कथामृत - अध्याय चौदावा
प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.
श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविष्णवे नमः । लक्ष्मीमाते नमोस्तुते ॥१॥
गताध्यायीं वाचिले आपण । सर्पास केले दिव्य सुवर्ण । बसाप्पाचे दारिद्रय हरुन-। केले तयासी संतुष्ट ॥२॥
गरिब बिचार्या जनाईस । विठठल स्वरुपे दर्शनास-। देवोनि केले संतुष्ट तीस । सामर्थ्य ऐसे स्वामींचे ॥३॥
बसाप्पा कोष्टी द्रव्यहीन स्वप्नदृष्टांत त्या देऊन । सांगती कोठे पुरले धन-। मिळता श्रीमंत जाहला ॥४॥
आड पाहता तो जलहीन । करुणा उपजे त्यांस म्हणुन । अंतरी निर्मिले नवजीवन । अद्भुत ऐसे सामर्थ्य ॥५॥
चरित्रगंगा पुढे चाले । तींत पाहिजे स्नान केले । पापक्षालन पाहिजे झाले । आत्मोद्धार साधावया ॥६॥
सर्वागाचे करोनि कान । श्रोते करावे कथा श्रवण । योगेश्वरांचे ध्यान धरुन । मनन करावे निज अंतरीं ॥७॥
संतकथा त्या ऐकावया । यावे लागते भाग्य उदया । नातरी जिणे जाय वाया । विषयीं रमताम अहर्निश ॥८॥
मंगळवेढ्यानजिक गाव । चळअंबे हे असे नांव । मठीं तेथल्या एकमेव । राहिला होता रामदासी ॥९॥
खैर हिंडता यती आले । चळअंब्याचे मठीं वसले । बुवा, स्वामी एकत्र जमले । मठामाजी बहुत दिन ॥१०॥
जाता ऐसा बहुत काळ । काय जाहले एक वेळ । योगनिन्द्रेंत फार वेळ । होते स्वामी अंतर्गृही ॥११॥
प्रातःसमयीं रामदासी । उरकोनिया निजकर्मासी । लावोनि टाळे की दारासी । दूर गेला निघोनिया ॥१२॥
स्वामी येता जागृतींत । दार बघती बंद असत । योगबले बाहेर येत । जाउनी बसले भीमातिरीं ॥१३॥
रामदासी परतोनि आले । लोके तदा तया कथिले । स्वामी भीमातिरीं बसले । पहा जावोनि प्रत्यक्ष ॥१४॥
लोकां बुवा सक्रोध वदले । वृत्त फसवे सांगता कसले । लावुनी टाळे बंद केले । मठद्वारासि मी स्वये ॥१५॥
जावोनि बघता दार बंद । बुवां जाहला अत्यानंद । उघडोनि देखिले स्थल सबंध । परंतु यतिवर्य दिसती ना ॥१६॥
थक्त जाहले मनीं तेव्हा । यती दिसतो योगी महा । गर्भगलित ते झाले अहा । धाव घेतली भीमातिरी ॥१७॥
योगेंद्र बघता वाळंवटी । बुवा घालिती चरणीं मिठी । क्षमा असावी की जगजेठी । घोर अपराध मी केला ॥१८॥
सस्मित वदने मुनी वदले । समर्थ शिष्यत्व तुम्ही वरिले । सदाचारे पाहिजे वर्तले । समर्थ होतील संतुष्ट ॥१९॥
सद्बोध ऐसा तया करुन । यतींद्र करिती क्षणीं गमन । सामर्थ्य तयांचे अवलोकून । जयजयकार जन करिती ॥२०॥
मोहोळगावच मूर्तिकार । नियम तयाचा असे प्रखर । जातील जेथे योगेश्वर । तेथे दर्शना जात असे ॥२१॥
दर्शनाचा हा निर्धार । नित्य चाले महिने चार । एकदा आला मनि विचार । दर्शन व्हावे कुलपतीचे ॥२२॥
ऐशा असता अवस्थेत । जाई जेधवाअ दर्शनार्थ । स्वामी न दिसती, साक्षात-। मल्लारिमार्तड पाहिले ॥२३॥
चंपाषष्ठीस महोत्सव । श्वेत अश्वधारी देव । करीं खड्ग नी ढाल भव्य । भालीं फासला भंडारा ॥२४॥
उग्र रुप ते मनोहर । देखता जोडिले दोन्ही कर । विस्मित झाला मूर्तिकार । साष्टांग नमिले खंडोबा ॥२५॥
खोबरे खारका भंडारा-। उधळोनि पूजिले परमेश्वरा । सदानंद हो द्या आसरा । गर्जना करी येळकोट ॥२६॥
यतिवर्य घेता मूळ रुप । मूर्तिकारा आनंद खूप । म्हणे आपण मायबाप । आस माझी पुरविली ॥२७॥
जाणुनी माझे मनोगत । स्वरुप दाविले हो इच्छित । उपकार मजवरी हे अनंत । शरण आपणा पामर मी ॥२८॥
नेत्रीं तयाच्या अश्रुपात । भक्तिभाव तो उचंबळत । आपण माझे सर्वस्व होत । वदोनि लोळे श्रीचरणीं ॥२९॥
स्वामी तदा मनीं द्रवले । गोंजारुनी त्या शांतविले । सद्भाव जाणुनी पूर्ण केल आम्ही तुझे मनोरथ ॥३०॥
यती सोडुनी मोहोळास । निघोनि जाती सोलापुरास । शुभरावाचे देवळीं वास । करिती तेव्हा यतीश्वर ॥३१॥
देवलाभोवती कट्ट्यावरी । लोक बघती मूर्त गोजिरी । दगडी गोट्या घेउनी करीं । बालवृत्तिने खेळती ते॥३२॥
असंबद्ध की ते बोलती । जन तयांते खुळे म्हणती । दर्शना येता नित्य बघती। टोळ चिंतामणी स्वये ॥३३॥
चिंतोपंत सखाराम । टोळ जयांचे की उपनाम । वदती यांस नसेका धाम कोण कोठचे असती हे ॥३४॥
काय असावी जात यांची । विचित्र रीत ही वागण्याची । सोय असे का भोजनाची । असती यांचे कोण इथे ॥३५॥
मनात येती प्रश्न नाना । विचारावे जाउनी त्यांना । जाती पुसाया यतिवरांना । जाता परंतु अडखळले ॥३६॥
स्वामी पाहुनी टोळांकडे-। कशासि येता तुम्ही इकडे । तुम्हा कासया सांकडे पडे । कोण कोठुनी आलो मी ॥३७॥
जात आमुची कशा पुससी । विचित्र आम्हा काय म्हणसी । जाई आपुल्या उद्योगासी । आम्ही कुणाचे कोणी असो ॥३८॥
अंतःसाक्षित्व सिद्ध झाले । टोळ ऐकता हे एचकले । अनुच्चारित प्रश्न जाणले । निश्चित हे की असामान्य ॥३९॥
नेत्र टोळांचे पाणावले । कर जोडुनी उभे ठेले । अपराध पाहिजे क्षमा केले । वदोनि घालिती दंडवत ॥४०॥
टोळ जाहले परमभक्त । भजन-पूजनीं ते आसक्त । समर्थचरणी ते अनुरक्त । लाभले म्हणती सदगुरु हे ॥४१॥
भाग्य टोळांचे उदेले । मालोजि नृपे पाचारिले । कारभारी त्या नेमिले । अक्कलकोटिचे संस्थानीं ॥४२॥
एके प्रसंगी काय झाले । स्वामी, टोळ भोजना बसले-। तदा टोळांचे मनीं आले-। नानातर्हेचे विकल्प ॥४३॥
स्वामी जातिचे खरे कोण । हवे त्याचे भक्षिती अन्न । शुद्धा-शुद्ध प्रकार भिन्न । मानिती ना हे स्वामी ॥४४॥
कुणासंगेही राहती । केव्हा काहीही प्राशिती । विधि-निषेध ना मानिती । कैसे जेवणे यांचे सह ॥४५॥
तत्क्षणीं पहा काय झाले । स्वामी पंक्तींतुनी उठले । भयग्रस्त ते टोळ वदले । थांबा थांबा यतिवर्य ॥४६॥
असो आम्ही अशुद्ध अती । जेवणे तुम्ही शुद्धमती । विशुद्ध जाहल्यावरी पुढती । करु भोजन तुम्हांसवे ॥४७॥
स्वामी पावले जणू गुप्त । टोळां जाहला पश्चात्ताप । माझ्या मनिंचे विकल्प सुप्त-। जाणुनी क्रोधे गेले की ॥४८॥
करावे आता तरी काय । करु लागले हाय हाय । अवमानिली विकल्पे माय । व्यर्थ मी हो मूर्खाने ॥४९॥
स्वामी असता सोलापुरीं । सिद्धेश्वरी शिवमंदिरीं । सिद्धेश्चराच्या सरोवरीं । उदक नव्हते थेंबही ॥५०॥
प्रजा अत्यंत संत्रस्त । पाणी पाणी नित्य करिता । लांबलांबुनी जन आणित । पाणी आपुल्या कार्यास्तव ॥५१॥
लोक अत्यंत कंटाळले । जीव नकोसे तयां झाले । अभिषेक प्रार्थना नित्य चाले । मंदिरांमंदिरांमधोनिया ॥५२॥
उपाय करिती लोक नाना । परंतु तयांसी यश येइना । हैराण जाहले उदकाविना । काय करावे न सुचे त्यां ॥५३॥
यतिवर्य बघता ऐशी स्थिती । करुणा उपजे तयां चित्तीं । लांब जावोनिया करिती । एक घटिका लघुशंका ॥५४॥
जन बोलती आपसांत । संन्यासी हे विचित्र दिसत । काय असते यांचे मनांत । न कळे कवणास काहीही ॥५५॥
तोंचि स्वामी त्वरे आले । आश्वासन ते जनां दिधले । पहा पहा हो मेघ आले । होईल पर्जन्यवर्षाव ॥५६॥
लोक पाहती आकाशांत । मेघ परी ना कुठे दिसत । हांसहांसुनी सर्व वदत । खुळे दिसताति संन्यासी ॥५७॥
लोक आपुले घरीं जाती । काय जाहले मध्यरात्रीं । विजा कडाडू लागल्या वरती । मेघगर्जना होत थोर ॥५८॥
जाता ऐसे काही क्षण । पर्जन्य पडे अति भयाण । जीव आपुला मुठीं धरुन-। लोक वर्तले त्या रात्रीं ॥५९॥
प्रातःकाळी दुसरे दिनीं । वर्षाव झाला बंद म्हणुनी । बघाया जाती जन धावुनी । तलाव कैसा भरलासे ॥६०॥
तलाव बघता जल संपूर्ण । हर्ष आला उचंबळून । यतिवर्याचे सामर्थ्य बघुन । विस्मित झाले जन सारे ॥६१॥
पाण्यासाठी डोळियां पाणी । ऐशी स्थिती भोगिली ज्यांनी । यतिवर्य गमले चक्रपाणी । मिळता जनांसी जवजीवन ॥६२॥
दुष्काळसंकट पूर्ण टळले । अत्यानंदीं सर्व रमले । स्वामींस आम्ही खुळे म्हटले । केले वदती महा पाप ॥६३॥
अमृतवृष्टी बहुत झाली । धरा तेणे प्रफुल्ल झाली । उदक चिंता पूर्ण मिटली । आनंद जाहला सर्वत्र ॥६४॥
येणे प्रकारे यतिवर्याची । योग्यता कळली जनां साची । केली हेटाळणी तेची-। घालु लागती लोटांगणे ॥६५॥
जयांनी पर्जन्य बोलाविला । तलाव जेणे पूर्ण भरिला । अतर्क्य असे ही यतिलीला । ईश्वर अवतार सत्यची ॥६६॥
ब्राह्मण असे हिंदुस्थानी । सेवेकरी नृपासदनीं । सत्यवक्ता धर्माचरणी । स्वामिसेवेंत तत्पर ॥६७॥
स्वामींवरी अती भक्ती । स्वामी तया सर्वस्व गमती । दर्शनासक्त ज्याची मती । मुकुंद ऐसा यतिवेडा ॥६८॥
स्वामीचरणीं तो अनन्य । सेवेत मानी आपणा धन्य । भजन-पूजना दे प्राधान्य । सरकार नोकरी गौण तया ॥६९॥
यतिदर्शन घेतल्याविण । करित नसे अन्नग्रहण । अपूर्व भक्ती विलोकुन । स्वामी संतुष्ट त्यावरी ॥७०॥
प्रार्थना करी यतिवरांसी । आपणासारिखे करा मजसी । व्यर्थ नरदेह हा मजसी । नातरी मिळाला वाटेल ॥७१॥
वासनांचा त्याग करणे । संसारमाया ती जाळणे । ईश्वरनिष्ठ वृत्ति असणे । चिंरतन सुखा अवश्य ती ॥७२॥
यतिवर्यमुखे श्रवण करिता । परिणाम जाहला की सर्वथा । द्रव्य, दारा सोडुनी चिंता । एकांतवासा वरियेले ॥७३॥
जनतासंपर्क टाळावया । मौनव्रतासी धरिले तया । टवाळी निंदा कुणि केलिया । न ये क्रोधासि तो कदा ॥७४॥
समभाव मनीं दृढावला । हर्ष खेद हा भाव गेला । एकांतवासीं सुखावला । संन्यस्त जाहला संपूर्ण ॥७५॥
साधन चतुष्टय संपन्न । यतिवर्य असती त्या प्रसन्न । स्वामींविना अन्य ना ध्यान । होय ऐसा विरागी तो ॥७६॥
गत जन्मीचा योगाभ्यासी । पूर्वसुकृते भेटले त्यासी । प्रेम उपजले योगेश्वरांसी । केला संपूर्ण पालट ॥७७॥
यतिवर्य जाती प्रज्ञापुरी । मुकुंद वसे तो सोलापुरीं । संपूर्ण कृपा मुकुंदावरी । होती सत्यची स्वामींची ॥७८॥
सिद्धेश्वराचे मंदिरांत । खोलींत वसती ते निवांत । योगाभ्यासीं अखंड रत । मुकुंदस्वामी असती ते ॥७९॥
सिद्धेश्वराच्या तलावांत । नित्य प्रभातीं स्नान करित । कवनास काही ना याचित । अलिप्त वृत्ती तयांची की ॥८०॥
हे न पाहवे दुर्जनांस । चुगली करिती वरिष्ठांस । दंडावे या मुकुंदास । आपणा समजे मुनीश्वर ॥८१॥
वरिष्ठ येती तदनंतरी । तंबी दिली तयां भारी । स्नान केलिया सरोवरीं । कोठडीमाजीं बंद करु ॥८२॥
ते न बोलती परी काही । वरिष्ठ गेले सांगोनि तेही । नेम तयांचा चालूच राही । वरिष्ठ तेणे संतापले ॥८३॥
दुसरे दिनीं काय झाले । प्रातःकालीं वरिष्ठ आले । कोठडीमाजीं बंद केले । ठेविला रक्षक दारावरी ॥८४॥
दुसरे दिनीं चमत्कार । लोक पाहती खरोखर । बुचकुळ्या मारी तीन चार । जलाशयीं तो श्रीमुकुंद ॥८५॥
वृत्त येताचि हे कानीं । वरिष्ठ आले तया स्थानीं । प्रत्यक्ष पाहिले तये नयनी-। स्नान करितसे तो मुकुंद ॥८६॥
वरिष्ठ गर्जले तयांवरती । आज्ञा तुजला दिली होती । बाहेर यावे त्वरित गती । नातरी दंडा बसेल रे ॥८७॥
ऐकोनि आज्ञा अशी करडी । मुकुंदे मारिली खोल बुडी । विलंब जाहला तरि न कुडी । पाणियावरी दिसे न ती ॥८८॥
उड्या टाकुनी लोक बघती । परंतु कोणास ना मिळती । कंटाळुनी वरिष्ठ वदती । चला पाहुया खोलीवर ॥८९॥
वरिष्ठे उघडिले स्वये दार । पाहता वाटे आश्चर्य थोर । ओलीचिंब ती मूर्ती समोर-। देखिली त्या मुकुंदाची ॥९०९॥
मुकुंदे केले हास्यवदन । का गाठिले आमुचे सदन । आम्ही कुणाचे वाटेस न । पीडिता का आम्हासी ॥९१॥
गुरुंची आज्ञा हे बंधन-। आम्ही मानितो फक्त जाण । कराया आम्हा बंदिवान । कोण समर्थ आहे की ॥९२॥
सार्थ जाणोनि उन्दार । तपःसामर्थ्य महा थोर । पाहता लोकीं अत्यादर । प्रकटला तो तत्क्षणीं ॥९३॥
कुटाळ पाखंड मौनावती । चरणीं तयांचे वोळंगती । दया करावी अम्हावरती । व्यर्थ छळिले तुम्हासी ॥९४॥
विनम्र चरणीं ते वरिष्ठ । दिधले वदती वृथा कष्ट । अधिकार आपुला असे श्रेष्ठ । क्षमा मागतो श्रीचरणीं ॥९५॥
मौनीबुवा सर्वास वदती । सुखे जावे गृहाप्रती । नृसिंहस्वामी स्मरा चित्तीं । तेर्णे साधाल कल्याण ॥९६॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥९७॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2011
TOP