११९
आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा ।
काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥
कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं ।
कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥
हा कृष्ण आजी कां घरी नये । आतां काय करुं यासी उपाय ।
एका जनार्दनी धरुं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥
१२०
वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग ।
जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥
ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥
समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया ।
तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥
आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी ।
एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥
१२१
कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती ।
श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥
येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊनि पुरवीं मनोरथ पुर्ण ।
विरहाविरहा करी समाधान । दावी तु आपुले चरण ॥२॥
येथें अपराध आमुचा नाहीं । खेळ सर्व तुझा पाहीम ।
एका जनार्दनी नवल काई । एकदां येउनी भेटी देई ॥३॥
१२२
कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥
रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥
रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥
एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥
१२३
विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें ।
वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥
ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणो सांवआळा ।
पहातां पहातां ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥
नेणो कांही कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जाले ।
एका जनार्दनीं कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥
१२४
नको नको रे दुर देशीं । आम्हां ठेवी चरणापाशीं ।
मग या विरहा कोन पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥
पुरे पुरे संसार विरह छंद । तेणें तुं अंतरासी गोविंद ।
द्वैताचा नसो देऊं बाधा । हृदयीं प्रगटोनी दावी बोध ॥२॥
विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनि दावीं पायां ।
दुजें मागणें आणीक नाहीं काह्मा । एका जनार्दनीं शरण तुझिया पायां ॥३॥
१२५
समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें ।
हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥
सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी ।
पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥
तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान ।
शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥
१२६
आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला ।
जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥
धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तूं आमुची वासना ।
आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥
छंदे छंदें विरहिणी बोलें । कां वो बोलण्या अबोलणें जालें ।
एका जनर्दनी ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥
१२७
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी ।
दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥
येउने भेंटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत ।
मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥
दुःख फिटलें मान जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार ।
एका जनार्दनीं भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥
१२८
काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ ।
कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ ॥१॥
नको नको वियोग हरी । येई येई तूं झडकरी ।
आम्हा भेटें नको धरुं दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥
तुझिया भेटिंचे आर्त मनीं । याकारणें विरह बोलणें वाणी ।
एका शरण जनार्दनीं । वियोग गेला पाहतां समचरणीं ॥३॥
१२९
मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥
आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटलें विरहाविरहें हर खुंटलें । काया वाचा मनें वेधलें वो ॥३॥
१३०
बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥
चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥
विरह जाईल कैशा परी । पुर्वपुण्या सुकृत पदरीं । एका जनार्दनीं भेटलें हरी । तैं विरह नोहे निर्धारी ॥३॥
१३१
येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥
सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥
स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥
संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एका जनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥
१३२
भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरीं । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जालें अंतरीं वो ॥१॥
अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥
एका जनादनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला देहत्याग । सुखें सुख झालें अनुराग वो ॥३॥
१३३
विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥
मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥
क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥
यासी शरण गेलिया वांचुनी ।संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावें जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥
१३४
ऐशीं निर्धारें विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥
धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥धृ॥
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥
एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपतां स्थिर झालें मन । विरह गेला त्यागुना ॥३॥
१३५
रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥
विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥
संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥
धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥
१३६
आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥
मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥
विरहें बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥
नेणें आपपरावे दुजें कांहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सोडवी गुरु मज देहीं । या विराहा अंतपार नाहीं ॥३॥
ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडलें संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥
संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झालें गे माय ॥५॥
१३७
युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥
विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥
घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती संतमहिमा वर्णावा किती ॥२॥
महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवे अंतरीं दाटलें । विरहाचें बीज भाजिलें वो ॥३॥
१३८
बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥
दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥
विरहतांपे तापलं भारीं । कोण आता दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका जनार्दनी दाविला श्रीहरी ॥३॥