खंड ५ - अध्याय १

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शौनक सूतासी म्हणत । ऐकिलें गजाननाचें चरित । सर्वसौख्यकर जें अत्यंत । ब्रह्यभूत पदप्रदायक ॥१॥
एकदा ज्यानें ब्रह्मामृत । गणराजाच्या कथांचें अद्‍भुत । प्राशन केलें ऐसा कोण होत । पूर्ण तृप्त या जगीं ॥२॥
गुणज्ञ कोण तें अमुत त्यागील । धन्य आम्हीं सारे निर्मल । महाभागा तुझ्या संगतीनें अमल । गणेशचरित्र ऐकतसों ॥३॥
योगप्रदा गाथा ऐकली । तुझ्या मुखांतून द्विजोत्तमा भली । लंबोदराची महत्ता वर्णिली । पाहिजे आतां आम्हांप्रती ॥४॥
कैसा असे हा गणेशान । त्याचें ब्रह्म कैसें पावन । त्याचे अवतार किती महान । विघ्नपाचें कार्य कोणतें ? ॥५॥
तो भूमीवरी अवतरत । किमर्थ तें सांगा विस्तृत । सूत शौनकासी सांगत । दक्ष ऐसें मुद्‍गला म्हणे ॥६॥
योगींद्र मुख्य़ मुद्‍गलमुखातून । गजानन चरित्र ऐकून । गाणपत्यासबोले वचन । अहो मुद्‍गल महामुने ॥७॥
गजाननाचें माहात्म्य चरित । संक्षेपें ऐकिलें ऐकिलें परी चित्त । माझें न झालें तृप्त । अमृतासम ते अवीट वाटे ॥८॥
म्हणोनि लंबोदराचें चरित । सांगा मजसी पुनीत । सर्वसिद्धिप्रद पूर्ण असत । जें वाचितां वा ऐकतां ॥९॥
गणेशाच्या कथा ऐकती । वाचिती विचारिती । ऐसे चतुर्विध योगी जगतीं । पुण्यवंत निःसंशय ॥१०॥
धन्य धन्य ते पुरुष जगांत । ज्यांसी गणेश कथांत आदर वाटत । ते योगिभूषण कृतकृत्यता प्राप्त । ऐसे जाण मुनिसत्तमा ॥११॥
सूत शौनकादीस सांगत । ऐसा दक्षाचा आदरभाव पाहत । तैं मुद्‍गल मुनि हर्षित । म्हणे तया महाभागासी ॥१२॥
प्रजापतींद्रा तूं ब्रह्मभूत । साक्षात्‍ ब्रह्मतुल्य जगांत । यात संशय कांहीं नसत । म्हणोनि आश्चर्य यांत काय ॥१३॥
गणनाथकथांत रसयुक्त । तूं म्हणोनी भाग्यवंत । ज्यांचा मुखारविंदांत । गणेश स्मरण सदा वसे ॥१४॥
त्यांचें दास्य करण्या इच्छित । दक्ष प्रजापते मी सतत । आता लंबोदराचें चरित । संक्षेपानें तुज सांगतों ॥१५॥
विस्तृत वर्णन करण्यास । सामर्थ्य कोणा नरास । असित नैध्रुव संवाद सुरस । सांगेन तुज सर्व सिद्धिप्रद ॥१६॥
एकदा मुनिशार्दूल नैध्रुव जात । तपश्चर्या करण्या वनांत । तेथ तो घोर तप करित । दिव्य वर्षे सहस्त्रावधि ॥१७॥
देवेंद्रादि भयभीत । तपानें काय हा साधण्या इच्छित । अग्निसम याच्या तुल्य ब्रह्मांडांत । अन्य कोणी नसे ॥१८॥
तदनंतर नैध्रुवाच्या आश्रमांत । असितमुनि एकदा येत । त्या पितृव्यासी प्रणाम करित । नैधुरुव मुनि तैं आदरें ॥१९॥
हत जोडून प्रार्थित । भक्तियुक्त पूजा करित । असितें आज्ञा करितां बसत । आपुल्या आसनीं विनम्रपणें ॥२०॥
आपुल्या भावाच्या सुताप्रत । असित महायोगी सांगत । हितकारक गोष्ट भावें संतुष्ट । तपोधना नैध्रुवासी ॥२१॥
अरे बाळा देहा कां पीडिसी । देहशोषण हें मुख्य कैसे मानिसी । शास्त्रें निषेध करिती तयासी । म्हणोनि त्यागी देहश्रम ॥२२॥
देह कष्टविणें सोडून । मुख्य तपाचें कर आचरण । तेणें तूं होऊन ब्राह्मण । ब्रह्माप्रती जाशील ॥२३॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । असिताचें वचन ऐकून म्हणत । नैध्रुव तेव्हां भक्तिसंयुत । संशय मानसीं दाटून ॥२४॥
योगींद्रा कृच्छ्र चांद्रायणादि व्रतें । यथाविधि केली महामते । यासीच शास्त्र तप म्हणते । सर्वज्ञही मुख्य त्यास वर्णिती ॥२५॥
असित तेव्हां त्यास सांगत । त्रिविध तापद तप वर्णिलें शास्त्रांत । ते ऐकतां विधिपूर्वक उचित । योगिवंद्य तूं होशील ॥२६॥
कृच्छ्र चांद्रायणादी व्रतात्मक । पंचाग्नि साधनें वायुभक्षणादिक । ऐसीं हीं व्रतें अनेक । बाहयभावस्थ तपें तीं ॥२७॥
पुत्रा तूं ऐसें जाण निश्चित । तप इहलोकीं परलोकींही होत । फलप्रद ही गोष्ट निश्चित । परी स्थिरपद तेणें न दिलें ॥२८॥
ऐश्या बाहय तपाचें फळ भोगून । दीनरूप होई अन्तीं जीवन । तैसेंच महाभागा अन्य कठीण । वायुरोधात्मक तप ॥२९॥
देहांत प्राणायामें करून । प्राणांचा निरोध साधून । जो संताप घडविती जन । देहतप तेंही असे ॥३०॥
षट्‍चक्र भदेन करून । होऊन अंतर्ध्यान परायण । सहस्त्रार कपाळीं प्राण रोधून । समाधि लाविती योगी ॥३१॥
ऐश्या तपाच्या प्रभावें प्राप्त । क्षुद्र सिद्धि जगीं होतात । त्या योगें ज्ञानमार्गज्ञ नराप्रत । त्रिकाल ज्ञान ही लाभते ॥३२॥
दूरचें सहज ऐकत । इच्छेनुसार संचार करित । जळीं स्थळीं आकाशांत । नगरांदींत लीलेनें ॥३३॥
अनहत ध्वनि तो ऐकत । सर्वत्र परम द्युति पसरत । दिव्यजीवनें होय युक्त । ब्रह्मादिकांही चालवी ॥३४॥
एका संपूर्ण कल्पाचा वृत्तान्त । अन्तर्ज्ञानें योगबळें जाणत । ऐसा योगी ब्रह्मलोकांत । जाऊन विविध सुखें भोगी ॥३५॥
परी तें योगबळाचें पुण्य संपत । तेव्हां तोही दीनत्व पावत । आता तिसरें तप सांप्रत । सुयोगद तुज सांगतों ॥३६॥
गुरुमार्गाचें अनुसरण । करितां विविध तपाचें साधन । एकाग्रमय चित्त होऊन । सर्वत्र पाही आत्मरूप ॥३७॥
ज्ञानचक्षूंनी हें पाहत । अनुभव मात्रें शमदम परायण होत । तेणें देहांत तैसा मनांत । संताप उत्पन्न होत भलें ॥३८॥
विषयांची निंदा करित । ऐसा योगी पिशाचासम जडोन्मत्त । सर्वज्ञ आत्मनिष्ठेनें तुष्ट । संचार करी जगामाजी ॥३९॥
नंतर निरोधयोगें करी स्थित । निवृत्तींत आपुलें चित्त । सर्वत्र संरोध करू शकत । निवृत्ति ऐसा साधक ॥४०॥
मी ब्रह्म ऐसें म्हणत । तेथें भय कैसें उरत ? । जग तैसा जगदात्मा न वर्तत । मनोवाणी विहीन ॥४१॥
न तेव्हां स्वयं उत्थान । अथवा नसे परत उत्थान । उभयविध उत्थानांचें वर्जन । निरोधयोगें साधलें ॥४२॥
ऐशापरी शमी दमयुक्त । संतोषें तो योगी वर्तत । सुता नैध्रुवा सतत । त्या संतोषें संताप जन्मे ॥४३॥
देहमनांचा संताप उत्पन्न । होतो नित्य तेंच तप जाण । नंतर निरोधभूमि त्यागून । पंचविध चित्ताचा लय करी ॥४४॥
तेव्हां होतो शांतिपरायण । ब्रह्म स्वयं तो होऊन । विधिनिषेधांनी हीन । योगधर स्वयं तेव्हां ॥४५॥
रसहीन प्रारब्धाच्या अनुभवें फिरत । यदृच्छया या जगांत । जैसी जळें सागरा मिळत । आपुल्याल्या स्वच्छंदें ॥४६॥
भोक्ता भोगादि वर्तत । त्या अंतरीं शरीरीं ताप जन्मत । भोगपरत्व सोडून शांति राखित । तें तिसरें तप श्रेष्ठा ॥४७॥
ऐसें हें योगात्मक तप तुजप्रत । तृतीय ब्रह्म सांगितलें प्रख्यात । त्यासाठीं सुज्ञत्वें प्रयत्नरत । सदैव तूं रहावें ॥४८॥
तपोधन महाभाग तपयुक्त । तत्परायण ब्राह्मण जगांत । होती अन्ती ब्रह्मभूत । ऐसा प्रभाव तिसर्‍या तपाचा ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते असितनैध्रुवसंवादे त्रिविधतपोवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP