कथामृत - अध्याय विसावा
प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविष्णवे नमः । लक्ष्मीदेवी नमोस्तुते ॥१॥
मागे वाचिली आपण कथा । रायराजे काशीस जाता-। विश्वेश्वराच्या दर्शना करिता । जाता घडला चमत्कार ॥२॥
विश्वेश्वराच्या पिंडीऐवजी । तेथे दिसती यतिवर्यजी-। आश्चर्य पावले सरदारजी । घालिती तयां दंडवत ॥३॥
तेलंगणांतिल विप्र एक । यात्रा करिता तो अनेक । मनीं करोनी तो विवेक । स्वामी संन्निध पातला ॥४॥
यात्रा करिता ऋण अपार-। जाहले मातें म्हणे फार । दया करावी हो मजवर । द्रव्यसाह्य द्या मजलागी ॥५॥
सांगती आहोत संन्यासी । द्रव्य द्याया नसे मजसी । हे घे म्हणोनी ढेकळासी-। देवोनि करिती मार्गस्थ ॥६॥
मार्गी चालता करि विचार । ओझे जाहले म्हणे फार । फेकू जाता मृत्तिका दूर । रुपे पाहिजे चकाकते ॥७॥
तेणे दारिद्रय गेले लया । यतिवर्य ऐशी करिती दया । वाचिले आपण कथेसी या । समर्थ ऐसे कनवाळू ॥८॥
तैशीच दुजी वाचिली कथा । रहिमतपुरचा सरदार होता । तत्कन्य्ची विवाह-चिंता । निवारिली ती यतिवर्ये ॥९॥
वाचिली तैशी अद्भुत कथा । मूषकातें निर्जीव असता-। अंगावरोनी कर फिरविता । जाहला तो जिवंत की ॥१०॥
मूषका मिळता संजीवन । तये केले पलायन । आश्चर्य करिती ते बघोन । प्रज्ञापुरीचे नृपवर्य ॥११॥
वाचिली आपण कौतुककथा । स्वामी वृक्षातळीं बसतां । चिमणी चिव चिव वरी करिता । समर्थानी आज्ञापिले ॥१२॥
येतो गावासि जावोनी । तोंवरी तेथेचि बैसोनि-। रहावे ऐसेचि सांगोनी-। यतिवर्य जाती गावाला ॥१३॥
येतां परतोनी । वदले आता जा उडोनी । चिवचिवाट केला चिमणीनी । गेली उडोनि आनंदे ॥१४॥
वाचिली आपण अपूर्व कथा । जाधवाचा काळ येता । शोक अत्यंत तो करिता । चिठी तयाची परतविली ॥१५॥
जाधवा मिळता प्राणदान । बैल जाहला गतप्राण समर्थाचे महात्मेपण । गताध्यायीं वाचियले ॥१६॥
गरिब बिचार्या वानरीशी । मारावया लोक तिजसी-। येता, घालोनी पाठीशी । संरक्षिती स्वामी तिला ॥१७॥
जवळ येता अंतकाळ । धरिले तिने चरणकमळ । रात्रंदिन ती करी तळमळ । व्यथित जाहली अत्यंत ॥१८॥
मरणासन्न की होता स्थिती । स्वामी मस्तके३ए कर ठेविती । ठेवोनि मस्तक चरणांप्रती । वानरी करी परार्पण ॥१९॥
मुक्या पशूसी दिली मुक्ती । समर्थाची अशी शक्ती । अनन्यपणे करिता भक्ती । स्वामी तयासी ॥२०॥
श्रीस्वामीच्या पदां नमुनी । वाचू कथा मन लावुनी । तेणे चिंता दूर सरुनी । उद्धरती सुधैर्य आपणां लाभेल ॥२१॥
नवरोजी शेठ मुंबईचे । दर्शना आले समर्थाचे मित्रगृहीं राहिले साचे । उद्या भेटु म्हणोनिया ॥२२॥
घेती प्रभातीं यतिदर्शन संतोष पाहता आनंदधन । चिंता कथाया नुरे भान । तैसेचि आले माघारी ॥२३॥
निद्रेत असता मध्यरात्री । आवाज येता ये जागृती । उठताक्षणी पुढे दिसती-। स्वामी प्रत्यक्ष खुर्चीवरी ॥२४॥
आश्चर्य वाटले धरी चरण । क्षमा मागे कर जोडुन । चिंता माझी करा हरण । करी याचना नवरोजी ॥२५॥
धंदा बुडाला कर्ज होय । ह्रदरोग लागे मला हाय । अनंत केले मी उपाय । तुम्हांविणे ना सोडविता । ॥२६॥
चरन धरोनी धाय धाय-। रडे पारशी होय गाय । तूचि माझी अता माय । वाचवीगे मजलागी ॥२७॥
द्रव्य देतो मी अपार । नासेल तेणे कर्जभार । सांगे परंतु एकवार । काय देशील मजलागी ॥२८॥
अत्यानंदे तदा वदला । होता मोठा लाभ मजला । पावहिस्ताचि मोबदला । आपुल्याअ पदीं अर्पीन ॥२९॥
स्वामीस ऐसे आश्वासिले । तदा यतिवर्य त्या वदले । नर्मदेकडे जाता भले । होईल मोठा धनलाभ ॥३०॥
श्रवणीं ऐसे शब्द पडता । हर्ष जाहला तया चित्ता । चरणीं मिठी घालू जाता । गुप्त जाहले यतिवर्य ॥३१॥
थक्त जाहले तेव्हा मनीं । आले परंतु हे कोठुनी । दारे, खिडक्या बंद असुनी । प्रवेशले हे आश्चर्य ॥३२॥
दुसरे दिनीं स्वगृहासी । निघोनि गेले मुंबईसी । अल्पकाले ये तयांसी । वडोद्याचे निमंत्रण ॥३३॥
नृपवर्याने सन्मानिले । अविकार आणी धन अर्पिले । तेणे तयांचे कर्ज फिटले । सुखी जाहले सर्वस्वी ॥३४॥
समर्थानी जसे कथिले । प्रत्यया तैसेचि त्यां आले । परमाश्चर्य ते तदा गमले । धन्य धन्य हे यतिवर्य ॥३५॥
सफल होता कार्य त्याचे । आनंदले मन तयाचे । प्रज्ञापुरीं जाउनीं साचे । म्हणे करावी पाद्यपूजा ॥३६॥
पेढे, मिठाई, फुले माळा। केशर, कस्तुरी लावुनी टिळा । महत् संकटीं रक्षिले मला । अनंत जाहले उपकार ॥३७॥
साष्टांग नमिले स्वामीचरण । कंठ तयाचा येत भरुन । आजन्म मार्ते जगजीवन । कृपा आपुली लाभावी । ॥३८॥
समर्थाची करुनि स्तुती । जाण्यास मागे अनुज्ञेप्रती । व्यापारधंदा करण्याप्रती । जाणे मजला भाग असे ॥३९॥
पाव हिस्सा द्यावयाचे । भान नुरले तया साचे । हरण होताचि रोगाचे । स्मरे कोण त्या वैद्यासी ॥४०॥
ऐसे असती कृतघ्न जन । कार्य होता विसरती पूर्ण । उपकारकर्त्या स्मरे कोण । नवरोजी शेठ तैसेची ॥४१॥
बडोदे ग्रामीं समर्थासी-। बलात्कारे न्यावयासी । तात्या हर्षे निज मानसीं-। रचू लागले बेत नाना ।४२॥
राम मालशे इत्यादिक । यांही रचिला व्यूह एक । भांग-धोत्रा करुनी एक । केले रसायन पाजाया ॥४३॥
पडता बेशुद्ध यतिवर्य । पळवुनी न्यावे तयां त्वर्य । त्वरित गाठणे बडोदे कार्य । रचिला ऐसा व्यूह तये ॥४४॥
