श्रीभानुदासांचे अभंग - काला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्री कृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


८६

अवघ्या सोडियेल्या मोटा । आजीचा दहिंकाला गोमट ॥१॥

घ्या रे घ्या रे दहींभात । आम्हां देतो पंढरीनाथ ॥२॥

मुदा घेऊनियां करीं पेंद्या वांटितो शिदोरी ॥३॥

भानुदास गीतीं गात । प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥

८७

गूढीयेसी सांगु आलें । कंस चाणूर मर्दिले ॥१॥

हर्ष नाचताती भोजें । जिंकियेले यादवराजें ॥२॥

गुढी आली वृंदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥३॥

जाला त्रिभुवनीं उल्हास । लळीत गाये भानुदास ॥४॥

८८

गाई गोप विप्राचार संध्यावंदन । अपूज्य लिंगा पूजन साधू दरुशन ॥१॥

जयजय सुशब्द बोलती जन । कोटि युगें राज्य करीं रघुनंदन ॥२॥

भरत शत्रुघ्र जवळी लक्ष्मण । शौर्य विद्या साजे रघुनंदन ॥३॥

कौसल्या सुमित्रा वोवाळिती रामातें । देवा भानुदास गुण गातसे तेथें ॥४॥

८९

आशीर्वाद देती भार्गव तो राम । विजय मेघःश्याम होई सुखें ॥१॥

राज्य करीं बळें सर्वत्रीं आनंद । नाहीं दुजा शब्द रामा तुशीं ॥२॥

भानुदास म्हणे आनंदे श्रीराम । सुखरुप आत्माराम अयोध्याधीश ॥३॥

९०

रायें कंठमाळ देवासी घातली । देवं त्या दिधली भानुदासा ॥१॥

कोणी नेली माळ करती त्याचा शोध । देखिली प्रसिद्ध याचे गळां ॥२॥

राजदुतीं नेला म्हणती गे हे चोर । रायानें विचार नाहीं केला ॥३॥

सुळीं द्यावया भानुदास नेला । तेणें आठविला पांडुरंग ॥४॥

९१

कोरडिया काष्ठीं अंकूर फुटले । येणें येथें जालें विठोबाचे ॥१॥

समर्थाचा आम्हीं धरिला आधार । जाणोंनी सत्वर आला येथें ॥२॥

माझिये संकटीं आलासी धांऊनी । भानुदास चरणीं लागतसे ॥३॥

९२

सांडोनि तितुकें यथाबीज केलें । कैंसे चाळविलें कानडीयाने ॥१॥

रखुमाई आई ती जालीसे उदास । पुंडलिका कैसें पडिलें मौन ॥२॥

कनकाचें ताटीं रत्‍नाचे दीपक । सुंदर श्रीमुख वोवाळती ॥३॥

भानुदास म्हणे चला मजसवें । वाचा ऋणदेवें सांभाळावें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP