कथामृत - अध्याय तिसरा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यैनमः । श्रीअन्नपूर्णायै नमः । ललितादेवी नमोस्तुते ॥१॥
सकलांसी वंदितो भावे । संत चरित्र पूर्ण व्हावे । आशीर्वाद मज लाभावे । सकल श्रीसंत देवांचे ॥२॥
आशीर्वाद लाभल्यावर । सकल कार्य होय सुकर । ऐसे पुरावे पुराणीं फार । वाचतांना आढळती ॥३॥
वरदान मिळाले अर्जुनास । शाप बाधले ते कर्णास । सूर्यपुत्र तो असता त्यास । अपयश आले सर्वदा ॥४॥
उदाहरण हे नित्य मनीं । ठेवुनी लोळतो संत चरणीं । वरदान मज द्या ग्रंथ लेखनीं । अखंड त्यासी प्रार्थितसे ॥५॥
अनंत लहरी सागरावरी । उसळत असती वरचेवरी । गणिल तयांची संख्या खरी । ऐसा न कोणी विश्वांत ॥६॥
तैसाचि संत चरित्र सागर । चमत्करांच्या लहरी त्यावर । प्रकट होती वारंवार । लोकहिता कारणे ॥७॥
चमत्कारे लोक वळती । उपदेशाने ना ऐकती । ऐशीच असे ही जनरीतो । ज्ञात सर्वांसि सत्य हे ॥८॥
नाठाळ जनां उद्धराया । चमत्कार या सुलभ उपाया-। सिद्ध योजुनी करिती दया । दाविती जनां सत्पंथ ॥९॥
अत्तराचा एक थेंब । जैसा नाशितो दुर्गंध । तैसाचि संत संबंध-। घडता दुर्जन पालटे ॥१०॥
केवि वर्णू संत महती । वर्णावया ती शब्द नसती । निःस्वार्थपणे कृपा करिती । दीनोद्धारा कारणे ॥११॥
सिद्ध, साधू, संत महंत । अधर्मयोगे होत व्यथित । पृथ्वीवरी अवतरतात । धर्मं रक्षावयास्तव ॥१२॥
दृश्य-अदृअश्य सृष्टींत । सिद्धांचा अधिकार बहुत । प्रसंग पडल्या जनहितार्थ । चमत्कारही करिती ते ॥१३॥
श्रेष्ठ ऐशा योगियांत । नृसिंहयती अति विख्यात । पशु-पक्ष्यांचे मनोगत-। होते जाणत लीलया ॥१४॥
तैशीच आता मनोहर । कथा ऐकणे सविस्तर । मृग-मृगी त्यां भेटल्यावर । संवाद झाला श्रवणीय ॥१५॥
सानुल्या निज पाडसास । भेटण्याची धरोनि आस । मृगी निघाली शोधायास । महाभयंकर वनामध्ये ॥१६।
हिंडता-शोधिता फार थकली । क्षुधे-तृषेने व्याकुळली । वात्सल्यभावे अति तळमळली । पाडस तिचे गवसेना ॥१७॥
निजबाळाची आस धरुनी । तैशीच फिरे हरिणी वनीं । सर्वत्र पाहता धुंडाळुनी । हताश झाली अत्यंत ॥१८।
तशांत घडले दुजे नवल । मृगे गांठिले तेचि स्थल । मृगीस बघता हर्षोत्फुल्ल । मृग जाहला तेधवा ॥१९॥
परि त्यां शावक सापडेना । तेणे तयांसी अति यातना-। तशांत लागे तृषा त्यांना । शोधु लागले जलाशय ॥२०॥
अंतरावरी तोंच एक । निर्झर देखिला अति सुरेख । अमृतजलीं बुडवुनी मुख । प्राशिती जल संतोषे ॥२१॥
जलप्राशनें संतोषली । तृण भक्षुनी तृप्त झाली । पूर्वस्थानीं ती पातली । पाहु लागली आश्चर्ये ॥२२॥
भव्य वृक्षाच्या छायेंत । एक मुनी प्रसन्न चित्त । सुधादृष्टिनें अवलोकित । समोरील त्यां युगुलासी ॥२३॥
कां मज बघता टक लावुनी । विसरलात का ओळख जुनी । गतजन्मीचा परिचय म्हणुनी । प्रेमपूर्वक विचारितो ॥२४॥
असता आम्ही गाणगापुरीं । होतास आमुचा सेवेकरी । तज्जन्मी तूं प्रखर खरी । अखंड सेवा केलीस ॥२५॥
होतासि तूं विप्र रोगी । पीडिलेला महारोगी । निज भक्तीर्ने दया जागी-। करिता, केला रोगमुक्त ॥२६॥
हीच मृगी भार्या होती । पतिनिष्ठ साध्वी, महासती । परंतु झाली तुज दुर्मती । संपन्न काल येतांची ॥२७॥
मुलेबाळे, धान्य-संचय । गोधन, धन ही सर्व सोय । दूध, दही, नवनीत, साय । गोकुळासम गृह होते ॥२८॥
कशासि काही नव्हते उणे । जात होते दिन मजेने । पुढे वर्तसी उन्मत्तपणें । अपमानिले साधूजना ॥२९॥
दुष्ट वर्तन असह्य झाले । शापिणे तुज भाग पडलें । पशुजन्मीं या तुज घातले । भोग भोगावयालागी ॥३०॥
ऐकता हे सिद्धशब्द । कुरंग राहिले निःस्तब्ध । वृत्त ऐकता ती हतबुद्ध । होउनी अश्रु गाळिती ॥३१॥
स्फुरली वाणी जोडप्यासी । प्रार्थना करिती यतिवरांसी । क्षमा असावी अपराध्यासी । चरण चाटिती स्वामिंचे ॥३२॥
क्षमा याचिता द्रवले यती । अश्रु नेत्रांतुनी गळती । नरदेहाची तुम्हां प्राप्ती । पुढिल जन्मीं अत्युत्तम ॥३३॥
श्रवणी पडता मधुर वाणी । भारावली ती कृतज्ञतेनी । मस्तक ठेविती यती चरणी । साश्रु नयनें पुनःपुन्हा ॥३४॥
तोचि पाडसे तिथे आली । भेट होता अति हर्षली । दयासागरें दया केली । पशूंवरी त्या अपूर्व ॥३५॥
ऐसे यतिवर्य कनवाळू । मातेहुनीही अति दयाळू । सर्व जीवांचा प्रतिपाळू । सदासर्वदा करिताती ॥३६॥
सामर्थ्य पाहता अलौकिक । आश्चर्य पावले मुनि अनेक । सर्व मिळोनी तयें एक । समारंभ तो आयोजिला ॥३७॥
हिमगिरीचे सर्व योगी । जमती प्रेमे एक जागी । सन्मानयोग्य हा थोर जोगी । ऐसे वदती ते सर्व ॥३८॥
गुहा सजविती पल्लवांनी । मृगाजिन घातले उच्चासनी । फळे, फुले मधु आणुनी । स्वागत करिती प्रेमाने ॥३९॥
उच्चासनीम यति बैसता । सभेत आली अपूर्वता । स्मित वदन ते स्वामि बघता । धन्यता वाटे ऋषिजनांसी ॥४०॥
ऋषी अर्पिती सुमनमाळा । कुणी अर्पिती मधुर फळां । पर्णद्रोणीं मधु आगळा । प्राशनार्थ देती कुणी ॥४१॥
पक्षि करिती किलबिलाट । वनश्रींचे सुरम्य भाट । यतिस्तुतीचा अपूर्व थाट । बघतां तपस्वी आनंदले ॥४२॥
ऋषिगण गाती वेदमंत्र । वातावरण ते होय पवित्र । यतिवर असती पूज्यपात्र । यास्तव स्तविती मुनि सारे ॥४३॥
योगेश्वरांसी सर्व नमिती । धन्य वदती आम्ही जगतीं । असा योग्यांचा अधिपती । बघायासी न मिळे कदा ॥४४॥
अष्टसिद्धी वोळंगती । रात्रंदिन त्या जयां पुढती । श्रेष्ठपणासी नाही मिती । धन्य जाहलो या दर्शनें ॥४५॥
स्वर्णचंपक, बूटमोगरा । बकुल, जाई सर्वेश्वरा । चंदन, केतकी सुलसितुरा । सुगंधी पुष्पे अर्पियली ॥४६॥
केशर, कस्तुरी अंगी चर्चिती । नाना सुगंधी द्रव्ये अर्पिती । कमल पुष्पे । पदिं वाहती । ऐसे पूजिती परमादरे ॥४७॥
बघुनि दिव्य हा पूजाविधी । यक्ष, गंधर्व, किन्नरांदी । नारद, तुंबर, सुरेश्वरादी । जयजयकारा करिती ते ॥४८॥
हे ना केवळ योगेश्वर । हे तो प्रत्यक्ष परमेश्वर । उत्पत्ती, स्थिती, प्रलयंकार । सर्व सत्ता इये हातीं ॥४९॥
ऋषिगण भवती दाट जमले । चरणारविंदी नम्र झाले । मार्गदर्शन पाहिजे केले । आपण देवा सदोदित ॥५०॥
आसनीं स्वामी स्थिरावले । भक्ति पाहोनि गहिंवरले । आनंदाश्रू पूर चाले । दिव्य तयांच्या नेत्रांतुनी ॥५१॥
कंठ जाहला सद्‌गदित । बोलत असता ऋषींप्रत । जपतप करिता हिमनगांत । परित्यागुनी सर्व काही ॥५२॥
अहम्‍ ब्रह्मास्मि तत्त्व कथिती । स्वामी तदार्था विशद करिती । कैवल्यमार्गा सुकर करिती । गुह्य त्यांतील सांगोनी ॥५३॥
मर्म कळतां ऋषि हर्षले । महद्‌भाग्ये यति लाभले । निज मस्तकी चरण धरिले ॥ यतिवर्यांचे सर्वानी ॥५४॥
अज्ञानाचा नाश केला । ज्ञान प्रकाशे मार्ग दिसला । शतजन्मींचा लाभ झाला । स्वामी दर्शनें सकलांसी ॥५५॥
स्वामि देती आशीर्वाद । ध्येय साधाल निर्विवाद । तुम्हासि बघतां परमानंद-। आम्हासही जाहला असे ॥५६॥
प्रेमे बोलोनि यति उठले । गुहेमधोनी बाहेर आले । मुनिगण तदा वर्षती फुले । जयजयकार करोनिया ॥५७॥
जयजयकारे गिरिकंदर-।निनादला तो मनोहर । यतिवर्य जाता दूर दूर । साश्रु नयने बघती ऋषी ॥५८॥
धन्य, धन्य तो तपस्वीगण । जयांसि घडले यतिदर्शन । सामान्य आपण पापीजन । दर्शन कैसे घडेल की ॥५९॥
कशासि घ्यावी दुष्ट शंका । स्वामी दयार्णव नसती का?। आर्त ऐशा निज भाविका । भेटतील ते स्वप्नांतरीं ॥६०॥
आर्तता सर्वाची वाढावी । यतीश्वरांची भेट व्हावी । कल्याणप्रदं गोष्ट घडावी । सकल भक्तांच्या जीवनीं ॥६१॥
ऐसे प्रार्थोनि यतीश्वरां । पूर्ण करितो अध्याय तिसरा । संकल्पं आमुचे परमेश्वरा-। पूर्ण करावे सदोदित ॥६२॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥६३॥
॥ श्रीस्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP