खंड ५ - अध्याय १७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्गल सांगती दक्षाप्रत । पूर्वी कश्यप विप्र आराधित । तप करोनीयां भक्तियुक्त । मंत्रध्यान समाधीनें ॥१॥
शिवविष्णूंसी तो प्रार्थित । पुत्ररूपें रहा सदनांत । दहा वर्षें तो तप करित । तेव्हां प्रकटले ते वर देण्या ॥२॥
त्यांच्या अंशे जन्मत । शेष नामक सुत बलवंत । धरित्रीचा भार सहन करित । विष्णुअंशें तो पालक ॥३॥
ब्रह्मदेवाच्या दिनांती । तो ज्वालेनें अवचिती । शंकरांशें जाळी क्षिती । महानाग प्रतापवान ॥४॥
सहस्त्रशीर्षांचा पुरुष ख्यात । शेष मृत्यहीन अनंत । सर्वांचा अंतक अद्भुत । लय होता जगताचा ॥५॥
एकटा तो सुरक्षित । म्हणोनी अवशेष शेष ख्यात । ब्रह्मांडाचें धारण करित । सर्वाधार त्या कारणें ॥६॥
हरिहरात्मक जन्मत । स्वयं शेष तैं ब्रह्मा येत । राज्यकार्यीं अभिषेक करित । परमादरें तयासी ॥७॥
नागांचा ईश्वर होत । सर्वत्र तो शेष संमत । तेव्हां कश्यपा नमून म्हणत । एकदा तो हितवचन ॥८॥
ब्रह्माला मी धारण करित । सर्व समाकुल येथ वर्तत । तदर्थ महायोग्या मजप्रत । शिकवा शिष्य मानूनियां ॥९॥
तेव्हां मुनिश्रेष्ठ त्यास देत । गणेश षडक्षरमंत्र पुनीत । सिद्ध करून विधियुक्त । प्रजानाथा दक्षा तैं ॥१०॥
तदनंतर त्यास प्रणाम करून । तप केलें उत्तम मन लावून । वनांत जाऊन ध्यान करून । जप केला गणेशाचा ॥११॥
निराहार राहून तोषवित । विघ्नेशा तो भक्तिसंयुक्त । विविध स्तोत्रांनी स्तवित । एक सह्स्त्र वर्षें तो ॥१२॥
तैं गणनायक प्रसन्न । त्याच्या जवळीं जात धावून । केवळ अस्थिपंजर त्यास पाहून । द्रवलें चित्त गणेशाचें ॥१३॥
गजाजनासी पाहत। तैं शेष यत्नें वरती उठत । आदरें वंदन करित । हर्षभरानें पूजी तयासी ॥१४॥
हात जोडून स्तवन करित । गणराज त्यास तेव्हां म्हणत । माग तुझें वांछित । देईन मीं शेषा तुला ॥१५॥
तुझ्या तपानें संतुष्ट होऊन । देईन वांछित वरदान । शेष विघ्नेशा नमून । आनंदानें व्र मागे ॥१६॥
ब्रह्मांड धारणाची शक्ति । द्यावी नाथा मजप्रती । तैशी तुझी दृढ भक्ति । भुक्तितमुक्ति प्रदायिनी ॥१७॥
दिशांच्या नाथा बलयुक्त । मृत्युहीन करी मजसी जगांत । यश पसरावें अद्भुत । ऐसा वर मजद्यावा ॥१८॥
तथास्तु म्हणून अंतर्धान । तैं पावले गजानन । शेष प्रमुदित होऊन । स्वस्थानासी नंतर गेला ॥१९॥
तेव्हांपासून शेषनाग होत । धराधार नामें ख्यात । दिक्पालाचें पद लाभत । मान्यता श्रेष्ठ पावला ॥२०॥
नंतर योगबळानें युक्त । नाना मायेंत पारंगत । नाना रूपें धारण करित । शेष शोभे सर्व मंडळीं ॥२१॥
ऐसा बहु काळ जात । हिरण्यकशिपूचें भय तैं वाटत । ऐश्वर्य लौकिक समस्त । नश्वर वाटे शेषासी ॥२२॥
ज्ञानार्थ तो तप आचरित । शमदम परायण राहत । योगभूमिस्थ भावें होत । अंतर्निष्ठ शेषनाग ॥२३॥
क्रमानें सम स्वानंदस्थित । योगबळें शांति पाहत । तेणें त्याचें चित्त होत । प्ररमार्थ परायण ॥२४॥
विष्णूस जाणून तोषवित । वैष्णवमार्गें केशवाप्रत केशवाप्रत । परम भावबळें स्तवित । संतुष्ट तैं होत नारायण ॥२५॥
