श्रीगुरु दक्षिणामूर्तयेनमः । श्रीम्हाळसा मार्तंड भैरवाये नमः ।
जयजय पूर्णानंद समुद्रा । निज जन मानस चकोर चंद्रा । आनंदकारका लक्ष्मीवरेंद्रा । लक्षा व लक्षातीता नमोस्तुते ॥१॥
प्राप्त होता तुझे चरण रज । दग्ध होईल कर्मबीज । चुकेल यातायातती सहज । सहजानंदा सदगुरु ॥२॥
आनंद संप्रदाय क्रम करुन । अवतरसी तू पूर्ण चिदघन । भक्तवत्सल होऊन सगुण । सगुण लीला पै दाविसी ॥३॥
निज कल्याणी सहपद्मज सिंहासनी । सहज विराजिसी अनुदिनी । सहजानंद ऐसी करुणा वाहुनी । करुणार्णवा दयाळा ॥४॥
तुज ऐसा नसे दयाळू । तुज ऐसा नसे कृपाळू । सप्रेम कवळिता चरण कमलु । जवळीक होसी तूं त्यासी ॥५॥
तू होसी भक्ताचा वेळाईत । स्वभक्तासि देसी निजहित । हेतु दृष्टांत विवर्जित । सुखस्वरुपा सर्वेशा ॥६॥
तुज म्हणता कल्पवृक्ष । ते पुरवितसे कल्पित आपेक्ष । तुज स्मरता निरपेक्ष । करिसी मनोरथ परिपूर्णी ॥७॥
ऐसा तू उदार । पुढे चालवी तुझे चरित्र । चरित्ररुपी ब्रह्मगिरीनार । प्रगटुनि देई प्रेमा भरणे ॥८॥
सप्तमोध्यायी कथा । लक्ष्मी विनवी निजभर्ता । गोदूस द्यावे आता या द्बिजासी स्वानंदे ॥९॥
तेव्हा गोदू तीन वर्षाची होती । मुखी न आलिसे दंतपक्ति । हे ऐकता तुम्ही श्रोते संती । आश्चर्य कराल निजमनी ॥१०॥
तिचे नाम असे गोदा । ती प्रत्यक्षचि अवतरली तीर्थ गोदा । सदा वाहे ज्ञानवंद्या । चित्कलीपूर्ण जन्मली ॥११॥
तिची जे अपार ख्याति । आणि तिची वैराग्य संपन्न भक्ति । वर्णन घडेल पुढे निगुती । समयोचित पाहून ॥१२॥
कांतेचे पाहून निश्चळ मन । द्विजासी बोले पूर्णनिधान । मजपासी असता फळ जाण । तुम्हास अर्पण पै करतसे ॥१३॥
फळाचे नाम घेता जाण । अवश्य म्हणे ब्राह्मण । स्वामीचे प्रसाद पूर्ण । मजला प्राप्त पै व्हावा ॥१४॥
मग गोदू बाळी । अर्पिले द्विज करकमळी । पाहाताच शिशु केवळी । बोले काय ब्राह्मण ॥१५॥
आता हे लेकरु । का दिधले माझे करु । याचे वर्म निर्धारु । मजला कांही कळेना ॥१६॥
ऐकताच ऐसे वचन । पूर्णानंद बोले त्यालागून । ही दिधलेसे तुज लहान । अंगीकार करावे ॥१७॥
तेव्हा बोले ब्राह्मण । ही उपाधी का मजलागुन । ऐसी उपाधीस भिऊन । घोर तपासी आरंभितो ॥१८॥
आता हे घोर कर्मी । का लोटिता जी स्वामी । फळाचे नाव ऐकता मी । अवश्य ऐसे बोलिलो ॥१९॥
मज असे वर्ष पन्नास । या लग्नाचा कासया प्रयास । संसाराची काही आस । मजला नसे स्वामिया ॥२०॥
जाणून संसाराची खंती । अंगिकारिली विरक्ति । कवणे विषयी आसक्ति । नसेच मजला गुरुवर्या ॥२१॥
आपण असता पूर्ण ब्रह्म । मज का लाविता हे श्रम । आपले दर्शनमात्रे भ्रम । हरे सर्वत्राचे ॥२२॥
लौकिकाची सोडूनी चाड । मी तप मांडिले अवघड । आणखी ऐसे कर्म निबिड । मज न लगेजी दयाळा ॥२३॥
ऐकोनि त्याचे वचन । पूर्णानंद बोले त्याकारण । प्रारब्धी लिहिले जे विधान । अन्यथा केवी होईल ॥२४॥
आता त्रिकर्ण पूर्वक । हे अर्पिले तुजला देख । पाषाणा पोटी पिकेल पीक । तरी ही अन्यथा वाणी नव्हेचि ॥२५॥
उदयिक करावे प्रयाण । काशी जाता आपण । तेथेच कन्यादान करुन । देईन गुरु संन्निधानि ॥२६॥
ही अंगीकारावी या काळी । निघावे आपण प्रातःकाळी । अव्हेर करिता भागीरथी जवळी । सोडील इजला नेऊन ॥२७॥
ऐकता ऐसे निर्वाण वचन । बोले काय तो ब्राह्मण । क्षेत्रपालाच्या आज्ञेवरुन । अंगिकार करता येईल ॥२८॥
पूर्णानंद बोले अहो सूज्ञा । क्षेत्र आणि क्षेत्रज्ञा । ओळखिता तू निज प्रज्ञा । क्षेत्रपाल कांही दूर नसे ॥२९॥
सर्व क्षेत्री क्षेत्रेश्वर । सदैव असतो ब्राह्याभ्यंतर । स्वाध्ययनी न जाणती निर्धार । हेच जाणणे अज्ञत्व ॥३०॥
चौर्यांऐंशी लक्ष क्षेत्री । त्यात नरदेह पवित्री । ना प्राप्त होता देह गात्री । क्षेत्रज्ञ कांही मिळेना ॥३१॥
क्षेत्रज्ञाची प्राप्ती । या क्षणी जाण निगुती । या क्षेत्रा जे न जाणती । तेच अभाग्य जाणावे ॥३२॥
या क्षेत्रास असे चार मंदिर । प्रथम मंदिरास नऊ द्वार । विषय सेविती त्या परिसर । क्षेत्रज्ञा कोणी न ओळखी ॥३३॥
क्षेत्रज्ञ असे चौथे मंदिरी । या लोकाचे प्रवेश नव्हे तेथवरी । तिन्ही मंदिरासी हा व्यवहारी । चौथ्या आलयी प्रवेश नव्हेचि ॥३४॥
ज्याच्या मस्तकी गुरुपादुका । अखंड पडली असेल देखा । आवडत असेल जो देशिका । त्यालाच प्रवेश होईल ॥३५॥
त्या घरा जाण्याचे महाप्रयास । मी पाहणे तेथील धण्यास । केवि घडेल निजदास । सदगुरुचा जाल्याविण ॥३६॥
याहून गुरुकृपा विशेष । जो करील चौथे मंदिरी प्रवेश । तेथे नांदे स्वप्रकाश । स्वयंज्योति क्षेत्रज्ञ ॥३७॥
त्या क्षेत्रज्ञाचे प्रकाशा वाचून । प्रकाश नव्हे शशिसूर्य किरण । सकळा प्रकाशक प्रकाशघन । अंतरात्मा सर्वज्ञ ॥३८॥
त्याच्या सत्तेने श्रवण करणे । त्याचे सत्तेने स्पर्श किरणे । त्याचे सत्तेने नयनी तुज देखणे । पाहणे घडत याक्षेत्री ॥३९॥
त्याचे सत्तेने स्वाद घेणे । त्याचे सत्तेने परिमळ सेवणे । त्याचे सत्तेने उच्चार करणे । वर्णमातृका सर्वस्वी ॥४०॥
त्याचे सत्तेने देणे घेणे । त्याचे सत्तेने पायी चालणे । त्याचे सत्तेने वरती भोगणे । त्यावाचून मलविसर्जन नव्हेचि ॥४१॥
त्यास नसे करण ना अकारण । त्याविण न हाले तृणपर्ण । घटमटासी जेवी गगन । अलिप्त असे सर्वदा ॥४२॥
तो एकचि अनेक क्षेत्री वसे । अनेक कृत्याला कदापि नसे । वसे नवसे बोल ऐसे । तेही त्याला साहेना ॥४३॥
घटमटीची व्यापकता । अनेक घटमटी दिसे पाहता । घटमटाचा भंग होता । तो एकला एक जेवी गगनी ॥४४॥
एक आणि अनेक । त्याला न साजेची देख । तो स्वयंज्योति स्वप्रकाशक । त्याला दुजेपण केवी साजे ॥४५॥
साजे आणि न साजे । सकलांतरी परि तो विराजे । ऐसे बोलता वेद लाजे । इतरांचा काय पाड तेथे ॥४६॥
व्यापक असता व्याप्यासी नातळे । जाणत असता आजापण नसे वेगळे । ऐसी महिमा ज्याची निश्चळे । ब्रह्मादिकासी अगम्य ॥४७॥
ब्रह्मादिकादि सकळ । त्या मायेने करुनी बाळ । खेळवित असताही कळ । तिजलाही त्याची कळा नातुडे ॥४८॥
ज्यास वर्णिता वेद मुकावले । व्यासादिकांचे ज्ञान खुंटले । ऐसा तो स्वानंद कल्लोळे । सहजानंदांश सर्वेश्व ॥४९॥
तोच क्षेत्राचा क्षेत्रेश्वर । त्यास जाणावा आपाद समग्र । तरी या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ साचार । गुरुतत्वी सापडतो ॥५०॥
सार्थक नव्हेगा जाणणेच त्यास । जाणणे ग्रासुन आपणची गवसे । क्षेत्रज्ञ होणे तेथे आपैसे । साचही म्हणणे न साहे ॥५१॥
सत्य असेल तो क्षेत्रेश्वर । सकळ क्षेत्राचा प्रकाशक साचार । आज्ञा करतील निर्धार । आजिच्या रात्री तुजपाही ॥५२॥
आज्ञा जाहलिया पाही । प्रयाण करावे लवलाही । क्षेत्रपालेश्वराचे तुम्ही अनुयायी । ध्यान करुनी आज्ञाघेणे ॥५३॥
आज मी येथूनी निघतो । पुढे दो कोसावरी जाऊनी राहतो । उदयिक प्रहर पर्यंत वाट पाहतो । सत्वर तुम्ही पै यावे ॥५४॥
यापरि बोलुनि पूर्णानंद । प्रयाण केले स्वानंदकंद । ह्रदयी आठऊन ब्रह्मानंद । राहते झाले ग्राम एक ॥५५॥
इकडे हा ब्राह्मण । ह्रदयी चिंतुनी उमारमण । जो सर्वसाक्षी क्षेत्रपाल जाण । निजता स्वप्नी प्रगटले ॥५६॥
ब्रह्मचार्याचे रुप धरुनी । प्रगटे ब्राह्मणाचे स्वप्नी । बोले काय त्यालागुनी । ते ऐकावे सज्जन हो ॥५७॥
अरे ब्राह्मणा तापसी । पूर्णानंद जे बोलिले तुजसी । मान्य करी त्याच्या वचनासी । आव्हेर सहसा करु नको ॥५८॥
पूर्णनंद आहे कोण । पूर्णब्रह्मच तू जाण । जगदोध्दारा लागी सगुण । पूर्णानंद रुपी अवतरले ॥५९॥
मजला तू पाहसी या देऊळी । त्याचे राहणे ब्रह्मांड राऊळी । त्यास तू पूजी ह्रदय कमळी । मीच ते म्हणूनी निश्चय ॥६०॥
मी येथ राहिलो स्थावर । तो फिरत असताही चराचर । तोच असे क्षेत्रपालेश्वर । मज त्यामाजी भेद नाही ॥६१॥
त्याचे बोल ऐकावे । त्यासमागमे काशीस जावे । त्याच्या बोला प्रमाणे वर्तावे । तीच आज्ञा माझी असे ॥६२॥
तू तप केल्याचे फळ । आज झाले असे सुफळ । म्हणून तयाचे चरणकमळ । पाहणे घडे तुजलागी ॥६३॥
कृतु करता स्वर्गलोक । प्राप्ती होताती याज्ञिका देख । परी स्वर्गीचेही लोक । इच्छिती दर्शन साधूचे ॥६४॥
साधुसंगे आत्मसिध्दी । साधुसंगे अटे भवाब्धि । साधुसंगे सहज समाधि । सहजी सहज प्राप्त असे ॥६५॥
ब्रह्मार्पण बुध्दि सत्कर्म । घडले असता अनंत जन्म । तरीच तुजला भक्तवत्सल परम । दर्शन त्याचे पै घडले ॥६६॥
त्याची दृष्टी ज्यावरी पडे । त्याचे अज्ञान तात्काळ झडे । ब्रह्मज्ञान रोकडे । दर्शनी लाभ सर्वपरी ॥६७॥
यापरी देखता स्वप्न । निश्चय केला ब्राह्मण । पूर्णानंद अवतारी पूर्ण । संशय येथे काही नसे ॥६८॥
त्या द्विजाचे नाव बापुशास्त्री । त्याने अभ्यासिला असे षडशास्त्री । निघता जाला झडकरी । पूर्णानंद रायाकडे ॥६९॥
इकडे पूर्णानंद सिध्द होऊन । वाट पहात असता पातला ब्राह्मण । देखता साष्टांग नमन । पूर्णानंदासी पै केले ॥७०॥
स्वप्नीचे वर्तमान । स्वमुखे करुनी निवेदन । दृढ कवळिले चरण । सप्रेमयुक्त प्रभूचे ॥७१॥
मुखी करितसे स्तोत्र । आपण साकार दिसतापरी निराकार । प्रत्यक्ष सांगितले क्षेत्रेश्वर । आपुल्या मुखी स्वये तोचि बोलेता ॥७२॥
आपुली आज्ञा प्रमाण । आपणा सहित प्रयाण । यापरि बोलता ब्राह्मण । पुढे निघाले त्यासहित ॥७३॥
ती यात्रा असे सातवी । पूर्णानंदांची आनंदप्रभा नितनवी । सदगुरु दर्शनार्थी धावाधावी । महोद्योगी त्वरा करितसे ॥७४॥
ह्रदयी भरलासे गुरुपदारविंद । पदोपदी चालता स्वानंद । यापरि पूर्णानंद । काशिपुरासी पै आले ॥७५॥
आधी वंदूनी श्रीविश्वनाथ । दर्शना निघाले श्रीगुरुनाथ । जो अनाथांचा नाथ । ब्रह्मानंद यतीश्वर ॥७६॥
उल्लंघुनी सप्तभूमिका । स्वानंदपदी असता श्रीदेशिका । सप्तयात्रा करुनी देखा । पूर्णानंदी रिघे श्रीगुरुदर्शना ॥७७॥
टाकूनी सप्तार्णव । सदगुरु असती निरावर्ण स्वयमेव । सप्तवारी याचि रीति वैभव । पूर्णानंद परेश गुरुदर्शनी ॥७८॥
सप्तकोटी महामंत्र । यापरते सदगुरुपद स्वतंत्र । याची करुनी सप्तवारी जीवनगात्र । पूर्णानन्दी समर्पिले ॥७९॥
ब्रह्मानंद मठीचे महाद्वारी । पूर्णानंद प्रणिपात करी । तेथील रज घेवोनि स्वकरी । सप्रेम भाळी लावीतसे ॥८०॥
भाळी लाविता तेथील रज । ब्रह्मानंद प्राप्ती होय सहज । यास्तव पूर्णानंद राज । भाळी रेणु लावीतसे ॥८१॥
प्राप्त होता तेथील धुळी । वियोग खेदाची झाली होळी । स्नान घडे स्वानंद जळी । म्हणोनि भाळी लावितसे ॥८२॥
यापरि होऊन सप्रेम चित्त । मठी प्रवेशिले नमित्त । पातले जेथे सदगुरुनाथ । स्वानंद सिंहासनी विराजित ॥८३॥
पडताच सदगुरुंचे चरण दृष्टी । साष्टांग वंदिले उठाउठी । प्रेम न समाये पोटी । सर्वांगी दाटले अष्टभाव ॥८४॥
अष्टपूर युक्त जे लिंगदेह । वज्रघाती नव्हेचि कदा भंग । पाहता गुरुपद अभंग । भंग होय तात्काळ ॥८५॥
यापरि गुरुचरणीचा महिमा । अगम्य अगोचर अगम निगमा । जाणून चित्ती सप्रेमा । पूर्णानंद नमितसे ॥८६॥
मस्तक अर्पिता चरणकमळी । संचित जळे समुळी । अपरोक्ष होय स्वरुप झळाळी । जाणून चरण वंदीतसे ॥८७॥
सदगुरु चरणीचे परमभाग्य । चरणी जोडे वैराग्य । गुरुदासाचे होय श्लाघ्य । जाणून चरण कवळितसे ॥८८॥
चरणी घालिता मिठी । प्रारब्धाची होय तुटी । प्राप्त होई स्वानंद लुटी । जाणून चरण वंदितसे ॥८९॥
चरणीच घेतला थारा । चुके जन्म मरणाचा फेरा । अज्ञानाचा उडे धुंवारा । जाणून चरण वंदितसे ॥९०॥
चरणीचे आलिंगन घडे । पातक तत्काळ झडे । स्वानंद सुख जोडे । म्हणून चरण वंदितसे ॥९१॥
चरणी असे परम प्राप्ती । चरणी हरे सकळ भ्रांती । चरणी जोडे परम विश्रांती । म्हणून चरण वंदितसे ॥९२॥
चरणी वाटे पूर्ण स्वर्ग । तुच्छ वाटे इह परभोग । चरणी हरे भवरोग । म्हणून नमन करितसे ॥९३॥
चरणी असे परमकल्याण । चरणी हरे अकल्याण । चरणी जोडे निजानंद गहन । जाणून वंदन करितसे ॥९४॥
चरणी असे ब्रह्मानंद । सबाह्य दाटेले सहजानंद । ऐसे जाणून पूर्णानंद । स्वानंदकंदा नमन पै केले ॥९५॥
ब्रह्मानंद तेच पूर्णानंद । पूर्णानंद तेच ब्रह्मानंद । जेथे निरसला मूळही द्वंद । वंदन नमन त्या कैचे ॥९६॥
तरंग आणि समुद्र । हेम आणि अलंकार । तेवी हे उभयता साकार । दिसती निराकार सर्वांतरी ॥९७॥
जो असे निर्गुण निराकार । गुरुशिष्यपण काया व्यवहार । ते सच्चिदनंद बाह्याभ्यंतर । भरुन उरले ब्रह्मांडी ॥९८॥
जो ब्रह्मानंद अद्वय । तेच पूर्णानंद निश्चय । ते सहजानंद प्रतिबिंब चरणद्वय । त्यास भेद कोण म्हणे ॥९९॥
यात जे भेद कल्पिती । ते पडतील पुनरावृत्ती । सुटका नव्हे तया कल्पांती । हे सत्य सत्य जाणावे ॥१००॥
जे गुरुचरणी निज मस्तक । अर्पिले असतील पूर्ण देख । त्यालाच हे अद्वय सुख । प्राप्त जाणा निर्धारे ॥१०१॥
जे असतील सदगुरुंचे दास । तेच करतील येथे विश्वास । त्या वाचोनी इतरास । हे सुख काही न जोडे ॥१०२॥
जे गुरुचरणी रंगले । सुख भोगतील जीवन निष्कळे । त्यावाचुन हे जीवन निष्फळे । भाषण सकळ दिसतील ॥१०३॥
ते सदैव स्वानंदघन । त्याच्या स्मरणी भक्त तरतील पूर्ण । त्यांचे चरणामृत मकरंद महान । वर्णू न शके शब्दातुनी ॥१०४॥
तुम्ही क्षमेचे मेरु । तुम्ही दयेचे सागरु । तुम्ही ठेविता अभय करु । पुढे चरित्र प्रवाहील ॥१०५॥
हे चरित्र पूर्णानंद । ते शुध्द अपुलेरुप अगाध । तुमचे तुम्ही स्वानंद विशद । सहजा सहजी वर्णविले ॥१०६॥
तुम्ही पूर्णानंद समुद्र । ही असे तुमचीच लहर । सुटता अभयाचे समिर । निमिष्यो निमिषी उठविले ॥१०७॥
असो पूर्णानंद महामुनी । मस्तक ठेऊन सदगुरुचरणी । प्रेमोदके अभिषेक करुनी । सप्रेम चित्त बोलतसे ॥१०८॥
जयजय सदगुरु चंद्रमौळी । मस्तक ठेविता चरणकमळी । स्वये प्रगटुनी ह्रत्कमळी । निजसुख देसी अंतर्बाह्य ॥१०९॥
जयजय सदगुरु दत्तमूर्ती । अगाध असे तुझी कीर्ति । नमन सरिसे स्वानंद स्फुर्ती । देऊनी तारिसी दयाळा ॥११०॥
जय जय सदगुरु सदानंदा । सच्चिदानंदा स्वानंदकंदा । चिरकाळ राहुनी ह्रदयारविंदा । द्वंद दुष्काळा तू नाससी ॥१११॥
जयजय सदगुरु रामा । अगम्य अगोचर निगमागमा । माया नियंता निजजन विश्रामा । सर्वातीता नमोस्तुते ॥११२॥
जयजय सदगुरु अखिल अमला । स्वानंद कारका स्वानंद पुतळा । मंगलदायका परम मंगळा । मंगळमूर्ती तुज नमो ॥११३॥
जय जय सदगुरु गुणगंभीरा । चित्तचालका परात्परा । सर्वसाक्षी सर्वेश्वरा । सकळा अधिष्ठान तुज नमो ॥११४॥
जयजय सदगुरु ब्रह्मानंद दाता । दाता तुज समान त्रिजगती नसे अन्यथा । न दिसे कोणी आत्मदाता । कल्याणवासिया तुज नमो ॥११५॥
जयजय सदगुरु पूर्णानंद दायका । निजजन रंजन चित्तचालका । निजसुखाचा तु निश्चळ जनका । सुखसागरा तुज नमो ॥११६॥
जय जय सदगुरु ब्रह्मानंद धणी । कोण तुझी महिमा वाखाणी । अशक्य असे वेदपुराणी । अंतरंगा तुज नमो ॥११७॥
नमु म्हणतात सदगुरु तुज । मी पण हरेल माझे सहज । पुरवून सकळ माझे कामकाज । तू माझ्या आभ्यंतरी सहज भरसी ॥११८॥
आपण असता ब्रह्मानंद । मजही केले ब्रह्मानंद । सहजा सहजी ग्रासुनी द्वंद । हे अभिनव कर्णी गुरुराया ॥११९॥
गुकार ते अज्ञान अंधःकारु । रुकार ते तेजाकारु । गुरु शब्द म्हणता उच्चारु । अज्ञान सहज संहरे ॥१२०॥
नाममंत्र संपवी अज्ञान । सबाह्य प्रगटे विज्ञान । होणे ज्यास स्वयं अधिष्ठान । ते अभिनवकर्णी गुरुराया ॥१२१॥
कारण क्रिया विरहित । तू असशी सदोदीत । सहज होता शरणांगत । आपणा सारिखे पै केले ॥१२२॥
आता किती वर्णावे गुण । तू असशी निर्गुण । सच्चिदानंद परिपूर्ण । बोलता वाचा सहज लाजे ॥१२३॥
आता आपुल्या उपकारा । केवी फेडू दातारा । त्यास नसे पारावार । दयार्णव गुरुराया ॥१२४॥
यापरि करिता स्तवन । नेत्री चालिले प्रेमजीवन । चरणी मस्तक ठेऊन । साष्टांग नमस्कार पै केला ॥१२५॥
द्वादशवार नमस्कार । प्रदक्षिणा तदनुसार । करुनी न्याहाळिता मुख वारंवार । वृत्ति तन्मय पै जाली ॥१२६॥
वृत्ती रंगता गुरुपायी । वाचा खुंटली त्या समयी । काय वर्णावे तेथे वाणी । गुरुभक्त जाणती ते सुख ॥१२७॥
गुरुस पाहता हरपलो पाहणे । पाहण्यामाजी भरला निरंजने । चिदघन दाटता देहाभिमाने । गळित जाहला गुरुपायी ॥१२८॥
पायीच ठेऊन मस्तक । होऊन बैसला तारक । ऐसा होता क्षण एक । गुरु उठवी सप्रेमे ॥१२९॥
मुखी बोले गुरुराव । धन्य धन्य तुझा भाव । तो भावच परम सुखाचे वैभव । अगाध असे प्रेम तुझे ॥१३०॥
काय वर्णावा तुझा निश्चय । पश्चिमेसी होईल रवि उदय । परि न ढळेचि निश्चय । सत्य प्रतिज्ञा पै तुझी ॥१३१॥
तू जे जे करिसी काज । ती सर्व कांही माझीच सेवा उमज । माझ्या अभ्यंतरीही जे घेतसे सहज । दोदह व्यवहारी मद्रूपसेवा ॥१३२॥
यापरि प्रेम वचन । बोलून शिष्या लागोन । दृढभावे आलिंगोन । वर्तमान सर्व पुसतसे ॥१३३॥
यानी ही सकळ । वास्तव्य निवेदिले गुरुपायी निश्चळी । शास्त्रीकडे पहाताती केवळी । काय पूसे पूर्णानंदासी ॥१३४॥
हा ब्राह्मण कोठील कोण । येथे यावया काय कारण । पूर्णानंद संपूर्ण । वास्तव्य त्याचे सांगितले ॥१३५॥
गुरुशिष्यांच्या पाहुनी प्रेमा । काय केले ते द्विजोत्तमा । अगाध जाणोन उभयतांचा महिमा । सप्रेम नमिले गुरुरायासह ॥१३६॥
नमन करता बापु पंडीत । बोले काय सदगुरु समर्थ । अगाध असे सुकृत । तरीच संगती पै घडली ॥१३७॥
संतसंगती समान । लाभ नसेरे आन । तुमचे दैव उदयले म्हणून । पूर्णानंद संगती तुज घडली ॥१३८॥
मग पाहून गोदू लेकरु । काय बोले सदगुरु माहेरु । इचे प्राक्तन असे दुर्धरु । तदनुसार योग पै घडताहे ॥१३९॥
येताच लग्नाश्रय । करुनी लग्ननिश्चय । कन्यादान पूर्णानंद राये । करुन दिधले शास्त्रीस ॥१४०॥
लग्न झाल्यानंतर । आणखी राहिले एक संवत्सर । तेव्हा श्रीगुरु दयासागर । पूर्णानंदाप्रती काय आज्ञापि ॥१४१॥
आता पुढील कथेचे स्थळ । स्वानंद सुखाचे कल्लोळ । गुरुशिष्याचा उदगार निर्मळ । सप्रेम चित्ती परिसावे ॥१४२॥
हे चरित्र सुधाकर । सेविता श्रवण फार । चुकवून सर्व येरझार । अजरामर पै होती ॥१४३॥
पूर्णानंद चरणीचे रज । मज प्राप्त असो सहज । हेचि इच्छा हनुमदात्मज । पूर्णानंद पुरवी स्वइच्छे ॥१४४॥
इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । अष्टमोध्याय गोड हा ॥१४५॥