संधि साधुनी पेय देती । होय स्वामींसी दाह अती । यतिवर्याची कठिण स्थिती । पाहवेना कवणांसी ॥४५॥
बडोदेकरांची दुष्ट मती । जाणता जाहले संतप्त अती । ऐशा दुष्ट दुर्जनाप्रती-। ताडिले पाहिजे वदती जन ॥४६॥
भक्त लागता मारावया । लागले तेव्हा पडो पाया । आक्रोशता याचिती दया । चुकलो आम्ही नराधम ॥४७॥
स्वामी भक्तां खुणाविती । नका मारु तयांप्रती । ऐशी स्वामी दयामूर्ती । प्रज्ञापुरीं ती नांदे ॥४८॥
योगसामर्थ्य महाथोर । पचविती स्वामी विष घोर । येता पूर्वस्थितीवर । क्षमादृष्टिने अवलोकिती ॥४९॥
लोक सर्व हे पोटार्थी । द्रव्याकरिता सर्व करिती । तेणे जाहले हे दुर्मती । कीव तयांची येत आम्हा ॥५०॥
तात्या हर्षे नी मालशे । वोळंगती पदीं खासे । रक्षिता आम्हा कोणी नसे । तुम्हाविणे मायबाप ॥५१॥
आक्रंदता ह्रदय फुटले । देवे तयांसी आश्वासिले । होतील तुम्हा पुत्र भले । चिंता आता न करावी ॥५२॥
अयाचित असा आशीर्वाद । लाभता निमाला सर्व खेद । समर्थाचे घेतले पद-। उभयतानी निज मस्तकीं ॥५३॥
शत्रु-मित्र ना भेद करिती । ऐशी जयांची थोर मती । अखिल जनांचे हित साधिती । ऐसे महात्मे असती हे ॥५४॥
आता ऐका विठ्ठलकथा । हैदराबादीं गृहस्थ होता । माणिकप्रभूंचा भक्त असता । केले तयाने दुष्कर्म ॥५५॥
परस्त्री परधन अपहार । केले अत्यंत दुराचार । अपराध करिता महाथोर । श्रेष्ठ नोकरी जाय लया ॥५६॥
मनीं अत्यंत घाबरला । हस्तीं पदीं शृंखलेला-। घालुनी नेतील की मजला । बंदिशालेंत आजन्म ॥५७॥
उद्विग्न होय तो निज अंतरीं । जाऊ आता कोठे तरी । माणिकप्रभू समर्थ जरी । कळता देतील की शाप ॥५८॥
तया अंतरीं होय स्फूर्ती । अक्कलकोटीं देवमूर्ती । चरण धरोनी कथन करिती । स्थिती, जाउनी शरण तयां ॥५९॥
स्वामींच्या तो समोर येता । उग्ररुपा समर्थ घेता-। वदती तया अधमा आता । येसि कासया मजपासी ॥६०॥
परनारी त्या भष्ट केल्या । त्यांतील काही जिवे मेल्या । कित्येक व्यक्ती नागविल्या । अपहार करोनी द्रव्याचा ॥६१॥
ऐशा चांडाळाचे मुख-। बघता लाभे कवणा सुख । अनेकांसी दिले दुःख । तुला शासन नरकाचे ॥६२॥
संतप्त ऐशी ऐकता वाणी । थरथर कापे डोळिया पाणी । विठ्ठ्ल तदा कोसळे धरणीं । म्हणे वाचवा मज दीना ॥६३॥
बहुत पातके केली खरी । म्हणे मातें वाचवा हरी । आक्रोशता चरण धरी । हदीं आपुल्या विठ्ठल तो ॥६४॥
पश्चात्तापे जळे पुरता । ऐशी तयाची स्थिती बघता । दया उपजे श्रीभगवंता । मस्तकी ठेविला अभय कर ॥६५॥
विठ्ठल जाहला आनंद मनीं । अभय लाभे तयां म्हणुनी । घाली लोटांगणे चरणीं । कंठ तयाचा ये भरुन ॥६६॥
ठेवीन आता शुद्ध वर्तन । स्मरेन आपुले नित्य चरण । अनंत जन्मीं फिटणार न । अनंत असती उपकार ॥६७॥
हैदराबादे त्वरे येता । दरबारी त्या उभे करिता । निजाम वदला तया बघता । मुक्त करावे यालागी ॥६८॥
नवस केला होता तर्ये । मुक्तता झालिया मी तो स्वये । सुवर्णमुद्रा अर्पीन जये-। संकटीं मार्ते संरक्षिले ॥६९॥
मुक्त होता परतोनिया । यतिवर्याच्या पडे पाया । यथाविधी पूजोनिया । समर्था अर्पी स्वर्णमुद्रा ॥७०॥
श्रवण करावी आता कथा । बळवंतराव भेंडे स्वता । भोगित होते क्षयाची व्यथा । बहुत महिने दारुण ते ॥७१॥
देशी विदेशी वैद्य झाले। गंडेदोरे मांत्रिक भले । अनंत उपायां करोनि थकले । तदा वदले कोणी तया ॥७२॥
आपण प्रज्ञापुरीं जावे । सिद्ध महात्मा शरण भावे-। जावोनिया त्यां विनवावे । व्यथा आपुली हरावया ॥७३॥
पहावा तरी चमत्कार । अनुभव घ्यावा खरोखर । बरे होवोनि साचार-। याल तुम्ही सुनिश्चित ॥७४॥
प्रेमाग्रह तो अनेकांचा । ऐसा ऐकोनिया साचा । होय निश्चय मनीं त्यांचा । घ्यावे दर्शन स्वामींचे ॥७५॥
माता-भगिनी सवे घेती । प्रज्ञापुरीसी त्वरे जाती । कोठे आहे समर्थ मूर्ती । पुसती जनां नम्रत्वे ॥७६॥
तोंचि त्यांसी वदले कुणी । खासबागेंत असती मुनी । शरण जावे त्वरा करुनी । कृपा होईल तुम्हावरी ॥७७॥
हार, श्रीफल घेवोनिया । खासबागेंत जावोनिया । भावें साष्टांग वंदोनिया । चरणकमळीं स्थिरावले ॥७८॥
हार घालोनि दक्षिणा, पेढे । तांबूल ठेविला स्वामींपुढे । पुढे घालितो तुज साकडे । निवारावी व्यथा मम ॥७९॥
यथाविधी पूजिला हरी । वाहती नेत्रीं घळघळा सरी । तूंचि आता गा कैवारी । विश्वांतरीं या नसे दुजा ॥८०॥
स्वामीसन्निध पाचारिती । तया करीं श्रीफल देती । जपमाळ देउनी तया वदती । सुखे करावे त्वां गमन ॥८१॥
निराशतेने ग्रासिले जया । प्रसाद देउनी वारिले भया । येता तयांचे भाग्य उदया । अत्यानंद जाहला की ॥८२॥
स्वामीकृपे व्यथा गेली । समृद्धता तयां आली । समर्थचरणीं पूर्ण जडली । श्रद्धा तयाची आजन्म ॥८३॥
संत-महात्मे-सिद्ध थोर । वर्णन करिता नसे पार । सहज घडती चमत्कार । असे अलौकिक असती ते ॥८४॥
करुणार्णव ते होत स्वामी । कथा वाचा पुढे नामी । अगाध त्यांची असे करणी । प्रत्यक्ष पहा प्रत्यंतर ॥८५॥
मोहोळग्रामीं काय झाले । गरिब ब्राह्मणाघरीं घडले । रुग्ण पुत्रा मरण आले । आकांत जाहला भयंकर ॥८६॥
माते फोडिला हंबरडा । पिता जाहला जणू वेडा । कैसा पडे मृत्युचा वेढा । देवा आता कैसे करु ॥८७॥
एकुलता एक पुत्र साचा । प्रान बहिश्वर जणू अमुचा । कशास घेतला जीव त्याचा । म्हणोनि ताडिती निज वदना ॥८८॥
ह्रदय भेदक दुःख त्यांचे । ऐकवेना कुणा साचे । एक कुणबी गोड वाचे । धीर द्याया आला पुढे ॥८९॥
विवेके आवरा तुम्ही शोक । संकटीं दावितो मार्ग एक । कर जोडुनी मागुया भीक । दुःख सांगोनि साधूसी ॥९०॥
साधू ऐसा समर्थ कोण । मम बाळाचे आणील प्राण । घालीन चरणीं लोटांगण । म्हणे भेटवा आम्हा त्वरे ॥९१॥
सवे घेवोनि दोघांसी । कुणबी निघे दर्शनासी । नदीकाठी गुहेपाशीं । आले सत्वर धावुनी ॥९२॥
अहो धावा साधुदेवा । अंत आमुचा न पहावा । अमुल्य आमुचा पुत्र ठेवा-। द्यावा आम्हासी सत्वर ॥९३॥
गुहेच्या त्या तोंडावरी- होतो शिळा लोटुनी दुरी । उभी दिव्य स्वारी । तेजे भासली भास्कर जणू ॥९४॥
विप्र घाली मिठी पायीं । माता रडे धाइधायी । धरोनि आशा तुझे ठायीं-। आलो, निराशा न करि गा ॥९५॥
पुत्र एकला जाहला मृत । आभाळ फाटे अंधार होत । देवा आता करा त्वरित । उपाय पुत्रास्तव काही ॥९६॥
तदा बोलती योगेश्वर । बसवुनी पुत्रा घोड्यावर । दर्शना आणा येथवर । जावे सत्वर स्वगृहीं ॥९७॥
सदनीं येता आश्चर्य थोर । डोळे चोळित उठे पोर । निद्रा टाकोनिया घोर । भिर भिर पाहे चोहीकडे ॥९८॥
कवटाळिले माते तया । बाळा आलासि परतोनिया । करुणाघना श्रीयतिवर्या । तुमचीच कृपा सारी ही ॥९९॥
माता-पिता मंत्रमुग्ध । हर्षातिरेके नुरे शुद्ध । सावध करिती त्या प्रबुद्ध । अवती भवती होते जे ॥१००॥
माता-पिता घालिती स्नान । दिधले तया गोड अन्न । अलंकार वस्त्रे त्या घालुन । बसविले तया अश्वावरी ॥१०१॥
वाजत-गाजत तया नेला । स्वामी चरणी त्या घातला । सर्वागावरि का फिरविला । प्रेमभरे श्रीस्वामींनी ॥१०२॥
लोक करिती जयजयकार । अवधूत योगी महाथोर । गरिबाचे मृत उठविले पोर । ऐसे सामर्थ्य स्वामींचे ॥१०३॥
पुष्पे बहरला पारिजात । सडा फुलांचा पडे बहुत । तेवी श्रींच्या कथा अनंत । वाचू ऐकू आता पुढे ॥१०४॥
गोविंदशास्त्री विप्र एक । प्रज्ञापुरीं दिन कित्येक । धंदा भिक्षुकी करोनि देख । संसारगाडा चालविती ॥१०५॥
दिसामागोनि दीस जाता । वाढे तयांची संसारचिंता । काय करावे कर्मासि आता । नको दरिद्री ऐसे जिणे ॥१०६॥
संसार करिता पूर्ण विटला । जीव नकोसा तया झाला । जीवनापरी तो मृत्यू भला । लागली चिंता अनिवार ॥१०७॥
सहज एकदा आले मनीं । बसावे जाउनीं ययीचरणीं । करतील काहीतरी करणी । ना तरी करु आत्मघात ॥१०८॥
सायंसमयी सर्व जमली । भक्तमंडळी यती जवळी । घेवोनि दर्शना दूर बसलो । स्वारी गोविंदशास्त्रींची ॥१०९॥
भाग्यघटिका ती भटजींची । उदया आली पहा साची । अमृतदृष्टी समर्थाची । वळली अहा त्यांचेवरी ॥११०॥
