५७
जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥
न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ०॥
सप्त सागर एकवट होती । जैं हे विरुनी जाय क्षिती । पंचमहाभुतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगातीं गा विठोबा ॥२॥
भलतैसें वरपडों भारी । नाम न संडों टळों निर्धारी । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥३॥
५८
अगा पंढरिनाथा ऐसें काय केलें । मज उपक्षिलें अनाथासी ॥१॥
त्रैलोक्याचे ठायी मज नसे कोणीं । ऐसें चक्रपाणी ठावें तुज ॥२॥
कोणाचे आधारे असावें म्यां येथें । जन्मविलें व्यर्थ कां गा मज ॥३॥
आम्हांसी क्लेशांत बहु पाडियेलें । काय हातां आलें तुझ्या देवा ॥४॥
आमुच्या मनीचे अर्थ करितां पूर्ण । भानुदास म्हणे जाण दुजा कोण ॥५॥
५९
तुम्हीं कराल जें काय एक नोहे । ब्रह्मांड अवघे हें उभाराल ॥१॥
तुझिया सत्तेनें सकळांचा प्राण । चालतसे जाण ब्रह्मांड हैं ॥२॥
तुझिया सामर्थ्या नाहीं अंतपार । तेथें मी किंकर काय जाणे ॥३॥
सर्व अपराधी शरण मी पतित । उपेक्षा त्वा मातें न करावी ॥४॥
भानुदास म्हणे पुरवा मनोरथ । तुम्हीं अनाथनाथ पांडुरंगा ॥५॥
६०
चंचळ हें मन नावरे माझ्यानें । कामाच्या व्यसनें पीडीतसे ॥१॥
अविवेकांचे बळ झालें असे फार । धांवती षडविकार सैरावैरां ॥२॥
विवेकाची शक्ति होऊनिया क्षीण । सत्कार्मासी हीन बुद्धी झाली ॥३॥
चित्ताचा चालक अगा सुत्रधारी । भानुदासा हरी कृपा करी ॥४॥
६१
अधोगती आम्हीं जावें पंढरीनाथा । ऐसें तुझ्या चित्ता आलें काय ॥१॥
पडिलों पदरीं अन्यायी अन्यायी मी दीन । नेई सांभळुन कैसें तरी ॥२॥
मज अनाथाची परिसावी विनंती भानुदास स्तुति करीतसे ॥३॥
६२
ऐसियासी कृपा करावी त्वरित । पुरवा मनोरथ सर्व माझे ॥१॥
काकुळती कवणा येऊ तुजविण । दुःख निवारण कोण करी ॥२॥
त्रैलोक्य पालन करिसी सर्वकळ । त्याहुनि आगळें हेंचि काय ॥३॥
तुझिया पायांचा मजला आधार । केविं तुं निष्ठूर जाहलासी ॥४॥
आमुचे अन्याय न धरावे चित्तीं । सर्व कृपामूर्ति पोटीं घाली ॥५॥
कर्म धर्म माझें उत्तम आवरण । न न पाहें पावन करी मज ॥६॥
भानुदास म्हणे कृपेचें पोसणें । परि नारायणें सांभाळावें ॥७॥
६३
देवा कोठवरीं अंत पाहतोसी । प्राण कंठापाशीं ठेवियेला ॥१॥
पळमात्र चित्ता नाहीं समाधान । चित्तेंनें व्यापुन घेतलेंसे ॥२॥
नानापरीचें दुःख येवोनी आदळत । शोकें व्याकुळ चित्त होत असे ॥३॥
यासी तो उपाय न कळेचि मज । शरण आलों तुज देवराया ॥४॥
इच्छा पुरवुनी सुखरुप ठेवी । भानुदास पायीं ठाव मागे ॥५॥
६४
मज निरविलें कोनाचिये हातीं । वैकुंठीं श्रीपति राहिलासी ॥१॥
कोणी नाहीं मज ठाऊक तुजला । संकटाचा घाला कैसा केला ॥२॥
दुरी टाकूनियां केलेसे निष्ठूर । दुःखाने बेजार केलें मज ॥३॥
काय राग आला तुझिया मनांत । तयामुळें शोंकांत पाडियलें ॥४॥
अन्यायाची राशी देहचि सगळा । हा राग गोपाळा न मानावा ॥५॥
क्षमा करीं माझे सर्व अपराध । धरावा भेद कांही देवा ॥६॥
भानुदास म्हणे अंगिकारा त्वरित । करुनि आनंदात ठेवा पायीं ॥७॥
६५
कोठवरी धांवा करुं तुझा देवा । श्रमा झाले जीवा फार माझ्या ॥१॥
अझुनियां कां गा न येसी त्वरित । दुःखानें बहुत जाकळिलों ॥२॥
कंठ रोधियेला श्वासावरी श्वास । घालुनी नेत्रास नीर वाहे ॥३॥
दाही दिशा मज वाटती उदास । झाला कासाविस प्राण माझा ॥४॥
हीन कर्म माझें फुटकें अदृष्ट । म्हणवोनि संकट ऐसें झालें ॥५॥
भानुदान म्हणे पहातां चरण । तळमळ जाण शांत झाली ॥६॥
६६
दीनबंधु ब्रीद भले । जरी त्वां चरणीं बांधिलें । तरी कां आम्हा उपेक्षिले । संगे पंढरीराया ॥१॥
जळ बुडवीं पाषाण । जडकाष्ठा तारी पूर्ण । आपण वाढविलें म्हणोन । सांगे पंढरीराया ॥२॥
जीवानीं हा अभिमानी । तुं तंव जगाचें जीवन । ब्रीद आपुलें सांभळी पूर्ण । पंढ रीराया ॥३॥
माता ती क्रोध दृष्टी । परते बाळकासी लोटी । तरी तें चरणी घाली मिठी । पंढरीराया ॥४॥
सबळ काष्ठा कोरी भ्रमर । परि कमळ रक्षी निर्धार तैसा तुं प्रीतिकर । पंढारीराया ॥५॥
शारण निजभावेसी । भानुदास सेवेसी । तया तु नुपेक्षिसी सांगे पंढारीराया ॥६॥
६७
पतित म्हणोनि जाहलों शरणागत । अनाथाचा नाथ म्हणती तुम्हा ॥१॥
तें आपुलें ब्रीद साभाळी अनंता । नको पा परता दास तुझा ॥२॥
तुझा दास म्हाणोनि जगीं जाहली मात । अनथांचा नाथ तूते म्हणती ॥३॥
भानुदास म्हणे सांभळी वचन । पतीतपावन ब्रीद जगीं ॥४॥
६८
अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । ऐसें चराचरी ब्रीद गाजे ॥१॥
तें आम्हां सांपडले सोपें वर्म हातां । म्होणोनि अच्युता बोलतसों ॥२॥
आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें । उगवणें कोडें तुमचें हातीं ॥३॥
भानुदास विनवी चरणीं ठेवुनि माथा । सांभाळी अनाथनाथा आम्हांलागीं ॥४॥
६९
दीन आम्हीं रंक पतीत पतीत । पावन तूं अनंत स्वामी माझा ॥१॥
धरला भरवसा नामावरी चित्त । नाहें दुजा हेत मनीं कांहीं ॥२॥
देणें घेणें नको पुरला मनोरथ । बोलणें ती मात वेगळी असे ॥३॥
भानुदास म्हणे अहो पंढरीराया । कृपा करी सखया धरी हातीं ॥४॥
७०
अहो श्रीराम पतीतपावना । तारी मज दीना रंकपणें ॥१॥
गाजे त्रिभुवनीं उदार ती ख्याती । वेदही वर्णिती महिमा तुझा ॥२॥
भानुदास म्हणे श्रीराम दयाळ । पाळा बरवा लळा उदारपणें ॥३॥
७१
भाकितों करुणा पंढरीच्या राया । अगा यादवराया श्रीकृष्णरामा ॥१॥
तूं माय माउली जीवीं जीवनकळा । भक्ताचा लळा पुरविसि ॥२॥
आवडे साबडे भक्ताचें कीर्तन । नाचसी येऊन निरभिमानें ॥३॥
भानुदास म्हणे पुरवीं माझे लळे । विठठले सांवळे माऊलीये ॥४॥
७२
अहो पांडुरंग पतीतपावना । आमुची विज्ञापना एक असे ॥१॥
नामाचा उच्चार संताचा सांगात । पुरवावा हेत जन्मोजन्मीं ॥२॥
भलतीये याती भलतीये कुळीं । जन्म दे निर्धारी देवराया ॥३॥
भानुदास म्हणे दुजा नको धंदा । रात्रंदिवस गोविंदा वाचे नाम ॥४॥
७३
वेदांत सिद्धांत ऐकोनियां गोष्टी । मन जाहलें चावटी देवराया ॥१॥
परि त्याचा बोध नये काहीं चित्ता । फजिती तत्त्वतां मागें पुढें ॥२॥
संसाराचें जाळें पडतसे गुंती । करितां कुंथाकुंथी न ॥३॥
निघेची भानुदास म्हणे सांवळ्या श्रीरामा । तुझा देई प्रेमा दुजें नको ॥४॥
७४
माझा तो भरंवसा तुझे नामीं आहे । येणें कार्य होय आमुचें देवा ॥१॥
तूं जगाचें जीवन मनाचें मोहन । ब्रह्मा सनातन तूंचि देवा ॥२॥
जंगम जगीं प्रकाशला । हा अचोज अबोला दिसे देवा ॥३॥
भानुदास म्हणे विश्रांतीसी स्थान । पंढरीवांचून दुजें नाहीं ॥४॥
७५
तुझिया रुपाची आवडी मज देवा वाचेसी तो हेवा रामनाम ॥१॥
श्रवनीं ऐकेन तुमचे पोवाडे । दुजे वाडेंकोंडें न करीं कांहीं ॥२॥
चरणें प्रदक्षिणा घालीन लोंटागणा । वंदीन चरणा संताचिया ॥३॥
भानुदास म्हणे हीच मति स्थिर । रामराम निर्धार गाईन मुखीं ॥४॥
७६
श्रवणीं कीर्तीं ऐकेन मुखें नाम गाईन । डोळेभर पाहीन श्रीमुख देवा ॥१॥
चरणें करीन प्रदक्षिणा नमन चरणा । घालीन लोटांगणा संतद्वारीं ॥२॥
एकादशीं व्रत जागर निराहारी । द्वादशीं क्षीरापती निर्धारी सेवीन मी ॥३॥
भानुदास म्हणे हाचि माझा प्रेम । दुजा कांही श्रम न करी आन ॥४॥
७७
इहीं श्रवणीं तुझें गुणगान ऐकेन । इहीं चरणीं तीर्थपथेम चालेन । नाशिवंत देह कवणीये काजा । ऐसी प्रेमभक्ति देई सहजा ॥१॥
अखंड तुझे नाम उच्चारी । तेणें संसारा होय उजरी ॥धृ० ॥
शालीग्राम तीर्थे करीन आंघोळी । हरिदासाचें चरणरज लावीन कपाळीं । कंठमंडित तुळशी माळी । तन मन प्राण तुमचे वोवाळी ॥२॥
उदयव्यथेलागीं मी न करी धंदा । उच्छिष्ट प्रसादें हरावीं हे क्षुधा । आपली स्तुति आणि पारावीया निंदा । हे दोन्हीं आतळों नेदी गोविंदा ॥३॥
सर्वाभूती रामा तूतेंचि देखे । तुझेनि प्रसादें सदा संतोषे । देवा भानुदास मागे इतुकें । चाड नाहीं आम्हां वैकुंठ लोकें ॥४॥
७८
एकाचिये घरीं द्वारपाळ होय । एकासि ते पाहे खांदा वाहे ॥१॥
एकाचिया घरीं उच्छिष्ठ ते काढी । एकाची आवडी उभा राहे ॥२॥
एका घरी कण्या आवडीनें खाय । एका घरीं न जाय बोलावितां ॥३॥
एकाचिये घरीं उच्छिष्ट भातुंके । खाय कौतुकें मिटक्या मारी ॥४॥
भानुदास म्हणे आवडीच्या सुखा भुलोनियां देखा लोणी खाये ॥५॥
७९
शेबंडी वाकूडीं गौळियांची पोरं । तेथें नाचे निर्धारें आवडीनें ॥१॥
जाणते वेदांती न करिती तिकडे तोंड । म्हणे हे तों होती भांड शाब्दीक ते ॥२॥
चोरितानां लोणी बांधिती गौळणी । तेथें काकळुनि पाय धरी ॥३॥
यज्ञाचे ठायीं अवदान नेघे । विदुरासी मागे आणि कण्या ॥४॥
भानुदास म्हणे जाणते नेणते । दोनी ते सरते होता पायीं ॥५॥
८०
जें सुख क्षीरसागरीं ऐकिजे । तें या वैष्णवा मंदिरीं देखिजे ॥१॥
धन्य धन्य ते वैष्णवमंदिर । जेथें नाम घोष होय निरंतर ॥२॥
दिंडीपताका द्वारी तुळशीवृदांवनें । मन निवताहे नाम संकीर्तने ॥३॥
ज्याच्या दरुशनें पापताप जाय । भानुदास तयासी गीतीं गायें ॥४॥
८१
तुम्हीं कृपानिधी संत । मी पतीत अन्यायी ॥१॥
सलगी बोलयेलों फार । न कळे निर्धार योग्यता ॥२॥
म्हणवीं दास तुमचा देवा । करितों हेवा पुढील्याचा ॥३॥
उच्छीष्ट प्रसादांची आस । म्हणे भानुदास तुमचा ॥४॥