शेष नागास वर देत । तेव्हां तो तयास सांगत । केशवा वर्शन द्यावें मजप्रत । नित्य राहून मम चित्तीं ॥२६॥
जनर्दन तथास्तु म्हणत । त्याच्या देहीं नित्य वसत । शेषशायी तेणें हर्षभरित । जाहला तो नागराज ॥२७॥
तदनंतर योगबळानें पाहत । मायामोह तो समस्त । सम आनंद द्वद्वंमय लाभत । परी अशांत जाहला ॥२८॥
ऐसा बहु काळ जात । शेष योगमार्गीं रत । समाधी लावून लीन होत । सहज ब्रह्मांत त्या समयीं ॥२९॥
सहज समाधींत जाणत । शांकर मार्ग शैव स्तुत । शिवस्तोत्रांनी स्तवित्र । तोही देवा सदाशिवासी ॥३०॥
शंकर होतां प्रसन्न । उत्तम भक्तीचें करी याचन । सदा व्हावें म्हणे दर्शन । शंकरसंगती लाभावी ॥३१॥
तथास्तु म्हणून शंकर । ठेवी मस्तकीं त्याच्या कर । नित्यदर्शन इच्छि जो उदार । तेणें हर्षला अनंत ॥३२॥
भावबळें शंभुमार्गीं अनुरक्त । सदा वृषभध्वजासी सेवित । नंतर योगबळानें जाणत । सहजपर ऐसा योग ॥३३॥
मोहहीन अवस्था जाणून । तो जाहला शांतिहीन । मनानें शांकर ब्राह्म आठवून । म्हणे हे नव्हे परब्रह्म ॥३४॥
शिवासी करी नमन । महानाग विचारी विनम्रमन । योगशांतिप्रद ऐसें ज्ञान । गणेशयोगा पात्र झाला ॥३५॥
ऐसें जाणून सदाशिव सांगत । गणनाथाचें ज्ञान सर्वहित । म्हणे मानदा जाण उचित । योगशांतिप्रद गणेशासी ॥३६॥
तो असे परिपूर्ण जगांत । सत्यासत्य समान सहजयुक्त । ब्रह्में जेथ लय पावत । संयोगानें महामते ॥३७॥
त्यास स्वसंवेद्ये म्हणती । शांतिप्रद ब्रह्म परम जगतीं । संयोग होतां भक्ताप्रती । स्वसंवेद्यात्मकाचें दर्शन होतें ॥३८॥
त्या गणनाथाचें होतां दर्शन । स्वानंदवासिता लाभते पावन । सर्वसंयोगरूप महान । दोष तेथ महान असे ॥३९॥
म्हणोनि शांतिप्रद पूर्ण न मानित । योगिजन या शास्त्रांत । स्वसंवेद्यविहीन जें ब्रह्म असत । योगमय जें असेल ॥४०॥
तेथ त्याचें सम्यक् दर्शन जगात । व्यतिरेकानें न होत । स्वकीय अभेदें संजात । निवृत्ति तैं जनांची ॥४१॥
तेथ शांति वसत । ती न मुख्य विद्वज्जन मानित । अयोगात्मक रूप दोष असत । तेथ सर्वत्र सर्वदा ॥४२॥
मायाहीन प्रभावें वर्तत । गणनायक सतत । संयोग अयोग योगानें पावत । शांति प्रदायक योग ॥४३॥
ती शांति सर्वमान्य ख्यात । जी असे वेदवादोक्त । संयोग गकारस्थ वर्तत । णकार योगग असे प्रभो ॥४४॥
त्यांचा ईश गणेशान । वेदांत ऐसें असे वचन । विचक्षण हें जाणून । गणेशज्ञान दृढ करावें ॥४५॥
पंचभूमिमय चित्त । तेच बुद्धि भावग सतत । मोह भ्रांतिप्रद त्याच्यांत । तीच सिद्धी बुधसंमत ॥४६॥
त्यांचा स्वामी गणेशान । चिंतामणि जो पावन । चिंत्तप्रकाशक शांतिद महान । साक्षात् लाभे योगसेवेनें ॥४७॥
त्यास भज तूं महानागा पुनीत । तेणें शांतिलाभ तुजप्रत । अन्यथा कोटि वर्षांनीही न लाभत । शांति मानवा या जगीं ॥४८॥
ऐसें सांगून महादेव थांबत । त्यास शेष प्रणास करित । तदनंतर तपोवनात जात । रहस्यज्ञानाच्या आनंदें ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते शेषयोगोपदेशवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP