वैरवरी स्वयंभी सांपडले । परेचे पाठीरी पेरिले ।
पश्यंती ज्ञान वाफा आले । मध्यमी पिकले ज्ञानदेवी ॥३॥
टिकाः
निशःद्ब ते शब्द आले । ज्ञानराजें कवतुक केलें । इये ज्ञानगगनी पेरिलें । गुरुनाथें ॥१॥
नाभिमाझारी वाफा आले । तेचे हृदयी परिपुर्ण पिकलें । समाधान गोडीया आलें । जीवन कळीं ॥२॥
तेचि ज्ञानराजा लाधलें । वैखरीं स्वयंभ सांपडले । जगतांकारणें लुटिलें । उदारपणें ॥३॥
तेथ नाहीं आनपरी । म्हणोनियां जालो भिकारी । "स्वानंद" टीका प्रगट अंतरी । दासरामी ॥४॥
हनुमतसदगुरुकृपापुर्ण । ज्ञानेश्वरे वदविलें आपण । "स्वानंद" ठीका हे गहन । आपुलिया ग्रंथावरीं ॥५॥
ज्ञानदेव तेहत्तिशीवर । टीका करणेचा अधिकार । माझा काय मी पामर । दासानुदास ॥६॥
परि हे ज्ञानाईनें केलें । म्हणोनियाच घडो आले । आपणचि वदविले । सत्यसत्य ॥७॥
मति प्रकाशनि ठेले । अंतःकरणीं विवरण जालें । तेचि मुखावाटें आलें । नवलपरी ॥८॥
नवलचि जालें मोठें । माझें मज आश्चर्य वाटे । ज्ञानराज ज्ञान प्रगटे । हृदयातु ॥९॥
रेडियामुखें जेणे वेद । वदविला हे प्रसिद्ध । तेणें बोलविला मतिमंद । हेचि सत्य ॥१०॥
ऐसी सांप्रदायिका सेवा । करोनि घेतली ज्ञानदेवा । आपुल्या घरचा प्रसादमेवा । संतजनीं वाटतो ॥११॥
आतां द्यावा जी आनंद । वोरसोनि प्रेमे अगाध । बांधोनियां निजबोध । कृपा करी ॥१२॥
सकळ तुम्हीं संतसिद्ध । बालक द्या आशिर्वाद । दास करा जरी मी मंद । आपुलें बरीचा ॥१३॥
दास म्हणवितो जगीं । परी आपण या प्रसंगी । दास म्हणोनि मज उगी । कोड पुरवा ॥१४॥
संतीं केला दासनुदास । जाला प्रेमाचा कळस । काय त्यांच्या थोरपणास वानावें जीं ॥१५॥
मोल नाहीं दातृत्वपणा । ज्ञानराज सिद्धराणा । म्हणोनि दासराम चरणां । लोलिगला ॥१६॥
धन्य भगवान हनुमंत । पठीराखे सदगुरु समर्थ । "सानंद " ठीका हे निभ्रांत म्हणोनि जाली ॥१७॥
बोलविले अकळ बोला । हाचि मज अनुभव दिला । ज्ञानराज प्रेमें वोळला । पायीं जडला दासराम ॥१८॥
हनुमंत सदगुरु समर्थ । दासराम पायीं निवांत । "सानंद" टीका समर्पित । हृदयातु ॥१९॥
श्रीज्ञानेश्वरी पारायणी । तीर्थरुप गोविंदराया लागुनी । श्रीज्ञानेश्वर दिसले नयनीं । काय सांगो ॥२०॥
श्रेहनुमत्सदगुरु आज्ञेकरुन । सांगली स्वगृहीं नित्य किर्तन । शके अठराशे पंचेचाळीसापासुन । अखंडित पितयांनी चालविलें ॥२१॥
ऐसे हे गुरुभक्त पिता । सौभाग्यसंपन्न इंदिरा माता । लाभले म्हणोनि हनुमंता । भेटी माते ॥२२॥
मातापितयांची आज्ञा घेऊन । श्रीहनुमंतसदगुरुकृपेकरुन । "सानंद" टीका ग्रंथलेखन । अक्षरीं आलें ॥२३॥
गंगोदक मंगेसी अर्पावें । तयेपरीच हें जालें आघवे । नवल हे नवलावें । हनुमंतें केलें ॥२४॥
ग्रंथरचना निश्चयेसी । पौष शुद्ध सप्तमीसी । शके अठराशे पासष्टीसी । संपुर्ण जाली ॥२५॥
"सानंद" टीका समपोनि । रघुनाथचरणा लागोनि । गुरुपरंपरेसी वंदोनि । समाधानी राहिलो ॥२६॥
"सानंद" टीकेसहित । ज्ञानदेवतेहत्तिशी ग्रंथ । जाला समाप्त जी जेथ । ज्ञानेशकृपें ॥२७॥
॥ इति श्रीसटीकज्ञानदेवतेहत्तिशी संपुर्ण ॥