श्रीगुरु गणेशादि सर्वेष्ठ देवताभ्योनमः । ॐ नमो सदगुरु दिगंबरा । विश्वव्यापका विश्वंभरा । सच्चिदानंदा जगदोध्दारा । गणेशरुपा तुज नमो ॥१॥
जयजय श्रीजगदंबे प्रणव रुपिणी । माया सच्चिदानंद संजीवनी । नमन असो तुझे चरणी । जगन्माऊली श्रीशारदा ॥२॥
सदगुरुचे दये करुन । मी वंदिलो गणेश सरस्वती चरण । लाधुनि पूर्णवर प्रदान । सबाह्य तुष्टता प्रकाशिली श्रीये ॥३॥
वंदू आता कुळदैवत । ध्यानी भजो म्हाळसाकांत । प्रगटूनि स्वये ह्रत्संपुटात । प्रसुप्त वचना चेतविले ॥४॥
सप्रेम वंदिली मातापिता । जे सकळ दैवतांचे दैवतची तत्वता । त्यांचे अभयकरासी घेऊनि माथा । श्रीगुरु प्रेमास पात्र मी जाहलो ॥५॥
आता नमू संतसज्जन । जे वैराग्य सिंधूचे दिव्यरत्न । त्यांची कृपा होता परिपूर्ण । पुष्टी लाभली वाणीसी ॥६॥
वाणी परते जे चरित्र । ते सदगुरुचे चरण सूत्र । बोलावया माझे वक्त्र । इच्छा करी स्वानंदे ॥७॥
सामान्य जीवाचे करावया कल्याण । आपण प्रगटले स्वये नारायण । आनंद संप्रदाय क्रमांशी प्रगटून । भाविकजना उध्दरिति ॥८॥
तया संप्रदायामाजी जाण । जे अवतरले लक्ष्मी नारायण । ते शिवराम स्वामीचे पिता श्रीचरण । गुरुही आपणचि श्रेष्ठपद ॥९॥
जो पयाब्धिवासी श्रीअनंत । दश अवतारीची लीळा समस्त । धाऊनि युगायुगांशी सांभाळीत । सद्योविधी मानव वेषी अवतरले ॥१०॥
तेच हे श्रीपूर्णानंद नारायण । त्यांची महिमा शेषा लागुन । अगम्य अकथ्य अजाण । तरी मी मतिमंदु काय वर्णू ॥११॥
वाचेत रिघोन शिवराम । जो पूर्णावतारी पूर्ण काम । कथन करवील निगमा उत्तम । वंशावळी निजगुरुंचे ॥१२॥
तिम्मण दीक्षित नामाभिधान । वेदशास्त्र संपन्न । विद्वरत्न नारायण स्वामीचे पिता श्रीचरण । वास्तव्य ग्राम महागांवी ॥१३॥
रामभट्ट जेष्ठ भ्राता । तिम्मण दीक्षिताचे तत्वतः । एकचित्ती ते उभयता । श्रौतकर्मी सदा असे ॥१४॥
कलबुर्गीये परगण भूप्रदेशी । महागावीचे ते ग्रामजोशी । सर्वाभूती दया ज्यासी । परमार्थमय प्रपंचासी वाहती ॥१५॥
या रीतीनी असता । देशपरिगणी पूजिती विद्यावंता । श्रेष्ठ साहूगणादी ग्रामवासी अगत्या । उंबळ ग्रामीय सज्जनश्री ॥१६॥
त्या ग्रहस्ताचे नाम बाळकृष्णपंत । तयाचे वंशाभिधानी चंद्रकेत । पूजिले श्रीशिवराम दीनानाथ । ते अनुग्रहित एका जनार्दनी ॥१७॥
अष्टैश्वर्ये ज्याचे घरी असे । औदार्यगुण अंगी पूर्ण वसे । सकळ गुणसंपन्न निर्दोषे । जाणुनि असे त्याठायी ॥१८॥
तिमण दीक्षिताची ममता । त्या ग्रहस्तावरी जडली तत्वता । देखुनि तयांची अंतःकरणांशी शुध्दता । सदा येत जात त्या ग्रामासी ॥१९॥
त्या दीक्षितांनी जन्मांतरी । नेणो कैसे आराधिलेसे श्रीहरी । तरीच या जन्मी त्याचे उदरी । नारायण आपण अवतरले ॥२०॥
त्या नारायणाची सौंदर्यता । कोण वर्णू शकेल आता । प्रत्यक्ष मदनाचा होय पिता । अकरावा अवतार या जगी ॥२१॥
या अवताराची महिमा । चंद्रिकेत लिहिले शिवरामा । तो साक्षात भक्तकाम कल्पद्रूमा । तया आधारे मी बोलिलो ॥२२॥
बत्तिस लक्षणी आळवीत । गौरवर्णी जसा उमाकांत । अनुपम्य या जगात । मानवी वेषे विराजिले ॥२३॥
ग्रहस्त बोले दीक्षितास । तुंम्ही नांही आणिले कुटुंबास । आता कुटुंबासह आमुचे ग्रामास । येऊन पवित्र करावे ॥२४॥
त्याचे आग्रहावरुन । निघाले कुटुंबासह वर्तमान । अग्निहोत्रा सहित आपण । जाते जाहाले त्या ग्रामा ॥२५॥
आदिशक्ति प्रणवरुपिणी । जी अनंत शक्तिची स्वामिनी । तीच महालक्ष्मी कन्या होऊनि । त्या ग्रहस्ता उदरी जन्मली ॥२६॥
तिच्या स्वरुपाची उपमा । कांही येक न साजे शब्दागमा । जी स्वये प्रत्यक्ष अवतरली श्रीरमा । नारायणा कारणे त्याउदरी ॥२७॥
तिस होताच पंचवरुष । ग्रहस्त सांगे दिक्षीतास । इचे लग्न समारंभ आंम्हास । करणे आता अगत्य ॥२८॥
तुंम्ही आमुचे पुरोहित होऊनि । ईच्या वराचा न केला प्रयत्न । आता तरी शीघ्र शोधूनि । वर आणिजे इज योग्य ॥२९॥
जवळि ठेविजे इचे चित्र प्रतिमा । तिजला शोभेल वर उत्तमा । पाहताच स्वरुप आंम्हा । अल्हाद व्हावे सर्वांशी ॥३०॥
ऐसे तया सांगता यजमान । दीक्षित निघे प्रयत्ना कारण । धुंडिती देश फिरोन । परि योग्यतानुवर न मिळेचि ॥३१॥
परतुनी आले ग्रहस्ता जवळी । सांगितले या भूमंडळी । मि हुडकिलो परि लक्ष्मीचे मेळी । मिळे ऐसा वर दिसेना ॥३२॥
लक्ष्मीचे स्वरुपा समान वर । लक्षणयुक्त सभाग्य सुंदर । हुडकिता पृथ्वीवर । दृष्टीस माझे पडेना ॥३३॥
ऐकुनि ऐसे वचन । विस्मित जाहला यजमान । म्हणे लक्ष्मी सारखे रत्न । कोणास अर्पण करावी ॥३४॥
जवळी असता निधान । अप्राप्त जैसा चक्षूहीन । किंवा परिमळाक रिता मृग जाण । हिंडे जेवी वनांतरी ॥३५॥
तेवि चिंता करित असता । अवचित आठवले चित्ता । का बुध्दीसाक्षि श्रीअनंता । स्फूर्ति दीधली त्यालागी ॥३६॥
लक्ष्मि वराया वर जाण । न दिसे नारायणा वाचून । सर्व लक्षणी संपन्न । स्वरुप जे का मदनाचे ॥३७॥
लक्ष्मीस हाच वर साजे । आमुचे कुळीचे पुरोहित राजे । यासि टाकुनि दुजे । कोण्या मुर्खासी ना द्यावे ॥३८॥
ऐसे योजुनि मनी । विच्यार पुसे भार्ये लागुनि । लक्ष्मी सारिखी निधानी । कोणा लागुनि अर्पावी ॥३९॥
माझे दृष्टीस पाहाता । नारायणा सारिखा सुस्वरुपता । या भुमंडळी पाहाता । दुसरा कोणीही दिसेना ॥४०॥
मी तो त्रिकर्ण पूर्वक जाण । लक्ष्मी अर्पियली नारायणा लागुन । तुमचे मनोगत पूर्ण । सत्वर आता सांगावे ॥४१॥
ऐसे ऐकताच सती । हर्षायमान झालि चित्ती । परमाल्हादे विनंती । पतिलागी करितसे ॥४२॥
स्वामीचे जे मनोगत । तेचि आंम्हासी पसंत । त्या व्यतिरिक्त चित्तात । दुसरे कांही असेचीना ॥४३॥
ऐकोनि पतीचे वचन । हर्षयुक्त पुसे दीक्षिता लागुन । अद्यापि नारायणा लागुन । उपनैन का हो तुम्हीं केले नसे ॥४४॥
ऐकोनि यजमान वचन । दीक्षित बोले परतून । उपनैनालागी प्रयत्न । आता केला पाहिजे ॥४५॥
तेव्हा गृहस्त काय म्हणे । तुमच्या हीया कन्येत काय उणे । प्रयत्निले अन्यही ठिकाणे । आश्चर्य काय बोलता ॥४६॥
आता काढावे लग्न । सर्व साहित्य पुरवीन । शीघ्र करावे उपनैन । मंडप सिध्दांतीय करविती ॥४७॥
पुढे होईल हा जामात । हे मनी धरोनि हेत । सकळ साहित्य यथास्थित । योग्यता नुसार करविले ॥४८॥
पाहुनि सुदिन सुलग्न । करविले उपनयन कर्म संपूर्ण । विधीयुक्त ब्राह्मण भोजन । पांच सहस्त्राच पै जाला ॥४९॥
होताच चार दिन । उगवताच सोडमुंजच जाण । संभावना ब्राह्मणा लागुन । अपार द्रव्य दीधले ॥५०॥
होताच षोडस दिवस । करावे उद्वासन मंडपास । ते समयी दीक्षितास । यजमान काय निरोपीति ॥५१॥
शास्त्रोक्त उद्वासन । करावे आता आपण । मंडप जेथील तेथेच ठेवून । हेची आवडत मज चित्ति ॥५२॥
दीक्षित म्हणे काय करावे । येरु म्हणे तैसेची आहे । उत्तर विधानी जवळ आहे । कळेल आता चौ दिवसी ॥५३॥
लक्ष्मी स्वयंवराची सिध्दता । आधीच केली त्या ग्रहस्था । एकांति सांगे दीक्षिता । मम वचनी मान्यता पै द्यावी ॥५४॥
माझे मनी ऐसेची वासना । लक्ष्मी अर्पण करावी नारायण । अंगिकारुनि आपण । सनाथ दीना पै कीजे ॥५५॥
आता पुढील अध्यायी निरोपण । लक्ष्मी नारायणाचे स्वयंवर जाण । ते ऐकावे सावधान । सप्रेम चित्ती सज्जन हो ॥५६॥
श्रोते आपण पूर्णानंद मूर्ति । अगाध असे तुमची कीर्ति । तुमचे कटाक्षमात्रे होय स्फूर्ती । निज सुखाची सर्वदा ॥५७॥
आपण दयाळु पूर्ण । आपुले होता वरप्रदान । पुढे चालेल निरुपण । सत्य सत्य त्रिवाचा ॥५८॥
हे चरित्र पूर्णानंद । आपण असे पूर्णानंद । माझ्या मस्तकी ठेवूनि हस्त वरद । आपुले चरित्र आपण वदवीतसे ॥५९॥
पूर्णानंद शिवराम । जो भक्तकाम कल्पद्रूम । त्याचे चरित्रोत्तम । प्रख्यात असे लोकत्रयी ॥६०॥
आता जे चरित्र । वर्णिता सदभक्ति लाभेल पूर्त । तरीच कळेल सर्वत्र । ऐसे सांकेती निर्मिले हे ॥६१॥
आधीच ते चरित्र । जे सुखाचे सुखसुत्र । भरले असे श्रवण पात्र । संपूर्ण या जगाचे ॥६२॥
आता ते वर्णावयाचे काज । म्हणाल काय असेल तुज । अगाध महिमा सदगुरुराज । का वर्णवितो कोण जाणे ॥६३॥
येर्हवी मी पामराहुनि पामर । पतितामाजी पतित भूभार । वर्णू म्हणता पूर्णानंद चरित्र । जिव्हा माझी झडेल ॥६४॥
वाचेचे जे वाचकत्व । बुध्दिचे बोधकत्व । सदगुरुची वरश्रीयता सत्यत्व । त्यावीण वदेल कोण कैसे ॥६५॥
पूर्णानंद आपण । वाचेमाजी रिघोन । आपुले चरित्र आपण । वदवीतसे तत्वता आपूर्ता ॥६६॥
धन्य माझा सदगुरु । तो सहजानंद दिगंबरु । त्याच्या पादुका निरंतरु । मस्तकी माझे पै असो ॥६७॥
पादुका असता माझे शिरी । पुष्टि चढेलीसे ही वैखरी । स्फूर्ती होईल पूर्णानंद चरित्री । म्हणूनी वाहिलो निजमस्तकी ॥६८॥
आता श्रोतयांच्या चरणांबुजी । नमन असो हनुमदात्मजे सहजी । तुमची कृपा होता सहजी । चरित्र पुढे चालेल ॥६९॥
इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडवील श्रवण सत्र । जे स्वसुखाचे सुखसुत्र । प्रथमोध्याय गोड हा ॥७०॥
शुभं भवतु । श्रीसदगुरुनाथार्पणमस्तु ॥