मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ८११ ते ८२०

रामनाममहिमा - अभंग ८११ ते ८२०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


८११

कलियुगीं नाम सोपें तें सुजाण । ऐशी भाषा जाण बहुतांची ॥१॥

वाल्मिक सांगतु रामनाम जपा । तरले तरती सोपा राममंत्र ॥२॥

पुराणकर्ता तो व्यास मुगुटमणी । म्हणे रामकृष्ण वदनीं सोपा मंत्र ॥३॥

बहुतांच्या मतें एका जनार्दनी । रामनाम वाणी गाय सदा ॥४॥

८१२

नाम मुखीं सदा वाचे । कांपती कळीकाळ साचे ॥१॥

दो अक्षरीं रामनाम । जपतां पावसी मोक्षधाम ॥२॥

नामावांचूनि परिपाठीं । साधन नाहीं नाहीं नेहटीं ॥३॥

नाममंत्र श्रेष्ठ सार । जड जिवांसी उद्धार ॥४॥

एका जनार्दनीं नाम । सुखधामाचा विश्राम ॥५॥

८१३

रामनामें नित्य जयासी आनंद । तया ठायीं भेदाभेद नुमटती ॥१॥

ऐसे जें रंगले रामनामी नर । चुकवी यमप्रहार जन्मो जन्मीं ॥२॥

धरावी वासना रामनामजप । दुजा तो संकल्प आन नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं नामापरता मंत्र । दुजें नाहीं शस्त्र कलियुगीं ॥४॥

८१४

सकळ तपांचें तें तप । सोपा राममंत्र जप ॥१॥

नाहीं साधनांचे कोडें । राम म्हणा वाडें कोडें ॥२॥

न लगे जप तप अनुष्ठान । रामनामें सर्व साधन ॥३॥

एक जनार्दनी म्हणतां राम । नासे संसार भवभ्रम ॥४॥

८१५

राम कृष्ण हरी । नित्य वदे जो वैखरी ॥१॥

तयापाशी नुरे पाप । नासे त्रिविध हा ताप ॥२॥

नाम तेंचि परब्रह्मा । जप यज्ञ तो परम ॥३॥

एका जनार्दनीं जपा । रामकृष्ण मंत्र सोपा ॥४॥

८१६

वदतां वदनीं अहर्निशीं राम । उपदेश सुगम सोपा मंत्र ॥१॥

दो अक्षरीं राम तेणें जोडे धाम । आणिक तो श्रम वायां जाये ॥२॥

सर्वाभूति समदृष्टिते पहाणें । मग नाहीं पेणें आन दुजें ॥३॥

दुजें पेनें नाहीं एका जनार्दनीं । श्रीरामावाचुनीं आन नेणें ॥४॥

८१७

रामनाम वसे ज्याचे मुखीं नित्य । त्याचेनि पतीत उद्धरण ॥१॥

रामनाम मंत्र जपे नित्यकाळ । त्यासी कळिकाळ हात जोडी ॥२॥

रामनामीं त्याची जडली चित्तवृत्ती । वृत्तीची निवृती झाली त्यासी ॥३॥

एका जनार्दनीं जपे रामनाम । तेणें पूर्ण काम स्वयें झाला ॥४॥

८१८

उत्तम साधन रामनाम जाण । यापरतें निधान आणिक नाहीं ॥१॥

नलगे समाधि रामनाम घेतां । उघडा जप तत्त्वतां सूपा राम ॥२॥

नलगे विरक्ति नाम मंत्र तंत्र । रामनाम पवित्र जप सोपा ॥३॥

एका जनार्दनीं सोपें रामनाम ध्यान । पवित्र पावन रामनाम ॥४॥

८१९

कर्म आणि धर्म अष्टांग साधन । नको यज्ञदान नाम जपें ॥१॥

तुटेल बंधन खुंटेल पतन । नाममुखीं गर्जन सोपा मंत्र ॥२॥

कलियुगामाजीं सोपें हें साधन । रामनाम खुण मुक्त वाट ॥३॥

एका जनार्दनीं खुंटली उपाधी । सहज समाधि रामनामें ॥४॥

८२०

कृतांताचे माथां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं ॥१॥

उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥

एका जनार्दनीं न करी आळस । चौर्‍यांशीचा लेश नको भोगुं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP