कथामृत - अध्याय तेरावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीहनुमंताय नमः । श्रीशनिदेवा नमोस्तुते ॥१॥
गत अध्यायीं श्रोतेजन । निजभक्ताचे रोगहरण-। करोनि दिले नवजीवन । प्रकार ऐसा वाचिला की ॥२॥
दीन दुर्बल कृषिवलासी-। रक्षिले उठवुनी मृत बैलासी । वाचिले अद्‌भुत प्रकारासी । ऐसे सामर्थ्य स्वामींचे ॥३॥
निज भक्ताच्या अंतसमयीं । प्रकट होउनी तया ठायीं । प्राण घुटमळे अशा समयीं-। भक्तासी त्या मुक्त केले ॥४॥
मातेहुनीया अति ममताळू । स्वामि माउली अति कृपाळू । स्मरणमात्रे ये दयाळू । आले अनुभव कित्येका ॥५॥
चरित्रसरिता पुढे वाहे । पुढे आणखी काय आहे । जाणावयासी उत्सुकलाहे-। श्रोतृवृंद मी जानतसे ॥६॥
होवोनि आता सावधान । कथा कराव्या अहो श्रवण । ऐकता कथा समाधान-। वाटेल चित्ता सुनिश्चित ॥७॥
ऐका एकदा काय झाले । शूद्रस्त्रीच्या मनीं आले । पंढरपुरीं जाउनी भले । दर्शन घ्यावे विठोबाचे ॥८॥
निश्चय ऐसा करुनी मनीं । सिद्धता तिने सर्व करुनी । सवे कन्या निज घेउनी । जाया निघाली । पंढरपुरीं ॥९॥
जरी शूद्र ती जनाबाई । विठूदर्शनीं तिला घाई । पंढरपूर ते कदा येई । आतुर जाहली अत्यंत ॥१०॥
मार्गीं चालता घाई घाई । अवचित वादळ सुरु होई । कडाडती त्या विजा डोई । अंधारले की सर्वत्र ॥११॥
मेघ गर्जती अति भयाण । तडित्‌ तडाडे अधुन मधुन । काय करावे हे न सुचुन । थांबली ती वृक्षातळीं ॥१२॥
धो धो पर्जन्य । ओरडू लागले पशू वन्य । संगती ना दुजे अन्य । भयभीत होय ती जनाबाई ॥१३॥
सुसाट सुटला थंड वारा । नजिक दुसरा ना निवारा । थंडिने कांपे ती थरथरा । चिंब जाहले सर्वाग ॥१४॥
जेव्हा पर्जन्य थांबे जरा । बाईस आला धीर खरा । वस्त्रे पिळता ती भरभरा । सहज बघे हो सामोरी ॥१५॥
समोर एका वृक्षातळीं । समर्थाची मूर्ति सावळी । दिसता धावे तयां जवळी । ठेविले मस्तक चरणावरी ॥१६॥
अवचित स्वामी कसे आला । घोर पर्जन्य समयाला । दर्शन घडता धीर आला । शरण आपुल्या चरणीं मी ॥१७॥
आजपर्यत मी केली । वारी पारी ना कधी चुकली । घोर ऐशा पर्जन्याकालीं । जाणार कैशी पंढरपुरा ॥१८॥
दर्शन मला चुकणार यंदा । सोडोनि आले काम धंदा । दया करी बा तूं गोविंदा । दर्शन माते न अंतरो ॥१९॥
स्फुंदोनि लागे रडायासी । करुणा आली यतिवरांसी । भितेसि का तूं पर्जन्यासी । घडेल दर्शन तुज निश्चित ॥२०॥
नेत्र पुसोनी पाहता वर । तोंचि घडले नवल थोर । अद्दश्य होउनी योगेश्वर । बघे प्रत्यक्ष पांडुरंग ॥२१॥
जनाबाईचे भान हरले । श्रीरंगचरणां कवटाळिले । अनंत जन्मिचे पारणे फिटले । समक्ष भेटता श्रीरंग ॥२२॥
श्रीरंग बोले जनाईला । नेम तुझा तो पूर्ण झाला । जाई सुखें निजगृहाला । प्रसन्न मी ग् तुजवरती ॥२३॥
भक्तजनांच्या संरक्षणा । रुपे घेती प्रभू नाना । आर्त होणे अवश्य जाणा-। ईशदर्शन होण्यास्तव ॥२४॥
गत जन्मिच्या सुकृताताविण । आर्तता येणे महाकठिण । ध्यानधारणा नामचिंतन । अखंड करणे अवश्य ॥२५॥
चिंतने लागे मना गोडी । नामस्मरणीं बहु आवडी । संतसमागम तो हरघडी-। कल्याणप्रद सुनिश्चित ॥२६॥
संतसंगे दुर्गुण जाती । साधकाची हो शुद्ध मती । साधका साधनीं लाविताती । आत्मकल्याण व्हावया ॥२७॥
सिद्ध महा अतर्ज्ञानी। जनाईचे स्थिति जाणुनि । विठोबाचे रुप घेऊनी । संतुष्ट केले तिजलागी ॥२८॥
जनि म्हणे यतिवरांसी । ऋण फेडने अशक्य मजसी । साक्षात्‍ विठठल तूंच अससी । ह्रदयीं धरिले रुप तुझे ॥२९॥
पंढरपुरिची सोडूनी वारी । प्रज्ञापुरीची करी वारी । भजन-पूजन सेवा करी । परब्रह्म श्रीसमर्थाची ॥३०॥
यथा शक्ति विप्रभोजन । गोरगरिबां अन्नदान । प्रसन्न जाहले जगज्जीवन । पाहुनी तिचा दृढ भाव ॥३१॥
पुढे एकदा काय झाले । मंगलवेढीं अरण्यींभले । कंटकांवरी पहुडलेले । स्वामींस बघे बसाप्पा । तो ॥३२॥
बसाप्पाच्या मनीं आले । सिद्ध असती किंवा खुळे । योगमार्गात रमलेले । असती कोणी पुरुषोत्तम ॥३३॥
तोंच स्वामी तया वदले । आम्ही शहाणे अथव खुळे । तुझे काय रे सांग अडले । असोत आम्ही कोणीही ॥३४॥
थक्क जाहला बसाप्पा मनीं । अचूक देता उत्तर मुनी । जाणिले कैसे आश्चर्य यांनी-। मन्मनां तिल प्रश्नांसी ॥३५॥
हा न कोणी वेडापिसा । बावळा दिसे जरी ऐसा । कंटकांवरी निजे कैसा । पडत असता पर्जन्यु ॥३६॥
बसाप्पा लागे करुन सेवा । रात्रंदिन त्या ना विसावा । स्वामींस आग्रहे वदे जेवा । अन्न आणिले तुम्हांस्तव ॥३७॥
आग्रहास्तव स्वीकारिती । बसाप्पाची अत्यंत भक्ती । बघतां तयाची दीन स्थिती । दयासागर कळवळले ॥३८॥
स्वामी हिंडती ठाईठाई । तयां मागे बसाप्पा जाई-। पत्नी तयाची संतप्त होई । वदे चालले हे काय ॥३९॥
उद्योगधंदा नसे काही । कमाईची सोय नाही । दारिद्र्याने त्रासली बाई । नित्य भांडे बसापाशी ॥४०॥
बसाप्पाचीए अपूर्व भक्ती । श्रीदर्शनी अति आसक्ती । बघुनी तयाची प्रेमवृत्ती । स्वामी मनीं संतोषले ॥४१॥
स्वामींसवे फिरतां वनीं । आले एक्या भयाण स्थानीं । असंख्य भुजंग फूत्कारोनी । बसापावरी धावले ॥४२॥
आरडाओरड बसाप्पा करी । बैसली धारण पांचावरी । वाचवा वाचवा मातें हरी । भुजंग नातरी डसतील ॥४३॥
हांसुनी वदती तया स्वामी । उचल त्यांतला सर्प नामी । येईल तो तुझ्या कामी । निश्चये मी तुज सांगे ॥४४॥
यतींची आज्ञा मोडवेना । काय करावे हे सुचेना । यत्न करोनी तयें नाना । सर्प बांधिला वस्त्रांतरीं ॥४५॥
अरे आता घरी जावे । कोणास काही न सांगावे । नित्याप्रमानेचि वागावे । आज्ञा माझी तुजलागी ॥४६॥
घामाघूम बसाप्पा झाला । तेथोनि आपुल्या गृहीं आला । पत्नीस बोले वाढ मजला । क्षुधा लागली अत्यंत ॥४७॥
उपरणे ठेवोनि खुंटीस । पडता निद्रा ये तयास । उठोनि प्रातःसमयास । स्मरण करी श्रीस्वमींचे ॥४८॥
उरकोनिया प्रातर्विधी । पाचारिले स्त्रीस आधी । भाकरी दे खावया ताजी । जाणे मजसी उद्योगा ॥४९॥
भयभीत पत्नी तया वदली । कोठुनी अवदसा आठवली । सांगा कुठे केली । कर्म आपुले ओढवले ॥५०॥
बसाप्पा तदा स्त्रीस वदला । अगे सांगसी काय मजला । पर धना ना स्पर्श केला । जरी दरिद्री असलो मी ॥५१॥
तोंच स्त्रीने काय केले । उपरणे तिने पुढे केले । यांत बांधोनि काय आणिले । नको विष हे भयंकर ॥५२॥
सोडिता उपरणे आंत दिसले । सुवर्ण सर्पाचे वेटोळे । पहाता नेत्रे विस्फारिले । धन्य म्हणे ते यतिवर्य ॥५३॥
पत्नीस वृत्तांग सर्व कथिला । तदा वाटे आश्चर्य तिजला । व्यर्थ वदले नीच बोला । क्षमा करावी मज नाथा ॥५४॥
हर्षसागर उचंबळला । म्हणे चलावे न्याहारीला । योगेश्वराच्या दर्शनाला । चला सत्वरी जाऊंया ॥५५॥
स्वामींस द्याया फलाहार । घेतला त्यांनी बरोबर । जाता क्षणींच चरणावर-। ठेविती मस्तक नम्रत्वे ॥५६॥
दारिद्र्य व्यथा होय दूर । सुखाने करा निज संसार । नित्य करित परोपकार । तेणेचि देव संतोषे ॥५७॥
सिद्धमहिमा वर्णील कोण । केला तयें सर्प सुवर्ण । विषाचे अमृत करिती जाण । सामर्थ्य ऐसे अलौकिक ॥५८॥
ऐसाच होता दीन कोष्टी । सदासर्वदा असे कष्टी । अत्यंत दुर्बल देहयष्टी । पुरा गांजला संसारा ॥५९॥
नित्य जाई यतिदर्शना । मस्तक ठेवी संतचरणां । नको जिणे हे वाटे मना । मृत्यू बरा की त्यापरिस ॥६०॥
हीन अवस्था अवलोकुनी । दया उपजे श्रींचे मनीं । स्वप्न-दृष्टांत जाहला झणी । बसाप्पा कोष्टयांस त्या रात्रीं ॥६१॥
निद्रेत असतां गाढ कोष्टी । स्वामी पडले तया दृष्टी । वडिलें धनाची एक पेटी । पुरली तुळशीवृंदावनीं ॥६२॥
सांगोनि यती पावले गुप्त । कुणा न कथिला तो दृष्टांत । आजवरी हे वदला न आप्त । असेल का हे सत्य परी ॥६३॥
वृथा शंका कासया मनीं । पहावे तेथे की खणोनी । विचार ऐसा येता मनीं । खणू लागला प्रत्यक्ष ॥६४॥
खणता काय झाले । संदुकेवरी घाव पडले । आवाज येताचि थांबविले । खणावयाचे काम तये ॥६५॥
माती उकरिता आंत खोल । संदूक दिसली तया खोल । उघडोनि बघता यत्न सफल । हर्षतिरेके तो नाचे ॥६६॥
रुपये मोहरा पाहोनि आंत । दागदागिने व्यवस्थित । दारिद्रय गेले लयाप्रत । धनिक जाहला एक्याक्षणीं ॥६७॥
स्वामीचरणीं ठेवुनी धन । वदे आपण दयाघन । दारिद्रय माझे नष्ट करुन । रक्षिलेती मायबापा ॥६८॥
चरणकमळीं ठेवुनी डोई । रडू लागला घाई धाई । गोंजारीत बोलती साई । करी संसार आनंदे ॥६९॥
अशा स्वामींच्या कथा गहन । श्रवणे होई पापक्षालन । तयांचे चरणीं ठेवुनी मन । वर्तू जगीं आजन्म ॥७०॥
ऐकणे आता दिव्य कथा । जाईल ऐकता मनोव्यथा । कैसे पुरविती मनोरथा । शरणागत जो सर्वस्वी ॥७१॥
मंगलवेढयामधे एक । बाबाजी विप्र वैदिक । सत्त्वशील नी अति भाविक । प्रसिद्ध ऐसा तो लोकीं ॥७२॥
एके दिवशीं उन्हाळ्यात । विप्रसदनीं अकस्मात । समर्थ येता हो विस्मित । बाबाजेभट्ट तेधवा ॥७३॥
उच्च आसन तया दिधले । बाबाजीने चरण चुरिले । उपवासाचे पदार्थ दिधले । द्विजस्त्रीने सप्रेमे ॥७४॥
आग्रहे सेविता चार घास । प्रसन्न जाहले यति-मानस । उभयतां पूजिले यतिवरांस । चरण प्रक्षाळिले ॥७५॥
पसरली वार्ता ही सर्वत्र । तदा जमले जन एकत्र । दर्शन घ्याया की पवित्र । अधिर जाहले नरनारी ॥७६॥
प्रेमे पूजन स्वीकारिती । द्विजस्त्रीसी यती वदती । तृषार्त आम्ही आहो अती । प्यावया द्यावे जल मधुर ॥७७॥
नमन करोनी ती यतिवर्या । कलश घेउनी विप्रभार्या । त्वरे निघाली स्वामिकार्या । मधुर शीतल जलास्तव ॥७८॥
कलश घेउनी सभोवार-। हिंडली परंतु मिळे न नीर । हताश होउनी गाठिले घर । लागे रडाया द्विजभार्या ॥७९॥
गतजन्माची मी पापिणी । वाढी न कोणी मला पाणी । केवढी मी तो अभागिनी । देतील आताअ मुनि शाप ॥८०॥
सांगती योगेंद्र परोपरी । कूप असता तुझे दारी । हिंडसी कासया घरोघरी । कूपासमीप मी येतो ॥८१॥
स्वामींसवे सर्व निघती । तदा स्वामींस लोक वदती । कूप पडला कोरडा अती । जाहली तया वर्षे बहू ॥८२॥
स्वामी पाहती खरोखर । आड पडिला शुष्क ठार । जाती तेथुनी जरा दूर । करावयासे लघुशंका ॥८३॥
कूपासन्निध येता यती । सर्व लोकांस ते वदती । डोकावुनी पहा अंती । कूपातळीं काय दिसे ॥८४॥
आश्चर्य घडले महा थोर । झरे फुटले आंत चार । आड भरता अर्ध्यावर । महागर्जना जना करिती ॥८५॥
स्वामी प्राशिती कूपोदक । अमृताहुनी गोड उदक । पिवोनि बघती लोक कैक । परम संतुष्ट जाहले ॥८६॥
कुंभ, कळशा बांधुनी थोर । आडामाजीं सोडिती दोर । भरोनि घेती नारी-नर । विशुद्ध जल ते संसारा ॥८७॥
अनेक वर्षे शुष्क ठार । पडला होता आड थोर । स्वामी प्रत्यक्ष परमेश्वर । भेटले आम्हाम दीनांसी ॥८८॥
वृत्त पसरले हे सर्वत्र । दूरदूरचे जन एकत्र । स्वामीदर्शन ते पवित्र । घ्याया उत्सुक जाहले ॥८९॥
गंधाक्षता यतिवरांसी । अर्पुनी फुले पूजिले त्यांसी । दुग्ध-फळें नैवेद्यासी । केली आरती महा नादे ॥९०॥
विहीर बघता जलसंपूर्ण। सौभाग्य द्रव्ये तिज अर्पून । खणा नारळे ओटी भरुन । आनंद पावल्या सुवासिनी ॥९१॥
काय वर्णावा संत महिमा । परमेश्वराची दुजी प्रतिमा । अष्टसिद्धी लाविती कामा । लोक कल्याण साधाया ॥९२॥
संत-सिद्धांची अपूर्व करनी । शुष्क आडा आणिती पाणी । वोळंगती लोक चरणीं । महदाश्चर्या विलोकिता ॥९३॥
यांहुनीही आश्चर्य कथा । वाचावयाच्या पुढे आता । हरतील सार्‍या मनोव्यथा अवलोकिता सामर्थ्य ॥९४॥
इति श्रीस्वामी गुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥९५॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP