१
ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥
हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥
२
नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥
करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥
एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥
३
परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥
वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥
आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥
४
श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥
मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥
न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणें तुमचे जाहलों ॥३॥
एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