२८
मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥
येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥
पांच सात बारा होऊनियां गोळा । बैसती सकळां टकमक ॥३॥
एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशीं ॥४॥
२९
आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥
तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥
एका जनर्दनीं न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं ॥३॥
३०
न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥
बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥
समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥
एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वायां वाउगाची ॥४॥