मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १३९१ ते १४१०

नामपाठ - अभंग १३९१ ते १४१०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१३९१

तेजाचें तेजस रुपाचें रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥१॥

पाहतां चित्त निवे मनाचें उन्मन । तें समचरण विटेवरी ॥२॥

आदि अंत नाहीं पाहतां प्रकार । तो हा सर्वेश्वर भीमातटीं ॥३॥

योगी चिंतिती अखंडता मनीं । तें उभे असें रंगणीं वैष्णवांचें ॥४॥

समाधी अष्टांग साधनें साधिती । तो मागे क्षीरापती आपुल्या मुखें ॥५॥

एका जनार्दनीं भावाचा लंपट । सांडोनि वैकुंठ कीर्तनीं डोले ॥६॥

१३९२

नाभीकमळीं चतुरानन । न कळे तया महिमान । तो साबडे कीर्तन । तेथें नाचे सर्वदा ॥१॥

नातुडे जो सदा ध्यानीं । योगयाग यज्ञहवनीं । अष्टांग योग करिता साधनीं । न लाभेचि सर्वथा ॥२॥

भागले वेद गीती गाता । श्रमलीं शास्त्रें वेवादतां । पुराणें तो सर्वथा । तया न कळे महिमान ॥३॥

तो उभा भीमातीरीं । भक्त करुणाकर श्रीहरी । एका जनार्दनीं विनंति करी । वास देई हृदयीं ॥४॥

१३९३

मधुपर्कादिक नावडे पूजन । आवडे कीर्तन भाविकांचें ॥१॥

शंखचक्रादिक नावडती मनीं । वोडवितसे पाणी भाजीपाना ॥२॥

लक्ष्मीसारखी नावडती जीवा । आवडे या देवा तुळशी बुक्का ॥३॥

एका जनार्दनीं कीर्तनीं नाचे । आणिक सुख त्याचे नये मना ॥४॥

१३९४

कीर्तनें तोषे अधोक्षज । राखी लाज भक्तांचीं ॥१॥

धावें द्रौपदीचें पानासाठीं । भीड मोठी कीर्तनाची ॥२॥

दहा गर्भवास सोसले । उणें नाहीं आलें भक्तांचें ॥३॥

एका विनवी जनार्दनीं । कीर्तनीं प्राणी धन्य होती ॥४॥

१३९५

जन्ममरणाचें निवारेल दुःख । करितां देख कीर्तन ॥१॥

नारद प्रल्हाद अंबऋषी । विनटले कीर्तनासी ॥२॥

व्यास शुक वामदेव । धरिती भाव कीर्तनीं ॥३॥

एका त्याचा दास खरा । करी पसारा कीर्तन ॥४॥

१३९६

महा पापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले ॥१॥

वाल्हा अजामेळ तारिली गणिका । त्रैलोक्यीं देखा सरते जाले ॥२॥

कीर्तनीं दोष पळती रानोरान । यापरतें आन दुजें नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं कीर्तन सार । तेणें पैलपार उतरलों ॥४॥

१३९७

कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी ॥१॥

कीर्तन प्रिय पैं गोविंदा । आदरें पूजितो नारदा ॥२॥

कीर्तन करिता अभेदु । आदरें रक्षिला प्रल्हादु ॥३॥

राजेंद्र करी नामस्मरण । धांवण्या धांवे नारायण ॥४॥

एका जनार्दनीं कळवळा । भक्तालांगीं देव भोळा ॥५॥

१३९८

कीर्तनीं प्रल्हाद तरला । बिभीषण मुक्त जाला ॥१॥

ऐसा कीर्तनमहिमा । गनिका नेली निजधामा ॥२॥

तारिले वानर असुर । कीर्तनीं पावन चराचर ॥३॥

गाई गोपाळ सवंगडे । कीर्तनीं तरले वाडेंकोडें ॥४॥

अजामेळ उद्धरिला । कीर्तनीं आल्हाद भला ॥५॥

एका जनार्दनीं कीर्तन । कली कल्मष नाशीं क्षण ॥६॥

१३९९

कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥

वाल्हा तारिला कीर्तनीं । पावन जाला त्रिभुवनीं ॥२॥

गणिका कीर्तनें तरली । मोक्षधामा ती नेली ॥३॥

अजामेळ चोखा महार । कीर्तनीं तरले अपार ॥४॥

एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं लोक जाले पावन ॥५॥

१४००

हरिकिर्तन नामोच्चर । जे नर करिती वारंवार । तया नाही संसार । ब्रह्मादि देव वंदिती ॥१॥

कीर्तनमहिमा नारदु । जाणतसे परमानंदु । जालासे सर्वां बंधु । देवा असुर मानवां ॥२॥

कीर्तनमहिमा परिक्षिती । जाणतसे परम प्रीती । अंतीं सायुज्यता मुक्ती । पावती झाली ॥३॥

कीर्तनमहिमा जाणें शुक । जाणती ते व्यासदिक । वाल्मिकादि सर्व सुख । कीर्तनें सरते ॥४॥

कीर्तनमहिमा जाणें प्रल्हादु । तोदियेला मायाकंदु । कोरडे कांष्ठी गोविंदु । प्रगटला ॥५॥

कीर्तनमहिमा जाणें बळी । याचक झाला वनमाळी । एका जनार्दनीं कली । कीर्तनें न पीडी ॥६॥

१४०१

अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन ॥१॥

देवा आवडी कैसी । धेनु धांवे वत्सा जैसी ॥२॥

कीर्तनीं तारिला गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥

किर्तनीं तारिली गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥

ऐशी कीर्तनाची गोडी । एका जनार्दनीं घाली उडी ॥५॥

१४०२

करितां कीर्तन श्रवण । अतर्मलाचें होत क्षालन ॥१॥

तुमचें कीर्तन पवित्र कथा । पावन होत श्रोता वक्ता ॥२॥

तुमचे कीर्तनीं आनंद । गातां तारले ध्रुव प्रल्हाद ॥३॥

कीर्तनाचा गजर होतां । यम काळ पळे सर्वथा ॥४॥

एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं देव वंदिती चरण ॥५॥

१४०३

कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धी ॥१॥

ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक सांगे परिक्षिती साचा ॥२॥

होती पावन अधम जन । करितां कीर्तन कलियुगीं ॥३॥

एका त्याचा दासानुदास । जाती कीर्तनास आवडी जे ॥४॥

१४०४

हरिकीर्तनें चित्त शुद्ध । जाय भेद निरसुनीं ॥१॥

कामक्रोध पळती दुरी । होत भोंवरी महापापा ॥२॥

गजरें हरिचें कीर्तन । पशु पक्षी होती पावन ॥३॥

स्त्री पुरुष अधिकार । कीर्तन सार कलियुगीं ॥४॥

एका जनार्दनीं उपाय । तरावया भवनदीसी ॥५॥

१४०५

तरले तरती भरंवसा । कीर्तनमहिमा हा ऐसा ॥१॥

म्हनोनियां हरीचे दास । कीर्तन करिती सावकाश ॥२॥

एका जनार्दनीं कीर्तन । आनंदें होती तें पावन ॥३॥

१४०६

धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर ॥१॥

गुण गाती भगवंतांचे । तेचि जाणावें दैवाचे ॥२॥

स्वयें बोलिले जगज्जीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥

एका जनार्दनीं भले । हरिभक्तीनें उद्धरीले ॥४॥

१४०७

कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा ॥१॥

भाळे भोळे घेती नाम । करिती आराम कीर्तन ॥२॥

नाना साधनांचे वोढी । न लगे सांकडी सोसाव्या ॥३॥

एका जनार्दनीं सोपें बहू । कीर्तनीं पाहे देवातें ॥४॥

१४०८

धन्य भाग्याचे जन इहलोकीं । कीर्तनें जाले सुखी कृतकृत्य ॥१॥

पातकी घातकी यासी सोपा पंथ । कीर्तन तरती कलीमाजी ॥२॥

योगयोग व्रत तप कल्पकोडी । कीर्तन श्रवण गोडी तेथें नाहीं ॥३॥

वेदशास्त्र पुराण श्रुतीचें आनुमोदन । करा रे कीर्तन कलीमाजीं ॥४॥

एका जनार्दनीं आल्हादें कीर्तन । करितां श्रोते वक्तें जाण पावन होती ॥५॥

१४०९

तुमचें चरित्र श्रवण । आवडी करुं तें कीर्तन ॥१॥

संसार पुसोनियां वाव । निजपद देशी ठाव ॥२॥

स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभ ये हातां ॥३॥

एका जनार्दनीं कीर्तनं । होती पातकी पावन ॥४॥

१४१०

आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन ॥१॥

थोर कीर्तनाचें सुख । स्वयें तिष्ठेक आपण देख ॥२॥

घात आलिया निवारी । चक्र गदा घेउनी करीं ॥३॥

कीर्तनीं होऊनी सादर । एका जनार्दनीं तत्पर ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP