श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सोळावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरुभ्योनमः ।

जयजय पूर्णानंदा अवधूता । निरामया आदिमध्यांत रहिता । अवधूत चिंतनी सिध्दांता । आनंदकंदा दयाळा ॥१॥

आनंद सांप्रदाय विभूषणा । पुनीता षडरिपुभंजना । अद्वयानंद आदिकरणा । अनाथनाथा अनंता ॥२॥

बंधविछेदका त्रिताप शमना । त्रिदोष दहना त्रैलोक्य पावना । त्रिगुणातीता निरंजना । निजानंदा सर्वेशा ॥३॥

नित्यरुपा निरामया । निगमागमसारा स्वानंद निलया । सच्चिदानंदा शरण तव पाया । पायीच ठेविसी त्यालागी ॥४॥

ऐसा तु दयासागरु । पूर्णानंदा श्रीदिगंबरु । तव चरित्र सुखकरु । पुढे बोलवि दयाळा ॥५॥

पंचादशाध्याय अंती । आक्षेप करिती श्रोते संती । कल्याण गुरुक्षेत्र निश्चिती । पूर्णानंदांचे केवी होय ॥६॥

तरी ही कथा सुरस फार । ऐकावीती कथा अत्यादर । त्याचे श्रवणमात्रे येरझार । चुकेल भाविक लोकांचे ॥७॥

सदानंद मुनीश्वरु । ते आनंद संप्रदयायाचे मूळ गुरु । काशीत अवतरले निर्धारु । तपोघन शिवांशपूर्णी ॥८॥

सदानंद ते ज्ञानखाणी । त्यास प्रत्यक्ष होऊनी शूलपाणी । वर दीधलासे आनंद निधानी । ते परिसावी रसाळ लीलांशे ॥९॥

सदानंद अवतार ज्ञानसंपन्न । तुझे तपी तोषलो मी त्रिलोचन । सर्वस्वी असे तुजला मी सुप्रसन्न । वर माग इच्छित ॥१०॥

येरु पाहताच चंद्रमौळी । मस्तक अर्पूनी चरणकमळी । स्तवन केले अनन्यपणी निश्चळी । ते ऐकावे अत्यादरे ॥११॥

जयजयाजी कर्पूरगौरा । कैलासपते करुणासागरा । कल्मषदहना व्याघ्रांधरा । स्वानंदकंदा जगदीशा ॥१२॥

त्रिंबका त्रिपुरांतका । त्रितापशमना त्रैलोक्य पालका । त्रिभेदातीता विश्वव्यापका । विश्व जीवना विश्वेश्वरा ॥१३॥

विमलरुपा विश्वंभरा । विजयकारका मदन संहारा । परमानंदा परात्परा । उमा विलासा नमोस्तुते ॥१४॥

मृत्युंजया रुद्राक्ष भूषणा । नागेंद्र हारा पंचानना । नाम रुपातीत तू निरंजना । निर्विकारा निरुपमा ॥१५॥

श्रीहरी प्रिया भक्तोध्दारा । श्रम मोचका अजरामरा । सहजानंदा श्रीदिगंबरा । दीन रक्षका दयाळा ॥१६॥

यापरी करुनी स्तवन । मागितले हेचि वरप्रदान । तुझे प्रेम देई अखंड कृपापूर्ण । अखंड मागणे श्रीशंकरा ॥१७॥

ऐसे बोलता सदानंदमुनी । तोषुन बोले पिनाकपाणी । तू जाय आता येथूनी । दक्षिणेसी स्वानंदे ॥१८॥

तेथे भेटतील श्रीदत्त अत्रिसुत । माझेच ते रुप जाण निश्चित । त्यानी कृपापूत वर देत । चतुर्थाश्रम देवोनि उपदेशितील ॥१९॥

तुज पासून आनंद संप्रदाय । क्रम चालेल जाण निश्चय । या संप्रदायाचा अभिमानी मीच निश्चय । गुरुकृपाद्वारे तारीन शिष्यवर्गा ॥२०॥

ऐसा वर देता उमावर । सदानंद बोलती प्रतिउत्तर । आज्ञाप्रमाण जातो दक्षिणदेशी सत्वर । परि भेटेल कोठे गुरुवर्य ते ॥२१॥

तूं येथून निघता तात्काळी । उच्चार करी पाऊला पाऊलि । श्रीगुरुदेव दत्त महामंत्र उज्वळी । दीर्घ घोष सिध्दातांशी ॥२२॥

ज्या स्थळी होईल गुरुभेट । सिध्दांतपीठ गुप्तस्थळी श्रेष्ठ । अनादि यूगीय तपस्थळ वरिष्ठ । सिध्दांतपीठ परिसरिये ॥२३॥

ऐसे आज्ञापिती महेश । सदानन्द निघे दक्षिणेस । प्रति पाऊला पाऊली मंत्र अतिविशेष । उच्चार करी श्रीगुरुदेवदत्त ॥२४॥

सदानंद पुढे ठेविता पाऊले । पाऊला पाऊली दत्तच भरले । दत्तमयचि ते होऊनि ठेले । दत्तचि दिसे दशदिशेस ॥२५॥

दत्तात्रेय तो विश्वव्यापक । दत्त तो सकळा प्रकाशक । दत्ता विना कांही एक । रिता दिसेना चराचरी ॥२६॥

दत्त जगाचे महाबीजमंत्र होय । दत्तच भरला असे सबाह्य । दत्ता वाचून निजांतरी निश्चय । तृणपर्णादि कांही हलेना ॥२७॥

तरी शंकराचे ऐसे वचन । दक्षिण देशी प्रकटतील पूर्ण । तेच स्थल असे कल्याण । कल्याणक्षेत्र परिसरते ॥२८॥

या देशा येई पर्यंत । प्रतिध्वनी न झाले वाटेत । कल्याणास येता निश्चित । ध्वनी उमटे गुरुदेवदत्त मंत्राक्षरी ॥२९॥

दत्त शब्दाची प्रतिध्वनी । निघता तोषले सदानंद मुनी । मनी म्हणे सांबाची श्रीवरदवाणी । प्रत्यया आज पै आली ॥३०॥

ज्यास्थळी निघाली ध्वनी । तेथेच उभे राहिले कर जोडूनी । भेटतील सदगुरु कैवल्यदानी । आदरे उभा त्या स्थळी ॥३१॥

मुखी म्हणतसे श्रीगुरुदेवदत्त । सबाह्य भरला श्रीगुरु स्वयेचि दिप्त । दत्तमय दिसे जग समस्त । वृत्ती रंगली दत्तापायी ॥३२॥

वृत्ती तन्मय होता जाणा । नेत्री चालिले प्रेमांबु जीवना । उतावीळ चित्ती गुरुदर्शना । घेईन केव्हा म्हणतसे ॥३३॥

चित्तवृत्ती करुनी एकाग्र । जेव्हा पाहे उघडूनी नेत्र । सन्मुख दिसे सर्प भयंकर । मुखी ज्वाळा उठतसे ॥३४॥

दृष्टी पडता सर्पाकार । करुन साष्टांग नमस्कार । बोले काय जोडून कर । श्रीगुरुसी सप्रेमे ॥३५॥

जयजय सदगुरु आनंद दाता । विश्वभंरा विश्वनाथा । भक्तवत्सला अत्रिसुता । अनाथनाथा नमोस्तुते ॥३६॥

त्रिमूर्तीरुपा त्रिताप नाशना । त्रिदोष भंजना त्रैलोक्य पावना । त्रिभेदातीता मुनी मानस रंजना । निरंजना निष्कलंका ॥३७॥

निर्द्वंद्वा निर्गुण निःसंगा । नित्यानंदा निरुपमा अंतरंगा । निर्लेपा निर्मळा निजरुपी अभंगा । विश्व चालका दयाळा ॥३८॥

अनुसयात्मजा संकर्षणाद्वया । अवयव रहिता आनंद निलया । आनंदकंदा दत्तात्रेया । अंतरात्मा दयाळा ॥३९॥

करुणाकरा दयासागरा । वैराग्य योगज्ञान संचारा । सहजानंदा दिगंबर । दीन रक्षका जगदगुरु ॥४०॥

यापरी सप्रेमे करुनी स्तवन । वारंवार घालुनी लोटांगण । विनवी नम्र सांष्टान वंदून । दत्तात्रयासी ते वेळी ॥४१॥

तू तो निर्गुण निराकार । निज जनास्तव होसी साकार । तरी तूझी सगुणमूर्ती सुंदर । पाहू इच्छिती नेत्र माझे ॥४२॥

षडभूज सुहास्य वदन । षडा आयुध धारी सुलक्षण । मणिमय किरीट मंडित पूर्ण । पूर्णानंद कारका मूर्ती तुझी ॥४३॥

तरी तू होऊनी त्रिमूर्ती सगुण । मजला तू देई दर्शन । तेणे माझे मनोरथ पूर्ण । होईल सहज दिगंबरा ॥४४॥

ऐसे प्रार्थिती श्रीसदानंद । प्रसन्न झाले दत्त योगींद्र । जो पूर्णब्रह्म सच्चिदानंदकंद । सगुण रुपे प्रगटले ॥४५॥

प्रगटता मूर्ती सगुणवेष । ब्रह्मांडी न समाये प्रकाश । काय उदय जाहले सहस्त्र चंडांश । एकदाची ऐसे पै गमले ॥४६॥

ऐसी मूर्ती पाहता दृष्टी । सदानंदासी न माये आनंद पोटी । गुरुदेव चरणे ह्रदय संपुटी । साठविले साक्षात ॥४७॥

चरणी अर्पिती मस्तक । माथा ठेवितसे अभय हस्तक । हस्त मस्तक देता समाधी अपेक्ष । वृत्ती मुरली ब्रह्मानंदी ॥४८॥

ब्रह्मानंदी मुरली चित्तवृत्ती । करीत राहिले स्तवन स्तुती । दशदिशा दिसे दत्तमूर्ती । दत्तमय आपणत्वी ही भासे ॥४९॥

सदानंद पाहती संभ्रम । काय केले ते योगीश मनोभिराम । विधीयुक्त देऊनि चतुर्थाश्रम । गुहे तपाशी बैसविले ॥५०॥

गुहे माजी प्रवेशता देख । सदानंदी तल्लीन समाधी सुरेख । ज्याची समाधी तीन तीन सप्तक । समाधी कांही उतरेना ॥५१॥

त्यांनी सेवितसे सहज समाधी । समाधी माजी नाठवे देहबुध्दी । देहाहंता ग्रासुनी ब्रह्मानंदी । स्वानंदमय होऊनी ते खेळे ॥५२॥

खेळती अखंड ब्रह्मानंदी । त्यास कैचे द्वंदा उपाधी । निगमाक्षयी स्वानंदी । अखंड सेविती एकपणे ॥५३॥

एका पासुनी होय अनेक । अनेका माजी एकले व्यापक । जेवी नगासी अभेद कनक । त्यापरि पहातसे जग हे चराचर ॥५४॥

सूर्याअंगी नसे अंधार । तेवी त्यास नसे जगादाकार । ते दिसती साकारी निगमालंकर । निराकारीच मुळी नित्य असे ॥५५॥

असो ते सदानंदमुनी । लोकांचे उपसर्ग न हो म्हणोनी । गुहेमाजी प्रवेशुनी । राहते जाले स्वानंदी ॥५६॥

तरी म्हणाल गुहा कैसी । जेथ प्रवेश नसे मनुष्यासी । व्याघ्ररीस करीती मिराशी । राहिले ऐसे त्यास्थानी ॥५७॥

ऐसीये स्थानी करुनी प्रवेश । राहते जेथे अतिहर्षी । तेथे स्वानंदी चिद्विलासी । आपुले आपण तपःपुत ॥५८॥

ऐसिये स्थळी रात्रंदिनी राहिले । म्हणोनि कवण्याही लोकासी न कळे । एकदा रामानंदाचे भाग्यबळे । दर्शन पै देती गुरुदेव आज्ञे ॥५९॥

गुहेतील पाहून गुरुंची रहाटी । चरणी घातली स्वानंद मिठी । मिठी पडताच ब्रह्मानंद लुटी । लुटीते जाले सर्वस्वी ॥६०॥

रामानंदाची ही स्थिती । तदा कारचि होती । कदा नाठवे देहाभ्रांती । सदानंदी निमग्न जे ॥६१॥

समाधी माजी असता सदानंद । पुढे उभा राहती रामानंद । उभयताही ब्रह्मानंदी धुंद । होऊनी आत्मसुख पै सेविती ॥६२॥

विस दिवस किंवा मासाधीक जाण । सदानंद शिष्याकडे न पाहे नेत्र उघडोन । तरी ते उभा राहिले कर जोडून । पाहूनि मनी तोषतसे ॥६३॥

त्याच वेळेस कांही सांकेत लेण । समाधी उतरल्या वेळी क्षण । विश्वकारणी रामानंदा लागुन । उदबोधिती सांकेते ॥६४॥

तेव्हा तरी यथेष्ठ भाषण । कदा न करी शिष्या लागुन । कांही एक सांकेत निगमन । उदगारिती विश्वार्थी ॥६५॥

ऐसी त्यांची योग स्थिती । उभयता तैसेचि राहती । अगाध असे त्यांची कीर्ती । मूर्तिमंत तपोधन ॥६६॥

असो यापरि ते गुरुशिष्य असता । तेथे वर्तली एक नवल कथा । ती ऐकावी स्वानंदचित्ता । ते ऐकता मनोरथ पूर्ण होय ॥६७॥

ती कथा नव्हे अवतारकार्य उज्वळ । श्रवणे होईल जीवनोध्दार नीखळ । संजीवन समाधी गुरुशिष्य तपती सिध्दांती अढळ । तपे विश्वकल्याणा साधिती ॥६८॥

यास्तव तुम्हीं श्रोते भाविक पूर्ण । ही कथा ऐकावी एकाग्रमन । येथील वक्ता सदगुरु आपण । मनोरथ पुरवील गुरुआज्ञे ॥६९॥

सदगुरु वाचेत रिघोन । स्वचरित्रा प्रकटवीति आपण । त्याचे सत्ते वाचून पूर्ण । जिव्हा माझी हलेना ॥७०॥

असो कल्याणी एक साहुकार । ज्यानी नऊकोटीचा करीतसे व्यापार । ते यशोगुप्त वाणी निर्धार । रहात होता त्याग्रामी ॥७१॥

त्यास असे एक कुमर । बुध्दिवंत आणि फार सुंदर । वय लहान चतुर मनोहर । शोडश वयी धर्मगुप्तनामे असे ॥७२॥

त्याची भार्याही भाग्यश्री सुलक्षणा । पतीव्रता पती सेवेसी अनुकूल पूर्णा । ऐसे असता जाणा । काळ त्यावरी क्षोभला ॥७३॥

नव ज्वराचे करुनी निमित्य । एकाएकी तो पावला मृत्यु । त्याच्या खेद मातापित्यासी सातत्य । असह्य जीवनी झुंजताती ॥७४॥

आणखी संबंधी आप्तलोक । त्यासही जाले असे फार दुःख । त्या दुःखाशी नसे पारवार देख । शोकसमुद्री पै बुडताती ॥७५॥

कानडी देशा पध्दती । शवास बांधुनि स्मशानी नेती । नानावाद्ये शोकगीती वाहती । पुष्पादिही अर्पियले ॥७६॥

ऐसे शवासी नेता निर्धार । लोकही असती समागमे फार । दुःखे आक्रंदिती हाहाःकार । दुःखाक्रोशे गगनभेदी ॥७७॥

ज्या कुहरी असती सदानंद मुनीश्वर । रामानंद उभा असे ज्यांच्या समोर । त्याच मार्गे शवास नेती निर्धार । महा आक्रोशे गगनभेदी ॥७८॥

अगाध असे त्या वणिकाचे सुकृत । दानशील तो पुण्यवंत । मृत्यु पावला सूत झाला जिवंत । सदानंदांचे दयेने ॥७९॥

मृत्यु पावला जो नर । जीवित केवी जाला साचार । तरी सांगेन लीला विस्तार । ते ऐकावी स्वानंदे ॥८०॥

मासात एक दोन वेळा । सदानंद उघडी नेत्रकमळा । नेत्र उघडिले समयी दुःखीच्या गदारोळा । श्रवणी पडला भाग्योदयी ॥८१॥

श्रवणी पडता महा दुःखाचा हाहाःकार । रामानंदास बोलती मुनीश्वर । हा गलबला काय पाहे निर्धार । सत्वर सूचवी यथावत ॥८२॥

रामानंद निघाला आज्ञा नुसार । बाहेर येवोन घेती समाचार । कुहरी जाऊनी यथा प्रकार । सांगता कळवळले मुनीवरे आंतरी ॥८३॥

म्हणती एका करिता इतूके लोक । करिताती माहा दुःख शोक । तो जरी जीवित झाल्या हरिख । होईल की सकळिका ॥८४॥

यापरी सदगुरुचे अमृतवचन । रामानंद स्वानंदे ऐकोन । गुरुसी म्हणे प्रभूमहिमा पूर्ण । ब्रह्मादिकासी कळेना ॥८५॥

ब्रह्मादिका हि अवघडे । सहजा सहजी प्रभू कृपे हे घडे । अगाध असे आपुली कृपा निबिडे । सदानंदा सर्वेशा ॥८६॥

रामानंदाच्या विनंती वरुन । बोलिले सदगुरु आपण । या धुणीतून भस्म घेऊन । टाकून येई शवावरी ॥८७॥

इतुके बोलता श्रीसदगुरु उत्तरी । रामानंद भस्म घेऊनी करी । लागवेगे येऊनी झडकरी । शववरी टाकिले रक्षणार्थ ॥८८॥

ते भस्म नव्हे अमृत चोख । तेतो रक्षिले मृत्युग्रासी देख । सजीव झालातो मंगलकारक । तो रक्षिले सौभाग्य साहुकार सुनेचे ॥८९॥

प्रेतावरी विभूती टाकिली सर्वांगे । रामानंद तेथूनी आले वायुवेगे । ते प्रेतही आकाशमार्गे । येतसे सजीव होऊनी त्यापाठी ॥९०॥

रामानंद प्रवेशिता कुहरी । त्यामागे प्रेतही गेला झडकरी । सदानंदा लागली समाधी त्यासरी । मग्न असे झाकुनी नेत्र ॥९१॥

रामानंदही येऊन । उभा ठाकिले गुरुसन्निधान । त्याचे पाठीशी धर्मगुप्तही करी वंदन । आडवा पडे दंडवति ॥९२॥

इकडे त्याचे मातापिता । प्रेता मागे धावती यथावता । कंटकी प्रवेश न होय असह्यता । बाहिरि बैसले शोकग्रस्त ॥९३॥

आप्त लोकही आले तेथ । म्हणती प्रेती संचरिलेसे भूत । झडपणी करुनी निश्चित । त्या जोगीया मागे कोठे नेले कळेना ॥९४॥

आमुचे हाती त्यास चिती । तेही नसे कीं आम्हांसि प्राप्ती । यापरी मातापिता चिंता करिती । लोकही बोलती तैसेची ॥९५॥

त्याची माता बोलती पती लागुन । या प्रेताचे शोध घेतल्याविण । मी कदापि न निघे येथुन । प्राणासी त्यागीन या स्थळी ॥९६॥

ऐसी पत्नीचा पाहता निकट निर्धार । काय करतिसे साहुकार । झाडी तोडवितसे साचार । अपार द्रव्य देऊनी ॥९७॥

झाडी तोडावयास । लागला असे एक मास । ते मातापिताही निश्चयेस । तेथेच राहती अहोरात्री ॥९८॥

ती झाडी तोडविता जाण । किंचित मार्ग दिसो तयाजाण । त्यापुढे गुहा पाहोन । आश्चर्ये कुलदेवता स्मरताती ॥९९॥

एक तो बैसला असे नेत्र झाकून । दुसरा उभा असे कर जोडून । त्याचे पाठीस निजनंदन । दंडवती पुढती असे ॥१००॥

मनी म्हणती हे काय असतील देव । किंवा दिव्यऋषी वैभव । त्यांचे तेजानीं हा मार्ग मिळाला ठाव । प्रति सूर्यबिंब सतेजस ॥१०१॥

एक तरी आहे समाधिस्त । कधी काळी होतीते की जाग्रत । ते जाग्रत झाल्या व्यतिरिक्त । आणीक आम्हा मार्ग नव्हेची ॥१०२॥

ऐसे करिता विचार । त्यास लोटले दिवस चार । तव सदानंद योगेश्वर । उघडून पाहती नेत्रकमळे ॥१०३॥

स्वामी उघडिता नेत्रकमळ । हे उभयता वंदिती चरणी तात्काळ । नेत्री चालिल्यासे प्रेमजळ । तेणे अभिषिंचिंती स्वानंदे ॥१०४॥

पायावरी लोळती वारंवार । नेत्री भरलासे आनंदनीर । विज्ञापना करिती मधुरोत्तर । योगीराजासी त्याकाळी ॥१०५॥

जयजयाजी योगेश्वरा । विश्वव्यापका विश्वाधारा । विमलरुपा विश्वभंरा । विश्वात्मा नमोस्तुते ॥१०६॥

तुझ्या कृपेनी साचार । जिवविले जी अनाथकुमर । परि तो कांही न पाहे उघडुनी नेत्र । हे कार्य अभिनव गुरुवर्या ॥१०७॥

यापरी ते विनंती करिती । कृपा उपजली मुनीचे चित्ती । रामानंदाकडे अवलोकिती । जवळी येतसे कर जोडून ॥१०८॥

स्वामी म्हणे त्या कुमारावरी । कमंडलुतील तीर्थ प्रोक्षण करी । प्रोक्षण करिताची निर्धारी । लोळण घेतसे स्वामी पुढती ॥१०९॥

साष्टांग करुनी नमस्कार । उभे ठाकिला जोडूनी कर । स्वामी अवलोकिती निजनेत्र कृपापात्र । सप्रेमयुक्त ते काळी ॥११०॥

नेत्रपाती न हलू देता । आपाद स्वामीकडे पाहता । हर्षायमान होऊनी चित्ता । त्या मुलास काय आज्ञापीति ॥१११॥

अरे बाळा सुकुमारा । तव मातापित्यासी पाही रे प्रेम भारा । तू जाई आता आपल्या घरा । प्रपंच करी रे स्वानंदे ॥११२॥

येरु म्हणे जी गुरुवर्या । मी कदापि सोडून न जाय या पाया । पायीच राहीन निज निश्चया । ही आवडी ममचित्ती ॥११३॥

मजला कुणी नसे मातापिता । तूच रक्षिलेसी समर्था । तुझे पायी राहता यातायाता । सहज चुकेल जी प्रभूराया ॥११४॥

ऐकून त्याचे वचन । पुनरपि त्यास समजाऊन । पाठविते जाले त्यास घरासी संतोषऊन । मातापित्याचे समागमे ॥११५॥

तेव्हा त्या मातापित्यास ऐसे वाटले । पुनरपि याचे नूतन जन्म झाले । स्वामी पायी वंदिती वेळोवेळे । त्यांच्या सुखासी पार नसे ॥११६॥

साधूची जरी कृपा होय । जन्म मरणांसी तारिती निश्चय । त्याचे जीवित तरले आश्चर्य । पाहे गुरुचरणाची संप्राप्ती ॥११७॥

असो पुत्रासह वर्तमानी । तो साहुकार घरी प्रवेशुनी । ब्राह्मण भोजनादि उत्साहपूर्णी । करिता जाहला त्याकाळी ॥११८॥

सदानंदाचे गुण आठऊन । म्हणतसे केवी होऊ उत्तीर्ण । जरी प्राणाचाही करिता लिंबलोण । उत्तीर्ण कदापि नव्हेची ॥११९॥

त्रिकाळ स्वामीचे दर्शन । तो कदा न राहे घेतल्याविण । या गृहासी द्वादश प्रदक्षिणा । सप्रेम करितसे तो वाणी ॥१२०॥

त्याचा पुत्रही तदनुसार । दर्शन घेतसे त्रिवार । त्याचेनी जिवित्व प्राप्ती निर्धार । जाणुनी पायी लोळतसे ॥१२१॥

सदानन्द चरण । समाधि अंतरंगी तल्लीन । असल्यापरी दर्शन । भावे वाहति स्वानंदे ॥१२२॥

गुरुद्वार सडा संमार्जन । नित्य स्वकरी करिती भावेपूर्ण । रंगवल्यादि मंगलरतीही सारुन । भक्तसेवा लंकरिती ॥१२३॥

यापरी ते दोघे पितापुत्र । काळांतरी पिता पावला परत्र । तेव्हा साहुकार पुत्र । काय करिता पै जाला ॥१२४॥

आधी निजमनी विचार करी । अपार असे द्रव्य माझे घरी । तरी त्याची सार्थकता निर्धारी । गुरुसेवे परिवाहीले ॥१२५॥

हे साधु ते केवळ निरापेक्ष । हे प्रत्यक्षचि कल्पवृक्ष । हे जगाचे पुरविती अपेक्ष । तरी या द्रव्याचे पाड काय ॥१२६॥

ज्याचे दर्शनही नित्य घडे । ज्याची वृत्ती स्वस्वरुपी बुडे । त्यास बोलण्या शब्द थोकडे । तरी हे द्रव्य अर्पण केवी होय ॥१२७॥

यापरी योजना करुन मनी । एकदा पुसे स्वामी लागुनी । आपण तो सदगुरु कैवल्यदानी । जगदोध्दराक जगदगुरु ॥१२८॥

माझे मनीची एक वासना । ती पुरवावी जी सदगुरुराणा । माझे तनुमन अर्पण स्वामी चरणा । मी अनाथ केवळ पामरु ॥१२९॥

माझे ऐकूनी विज्ञापना । येथे मठ बांधावया द्यावी आज्ञा । हेचि दीनाची मनोवासना । ही पूर्ण करावी जी दयाळा ॥१३०॥

याची विज्ञापना ऐकून । स्वामी त्यावरी सुप्रसन्न । बोले काय त्यालागुन । स्वानंदवचनी त्याकाळी ॥१३१॥

अरे बाळा गुणवंता । आमूचे मठ बोलता चालता । दूज्या मठासी लागुनी तत्वता । आंम्ही कदापि न राहतो ॥१३२॥

आमुचे मठी असति नवद्वार । त्यामठी असे चार मंदिर । चौथ्या मंदिरी निरंतर । राहणे असे आम्हासी ॥१३३॥

चौर्‍याऐंशी लक्ष मठ । त्यामाजी हे मठ श्रेष्ठ । ऐसे जाणुनी स्पष्ट । त्यामाजी राहतो स्वलीळी ॥१३४॥

आंम्ही तो केवळ निःसंग । आंम्हास नलगे हे उपसर्ग । तुम्हा लोकाचे टाकुनी संग । निरंजनी राहतो स्वच्छंदी ॥१३५॥

यापरी बोलुनी त्यासी । समाधिस्थ जाले ते स्वानंदराशी । हा चिंता करितसे निजमानसी । हा योग कैसा घडेल ॥१३६॥

ऐसेच एक दोन वेळा । त्यानी विनविले श्रीगुरुचे चरणकमळा । आज्ञा न देताच स्वानंद पुतळा । मठालागी पै वाहत ॥१३७॥

वाणि विचारी अंतःकरणी । माझे चित्त तो गुंतलेसे याचे चरणी । तथापि आज्ञाही न होता मज लागुनी । एकदा मठ करुनि सिध्द ॥१३८॥

ऐसे दृढ करुन मानसी । सिध्द जाला मठ बांधवयासी । मेळऊन उभा राही लोकासी । प्रारंभ करविले अतिहर्षे ॥१३९॥

नित्य लावून पाच शत मजूर । पाया भरणी करुनिया सत्वर । पहाटे पाहता निर्धार । एकही धोंडा न राहे त्यास्थळी ॥१४०॥

श्रीगुरुची आज्ञा न होता । त्यानी आरंभिले आपल्या वृत्ता । तरी ती केवी पावेल सिध्दता । गुरुच्या मनी नसताची ॥१४१॥

त्याचे मनी हाची विचार । मजपाशी असे द्रव्य फार । तया वेचून निर्धार । बांधावी मठ सर्वस्वी ॥१४२॥

ऐसी श्रध्दा धरुनी मनी । नित्य बांधवी तातडी करुनी । प्रातःकाळी काही न देखूनी । उदास मनी होतसे ॥१४३॥

त्याचे नेत्री द्रव्यपटले आली । म्हणून गुरुमहिमा तया न कळली । यास्तव होताच प्रातःकाळी । नित्यवत उद्योगा प्रवर्ततसे ॥१४४॥

नित्य सायंकाळ पर्यंत । वीतभर चढतसे भिंत । प्रातःकाळ होता निश्चित । कांहीच न राहे त्याठायी ॥१४५॥

यापरी वर्ष दोन वर्षात । द्रव्य वेचिले घरातील समस्त । परी कांहीच न चढे भिंत । उद्विग्न मनी झालासे ॥१४६॥

एक रुपया असे पर्यंत । प्रयत्नी तो न चुकला वाणीसुत । शेवटी होऊनी लज्जित । उभा ठाकला श्री सन्मुख ॥१४७॥

तेव्हा सदगुरु सच्चिदानंदघन । समाधी आपुली जिरऊन । त्याजकडे पाहती प्रसन्नवदन । पायी मिठी घालीतसे ॥१४८॥

अभय हस्ते त्याच्या राहटी । पाठ स्वयेची थोपटी । बोले काय आनंदवाणी यथेष्टी । कारे कार्यासी नाही गेलासी ॥१४९॥

येरु पाहे अधोवदन । नेत्री भरलेसे प्रेमंबूजीवन । मुखी न निघे एकही वचन । स्तब्ध होऊनी उभा ठेला ॥१५०॥

ज्यावरी गुरुकृपा होय । आधी त्याचे वित्त हरे निश्चय । वित्त असता अभिमान ठाय । साधकासी बाधे आंतरमनी ॥१५१॥

द्रव्य माया असे काळु । साधकास नको त्याचा विटाळु । यास्तव सदगुरु दायाळु । निसर्गी उपाय योजिती ॥१५२॥

त्या मुलास पाहती निरभिमान । कळवळले स्वामींचे अंतःकरण । बोले काय त्यालागुन । प्रसन्नवदनी त्याकाळी ॥१५३॥

अरे बाळा परम उदारा । तुझे मनीची सांग वासना इच्छित त्वरा । पूर्ण करतील दत्तदिगंबरा । अविलंब योगीश्वरु ॥१५४॥

येरु म्हणे वासना काय । मजपासी नसे एकही टकाठाय । हे तो विदित असे चरणा ठाय । पुढे काय करावे ॥१५५॥

यापरी बोलता वाणीकुमर । काय बोलतसे सदगुरु उदार । तुजपाशी काही द्रव्य निर्धार । असेल तरी घेऊन येई ॥१५६॥

येरु म्हणे दोन्ही मंगळसूत्र । तव दासीचे कंठी असे साचार । ऐकता म्हणे सदगुरु माहेर । येरु विकुनी आणि द्रव्य ॥१५७॥

ऐसे सदगुरुचे वचन । ऐकूनी सर्वांग संतोष होऊन । एक मंगळसूत्र विकता जाण । टक्का एक खुर्दा घेऊन येई झडकरी ॥१५८॥

आणून देतसे गुरुकरी । ते घेती सदगुरु आपुल्या करी । टाकिते जाले धुणी माझारी । स्वानंदे पूर्ण त्याकाळी ॥१५९॥

त्यास म्हणती लावी मजूर । चित्ती संशय न करी अणुभर । मजुराची मजुरी साचार । धुनीच नित्य देईल ॥१६०॥

आज्ञा करिता श्रीदेशिकेंद्र । येरु लावितसे पाचशत मजूर । सायंकाळ होता निर्धार । श्रीगुरु काय आज्ञापिती ॥१६१॥

वाणीकुमरास बोलिले तये अवसरी । मजुरा सांगणे घेवोनि जाण्या मजुरी । धुनीमाजी हात घालता निर्धारी । मिळेल सहज कष्टानुसार ॥१६२॥

सायंकाळ होताचि देख । धुनीत हात घालिती मजूर लोक । मिळेल ते नेती खुर्दा सकळिक । कष्टाप्रयाणे ते काळी ॥१६३॥

ज्यांनी कष्ट अधिक केले । त्यास चार पैसे अधिक मिळाले । ज्यांनी कामात कसूर केले । त्यास दोन पैसे उणे मिळत ॥१६४॥

ऐसे पाहता तेथील चमत्कार । चित्त देऊनी करिती मजूर । त्यास कोणी नलगे सांगणार । तेच करिती सप्रामाण्ये ॥१६५॥

यापरी धोंडे चुना जे आणिती । त्यांनीही हात लाविता द्रव्य मिळती । ते धुनी नव्हे भांडार निश्चिती । संपूर्ण व्यवहारा पुरवीतसे ॥१६६॥

तेथे कुणी नसे सांगणार । द्रव्य इच्छेपरी मिळती हजारो मजूर । अकृत्रिमपणी वागती चाकर । द्रव्य नेती नेमिकेची ॥१६७॥

नित्य जरी लागले हजार उधारे । तेथील द्रव्य ते कधी न सरे । ते भरलेचि असे भांडारे । गुरुकृपेनी सर्वस्वी ॥१६८॥

ज्यास गुरुकृपा भांडारा मिळाला । कोण वर्णी त्याच्या भाग्याला । सकळ संपत्ती भोगूनी भूतळा । सुखी राहील तो गुरुपदी ॥१६९॥

अगाध असे गुरुपाद महिमा । अगम्य अगोचर निरुपमा । कटाक्षमात्रे निजधामा । देणार ऐसा सदगुरु ॥१७०॥

असो मठ सिध्द होण्यास । कांहीच नलगे सायास । धुनीरुपी असता परिस । द्रव्यास उणे काय असे ॥१७१॥

ऐसे षण्मास होता । मठाचि जाली सिध्दता । स्वामी चरणी वणिक सुता । विज्ञापना करीतसे ॥१७२॥

मठाची सर्व सिध्दता । स्वामीचे दयेने जाहाली जी आता । कृपा करुनी समर्था । एकदा पहावे त्या मठासी ॥१७३॥

ऐकताच ऐसी गोष्ट । स्वामी बोलती मुलास सुस्पष्ट । अरे बाळा मी पाहता ते मठ । कष्ट तुजला होईल ॥१७४॥

ऐसे स्वामी बोलता निश्चयी । तयास न उमजले ह्रदयी । वारंवार आग्रह करी गुरुपायी । एकदा अवलोकन करावे ॥१७५॥

ऐसेचि त्यानी आग्रह करीत असता । त्यास एक दोन वर्षे लोटली तत्वता । मग त्याच्या आग्रहा पाहुनी तत्वता । काय करिते पै जाहले ॥१७६॥

धर्मगप्तास सदानंद आज्ञापिती । उदईक येऊ मठ पाहाण्या निश्चिती । सर्व पूजा सामग्रीसह यथावति । सिध्द होई गुण भूषणा ॥१७७॥

दूसरे दिनि प्रदोष वेळी । श्रीगुरुदेव उठले आसना वरुनी निश्चळी । पायी चालत येती स्वानंद लीळी । पूर्णब्रह्म परात्पर ॥१७८॥

दोन सहस्त्र अष्ठशति । श्रीसदानन्द स्वस्थानी समाधि वाहती । भक्त प्रार्थनि उठोनि चालती । अत्यानन्दे भक्ता अपेक्षेत ॥१७९॥

श्रीचरणे चालण्याची कळा । आश्चर्य वाटे सकळा । चरणे न स्पर्शति भूमीला । अधांतरी चरण वाहताती ॥१८०॥

अधिष्टित परिसरी त्याकाळी । सदानंद प्रवेशिले या मठस्थळी । आकाशातुनी पुष्पे वर्षिली निश्चळी । घंटा गजरे शंख भद्रघोषी गर्जिले ॥१८१॥

प्रदोष वेळा अस्तमानी । मंद वायु सुगंध वहनी । एका क्षणात मठस्थानी । प्राप्त झाले श्रीचरणे ॥१८२॥

आदी येवोनि सुमुखेश्वरा । आनन्दाम्नाय वहनी अधिकारा । लावीती तिलक रक्तांबरधरा । स्वये श्रीये आशीर्वादिले ॥१८३॥

मग आले परमपीठेश्वरी । आनन्दाम्नाय विज्ञान निर्भरी । जे त्रिपुर र्मदनी श्रीनाथे स्वकरी । आदिसरस्वतीशी स्थापीले श्रीपीठी ॥१८४॥

ती ते पूजोनि यथावत । मग श्रीगुरुदेव सिध्दांतपाद पीठी दर्शन घेत । गुरुदेव दत्तात्रये आशिर्वादित । ॐतत्सद मूलपदे ॥१८५॥

दक्षिणामूर्ति श्रीचरणे वंदिली आदरी । खाली उतरोनि आले गव्हरी । पाहिली व्यवस्था परिसरि । योजना सर्व यथावत ॥१८६॥

गव्हरांतरा माजी तीनही तारव । बांथविला असे सम्यक शुध्दठाव । ते पाहता सदानंद स्वामी स्वयमेव । पहीले तारवी प्रवेशिले ॥१८७॥

वैशांख शुध्द पंचमीस । गुरुपुष्य काळी प्रदोष । तारवी आसनी श्रीआज्ञे सरिस । विश्वकल्याण संकल्पिले ॥१८८॥

प्रथम तारवी मांडुन आसन । त्यावरी स्वामी विराजिले पद्मासन । बोले काय रामानंदा लागुन । ते परिसावी स्वानंदे ॥१८९॥

अरे रामानंदा ज्ञानखाणी । तू आपुले शिष्यास येथे ठेवूनी । तू जाय उत्तरदेश पट्टणी । आज्ञा माझी हीच असे ॥१९०॥

रामानंद म्हणे आपुले चरणी । सार्ध कोटीत्रय तीर्थे वर्तती अनुदिनी । या चरणापेक्षा तीर्थाटणी । तीर्थ नसे जी गुरुवर्या ॥१९१॥

आपुल्या चरणी सकल तीर्थ । आपुले चरणी पूर्ण परमार्थ । आपुलेच चरणी सच्चिदानंदपद उदित । यास्तव येथेच राहीन मी ॥१९२॥

आपुले चरण रेणुसमान । न तुके सप्तसागरीचे तीर्थ पूर्ण । मज पामरा लागुन । चरणी थारा पै द्यावी ॥१९३॥

आपुले चरणास होता विन्मुख । मजला केवि प्राप्त होईल श्रीकृपा सुख । आपुले चरणीच राहीन देख । हीच इच्छा पुरवावी ॥१९४॥

ऐसे विनविता शिष्य शिरोमणी । बोले काय सदगुरुखाणी । अरे पुढील भविष्य जाणोनी । सांगणे तुजला प्राप्त असे ॥१९५॥

अरे तेथे तुझेनी योगे । रक्षिले जाईल सर्व जगे । यास्तव तू जायी वेगे । अनुमान काही न करता ॥१९६॥

यापरि रामानंदास बोलून । मग आज्ञापिले धर्मगुप्ता लागुन । अरे समाधी तारवा माजी पूर्ण । पुढे भिंत पै उभवी ॥१९७॥

भिंत चढवा म्हणता सदगुरु । मनी गडबडला वाणीकुमरु । नेत्री भरले सप्रेम नीरु । चरणी लोळतसे अतिखेदे ॥१९८॥

मुखी विनवितसे हे सदगुरुराव । मी बोलिलो जी पाहण्या ठाव । आपण निरखिता मठ अभिनव । हे ची बोलणेचि अपराध मजलागी ॥१९९॥

आपुले पायीच आपण । घालुनी घेतला पाषाण । स्वहस्ते स्वसदनास हुताशन । लाविलासे पै अभाग्यपणी ॥२००॥

तरी आपण सदगुरु दयाळु । भक्त मी तो केवळ अनाथ बाळु । ही गोष्ट न व्हावी जी निश्चळ । भक्तवत्सला दीनबंधु ॥२०१॥

मग काय आज्ञापिले गुरुनाथ । यदर्थी तू आग्रह न करी परमार्थी । समाधी स्वरुपी चालेल मठ निश्चिति । स्वानंदयुक्त युगभरी ॥२०२॥

येणे तू जन्म जन्मांतरी । काय आराधिलास श्रीहरी । तेचि याजन्मी तुला निर्धारी । हा अलभ्य लाभ पै घडला ॥२०३॥

यापरी बोलून धर्मगुप्तास । रामानंदाकडे पाहूनी सहर्ष । म्हणे कासया रे उशीर करतोस । लवकर चढवी भिंतपुढे ॥२०४॥

रामानंद तो शिष्य शिरोमणी । रामानंद श्रीगुरुकृपा वाहे संजीवनी । कांहीच खेद न करता अंतःकरणी । ज्ञानसंपन्न आज्ञावाही ॥२०५॥

रामानंदाचा हाच अनुभव । आमुचा स्वामी तो स्वप्रकाश स्वयंमेव । स्वयंज्योति सदानंद निरवयव । पूर्णब्रह्म सनातन ॥२०६॥

ते आंतरि निर्गुण निराकार । भक्तास्तव होऊनी साकार । स्वचरित्र दाविती निर्धार । स्वानंदकंद सर्वात्मा ॥२०७॥

त्या माजी मग कैचा वियोग । तोचि भरलासे विश्वी वैभव । संपूर्ण जगाशी तारितो श्रीगुरुचरणी ठाव । सबाह्य भरुनी उरलासे ॥२०८॥

ऐसी त्या रामानंदाची स्थिती । यानी केवी करतील खंती । आज्ञा करिताच श्रीगुरु निश्चिती । पुढील सेवा अनुवाहिली ॥२०९॥

स्वामीस करुनी रुद्राभिषेक । नवीन नेसविले दिव्यछाटी सुरेख । केशर कस्तुरीसह पूजी विशेख । विधीय अर्चना करीतसे ॥२१०॥

कंठी घालितसे सुमनमाळा । मस्तक ठेवी चरणकमला । मुखकमल न्याहाळीत वेळोवेळा । धणी न पुरे रामानंदाची ॥२११॥

दोन्हीकडे लाविले दोन दीप । घृते भरली सतेज प्रकाशती अमुप । धूपदीप मंगलारती नैवेद्यासह अपूप । प्रार्थना प्रदिक्षिणी साष्टांगिले ॥२१२॥

यापरी पूजनी धर्मगुप्तही अर्चित । साष्टांगे वंदिती समस्त । बहुविध प्रार्थनी संस्तुत । सदानन्द श्रीचरणे ॥२१३॥

तेंव्हा श्रीरामानन्दा बोधिती । पुढील कार्यलंकरक्षणी सांकेती । सर्वस्व अर्पून तपादी लोकार्थि । रक्षावे धर्मदेशाशी प्रयत्ने ॥२१४॥

धर्मगुप्ता बोलती वरदहस्ते । अनाथ चित्ती मानू नका मनी विज्ञान वृत्ते । अमलानन्द सेवील मठक्रम आम्नाय सरिते । आंतरानुभूती संवाहील ॥२१५॥

तू सामोरी महाव्दरा एलीकडे । नित्य अनुष्ठानी सेवाधर्म घडे । श्रीदक्षिणामूर्तिसह दुसरीकडे । संजीवनीय समाधी साधावी ॥२१६॥

मठाचा क्रम । यथावत चालवी उत्तम । इये समाधि स्थानि पीठानुक्रम । आन चरणे येतील ॥२१७॥

ऐसी आज्ञा सदानन्द उभतास । शांतचित्ते बोधिले सौरस । इतर जनाही अशिर्वांदूनि भिंतीस । श्रीरामानन्दे पूरियले ॥२१८॥

तेव्हा पहावया येती लोक अमूप । ऐसे सिध्द होताती मूर्तीमंत चिद्रूप । रामानन्द चढवी तात्काळे लेवोनि दीप । मठानुशासन क्रम वाहति ॥२१९॥

स्वहस्ते चढवुनी भिंती । तारव बुजविते झाले निश्चिती । पूर्वापारी यथावती । पूर्ण केले बांधूनी ॥२२०॥

इतरा सारखे नव्हे ती समाधी । मेलियावरी मातीची बांधी । सदानंदाची सहज समाधी । कालत्रयी ते अजरअमर ॥२२१॥

सदानंद स्वामीची समाधी होऊनी जाण । झाले असती पंचसहस्त्र वर्षे पूर्ण । या कालपर्यंत जाण । ती मूर्ती बैसले असे ॥२२२॥

रामानन्द गुरुदेव आज्ञेत । युधिष्टिर संवती क्रम वाहात । व्दिसहस्त्री अष्टशत एकाहत्तर वरुषे विहित । क्षयनाम संवत्सरासी ॥२२३॥

येथवरी सदानन्द चरण । मुक्त गुहे करि युगा रंभण । मुक्तव्दारी तपाचरण । यथाक्रम सारीयलेती ॥२२४॥

सहजानन्द विधानी । सूर्यसिध्दात गणित वाहोनि । युगारंभीय दिनमान मोजूनी । विधान सिध्द परिलेखिले ॥२२५॥

दत्तानन्द यावेळी । तादलापुर मठास्तव निर्मळि । प्रयाण केले आज्ञा घेऊनि ते वेळी । तीच तिथी ही असे ॥२२६॥

शके सोळाशे तीन । दुर्मति संवत्सर जाण । वैशाख शुध्द सप्तमी दिन । प्रयाणिले श्रीआज्ञेत ॥२२७॥

त्याकाळी कल्याण स्थळी । लिला झाली गुरुकृपा कल्लोळी । ती अभिनव भक्तगण परिमळि । आनन्दाम्नाय विधानांशी ॥२२८॥

श्रीसदानन्द पीठविधानी । गुरुक्रम चालिले विशेष वहनी । रामानन्दा नुशासनि । यथाविध गुरुआज्ञेत ॥२२९॥

श्रीदक्षिणामूर्ति प्रथम । दत्तात्रेय दुसरे निगम । सदानन्द त्रितीय सुगम । अमलानन्द चतुर्थ कीं ॥२३०॥

जनार्दना पासोनी सेवांकन । श्रीधर भाग्वेतंद्र तेतीसावे चरण । प्रथम सहजानन्द विज्ञानासह गणन । एकेचाळीस बेचाळीसी परिगणिले ॥२३१॥

अपर सहजानन्द अलंकरण । षष्ठित्तम पीठसेवी विधान । पूर्णानंद ब्रम्हानन्द येणे क्रम जाण । यथाक्रम परिसेविले ॥२३२॥

काशिक्षेत्रासी दोन चरणे । त्यानंतर दत्तानंद पीठ सेवने । युगक्रमी संख्या लेणे । श्रीगुरुसेवे यथावत ॥२३३॥

यथाक्रम अनुसरुनी । पुढची लीला पीठासेवां विधानी । आनन्दाम्नाय अति पुरातनि । येणे कारणी विधान हे ॥२३४॥

हा क्रम श्रीरामानन्द अनुशासनी । सर्वही वहिले आजवरी सर्वानी । तुर्याश्रमी ब्रम्हचारी व्रतस्थ आजन्मपूर्णी । अधिकार सेवा गुरुआज्ञे वाहणे ॥२३५॥

पीठक्रम प्रमाण वहन । येथे संशय नाहि सत्य विधान । अधिकार संख्या बहु म्हणोन । आदद्यंत पाच नामे स्मरताती ॥२३६॥

पीठक्रम दिनमान प्रमाणी । मध्येच स्पष्ट केले क्रम वाहोनी । आता कथानुक्रम अवलोकनि । लक्ष देणे यथावत मूळकथे ॥२३७॥

बाहमनी राज्य मूळ स्थापन । कलबुर्गे प्रथम आरंभण । शालिवाहन शक बाराशे एकूण साठ दिनमान । वर्ष क्रमे परिवाहणि ॥२३८॥

त्याची कथा संक्षेपपणी । येथे कथिले म्हणोनी । तोची क्रम बोलोनि । पुढे जाऊ संक्षेपे ॥२३९॥

सदानन्द चरित्री स्पष्टपणी । आले असे कथा विशदपणी । येथेही संक्षेप स्मरणी । अल्प स्मृतीनी परिवाहू ॥२४०॥

राजा अत्यंत सात्विक । सत्यप्रीय दूरदर्शक । राज्य वाहता प्रांती प्रताप निर्वाहक । मृगये आरण्यी प्रवेशिला ॥२४१॥

मृगयेच्या गतीत वाहून । दूर आला सेना सोडून । व्यघ्रीचे बाळ पळून । गायीच्या स्तनी पीत असे ॥२४२॥

म्हणे मी हे काय पाहतो । माझ्या दृष्टीवरी विश्वास न ठेवीतो । पुष्कळ काळ निरखितो । विश्वास वळे एकाग्रपणी ॥२४३॥

धीर वाहोनि मनि । जवळी गेला स्तनपान स्थानि । ते व्याघ्र बालक पळाले तेथोनि । अती वेगे पळताहे ॥२४४॥

व्याघ्र बाळ अतिवेगे । धावोनि एक्या आश्रमी रिघे । राज्ञे अश्वारुढ प्रवेशिला आश्रमी परिघे । पाहतो दृश्या विशेषची ॥२४५॥

एक साधू जटामंडित । दिसत त्याच्या मांडीवरी बैसत । राजा मनी विचार करित । आणखी नवल हे ॥२४६॥

मानवाच्या मांडीवरी । व्याघ्र वत्स जीवनस्तरी । वाहतो नवल इये परिसरी । निर्वैर जीवित्व वाहताती ॥२४७॥

तो भाग नरावण क्षेत्रनामे । प्रख्यात आश्रम महिमे । साधु आश्रमी गाय व्याघ्र नांदती अगम्ये । नवल थोर जीवन हे ॥२४८॥

पाहोनि ऐसी नवलाई । साष्टांग वंदी साधूस ठायी । हात जोडोनि उभाराही । ध्यानी जाग्रत समयांशी ॥२४९॥

किंचित्काळ उभाध्यायी । याना आपण पाहिले पूर्वीही । स्मरतो जीवनस्मृति कांहीं । अठवली वेळा पूर्वीची ॥२५०॥

इतुकिया अवसरी मुनिवर । जागे झाले नित्य प्रकार । उभा पुढती पाहोनि मधुरोत्तर । बोलिले तयासी त्याकाळी ॥२५१॥

अरे इतुके दिन पर्यंत । काय केलासी जीवनी पुनित । म्हणता स्मृतिनि विदित । श्रीचरणे अत्यादरी ॥२५२॥

म्हणे देवा कृतार्थ करावे । जीवनी यातायात वहु परी धावे । शिणलो आता उध्दरावे । चरणशश्रयी घेवोनि ॥२५३॥

ऐसे विनवी अनन्य चरणी । राज्यांश इतरा सोपवोनि । कल्याण मठी यावे तुम्ही । सेवा करावी गुरुआज्ञेत ॥२५४॥

ऐशी आज्ञा वाहोनी । गेला कलबुर्गे राज्य नियमनि । पांच सरदारा राज्य समानपणी । वाटूनिया आपण निघाला श्रीसेवे ॥२५५॥

कल्याण वाटे चालता । दिंडी निघाली पंढरीसी भक्तिरता । त्या परिसरी प्रवेशिता । गोडी लागली भजानांशी ॥२५६॥

त्या दिंडी सोबत । राया आला पंढरीत । तेथे पाहे सर्वगत । नाना देशीय भक्ताशी ॥२५७॥

या भक्तिक्रमा वाहोनी । महाव्दारी उभाध्यानी । त्रयोदश रात्री वाहोनि । श्रीरंगी रंगलासे ॥२५८॥

त्यांनी तो अन्नोदक करुनी त्याग । ह्रदयी ध्यातसे पांडुरंग । श्रीरंग तो वसे त्याच्या अंतरंग । अंतरात्मा श्रीहरी ॥२५९॥

त्याचे पाहूती निकट निर्धार । काय करीतसे सारंगधर । विवेकसिंधु पुस्तक स्वकर । देऊनी तया आज्ञापीती ॥२६०॥

कल्याणी असे सहजानंद योगी । तेथे हे पुस्तक घेऊनी जाय वेगी । त्याच्या उपदेशी तुजलागी । पूर्णानंद प्राप्ती सहज असे ॥२६१॥

तो तरी उभा असे नेत्र झाकुन । त्यास भासे काय पाहतो स्वप्न । तेव्हा पाहतो नेत्र उघडून । तो जवळी पुस्तक सिध्द मिळाले ॥२६२॥

ते पुस्तक घेऊनी हाती । तेथुनी निघाला सप्रेम चित्ती । कल्याणास येता निश्चिती । स्वामी नसे त्या स्थानी ॥२६३॥

तेथील लोकास राये विचारीति । बोलती स्वामी गेले पंढरीप्रती । ऐसे वचन पडता श्रवणपंक्ति । परतुनी जातसे पंढरीकडे ॥२६४॥

तो पंढरीस जाता लागवेगी । स्वामी कल्याणीस आले दुसरे मार्गी । ते आंतरसाक्षीसी सहजानंद योगी । त्याचे भाव पाहती निर्धारणी ॥२६५॥

जेवी तृषार्त प्राणी । कासावीस करी उदका लागुनी । तेवी तो तापत्रयी तापुनी । निज सुखालागी हिंडतसे ॥२६६॥

पुनरपी येता कल्याणीसी । तेथे स्वामी असे स्वानंदेशी । तो पाहता तोषला मानसी । साष्टांग प्रणिपात पै वहिले ॥२६७॥

करुन साष्टांग प्रणिपाते । विनंती करी स्वामीते । कृतार्थ करावे मज दीनाते । म्हणून पुस्तक पुढे ठेवीत ॥२६८॥

पुस्तक पाहता निज दृष्टी । स्वामी काय करिती गोष्टी । अरे मठी नाही कामाठी । तू करशील का कार्याशी ॥२६९॥

नित्य रानास जाऊन । आणित जायी सरपण । हेची कामाठ्याचे कार्य पूर्ण । मठीय सेवे परिवाहि ॥२७०॥

त्याचे चित्त पाहण्या कारण । स्वामी आज्ञापिले त्यालागुन । तो तरी वैराग्य संपन्न । राजत्व सुखा त्यागूनि आला असे ॥२७१॥

ऐकता ऐसे आज्ञा वचन । मनी म्हणे तो आपण । भाग्यवंत नसे मज समान । सेवा मजला सहज घडतसे ॥२७२॥

नाहीतरी मी केवळ यातीहीन । केवी सेवा घडेल मज पासुन । यापरी अंतःकरणी तोषून । म्हणे हे कार्य करीन मी ॥२७३॥

हती कुर्‍ह वाहोनी । त्वरे निघाला वनाकारणी । काष्ठ संभारा एकत्र करोनि । भारा बांधि स्वहस्ते ॥२७४॥

भारा टाकोनि जलपान करीत । काष्ठे वहिले रांधणस्तरी यथावत । अन्नपूर्णम्मा नामे वृध्दास्थानी कार्या आवरीत । काष्ठे पेटविता ओली म्हणोनि काष्ठा दोषा दिले ॥२७५॥

दूसरे दिनी त्याच प्रकारे । तीही ओलीच निर्धारे । येणेविधी क्रम वावरे । नित्य विधी अयोग्यत्वी ॥२७६॥

वारंवार कामाशी नाडिले । ओलेपणी दूषण दीधले । राव म्हणे शोधूनि वाहिले । सर्वही आयोग्य नसतील कीं ॥२७७॥

रानी सर्वत्र धुंडोन । काष्ठे मेळविली पूर्ण । संपूर्ण काष्ठे अयोग्य विधान । कैसे केवी शक्यता उमजणे ॥२७८॥

हे संभाषण स्वामीनी । ऐकिले यथावत श्रवणी । म्हणे कार्यी निरभिमानता अनुभविणे । साधना विशेष अवधी असे ॥२७९॥

नित्यापरि आपण । काष्ठे आणिला पाकशाळे कारण । एक्यादिनी अल्पोपहार करिता जाण । धूर लोटला पाकशाळेत ॥२८०॥

वायुच्या रेटणी धुर । घोळू लागला सभोवार । राया त्रस्त झाला त्यास्तर । अतिव शिणला क्षणार्धे ॥२८१॥

मनी विचारी विवेके । सूज्ञपणी आपण सेवार्थी वाहतो सम्यके । क्षणात माझी गती झाली आनावरता विशखे । पूर्णपणे आपण अम्माशी पीडा दिली ॥२८२॥

हाच चुकीचा व्येवहार । विचार करोनि साचार । क्षमा मागे नानास्तर । चरण वंदोनि अम्माच्या ॥२८३॥

स्वामींनी तयाचा व्येवहार । अवलोकिले नेत्रभर । म्हणे आता सेवाधिकार । सफलपणे उपेगा आली ॥२८४॥

स्वामीनि यथावत । रायासी सामोरि ये म्हणत । पुस्तक कोठे आहे पाहू पुसत । पांडुरंग प्रसादनी ॥२८५॥

पुस्तक तयाकडून आणविती । श्रीगुरु पाहोनि पीठी अर्पिण्या सांगति । स्नान करोनि येण्या आज्ञापिती । श्रीगुरुसेवा परिवाहणी ॥२८६॥

बैसोनि आसनी । बोलाविले विप्रमंडला आमंत्रणी । विचारिती प्रायाश्चीत्त याविधानी । याशी शुध्द करोनि घेणे यथावत ॥२८७॥

सर्व व्दिजा समक्ष निहित । प्रायश्चित दिधले त्यास शास्त्रपूत । तीन वेळा अग्निकाष्टी विहित । दग्ध केले शास्त्र आज्ञार्थत्वी ॥२८८॥

अरे मृत्युंजया म्हणोनि । स्वामी हाकारिती भक्तास त्याक्षणी । अग्नीत दग्ध होत असता उठोनि । येवोनि वंदिला श्रीचरणांशी ॥२८९॥

सर्व विप्राही वंदि साष्टांगपणी । स्नान करोनि आला सेवा अलंकरणी । झोळी देवोनि नैवेद्यर्थ तत्क्षणी । भिक्षार्थी निघाला गुरुसेवेशी ॥२९०॥

तीनवेळा पूर्णपणी समग्र । अग्नीत दग्ध केला विप्र आज्ञे उग्र । उठोनि भिक्षा वाहविती गुरुसेवे व्यग्र । गुरुमार्ग सर्वश्रेष्ठ विधिश्रीये ॥२९१॥

याप्रकारी तयास अग्नित । दग्ध केले विप्र आज्ञेत । भिक्षा आणावया पाठवित । श्रीगुरुमठी नैवेद्यांशिनी ॥२९२॥

सर्वा समक्षत्वी अग्नीत । दग्ध करोनि भिक्षा वाहवीत । सर्वही म्हणती गुरुसेवेत । पावन झाला भक्तवर ॥२९३॥

ऐसी ही अघटीत सेवा । श्रीगुरु आज्ञेत वाहोनि पूर्णभावा । गुरुभक्त जाहला कैवल्य स्थानी आघवा । श्रीगुरु महिमा अमोघ हे ॥२९४॥

ऐशापरी सेवा करुन । योगचंद्रिका सिध्दसंकेत लिहिलासे स्वानुभवी निपुण । ती आजही आहे सरस्वती माहली यथावतपण । तयाचे चित्र येथे ठेवितसे ॥२९५॥

श्रीगुरुत्व अनन्यपणी । जो वाहीला एकाग्रमनी । तयास अप्राप्त नाही त्रिभुवनी । केवळ आज्ञा गुरुत्वी भूमंडळी ॥२९६॥

ही सेवा वाहून । नारायणपुरी समाधी संजीवन । घेवोनि अपूर्व आजही प्रमाण । गुरुतत्वांशी रंगलासे ॥२९७॥

त्याचे दोन शिष्य त्यासोबत । भवरैय्या मुदैय्या नामे विख्यात । तेही नारायणपुरी समाधीस्त । संवाहिली गुरुक्रमी ॥२९८॥

याहून आणखी वहूपरी । चमत्कार जाहले मृत्युंजयाच्या भक्ति निर्भरि । मुख्य गुरुसेवा सफल निर्भरी । अनमोल विधान जीवनिये ॥२९९॥

गुरुकृपा प्राप्त करणे । जीवनी दुर्मीळ उमजा विधाने । त्याच्या कृपेनी स्वये तरुन इतरा तारणे । मानव जीवनी श्रेष्ठ असे ॥३००॥

संस्कारातीत यातिहीन जरी । गुरुसेवा तत्परते वाहे धुरंधरी । त्या अनन्य भक्तीच्या आधारे निर्धारी । सर्वस्व लाभला मृत्युंजय ॥३०१॥

सहजानंद विधानी आणीक । कथा झाली असे पुनीत । कानीफ नाथाचा शिष्य म्हणवीत । तोही गुरुदर्शनी आला असे ॥३०२॥

कानीफ नाथाचा शिष्य अवघडनाथ । देशोदेशी अहंकारी व्याघ्रांवरी बैसोनि फिरत । कल्याणीस आला स्वामि भेटित । लोक कौतुके बोलती ॥३०३॥

स्वामीनी मुख धूवोनि माहाव्दारी । स्वामी सहज बैसले नित्याच्यास्तरी । व्याघ्रावरी येता पाहीले दूरवरी । माहाव्दाराशी आज्ञा करिती तात्काळ ॥३०४॥

संत येताती भेटण्यासी । आपणही चला जाऊ सामोरी व्यवहार प्रथेसी । अचेतन प्रस्तर सांकेताससी । पुढे सरके आज्ञां प्रकारी ॥३०५॥

भिंत सामोरी येता पाहुनी दृष्टी । लज्जित होउनी निजपोटी । व्याघ्रासि टाकून उठाउठी । वंदनी धावे स्वामींच्या ॥३०६॥

राजे बागसवार । तो नाथमार्गी पूर्णअधिकार । दुरुनी भूमि करुनी वंदितो निर्भर । सर्वस्व चरणी अर्पूनि उभा असे ॥३०७॥

जय जयाजी सहजानंदा । जगदोध्दारक स्वानंदा । नेणो महिमा तव पादारविंदा । आपुल्या दर्शनि सुखावलो ॥३०८॥

देशोदेशी पूजा घेऊन आलो । साधुसंतादि बहूत निंदिलो । परी ऐसा त्राता नाही देखिलो । जड प्रस्तरा सेवाअर्थी वाहविती ॥३०९॥

अनेक स्थळी हिंडलो । अभिमानी मूळ दृष्टी हरलो । दुर्मार्गी जीवना नाशिलो । स्वहितास मुकलो सर्वस्वी ॥३१०॥

आपुली महिमा अगाध असे । अभिमान गळाला नमना सरसे । आपण विश्वज्योतीर्मयि स्वयंप्रकाशे । ऐसी प्रचिती साक्षातिली ॥३११॥

तरी आपुल्या चरण सोडून । कदापि मी न जाय येथून । येथे राहीन आजीवन । हिची इच्छा मम ह्रदयी ॥३१२॥

महाद्वारीच्या झाडाझुडी । मी नित्य करीन आवडी । याविण अधिकार नसे अनाडी । ती इच्छा पूर्ण करावी ॥३१३॥

यापरी अनेक विनय वचनी । बोलता अनन्य निरभिमानी । स्वामी दयाळुमने पूर्णी । बोले काय त्यालागी ॥३१४॥

मी येथून सोडितो एक तीर । तेथेच तू राही माझे समोर । एक तिराचे अंतर । असावे म्हणता बहु संतोषला ॥३१५॥

अद्यापि स्वामीचे आज्ञे सारिखे । त्याची दर्गा असे सन्मुखे । श्रीगुरुपदाशी वंदोनी सम्यके । जीवन वाही गुरुचरणी ॥३१६॥

ऐसे कित्येक चरित्र । स्वामींचे नित्यचाले जगदोध्दारीय सत्र । मी तो मतीमंद पामर अरत्र । मजकडून वर्णन केवी घडे ॥३१७॥

ऐसीही गुरुपरंपरेची कथा । संक्षेपे वदलो अल्पाक्षरे निहिता । सहजानंद समाधि समयो पुनिता । क्षण विधानी साकारले ॥३१८॥

आनंदम्नाय पुरातन । यथावत चाललासे महान । भक्तोध्दारा वाहोन । परमकल्याण अभिवर्धिले ॥३१९॥

श्रीसहजानंद पीठ सेवेत । ही कथा असे विशेषपणी समर्थ । त्यांचा समाधिकाळ पुनीत । क्षण आला कालमानी ॥३२०॥

स्वामींचा शिष्यपरिवार । विस्तृतपणी व्यापिला दूरवर । परी अंतिमक्षणी हाकेस्तर । कोणीच स्थानी न मिळती ॥३२१॥

दूरवर वाट पाहून । पाचारिती विधवा अन्नपूर्णम्मा शिष्यासी स्मरुन । आयत्या वेळी उपसंपन्न । कोणीही हाके न आलेती ॥३२२॥

बहुवरी वाट पाहूनी । स्वामींनी उपस्थितासी बोलाविले सुचऊनी । म्हणती पुढील सेवेचे विधानी । रामानंदा नुशासनी परिवाहणे ॥३२३॥

श्रीअन्नपूर्णम्मा वृध्दा त्याक्षणी । स्वामी जवळी आली धाऊनी । पुसतसे कवण्या विधानी । शिष्यवर्गासी हाकारिलेती ॥३२४॥

द्वारी लगबगी तिला हाकारिती । आयत्या क्षणी स्थानी कोणीच न भेटती । क्षण आला असे निकट स्थिती । तूच येई इकडे हाके पाचारिले ॥३२५॥

स्वामींनी ऐसे बोलाविता । सहज येऊन वंदिले चरणी ऋता । स्वीय शाटीसी टाकिती तिच्यावरता । म्हणे स्नान करुनी येई वेगेसी ॥३२६॥

आज्ञा वाहोनि आडावरी । स्नान करुनी आली वृध्दा सत्वरी । चतुदर्श वर्षीय वयासी पुरुष शरीरी । प्राप्त केले गुरुआज्ञेत ॥३२७॥

पुढती घेऊनी विधिवत । तारक शांभवी मंत्रा उपदेशित । पूर्णानंद नामे दीक्षांशी योगपट्ट निहित । धर्मकर्मासी स्मरुनि अलंकरिले ॥३२८॥

तारक मंत्रोपदेश बळे । देहत्रयाही त्वरितची पालटिले । अति सुकुमार धवल शरीर वाहिले । रम्यपणी साकारिले अदभूत याति दर्शनी ॥३२९॥

सुकुमारता अतीव पाही । पाणी पीता कंठी दिसे धरा प्रवाही । नितळ त्वचा कोमलपणी देही । सर्वांग सुंदरपणी परिशोभले ॥३३०॥

हेच ते पूर्णानंद स्वामीऋत । जे निजानंदाचे गुरुपदासी वाहत । सर्वही वंदिती पीठाधिष्ठित । पूर्णानंद पदांकनी ॥३३१॥

पीठ क्रमांशी एकषष्ठी संख्या स्थान । सेवा केली त्रिशतवर्षे पर्यंत पीठ वाहून । अंती तिसर्‍या तारवी संजीवन । समाधि वाहिली गुरुआज्ञेत ॥३३२॥

अकलंक पुरीत स्वामी । नारायणानंद नगरेश्वरमठी महिमी । त्यांच्याच शिष्यात एकांत रामय्या प्रसिध्द गुणी । शिव साक्षात्कारी परिवाहिलासे ॥३३३॥

वंजरेकाठी निष्ठापुर । सेवा वाहती मठासहित उदार । लोककल्याणी परिसर । आनंदाम्नाय श्रेष्ठत्वी ॥३३४॥

निगडीकर घराण्यात । सहजपूर्ण निजरंग नामे उधृत । नाझरे कराची परंपरा येथ । श्रीधरस्वामी प्रसिध्द कीं ॥३३५॥

येणेस्तरी चहूदिशी । भक्तिज्ञान वैराग्य विधीशी । लोकोध्दारार्थ मार्गदर्शनांशी । पूर्णकल्याण वाहिले ॥३३६॥

आनंदाम्नाय पारंपरी । गुरुसांप्रदाय क्रमस्तरी । हनुमदात्मजे त्यांच्या कृपे निर्धारी । यथावत स्मरला तया अनुक्रमे ॥३३७॥

पूर्वनुस्मृतीच्या आधारे । माझ्या स्मृतीनुरुप दत्तानंदा क्रमे पुनर्लेखिले । अष्टादशाध्याय पर्यंत यथाप्रकारे । पूर्ण केले मंदबुध्दीत ॥३३८॥

इये पूर्व ग्रंथ शके सतराशे त्रेपन्नस्तरी । खर सवंत्सरी भागानगरी । बालबुध्दीच्या स्मृतिस्तरी । पूर्ण करोनि राहिलो असे ॥३३९॥

परी मानसी समाधान । न वाहिले मन प्रसन्न । आणखी हा ग्रंथ कल्याणी नेऊन । मूर्ती पदाब्जी अर्पावी ॥३४०॥

त्या स्तरी मनासी । समाधान होईल संकल्प विधीशी । म्हणोनि ठरविता तीन वरुषी । काळ गेला विचारणीत ॥३४१॥

निश्चय करोनि कल्याणमठी । आलो तीन वर्षाच्या शेवटी । मूर्तीच्या पदी ग्रंथ वाहिलो नेटी । रात्री दृष्टांताशी अनुभविलो ॥३४२॥

श्रीपूर्णानंद मूर्ति झगमगीत । स्पष्टपणी आज्ञा करित । म्हणे यातील तीन अध्याय प्रतिलेखूनी त्वरित । पूर्णकरी रे भक्तवरा ॥३४३॥

सोळावा अध्याय दत्तानंद क्रमात । सत्रावा अच्युत अनंती लेखनी उधृत । अठरावा ब्रम्हानंद शिवानंद शब्दी उधृत । पूर्ण करणे यास्तरी ॥३४४॥

म्हणोनि पुस्तकाचे स्थान । प्रत्यक्ष दाखविले कृपावहन । उठोनि त्या ग्रंथासी संपादून । प्रतिलेखन स्तरी पूर्णकेले ॥३४५॥

तयावरी तीन पारायण । प्रायश्चित्तार्थ केले वाचन । चारणी वाहता पुन्हा स्वप्न । त्याच मूर्तीनी प्रसादिले ॥३४६॥

प्रत्यक्ष तुलशी आणि गंध । साक्षात मिळाली मजला पदारविंद । अतिव समाधानी मनी स्वानंद । भरुनी पावलो कृपांशी ॥३४७॥

अज्ञानपणी सेवेत चुकता । पूर्ण करोनि घेतले आज्ञेनिशी यथावता । मनःशांति वाहिलो पूर्ता । आंतरमनी गुरुप्रसादे ॥३४८॥

आज शके सतराशे छप्पन्न । जयनाम संवत्सर पूर्ण । वैशाख शु . त्रितीया पूण्यदिन । व्दितीय लेखना पूर्ण केले ॥३४९॥

व्दितीय ग्रंथ वडील घरी । तिम्मण दीक्षिताशी वगदळ परिसरी । अर्पण करोनि तिसर्‍या ग्रंथा आपुल्या घरी । पूर्ण प्रसादे परिवाहिलो ॥३५०॥

या दिव्य मूर्तीचा प्रसाद । साक्षात समाधानी वरासह पावलो सुखद । गुरुमार्ग शुध्द संजीवनी स्तर । पूर्णपणे अनुभविलो ॥३५१॥

या महासेवेतुनी ग्रंथ स्वये प्रतिलेखनी । कल्याण पूर्णानंद मठी मूर्तीच्या चरणी । ऐश्या काया वाच्या मनी । परमानंदे अर्पियलो ॥३५२॥

हनुमदात्मज श्रोतयासी । अनन्यपणे प्रार्थी विशेषी । कृपापूर्ण स्तरी सेवेशी । सांगूनि संधी दीधले कीं ॥३५३॥

तेणे साक्षात्कार पूर्ण । प्रसाद कृतीसरशी स्वीकारिले अनन्य । अजिच्या जिवनी जन्म धन्य धन्य । परम समाधानाशी पावलो ॥३५४॥

ही प्रति लीपीका । पूर्णानंद आज्ञेत केले समर्पका । सत्यानुभ्दूतीच्या सुखा । स्मरुनि उरलो कृपांकित ॥३५५॥

हा ग्रंथ पूर्ण । तेणे माझे जीवन धन्य । परम कृपे संतोष विधान । पूर्णःपूर्ण परिवाहिलो ॥३५६॥

चुकल्या भक्ता सांभाळिले । गुरुमार्गी मज वाट दाविले । कोण स्मृतीनी उतराई स्थळे । होणे न होणे ऋणानुबंधी ॥३५७॥

शब्दातीत मौनपदी । अर्पितसे जीवन निगदी । सांभाळिले सत्य अनुबंधी । नमो नमस्ते जगदगुरो ॥३५८॥

तूझ्या मार्गदर्शनी । तुझ्याच आज्ञा विधानी । तुझ्या कृपेच्या अनुवहनी । धन्य झालो गुरुवर्या ॥३५९॥

श्रोते तुमच्या कृपाबळे । आजीचा हा दिन सेवेत उदेले । ऐशीच कृपा असोद्या निर्मळे । हनुमदात्मज चरणी वंदितो ॥३६०॥

पूर्णानंद चरित्र अगम्य महान । हनुमदात्मजा करुनी निमित्त आजिचा दिन । त्याच्याच आज्ञेत जीवन । वाहवितसे प्रतीतोध्दरणी ॥३६१॥

सदानंदा अनन्यपणी । ही प्रतिलीपीच्या मनःपूतपणी वाहिली । जेणे माझी जन्मकुळी । तरलो पूर्ण गुरुकृपे ॥३६२॥

सदानंदा नमोनमो । पूर्णानंदा जीवन धर्मो । सेवेत उध्दरिले अनुभव निगमो । हनुमदात्मज परिवाही ॥३६३॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद कृपे प्रीति पात्र । त्याच्या आज्ञेच्या सूचनी सूत्र । शोडशोध्याय गोड हा ॥३६४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP