५
असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥
गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥
मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळीया घरीं ॥३॥
वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥
जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥
कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥
एक यश द्यावें त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥
एका जनार्दनीं । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥
६
देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥
अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥
आतां नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥
दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥
चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥
तेथें स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण ॥६॥
एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥
७
देवकी करी चिंता । केवीं आठवा वांचे आतां । ऐसी भावाना भावितां । जिवीं तळमळ ॥१॥
तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥
हरि सुनीळ सांवळें । बाळ निजतेजे तेजाळें । देखोनि वेल्हाळे । स्वयं विस्मीत ॥३॥
ऐसें देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादुं जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेंसीं । कैसा आंवरेना ॥४॥
वेगीं वसुदेवातें म्हणे । तुम्हीं गोकुळांसी न्या तान्हें । एका जनार्दनें कृपा केलीं ॥५॥
८
देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळके न्यावें गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥
पूर्ण प्रकाश निजतेजें । पाहतां न दिसें दुजें । तेथें कैंचे माझें तुझें । लपणें छपणें ॥२॥
सरसर अरजे दुरी । परब्रह्मा आम्हां छरीं । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ॥३॥
सवेचि पाहे लीळा ।मुगुट कुंडले वनमाळा । कंठीं कौस्तुभ तेजाळा । कळी तटी सुत्र ॥४॥
क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणें भुषणीं । चिद्रेत्नें महामणी । वीर कंकणें ॥५॥
कमलवदन हरी । कमले नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ॥६॥
करकमळीं कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळां । दिव्य मूर्ति ॥७॥
लक्ष्मी डवल उनियां जाण । हृदयीं श्रीवत्सलांछन । द्विजापदांचे महिमान । देखे दक्षिणाभागीं ॥८॥
शंख चक्रादि आयुधें चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ॥९॥
ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाचि न रिघे रेखा । कृष्णापणीं ॥१०॥
एका जनार्दनीं खरें । निजरुप निर्धारें । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ॥११॥
९
देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥
जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥
आतां मी करुं कैसें । भ्रतारा लागलें पिंसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥
मज मायेची बुद्धी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥
येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णें प्रकाशिलें । त्वां केवीं अच्छादिलें । कृषरुप ॥५॥
सरसर अरजे मूढें । बोलसी तितुकें कुडें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥
येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावें माझें ॥७॥
अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझें मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥
सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावें ॥९॥
तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृषाणानाथु ॥१०॥
आतां मी काय करुं वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥
चोज कैसेवीण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥
जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसें । हें अंगींचे निजरुप पिसें । न कळें तुम्हां ॥१३॥
कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥
आतां काय मीं बोलुं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥
प्रकृति पुरुष दोन्हीं । मीनली एकपणीं । एका जनार्दनीं । बंदी मोक्ष ॥१६॥
१०
श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥
कृष्णीं धरितां आवडी । स्वयें विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाहीं अर्गळा शृखंळा ॥२॥
कृष्ण जंव नये होतां । तंवचि बंधनकथा । पावलीया कृष्णानाथा । बंदी मोक्ष ॥३॥
ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥
श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥
अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावें असे सांगतु । कृष्णाकडिये पडियेला ॥६॥
अंध ते बंधन नेलें । राखतो राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें । नित्य मुक्त ॥७॥
११
तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पुर्ण । चढ़े स्वानंदजीवन । चरण वंदनार्थ ॥१॥
वसुदेव म्हणे कटकटा । यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहं मार्ग न दिसे ॥२॥
कृष्ण असतां हातीं । मोहें पडली भ्रांति । मोहाचिये जाती । देव नाठवे बा ॥३॥
मैळ मुकी वेताळ । मारको मेसको वेताळ । आजी कृष्ण राखा सकळ । तुम्हीं कुळदेवतांनी ॥४॥
अगा वनींच्या वाघोबा । पावटेकीच्या नागोबा । तुम्ही माझिया कान्होंबा । जीवें जतन करा ॥५॥
हातींचा कृष्ण विसरुन । देव देवता होतों दीन । मोहममतेचें महिमान । देवा ऐसें आहें ॥६॥
मोहें कृष्णांची आवडी । तेथें न पडे शोक सांकडीं । एका जनार्दनीं पावलें परथडी । यमुनेच्या ॥७॥
१२
गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥
तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥
श्रीकृष्ण सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी मरण भये ॥३॥
कंस पुसे लवलाह्या । काय प्रसाली तुझी जाया । म्हणोनी आणिली योगमाया । वसुदेवें ॥४॥
वेगें देवकी म्हणे । कंस पुसेल जेव्हां तान्हें । तेव्हा तुवां देणें । हे तया हातीं ॥५॥
ते तें देतां देवकी जवळी । गर्जे ब्रह्मांड किंकाळी । टाहो फुटली आरोळी । दैत्या निधीची ॥६॥
तेणें दचकलें दुर्धर । कामक्रोधादि असुर । कंस पावला सत्वर । धरावयासी ॥७॥
वेंगीं आठवा आणवी । तंव हातां आली आठवीं । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें जालेंचि विपरित ॥८॥
आठवा न दिसे डोळां । आठवी पडली गळां । कर्म न सोडी कपाळा । आलें मरण मज ॥९॥
परासि मारितां जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे आपण । कृष्ण भय करी ॥१०॥
आठवीं उपडितां तांतडीं । तंव तें ब्रह्मांड कडाडी । हातांतुन निष्टली हडबडी । कंस भयाभीतु ॥११॥
तंव ते गर्जलीं अंबरीं । पैले गोकुळीं वाढे हरी । तुज सगट बोहरी । करील दैत्याकुळाची ॥१२॥
वधिता देवकीचीं बाळें । माझें पाप मज फळलें । माझें निजकर्म बळें । आलें मरण मज ॥१३॥
भय संचलें गाढें । तेणें पाऊल न चले पुढें । पाहतां गोकुळाकडे । मूर्च्छित कंस बा ॥१४॥
आसनीं भोजनीं शयनीं । भये क्रृष्ण देखे नयनीं । थोर भेदरा मनीं । जनीं वनीं हरी देखे ॥१५॥
कृष्ण भयाचें मथित । कंसपणा विसरे चित्त । एकाजनार्दनी भक्त । भयें जीवन्मुक्त ॥१६॥