मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ६०१ ते ६१०

विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६०१ ते ६१०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


६०१

एकाची काजें फीटलें सांकडें । उगाविलें कोंडे बहुतांची ॥१॥

तोचि हरी उभा चंद्रभागें तटीं । कर ठेउनी कटीं अवलोकित ॥२॥

पडतां संकआट धांवतसे मागें । गोपाळांचिया संगें काला करी ॥३॥

चोरुनी शिदोरी खाय वनमाळी । प्रेमाचे कल्लोळीं आनंदाचेम ॥४॥

यज्ञ अवदानीं करी वांकडें तोंड । लोणी चोरितां भांड गौळणी म्हणती ॥५॥

एका जनार्दनीं ठेवणें संतांचे । उभें तेंसांचें विटेवरी ॥६॥

६०२

एकाचिया द्वारी भीकचि मागणें उभेचि राहाणे एका द्वारी ॥१॥

एकाचिया घरी उच्छिष्ट काढणें । लोणी जें चोरणें एका घरीं ॥२॥

एकाचिये घरीं न खाये पक्कान्न । खाय भाजी पान एका घरीं ॥३॥

एकाचिये घरीं व्यापुनी राहाणें । एकासी तो देणें भुक्तीमुक्ती ॥४॥

एका जनार्दनी सर्वाठायीं असे । तो पंढरीये वसे विटेवरी ॥५॥

६०३

कृपाळु माउली अनाथा साउली । उभा ती राहिली विटेवरी ॥१॥

भक्त करुणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवुनी कर ॥२॥

मोक्षमुक्ति फुका वांटितो दरुशनें । नाहीं थोर सानें तयासी तेथें ॥३॥

एका जनार्दनीं एकपणें उभा । कैवल्याच गाभा पाडुरंग ॥४॥

६०४

उदित तेथे परब्रह्मा उभें । सह्स्त्र कोंभ शोभे विटेवरी ॥१॥

कोटी सुर्य तेज लोपले तें प्रभे । तें असे उभे पंढरीये ॥२॥

एका जनार्दनीं कैवल्यपुतळा । पाहतां अवलीळा मन निवे ॥३॥

६०५

सकळ देवा शिरोमणी । सकळ तीर्थे वंदिती चरणीं ।

सकळांसी मुगुटमणी । तो उभा पंढरीये ॥१॥

सकळ तेजाचा पुतळा । सकळ जयांच्या अंगी कळा ।

सकळ जीवांचा आकळा । तो उभा राहिल्या विटेवरी ॥२॥

सकळ मंत्रांचा मंत्र । सोपा सकळ पवित्र ।

सकळ पर्वकाळ परत्र । दर्शनेंचि घडति ॥३॥

सकळ अधिष्ठानाचें सार । सकळ गुह्मांचे माहेर ।

सकळ भक्तांचें जे घर । निजमंदिर पंढरी ॥४॥

सकळ वैराग्यांचा निधी । सकळां कृपेची तो मांदी ।

एका जनर्दनीं निरुपाधी । आशापाश विरहित ॥५॥

६०६

मौनचि आला मौनचि आला । मौन्य उभा ठेला विटेवरी ॥१॥

मौन्याचि ध्यान गोजिरें गोमटें । मौन्यचि ठेविले विटे समपद ॥२॥

मौन्यचि पैं माथां धरिला शंकर । मौन्य ध्यान दिगंबर बाळवेष ॥३॥

मौन्याचि एका शरण जनार्दनीं । मौन्याचि चरणीं मिठी घाली ॥४॥

६०७

असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी ॥१॥

कैवल्य उघडें राहिलेंसे उभे । कर्दळींचें गाभे समपदीं ॥२॥

द्वैत अद्वैत विरहित सचेतनीआं उभा । एका जनार्दनीं शोभा गोजिरी ती ॥३॥

६०८

अजीव शिव व्यापुनी राहिला वेगळा । परब्रह्मा पुरळा विटेवरी ॥१॥

तयाचिये पायीं वेधलें मन । झाले समाधान पाहतां रुप ॥२॥

विश्रांती समाधि लोपोनियां ठेली । पाहतां सांवळा मूर्ती देखा ॥३॥

एका जनार्दनीं सर्वां वेगळा तो । बाळलीला खेळे कृष्ण ॥४॥

६०९

चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ॥१॥

बहुत भागले बहुत श्रमले । परी नाहीं लाभलें रुप ज्यांचें ॥२॥

भक्तांचेनि भावें पंढरीये उभा । आनंदाचा गाभा सांवळा तो ॥३॥

एका जनार्दनीं तो सर्वव्यापक उभा असे नायक वैकुंठीचा ॥४॥

६१०

एकपणें एक पाहतां जग दिसें । योगियांसि पिंसे सदा ज्यांचे ॥१॥

आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा होय पंढरीये ॥२॥

व्यापक विश्वभंर भरूनि उरला । तो प्रत्यक्ष संचला कीर्तन मेळीं ॥३॥

एका जनार्दनी त्रिगुणांवेगळा । पहा पहा डोळां विठ्ठल देव ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP