥
पूर्वपरंपरा पूज्यता । एकरुप एकनाथा । आह्मां सदगुरुचि कुळदेवता । एकात्मता एकवीरा ॥५॥
तिचेनी नांवें माझेंही नांव । ह्नणोनि मिरवी कवि - वैभव । तंव नामरुपा नुरेचि ठाव । हा निजानुभव कुळदेव्या ॥६॥
आतां वंदूं संतसज्जन । जे सर्वांगी चैतन्य घन । ज्यां सगुण निर्गुण समसमान । जे निजजीवन सदभावा ॥७॥
ज्यांची सदभावें ऐकतां गोष्टी । चैतन्यघन होय सृष्टी । लागे परमानंदी दृष्टी । ऐसी कृपादृष्टी साधूंची ॥८॥
आतां वंदूं श्रीजनार्दन । ज्याचें ऐकतां एक वचन । त्रैलोक्य होय आनंदघन । जें निजजीवन सच्छिष्या ॥९॥