दूर कासया बैसलासी । दुःख-चिंता काय करिसी । बैस येवोनि चरणांशी । बसता तया गोंजारिले ॥१११॥
संपत्ति असता वडिलार्जित । चिंतासागरीं वृथा बुडत । भाग्य उदया तुझे येत । सोडि चिंता सर्वही ॥११२॥
स्वामी मीतों भाग्यहीन । पूर्वार्जित कोठले धन । असे पामर मी मतिहीन । वदता वाहती अश्रूंसरी ॥११३॥
समर्थ त्यांसी तदा वदती । जागा खणोनी पहावी ती । दुपारीच्या तरुखालती । मागील तुझ्या परसांत ॥११४॥
ऐकता जाहला हर्ष थोर । स्वामींस घालुनीं नमस्कार । त्वरित गाठी आपुले घर । गेला परसांत मागल्या ॥११५॥
पत्नी-पुत्रांसवे रातीं । खणोनि करिता दूर माती । घट तांब्याचा हातीं । सुवर्ण मुद्रा दिसती त्यां ॥११६॥
परमानंदा नुरे पार । घडा घेवोनि डोईवर । नाचे थयथय पडवीवर । स्वामी स्वामी म्हणोनिया ॥११७॥
ऐसे स्वामी दयावंत । दारिद्रय-व्यथा दूर करित । मृता जीवन जणू देत । असती स्वामी अलौकिक ॥११८॥
समर्थाचे दिव्य चरणे । मस्तक ठेवू कर जोडूनी । गुंतवू मना नामस्मरणीं । स्वामीसमर्थ म्हणोनिया ॥११९॥
आता ऐका या कथेची दृष्टी दिली अंध स्त्रीसी । चिमाताई नामे ऐसी । घराणे तियेचे श्रीमंत ॥१२०॥
श्रीमंत रास्ते उमाबाई । तयांची भाची चिमाताई । विवाह जाहल्यावरी होई । पीडा तियेच्या नेत्रांसी ॥१२१॥
रोग वाढला नेत्रद्वयीं । खर्च जाहला तया पायीं । सृष्टी जाहली अंधारमयी । उपाय केले अनंत ते ॥१२२॥
मंत्र-तंत्रही सर्व केले । उपाय करिता सर्व थकले । तेव्हा कोणीतरी वदले । जावे आपण स्वामींकडे ॥१२३॥
विचार करिता बोध पटला । म्हणे जाउया दर्शनाला । प्रज्ञापुरीचा मार्ग धरिला । येताच वंदिले समर्थासी ॥१२४॥
दुसरे दिनी प्रातःकाळीं । शुचिर्भुत ऐशी ही मंडळी । पूजासाहित्य घेउनी जवळी । समर्थचरनीं उपस्थित ॥१२५॥
श्रीमंत रास्ते उमाबाई । स्वामीपदी ठेवुनी डोई । करी आम्हास उतराई । स्वीकारोनी पाद्यपूजा ॥१२६॥
पंचामृत स्नान चरणां । केशरी उटी लाविली त्यांना । हार सुगंधी अर्पिले जाणा । बैल-तुळशीहि वाहती ॥१२७॥
लाविला कपाळी सुगंधी टिळा । पुष्प-गजरे अर्पिती फळां । तांबूल-दक्षिणा हा सोहळा । स्वामी पाहती सकौतुक ॥१२८॥
भक्तिभावें ओवाळिती । कर जोडुनी त्यां प्रार्थितो । दया करावी अम्हावरती । नेत्रपीडा निवारी गा ॥१२९॥
स्वामी वदले प्रसन्नपणे । कशासि आता वृथा भेणे । त्यजुनी चिंता तुम्ही असणे । उपाय करणे सांगतो तो ॥१३०॥
दूध काढुनी मांजरीचे । नेत्रीं घालणे नित्य साचे । सातवे दिनीं दुःख तुमचे । नष्ट होता व्हाल सुखी ॥१३१॥
आनंद झाल तिचे चित्ता । उपाय केला गृहीं येता । यतिवर्याची अपूर्वता । प्रत्यया आली तिजलागी ॥१३२॥
त्रैलोक्यांत समर्थाची । सत्ता केवढी असे साची-। श्रवण करु नरसाप्पाची । कथा अत्यंत मनोहर ॥१३३॥
म्हैसुराहुनी अक्कलकोटीं । नरसाप्पा ये समर्थ भेटी । रात्रंदिन ते तया ओंठीं-। नाम नांदे समर्थाचे ॥१३४॥
ये न मराठी त्या बोलता । व्यवहार चाले खुणा करिता । स्वभावे तो शांत होता । स्वामींसन्निध सदा वसे ॥१३५॥
बहुत ऐसे जाता दिन । स्वामीसेवा नित्य करुन । जो जे देईल ते भक्षुन । करी आपुली उपजीविका ॥१३६॥
एके दिनीं काय झाले । यतिवर्ये त्या पाचारिले । हिशेबाचे चोपडे दिले । काय लिहिले ते वाची । ॥१३७॥
वाचता अत्यंत आनंदला । संदेश कानडी दिसे लिहिला । नित्य वाचणे तूं गीतेला-। होता तयासी उपदेश॥१३८॥
नरसाप्पा तो आनंदला । ठेवुनी चरणी मस्तकाला । त्वरे तेथोनिया उठला-। गेला दत्तगुरुजींकडे ॥१३९॥
कर जोडुनी म्हणे त्यांसी । मला शिकवालका गीतेसी । आजन्म आपुल्या उपकारासी । कदापि ना विसरेन ॥१४०॥
दत्तशास्त्री नि संन्यासी । शास्त्रचर्चा करिती निशीं । गाढ निद्रा नरसाप्पासी-। लागली होती त्या समयीं ॥१४१॥
जाहली असता मध्य रात्र । नरसू जाहला भयग्रस्त । सर्वागासी कंप सुटत । घाम फुटला आंगासी ॥१४२॥
स्वगत बोले तो भ्रमात । मातें नेले विष्णु लोकांत । स्वामी दाविती श्रीभगवंत । रामचंद्र नी सितामाई ॥१४३॥
रत्नजडित त्या सिंहासनीं । पाहिले दोघां हास्यवदनी । भरत-लक्ष्मण वामासनीं । शत्रुघ्न, मारुती नम्र अती ॥१४४॥
देदिप्य मूर्ती महा तेज । रत्नखचित ते मुकुट साज । पिनाकपाणी दिव्य ओज । ऐसे देखिले श्रीराम ॥१४५॥
स्वामी प्रत्यक्ष तिथे होते । प्रेमे धरोनी मला हाते-। प्रभू संन्निद्ध जाहले नेते-। तत्क्षणीं ठेविले शिर चरणी ॥१४६॥
श्रीस्वामीसमर्थ असती-। स्वयं भगवान ही निश्चिती । नरसाप्पा ऐशी करी स्तुती । ऐकता स्तंभित जन सारे ॥१४७॥
स्वचर्माचे जोडे जरी । स्वामींचरणीं घातले तरी । उपकार फिटणे अशक्य परी । हे मी जाणे सुनिश्चित ॥१४८॥
समर्थ विभुती असामान्य । तुळायासी दुजा न अन्य । देवांचेही देव ते, धन्य-। लाभे जयांना त्यांची कृपा ॥१४९॥
यतींची ऐशी करिता स्तुती । लाविता त्यांची चरण-माती । अनंत जन्मिची भस्म होती-। महापातके निमिषार्धी ॥१५०॥
सद्भक्तही करु नमन । जाऊ हितास्तव तयां शरण । भवभय संकट होय हरण । ऐसे सामर्थ्य स्वामींचे ॥१५१॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१५२॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 15, 2011
TOP