श्रीभानुदासांचे अभंग - मांभळभट

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्री कृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


९३

कंसराव चिंता करी । नवल बालकाची परी । या गोकुळामाझारीं एक अरिष्ट वर्तलें ॥१॥

आमुच्या सकळिका प्रधाना । माजी बलिवंत पूतना । विष भरोनियां स्तना । पांजुं तया पाठविली ॥२॥

तवं तो वेताळ कीं पिशाच्च । काळभैरव कीं राक्षस । त्याने केला तिचा ग्रास । विषासहित शोषिलें ॥३॥

तों अवतरला गोकुळीं । दैत्य दानव मर्दन बळी । जिनें बाळकें शोषिलीं । तेहि शोषिली पूतना ॥४॥

आम्हीं दुष्टबुद्धि केली । बहिण देवकी पीडिली । तेची बाळकें वधिलीं । आपुलें अरिष्ट चुकवावया ॥५॥

तंव ते न चुकतां पातले । विघ्न नसतांचि उगवलें । आम्हीं जाणतों इतुलें । तरी कृश्ण आणा बांधुनी ॥६॥

एवं माभळभट उठिला । तेणे विडा मागितला । निरंजनीं सांडवीन तान्हुला । जो गोकुळीं वाढतसे ॥७॥

ऐसें वचन ऐकोनी । विडा दिधला ततक्षणीं । आपुल्या आश्रमा जाऊनी । काय करिता जाहला ॥८॥

मग बोले स्त्रियेसी । आम्ही जातों गोकुळासी । बाळक जालें यशदेसी । तें सांडवीन निरंजनी ॥९॥

ऐसें बोलोनी निघाला । मार्गीं जातसे एकला । तंव श्रीकृष्ण हासिन्नला । हा विप्र भ्रमित जालासे ॥१०॥

गोकुळ ठाकिलें बिडालें । देखे उपलिया धवलारे । तेथीचीं माणसें अति नांगरें । लेणीं लुगड़ी मिरवती ॥११॥

कृष्ण अवेधें वेधलीं । अवघीं देवरुप जाहलीं ॥ वाचेसी सरस्वती आली । तैसें मधुर बोलती ॥१२॥

आला नंदाच्या मंदीरा । उपमा दिसे क्षीणसागरा । तेथीच्या गौळणी असती सुंदरा । परिये देती कृष्णातें ॥१३॥

वृद्ध बहुकाळ ज्योतिषी । देखोनि हारिखली मानसीं । यशोदा लागली पायासी । साउमेयासी म्हणीतलें ॥१४॥

पाट बैसकेचा घातला । पुढें तिसरा ठेविला । येरें आशिर्वाद दिधला । मग कुशलता पुसिली ॥१५॥

तंव त्या कृष्णातें दाविती । पहा हो याची जन्मतिथी । येरें उकलिती प्रीती । चंक्रांकिता साजिरी ॥१६॥

शनि मंगळराहु केतु । दुष्ट ग्रह ऐसें सांगतु । रोहिणी नक्षत्रु अष्टमी आंतु । भिन्नरात्री उपजला ॥१७॥

पुढें विघ्न असें थोर । मागें एक चुकलें गंडांतर । कंसरायाचे भय फार । या बाळकासी असे ॥१८॥

दैत्य करिती वळवळा । मेघ वर्षती शिळा । गोकुळ सांडुन अवघे पळा । ऐसा अनर्थ होईल ॥१९॥

पुत्र नव्हें हो लहाणा । हा तुम्हे वोपा कां पोसणा । हासिन्नला यादवराणा । मग विंदान मांडिलें ॥२०॥

होता बैसकेचा पाटु । तेणें घेतला उचाटु । पिढीयाचा खडखडाटु । घरोघरीं सुटला ॥२१॥

भट वाचित होता पाताडें । तें तंव मुखीं आदळालें पिढें । येर सुजविलें थोबाडे । मग भयबीत पळतु ॥२२॥

रागे सुजविलें पाताडें । म्हणे गौळिये लाताडें । आम्हां जोशिया केव्हडे । पिढेंदान दिधलें ॥२३॥

तंव त्या विशाळ काठवटी । लागती माभळभटापाठीं । तिवया सिराळीं तिखटीं । पाठीं पोटीं रुपताती ॥२४॥

तेला तुपाचींमापें । डवले खोडवे आमुपें । बडगे खुंटे खुटें भलिया कोपें । पूजा बांधती मस्तकीं ॥२५॥

थोर आवेशा चढले चाटु । म्हणती यातें सगळें घाटु । लाटणें म्हणती भोईसी लाटुं । ऐसा दृष्ट काय किजे ॥२६॥

शाळिग्राम गडबडिले । देवपाट साह्र आले । अर्गळांचे सळ सुटले । खिळखिंळिलें खिळखंबे ॥२७॥

थोर विसुरा केला डांगीं । मार्ग रुंधिला चौरंगीं । मुसळें कांडावयालागीं । भोंवता वेढा घातला ॥२८॥

होते रवियांचे नाथलें । देह नवनीतें माखिलें । तें येऊन सर्वागी बैसलें । हिवें ऐसें मवाळ ॥२९॥

नव्हे नव्हे गा जोशी । राख राख हृषीकेशी । उखळा मुसळांचिया राशी । दाही दिशा व्यापिल्या ॥३०॥

पाठीं पिढियाम्छॆ मेळ । तिहीं झांकिलें रविमंडळ । गजबजिलें लोकपाळ । नव्हें गोकूळ सोपारें ॥३१॥

माभळभटाचिया झडपणीं । देखोनि पळालिया गौळणी । दह्मा दुधाचिया सांजवणीं । पिढा भरणी फुटती ॥३२॥

देखे मांदियाचे थाट । त्यामाजीं शीरे माभळभट । म्हणे गोकुळींचा शेवट । दैवयोगें पातलों ॥३३॥

शेतीं होती तिफणीं । नांगर कुळवांची रुमणीं । पाठीं लागलिया दणाणी । भटजी आमुचा स्वयंपाक ॥३४॥

ब्राह्मण म्हणोनि राखिला । धोत्रे पाताड्या मुकला । मथुरा प्रांत ठाकिला । नग्न हिंडे राजबिंदीं ॥३५॥

देखोनि दैत्यसभा घन दाट । उठा उठा आले पाट । धापा फुटो पाहे पोट । पुसे वाट घराची ॥३६॥

कंसासी सांगतिला वृत्तांतु । अझून काय रे निश्चितु । बळिया वैकुंठीचा नाथु । तो गोकुळीं वाढतसे ॥३७॥

ते वेळी कागासुर बकासुर । तृणावर्त दैत्य आघासुर । मुष्टिक चाणुर वीर । तिहीं विडे मागितले ॥३८॥

थोर बोलती पैजा । आम्ही निर्दाळुं बोजा । ये कथेसीचित्त दीजा । विनवो तुम्हा संतानोम ॥३९॥

देवा भानुदास म्हणें । श्रोतें कोपतील झणें । पंढरीरायाचे योगाने । हा विनोद गाइला ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP