श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय अकरावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरुभ्योनमः । जयजय पूर्णानंदा पांडुरंगा । निष्काम पंढरपूर निवासा श्रीरंगा । चित्तचालका सर्वांतरंगा । अंतरात्मा सर्वेशा ॥१॥

विज्ञान भीमातीरी । विराजसी तू सहज विटेवरी । अद्वय भजनाचे गजरी । सदभक्त नाचती तवछंदी ॥२॥

चिद्रत्न कीरिटाची शोभा फार । अभेद कुंडल मकराकार । स्वानंद कौस्तुभाचा हार । अखंड झळके तवकंठी ॥३॥

प्रेमबुक्केचा तिलक भाळी । अखंड चिंतन तुळशीमाळा झळाळी । संकीर्तन नर्तन भक्त गर्जती आरोळी । निजपद देसी अविलंबी तया ॥४॥

समपदाची होत भेटी । जीवशिव भेदाची होय संपुटी । ब्रह्मानंद सुखासी लुटी । सुफलामार्ग भवपंथीया ॥५॥

तू निर्गुण निराकार । सदभक्तास्तव साकार । होसी तू दिगंबर । सहजानंदी अंतरंगांशी ॥६॥

दहा अध्याया पर्यंत । तुझे चरित्र अदभूत । वदविलासी निश्चित । पूर्णानंदा लक्ष्मीश्वरा ॥७॥

पुढील कथेचे कथन । तूच करविसी कृपाघन । तुझे चरणांघ्रीचे ध्यान । अखंड जडो ह्रत्कमळी ॥८॥

दशमोध्यायीची कथा कल्लोळ । पूर्णानंद होऊनी कुटुंब वत्सल । कल्याणी राहिले अचलस्थळी अढळ । ते परिसलेती स्वानंदे ॥९॥

पुढील कथेचे अनुसंधान । ते ऐकावे एकाग्रमन । तुम्ही अवधान देता पूर्ण । सहज चरित्र वाढेल ॥१०॥

असो महाराज पूर्णानंद । निज पुत्रास पहाती आनंद । पुत्र जो सच्चिदानंद । पूर्णावतारी शिवराम ॥११॥

शिवराम स्वामीची स्थिती । ती ऐकावी सदभाव चित्ती । ऐकता हरे संपूर्ण भ्रांति । विश्रांतिकारक स्थान विश्वाचे ॥१२॥

महाराजास पाच वरुषे लोटली । लोक म्हणती वाचा न फुटली । त्याची निज समाधी आंतर पटली । हे काही लोका कळेना ॥१३॥

जेथे सहज विसावले तेथेच बैसती । तया उठविल्यावीण स्वामी न उठती । भक्त बोलविता तिकडे पाहती । ऐसी स्थिती त्याची असे ॥१४॥

हस्तामलकाचे परिसदा । असे समाधी माझारी महासंपदा । आप्तइष्ट बोलविति परोपरी स्वानंदा । ऐकोनि उगे राहताती ॥१५॥

कदा काळीही रडेना । कदापीही बाळ हसेना । आपुले निज सुखामाजी जाणा । विलीन असे सर्वस्वी ॥१६॥

गोदुबाई बोले पित्यालागुन । हे काय बाळाचे लक्षण । अद्यापी न निघे मुखी वचन । उपनयन तरी केवी करावे ॥१७॥

यास नसे वक्तृत्व । वाचे वाचुन द्विजत्व । केवी येईल सर्वस्व । हीच आम्हां चिंता असे ॥१८॥

ब्राह्मणास मुख्य गायत्री । तीच नये याचे वक्त्री । यास उपनयन सूत्री । केवी संस्कार येईल ॥१९॥

ज्यास नसे तहान भुकेचे ज्ञान । नसे मायबापाची खुण । पाच वर्षे लोटली यालागुन । अवतारी आपण केवी म्हणता ॥२०॥

मुखी म्हणता अवतारी । एक गोष्ट न बोले वैखरी । लोक बोलती नानापरी । चरित्र याचे केवी कळे ॥२१॥

आपणास सदगुरु समर्थ । आपुले बोलणेचे अर्थ । आम्ही केवळ प्राकृतार्थ । तरी केवी होईल ॥२२॥

आपुले चरित्र आपण जाणे । इतरास नकळे विंदाणे । आपण पूर्णब्रह्म सनातने । आपणास पिता म्हणणे न साचे ॥२३॥

आपण साक्षात सर्वेश्वर । साकार असता निराकार । न कळे आपुल्या चरित्र थोर । प्राकृत लोका कैसे कळणे ॥२४॥

आपुली कृपा होईल जरी । तरीच फुटेल वाचा वैखरी । लोकास कळेल हा पूर्ण अवतारी । प्रकट होईल जाणावे ॥२५॥

यास न लगे कांही सांगणे । नलगे कांही शिकवणे । नलगे कांही वाचणे । वाचेपरता हा विज्ञानघन ॥२६॥

याचे काही चरित्र । मज न कळे निर्धार । पुढे केवळ सर्वत्र । तेही तू पाहशील ॥२७॥

यास नलगे दिवस फार । प्रगट करतील अवतार । ते पहाल निजनेत्र । हर्षीत मने करोनि ॥२८॥

ऐसे आज्ञापिता पूर्णानंद । जे पूर्ण अवतारी स्वानंदकंद । गोदूबाईस न समाये आनंद । सर्वांग संतोषे डोलती ॥२९॥

आधी गोदूबाई । नवस केली पांडूरंग पायी । बंधूस वाचा फुटता येईन पायी । आणून घालीन चरणी वाहीन ॥३०॥

ऐसे बहिणीचे अंतःकरण । जाणतसे शिवराम आपण । नवसास देऊन मान । मौन आपुले विसर्जिले ॥३१॥

विसर्जुनी समाधीसुख । बोलू लागले हरिख । ऐकता त्याची गोष्ट देख । बहिणीस आनंद न समाये ॥३२॥

हरिखोनी बोले मातेप्रती । यास नेईन पंढरीस पायीद्रुती । पायी घालीन श्रीपती । नवस आधी तेथे पुरवीन ॥३३॥

माता बोले प्रतिउत्तर । वडिलांचे आज्ञा घेइ त्यानुसार । करणे असे निर्धार । विचारा आधी पुसावे ॥३४॥

पुसता पूर्णानंदराज । बोले उपनयन जाले पाहिजे । उपनयन होता सहज । मग पंढरीस पै जावे ॥३५॥

ऐसे बोलता पूर्णानंद । गोदुबाईस वाटले आनंद । जिची वृत्ती सदानंद । पूर्णानंदाचे दयेने ॥३६॥

बापु शास्त्रीही राहिले तेथ । त्यानी विचार करी निजमनात । गोदूस दिधले मात । मज कडून इजला सुख काय ॥३७॥

मजला प्राप्त असे वृध्दाप । इहलोकीचे इला काय सौख्य । परलोकतरी होय निश्चयेस । ऐसा उपाय करावा ॥३८॥

यापरी विचारुनी मनी । शास्त्री आरंभिले तिज लागुनी । कृपा उपजता त्यांचे अंतःकरणी । सहज तिजला प्राप्त जाहले ॥३९॥

व्याकरण न्याय वेदांत । कृपा करिता बापु पंडित । तिजला जाहले प्राप्त । अविश्रामी योगे करोनिया ॥४०॥

आधीच पूर्णानंद उदार समुद्री । जन्मली तिची जळलहरी । त्यावर कृपा करिता शास्त्रीस्तरी । ज्ञान अदभूत तिजला प्राप्त जाहले ॥४१॥

धन्य ती पतिव्रता शिरोमणी । पती सेवेसी अनुकुल निशिदिनी । निज पतीसेवे वाचुनी । कांहीच तिजला नावडेची ॥४२॥

कुलस्त्रियेचे अनुष्ठान । सदा चाले पती आज्ञा प्रमाण । पती संकटी वेची प्राण । सर्वस्व आवडे पतीसेवा ॥४३॥

सुपुत्र पूजावा मातापिता । कुलस्त्री पुजावी निजकांता । ग्रहस्थ पूजावा अथित अभ्यागता । यापरी आगमी नीती असे ॥४४॥

सकळ आगमार्थ कथन । तिजला घडलासे श्रवण । ऐसे जाणून वेदवचन । सदा करितसे पतीसेवा ॥४५॥

सर्वस्व करुनी पतीसेवा । प्रसन्न केली पतीसी सदैवा । सेवेमाजी प्रेम नितनवा । चढत चालिले तिजलागी ॥४६॥

यापरि करुनी सेवा पूर्ण । संपूर्ण केला शास्त्राध्यायन । सगर्भ भाषार्थ ज्ञान । सहज जाहले तिजलागी ॥४७॥

तिजला ऋतु प्राप्त जाल्यावरी । आणखीन चार संवत्सर राहिले शास्त्री । मग गमन केले वैकुंठ मंदिरी । आयुष्य सरता ते काळी ॥४८॥

त्यांनी गेले वैकुंठ भूवन । हेही खेद नसे तिज लागून । जे दृष्य त्याचे सरतेपण मरण । हे ज्ञान तिजला दृढ असे ॥४९॥

सदा करावे श्रवण मनन । पूर्णानंदी सुखे अनुभूतीगहन । तेणे चित्तवृत्ती समाधान । करुनी राहिली निजबोधी ॥५०॥

निजबोधी ठेविली चित्तवृत्ती । तिजला कैंची अगमनि गमाची खंती । निज ज्ञाने स्वानुभवी रमती । ती सती राही स्वरुपी परिपूत ॥५१॥

तिचे नाम असे गोदा । जिची ज्ञानास नसे मर्यादा । श्रवण मनन हाचि योगछंदा । त्याविण तिजला कांही न आवडे ॥५२॥

ऐसी तिची सहज स्थिती । सहज तिजला प्राप्त असती । सदा भोगिती वैराग्य अनुभूती । ज्ञानकळा पूर्ण उन्मनी ॥५३॥

शिवराम स्वामींचे उपनयन । पूर्णानंद करीतसे स्वानंद करुन । जे अवतरले लोकोध्दारा कारण । प्रत्यक्ष शंकर जगामाजी ॥५४॥

महाराजांची स्थिती पूर्ण । सदा असत निजमौन । सहज समाधिसुख पूर्ण । पूर्णानंदे भोगितसे ॥५५॥

पूर्णानंदास कळली ती खूण । इतरा सरिसे नसे मौन । जे ज्ञानानंद विज्ञानघन । कल्याणकारक निजवृत्ती ॥५६॥

असो गोदूबाई विनंती । काय केली पूर्णानंदाप्रती । ते ऐकावी एकाग्रचित्ती । पूर्णानंद पूर्णकामी ॥५७॥

जय जय पूर्णानंदा पूर्णकामा । तू भक्तकाम कल्पद्रुमा । आज्ञा जालिया शिवरामा । पंढरीस घेऊन मी जाईन ॥५८॥

नवस करिता पंढरीनाथे । पुरविले त्या दीनानाथे । तेणे नवसे शिवराम वचनी अपित । वाचा फुटली ब्रम्हवाहिनी ॥५९॥

चौ वाचातीत ते निरंजन । चौ वेद वर्णिती जाहले मौन । चौ मुखाचा पिता पूर्ण । त्याचे दर्शना नेईन मी ॥६०॥

चौदा विद्या चौसष्ट कळा । त्यातून उफाळे त्याची लीळा । ऐसा तो पूर्णानंद पुतळा । त्याच्या दर्शना नेईन मी ॥६१॥

चौवेद ज्यास वर्णिता भागली । सहा शास्त्रांची मती खुंटली । अठराही पुराणे मौनावली । त्याच्या दर्शना नेईन मी ॥६२॥

उत्पत्यादी व्यवहार । ज्याच्या मायेचा बडिवार । तिसही न कळे लीळा निर्धार । ऐश्या प्रभूदर्शना नेईन मी ॥६३॥

जे देह चतुष्टय चाळक । शशि आदित्यासीही प्रकाशक । स्वयंज्योति निष्कलंक । त्याच्या दर्शना नेईन मी ॥६४॥

ज्यास म्हणती श्रीपांडुरंग । भक्तवत्सल भवभंग । सर्वांतरात्मा श्रीरंग । त्याच्या दर्शना नेईन मी ॥६५॥

निष्काम पंढरपूर । तेथे विराजे सहज विटेवर । ज्ञानाभि मानासी वाहे निरंतर । तो अंतरंगीय श्रीविठ्ठल ॥६६॥

त्यास पाहून म्हणती सहज । सहजानंद होय निगम बीज । ऐसा तो श्रीगरुड ध्वज । बंधूस पायी घालीन मी ॥६७॥

ऐकता ऐसे काव्य वचन । आनंद जाहले पूर्णानंद मन । बोले काय प्रतिवचन । ते ऐकावे स्वानंदे ॥६८॥

ऐक गोदू माझे वचन । आता याचे जाले उपनयन । द्विजत्व प्राप्त जाले या कारण । तरी अध्ययन पै व्हावे ॥६९॥

यास्तव सांगतो अध्यायन । अध्यायन जालिया वरुन । मग पंढरीस जावे घेऊन । स्वानंद मुक्त ते काळी ॥७०॥

यापरि बोलोनि कन्येसी । अध्यायना प्रारंभिले महाराजासी । जो अवतारी पुरुष ज्ञानराशी । प्रत्यक्ष शंकर अवतरले ॥७१॥

एकदा सांगता जाण । दुसरे वेळेस दाखवावे म्हणून । ते अवतारी पूर्ण । अगाध स्मृती त्यालागी ॥७२॥

एकवार होता गुरुमुखे । दुसरी उद्धारणी म्हणती स्वानंदसुखे । या गोष्टीनी पूर्णानंद अति हरिखे । सर्वत्रासी अत्यानंद ॥७३॥

यापरि होता अध्ययन । शास्त्रही आरंभिले तयालागुन । मग गोदू पूर्णानंदास प्रार्थून । पंढरीस प्रयाण पै केले ॥७४॥

समागमे घेऊन शिवराम । जो भक्तकाम कल्पद्रुम । निघती जाली सप्रेम । पुरुषोत्तमाच्या दर्शनी ॥७५॥

येताच स्वानंद पंढरपुरी । निज भक्तयाचा माहेरी । अद्वय भजनाचा गजरी । अखंड होतसे त्यास्थळी ॥७६॥

महाराजासी नेता देऊळी । मस्तक ठेवोनी चरणकमळी । अर्पिते जाले वाकपुष्पांजली । ते परिसावे सप्रेमे ॥७७॥

जय जयाजी केशवा । मत्स्यावतारा नारायण देवा । नरकासुर संहारी माधवा । मंगलायतना गुरु शिवरुपा ॥७८॥

परमेशा गोविंदा गोवर्धन धारणा । गोरक्षका गोपी मनमोहना । गोरसचौरा चैतन्यघना । श्रीअवधूता दयाळा ॥७९॥

अनादि विष्णु कृष्णा यदूभूषणा । कनकांबरा कैभट भंजना । ज्ञानां जनातीत तू निरंजना । सदानंदा सर्वेशा ॥८०॥

मधुसूधना मदन जनका । मणिमय किरिट धारका जगत्पालका । शिशुपाळातंका सुखकारका । ह्रदयार्भिरामा आनंदमूर्ती ॥८१॥

त्रिविक्रमा त्रितापशमना । त्रिभेदातीता त्रैलोक्य पावना । त्रिपुरारी प्रिया श्रीवामना । मत्स्यरुपा चिन्मया ॥८२॥

जय श्रीधरा श्रीनिवासा । श्रीनिकेतना राधा विलासा । ह्रषिकेशा चिद्विलासा । गुण गंभीरा अभंगा ॥८३॥

पद्मनाभा पद्मश्रिया । भक्तह्रत्पद्मा निगमसूर्या । पद्मनयना परमानंद निलया । ब्रह्मानंदा श्रीपांडुरंगा ॥८४॥

दामोधरा दानवांतका । संकर्षणा साम्राज्य दायका । सायुज्य निलया चित्तचालका । सहजानंदा कल्याणमूर्ती ॥८५॥

वासुदेवा जगन्निवासा । वासुदेवानंद नंदना श्रीनिवासा । श्यामसुंदरा स्वप्रकाशा । पूर्णब्रह्मा सनातना ॥८६॥

प्रद्युम्ना आत्मानंदा । अनिरुध्दा सच्चिदानंदा । पुरुषोत्तमा स्वानंदकंदा । पूर्णानंदा लक्ष्मीवरा ॥८७॥

अधोक्षजा अक्षयरुपा । नारसिंहा अच्युत स्वरुपा । रुपनामातीत चिद्रुपा । जनार्दना जगदात्मया ॥८८॥

उपेंद्रा इंदिरावरा । श्रीहरी करुणा समुद्रा । श्रीकृष्णा जगदोध्दारा । सहजानंदा सचिन्मया ॥८९॥

पूर्णब्रह्मा पांडुरंगा । भक्तवत्सला सर्वांतरंगा । सर्वातीत तू श्रीरंगा । श्रीविठ्ठला नमोस्तुते ॥९०॥

यापरि स्मरोनि वनमाळी । अनन्य मस्तका वाहिली निजमौळी । मूर्ती पाहता सावळी । वृत्ती तन्मय पै जाली ॥९१॥

पाहताच शामसुंदरा । मदन मोहना रुक्मिणीवरा । चालिल्या प्रेमांबुधारा । महाराजांच्या त्याकाळी ॥९२॥

स्वरुपी रंगली वृत्ती । संपूर्ण हरपली चित्तवृत्ती । सहज राहिली स्तवन स्तुती । स्वानंद सागरी निमग्न ॥९३॥

निमग्न होता स्वानंदसागरी । सप्रेमाची उठती लहरी । अद्वय भजनाच्या गजरी । प्रसन्न होतसे श्रीविठ्ठल ॥९४॥

प्रसन्न होऊन घननीळा । प्रसाद देतसे सुमनमाळा । ते पाहताच महाराजांचे गळा । लोक आश्चर्य पै करिती ॥९५॥

पाहती कंठी सुमनहार । त्याचा सुवास न माये अंबर । प्रसन्न होवोनि रुक्मिणीवर । स्वलीळी प्रसादिले भक्तार्थ ॥९६॥

माळा पडता कंठी । ते न पडे कोणाचे दृष्टी । या गोष्टीचा आनंद पोटी । न समाये तेव्हा बहिणीसी ॥९७॥

बहिण निजमनी विचार करी । हा बंधू माझा पूर्ण अवतारी । पूर्णानंद बोलिले ती गोष्ट खरी । प्रचितीस आज पै सत्य झाले ॥९८॥

हा अवतारी जरी न होता । हा प्रसाद प्रत्यक्ष श्रीहरी न देता । समस्ताची दृष्टी चूकवूनी तत्वता । श्रीअनंतेमाळा पै घातली ॥९९॥

या गोष्टीचे आश्चर्य बहिणीसी । आणि समस्त लोकासी । होत असता म्हणती तेजोराशी । हा चित्कळि कोण आहे कळेना ॥१००॥

ऐसे एकमेका बोलती । महाराजांचे मुखा न्याहाळिती । वारंवार गुणवर्णिती । स्वानंदयुक्त त्यामेळी ॥१०१॥

यापरी लाहून वरप्रसाद । बाहेर निघती स्वानंद कंद । रंग मंडपी कीर्तन छंद । पाहताच श्रवणार्थ पै बसती ॥१०२॥

रंगमंडपी रुक्मीणीपंत । जे चतुःशास्त्री पंडीत । पांडुरंग ज्याच्या वेळाईत । ऐसा भक्त शिरोमणी संप्रेक्षिती ॥१०३॥

ऐसा हा अधोक्षज । सुप्रसन्न ज्यास गरुडध्वज । त्याचे कीर्तनी महाराज । सहज येऊन पै बसती ॥१०४॥

गोदुबाईस हर्षयुक्त । सप्रेम बोलती करु श्रवण पूर्त । कीर्तन करिती वेदांत ध्वनित । स्वानंद चित्ती पै बसले ॥१०५॥

यापरी होत असता गजर । कीर्तनी निघाला प्रमेय शास्त्र । ते पूर्ण न सांगता प्रमेया अन्यस्तर । बोलता गोदू पुसे त्यालागी ॥१०६॥

आपण पंडीतराज शिरोमणी । ज्ञानसागर चिदरत्न खाणी । प्रमेयास पुर्ण विवरुनि कीर्तनी । मग इतर विधाना बोलिजे ॥१०७॥

तरी हा शास्त्रविषय । त्याचे करावे संपूर्ण निर्णय । ज्याचे खंडणी होयील सकळ निःसंशय । श्रोतियाचे याकाळी ॥१०८॥

यापरी गोदू बोलून । त्याच विषयाचे मूळ प्रश्न । तेंव्हा निरविले समापण । न करिता अन्योन्य शब्दवाही ॥१०९॥

त्या प्रश्नाचे जे समाधान । त्याचे न होता परिपूर्ण मंथन । मता मतांचे विवरण । स्त्री दिसे परि ज्ञानी ही अदभूत ॥११०॥

माझीया बोलापुढे । ऐसा कोणी नसे तोंड उघडे । इचा प्रश्न अती प्रौढे । ही काय कर्णी श्रीहरीची ॥१११॥

यापरि विचार करुनी मनी । अपादी निरखिले तिजलागुनी । तो केवळ तेजस्वी ज्ञानखाणी । पाहोनि विस्मित पंडितासी ॥११२॥

त्याची पाहता मौन स्थिती । यिही मौन वृत्ती राहती । कांही न बोले त्याप्रती । सहज श्रवण करिताती ॥११३॥

महाराजास पाहता तिज जवळी । जे प्रत्यक्षचि अवतार चंद्रमौळी । त्यांचे तेज पाहून नेत्र कमळी । पंडीत विचार मनी करितसे ॥११४॥

हा बाळ दैदिप्यमान । तेज ज्याचे सूर्या समान । ही बाईही असेल कोण । शोध याचा करावा ॥११५॥

ऐसा विचार निजमनी । करीत असता कीर्तनी । कीर्तन समाप्त करुनी । जाते जाले स्वस्थानी ॥११६॥

तेच रात्री पंडिताचे स्वप्नी । प्रत्यक्ष प्रगटून चक्रपाणी । काय आज्ञापिले त्यालागुनी । ते परिसावे भाविक हो ॥११७॥

अरे पंडिता सदभक्तखाणी । तुज प्रश्न केले जे कीर्तनी । ती कोण आहे हे निजमनी । ओळखिले काय ते सांग ॥११८॥

तिज जवळी होता जो बाळ । तो शिव अवतारीच केवळ । म्हणोन ही मम कंठीची माळ । स्वहस्ते त्यासी पै दीधली ॥११९॥

ती सती असे ज्ञानकळा । तो बाळ साक्षात कर्पूर धवळा । लोकोध्दारणास्तव या भूतळा । अवतार त्यांचे जाणावे ॥१२०॥

त्यास मानव मानू नये । ते अवतारीच निश्चये । त्यास तू निज निलये । नेई आदरे करोनि ॥१२१॥

यापरी पंता प्रती । आज्ञा करिता श्रीपती । त्यानी विस्मित होऊन चित्ती । म्हणतसे कोठे असतील ॥१२२॥

इकडे गोदूबाईचे स्वप्नी । आपणच प्रगडून शारंगपाणी । काय आज्ञापिले प्रेमवाणी । स्वानंदयुक्त ते काळी ॥१२३॥

रुक्मीणीपंत येतील तुम्हापाशी । त्यांनी विनवीतील तुम्हासी । ते परिसोनि निज मानसी । शिवरामासी न्यावे त्याचे घरा ॥१२४॥

तेथून शिवराम चरित्र सूर्य । स्वानंद पूर्वेस होईल उदय । तेणे अज्ञान तम निश्चय । हरेल बहुत लोकांचे ॥१२५॥

शिवराम चरित्र सुधाकर । उदय होता निर्धार । तेणे वर्षिता प्रेमामृत परिसर । द्रवतील मुमुक्षु चंद्रकांती ॥१२६॥

त्यांच्या कवित्वाची पुष्पवल्ली । घवघवीत पसरेल भूतळी । त्या मकरंदाचे कल्लोळी । गुंजारव करतील संत भ्रमर ॥१२७॥

त्या मकरंदा सेऊन मुमुक्षु वृंद । सप्रेमे लुटतील अद्वयानंद । अवतारी असे सच्चिदानंद । त्याचा प्रत्यय लोका होईल सत्यत्वी ॥१२८॥

ऐसी श्रीहरीची वरदवाणी । स्वप्नी पडता बहीणीचे श्रवणी । झोपीतून उठोनी । बंधूस आलिंगिली निज ह्रदयी ॥१२९॥

दुसरे दिवशी प्रातःकाळी । रुक्मीणीपंत पातले यांचे स्थळी । सांगते जाले वर्तमान सकळी । स्वामी श्रीरंगे जे आज्ञापिले ॥१३०॥

आमचे राहणे विजापुरी । तुम्ही येऊनी आमुचे मंदिरी । पवित्र करावे निर्धारी । यापरि पंते म्हणीतले ॥१३१॥

ते ऐकून गोदूबाई । पंतास बोले काय ते समयी । अगाध असे तुमची कमाई । श्रीविठ्ठल तुमचे वेळाईत ॥१३२॥

तुम्ही केवळ भगवदभक्त । तुमचे दर्शनी लोक होती तृप्त । ज्याचे भाग्य अति अदभूत । त्यावरी तुमची कृपा होय ॥१३३॥

तुम्ही पंडितामाजी शिरोमणी । श्रीरंग डुलतसे तुमचे कीर्तनी । अगाध हिवेळा आजिचे दिनी । दर्शनी लाभ पै घडली ॥१३४॥

यापरी प्रार्थुनी उभयतासी । स्वप्नी पाहिले निश्चयेसी । स्वये श्रीरंगे मजशी । आज्ञापिले जी समर्था ॥१३५॥

आपण केवळ पंडीतराज । कृपा करिता बंधूस निर्व्याज । विद्यापूर्ण होईल सहज । सहजा सहजी तुमचेनी ॥१३६॥

ऐकून गोदूबाईचे वचन । पंडित सतोषले निज अंतःकरणी । हे अवतारीच पूर्णी । याचे भाषणी प्रेम दाटे ॥१३७॥

ऐसे ऐकून अनेक भाषण । यांचे येण्याचे घेऊन वचन । निघते जाले तेथून । जेथ आपुले बिर्‍हाड असे ॥१३८॥

तेव्हा गोदू आणि शिवराम । जे भक्तकामकल्पद्रुम । त्या पंताचे पाहुनी प्रेम । मान्य केले त्याचे निमंत्रणा ॥१३९॥

पुढील प्रसंगी कथा निरुपण । रुक्मीणी पंताचे प्रार्थने वरुन । विजापूरास प्रयाण आपण । करतील शिवराम बहिणीसह ॥१४०॥

ही चरित्र स्वानंद पंढरपूर । येथे तिष्ठे पूर्णानंद श्रीदिगंबर । भक्तास्तव सहज विटेवर । लक्ष्मी सहित सर्वदा ॥१४१॥

समपदीचे देऊन भेटी । सदभक्ता वळीकृपा करी जगजेठी । म्हणोन कटीवरी ठेवून हातनेती । वाट पाहे भक्ताची ॥१४२॥

जे श्रवणद्वारे घेती भेटी । त्यांची भवजलाची पूर्ण होय तुटी । ते सहजानंद लुटी । सहजा सहजी आनंदाम्नाई ॥१४३॥

यास्तव हनुमदात्मज । विनवितसे श्रोतयांचे चरणांबुज । तुम्ही कृपा करुन सहज । सहजानंद सेवा मज द्यावी ॥१४४॥

आनंद साप्रदायी सहजानंद । हे व्दितीय पीठ भूषणी संबंध । तिष्ठताती क्रमपूर्ण संबंध । श्रेष्ठत्वानुभवी अभिवंदिले ॥१४५॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । एकादशोध्याय गोड हा ॥१४६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP