खंड ५ - अध्याय १३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । पूर्वी दैत्याधिप एक असत । ब्रह्मदेवाचा वर लाभूत होत । क्रूर तो भुवनाधिपति बळी ॥१॥
महिषासुर नामें ख्यात । जिंकिले त्यानें देव समस्त । स्थापिलें दैत्यांस स्वर्गांत । अजिंक्य अवध्य तो जाहाल ॥२॥
त्या दुर्बुद्धीनें धरातल समस्त । कर्मविहीन केलें त्वरित । देवांदिकांसी हविर्भाग न मिळत । उपवास पडे त्या सर्वांसी ॥३॥
तेव्हां देव आणि ऋषि करिती । शक्तींसी प्रसन्न भावभक्ती । तप करूनि आराधिती । सर्वमयी त्या स्वानंदवासिनीस ॥४॥
ऐसीं एक सहस्त्र वर्षें जात । तेव्हां ती त्यांस दर्शन देत । प्रकट होऊन वरदान देत । देवगण तैं सांगती ॥५॥
देवि त्या महिषासुराचें मरण । पुरुषाच्या हस्तें न होय जाण । आम्हीं सर्व पराजित उदासीन । राख आम्हां त्या संकटीं ॥६॥
वरदान देण्या इच्छा मनांत । तरी त्या दैत्याचा नाश करी त्वरित । आम्हीं सारे तुझे सुत । महाभयांतून रक्षण करी ॥७॥
तथास्तु ऐसें बोलून । महादेवी सिंहावरी बसून । क्रोधयुक्त मनीं होऊन । गेली दैत्याचा वध करण्या ॥८॥
ती महामाया मार्गांत । मोहिनीरूप धरी वनांत । गायन सुमधुर तैं गात ते ऐकिलें कोणी असुरानें ॥९॥
तो तेथ जाऊन पहात । महाशक्ती ती शोभिवंत । होऊनियां मोहयुक्त । दैत्याधिपाजवळीं गेला ॥१०॥
जाऊन सांगे तयाप्रत । आज पाहिली मीं नारी अद्‍भुत । ऐंसी न पाहिली ब्रह्मांडांत । रूपतेजें असामान्य ॥११॥
स्त्रीरत्न ती असत । दैत्येश्वरा महिषासुरा तिज त्वरित । पकडून आणावें सांप्रत । राज्यभोग भोगी तिच्यासवें ॥१२॥
त्या दैत्यांचें वचन ऐकत । महा असुर तैं मोहयुक्त । आपुल्या प्रधानासी पाठवित । पकडून आणण्या सुंदरीस ॥१३॥
प्रधान आज्ञेनुसार जात । त्या महामायेसी पाहत । स्वयं मोहित होऊन सांगत । आदरें मोहवर्धिनीस त्या ॥१४॥
देवि ऐकावी विज्ञप्ती । महिषासुर ब्रह्मांडाचा पति । मृत्युहीन सदा यौवनयुक्त जगतीं । मनोहर शोभिवंत ॥१५॥
त्यानें मज पाठविलें तुजप्रतीं । करावया ही विनंती । रूपसुंदरी तूं जगतीं । होई पत्नी महिषासुराची तूं ॥१६॥
ती महाभागा तें वचन ऐकत । तेव्हां ती होत क्रोधयुक्त । त्य मदोन्मत्त दैत्य अमात्याप्रत । म्हणे तेव्हां धैर्यानें ॥१७॥
अरे महादैत्या मी असत । परस्त्रीं हें तूं न जाणत । मूढा काय तूं हें मज सांगत । वधीन मी तुज निश्चित ॥१८॥
जरी पुनरपि ऐसें वदसी । तरी आत्ताच मारीन तुजसी । त्या तिच्या ऐकून वचनासी । प्रधान अत्यंत क्रूद्ध झाला ॥१९॥
दैत्यांसी तो आज्ञा देत । हया सुंदरीस पकडून न्या आदरयुक्त । तेव्हां ते दैत्यगण धावत । तिज पकडण्या लीलेनें ॥२०॥
ऐसा अपमान घडत । तेव्हां देवी क्रोधयुक्त । आपुल्या क्रोधाग्नीनें जाळिस । त्या सर्व दैत्यगणांसी ॥२१॥
तें परम आश्चर्य पाहून । प्रधान करी पलायन । महिषासुराप्रत जाऊन । कथिला वृत्तान्त यशस्विनीचा ॥२२॥
महिषासुर मोहा वेशांत । स्वयं सेनेसह तेथ जात । त्या देवीस पाहता होत । कामबाणें विद्ध तो ॥२३॥
दैत्य पाठवी सचिवांस । त्य सुंदरीस पकडण्यास । परी देवी करी शस्त्रप्रहाराम । सत्वर तेणें नष्ट झालें ॥२४॥
तें पाहून अति कोपयुक्त । स्वतः महिषासुर लढण्या जात । महादैत्या पाहून करित । सज्जा आपुलें धनुष्य देवी ॥२५॥
दारूण बाणांचा प्रवाह । सोडिला दैत्येशांवरी दुःसह । कितेक छिन्नभिन्न होऊन मोह । कितेक पडले मूर्च्छित ॥२६॥
तदनंतर महिषासुर रागवला । युद्धासाठीं सरसावला । नाना शस्त्रास्त्र प्रहाराला । करण्या उत्सुक तो दैत्येंद्र ॥२७॥
ती महाभागाही तेणें लढत । नाना शस्त्रास्त्रें टाकित । परस्परा जिंकण्या वांछित । दक्ष प्रजापते ती दोघें ॥२८॥
ऐसें एक वर्ष युद्ध चाललें । एकदा असुरानें पर्वत टाकिले । त्या पर्वताघातें मूर्च्छित झालें । जगदंबेचें शरीर ॥२९॥
त्या मूर्च्छित स्थितींत । तिज उचलून नेण्य़ वांछित । तो महिषासुर उन्मत्त । तत्क्षणीं देवी सावध होय ॥३०॥
सावध होताच जाणून । सर्व वृत्तान्त तत्क्षण । देवी पावली अन्तर्धान । महाबळा दैत्यासमोरी ॥३१॥
तदनंतर हिमालयाप्रत । गेली ती खेदयुक्त चित्त । मी मनानें क्षणार्धांत । भस्म करीन हें विश्व ॥३२॥
तो महादैत्य स्त्रीच्या हातीं मरेल । ऐसीं भविष्यवाणी अटळ । तथापि त्या असुरा प्रबळ । जय कैसा आज मिळाला ॥३३॥
यश त्यास कैसें लाभलें । माझेंचि कांहीं चुकलें । ऐसा विचार करिता आले । मनांत देवीच्या सत्वर ॥३४॥
मी होऊनिया भ्रान्त । न पूजितां त्यास गेलें संग्रामभूमीप्रत । विघ्नेश्वरानें अवचित । हें विघ्न उपस्थित केलें असें ॥३५॥
अहो मी शक्तिरूप जगांत । माझ्या शक्तीनें सर्व चालत । परी असुरहस्तें मी पराजित । शक्तिहीन आज झालें ॥३६॥
ऐसें हें कौतुक उत्तम । दावी तो देव सुरोत्तम । माझी शक्ति अशक्ती वा अनुपम । पराधीन सत्य असे ॥३७॥
विघ्नराजाची जी सत्ता । तीच खरी शक्तियुता । भ्रांति उपजवी मम चित्ता । यांत संशय कांहीं नसे ॥३८॥
जेव्हां गणेश्वर तुष्ट होत । तेव्हां जीव महेश्वर शक्तियुक्त । अन्यथा सारे शक्तिविरहित । गणेशाची ही माया ॥३९॥
ऐसा मानसीं विचार करित । अति संतप्त चित्तांत । सर्व सोडून तप करित । निराहार राहूनियां ॥४०॥
जगदंबिका विंध्याचली वर्तत । विघ्नराजास मनीं ध्यात । जप करी मंत्र उत्तम सतत । एकाक्षर मंत्र जो महान ॥४१॥
एम सहस्त्र वर्षें तप करित । एकाक्षर मंत्र जपे सतत । त्या उग्र तपानें संतोष पावत । विघ्नेश तिजवरी प्रसन्न ॥४२॥
अस्थि चर्म अवशेष राहत । ऐसें तिचें रूप पाहत । तेव्हां मानसीं विस्मित । करुणानिधि गजानन ॥४३॥
विघ्नेश त्या शक्तीस जागवित । म्हणे पहा मी प्रकटलों पुढयांत । ज्याचें ध्यान करिसी सतत । एकनिष्ठ भक्तीनें ॥४४॥
तुझ्या भक्तीनें मी नियंत्रित । वर देण्या आलों तुजप्रत । तुझ्या भक्तीनें तपें तुष्ट । तुझ्या आधीन निःसंदेह ॥४५॥
वरदाता मी प्रकटलों पुढयांत । अता उघडी नयन त्वरित । त्याचें तें वचन ऐकत । सावध झाली जगदंबा ॥४६॥
जेव्हां ती नयनकमल उघडित । तैं गणराजा समोर पाहत । उठोनियां प्रणास करित । भक्तिभावें पूजितसे ॥४७॥
सर्वसिद्धिप्रदात्यासी नमित । कर जोडूनियां स्ववित । विघ्नेशा तुज मी वंदित । भक्तांचीं विघ्नें दूर करिसी ॥४८॥
अभक्तांसी तूं विघ्न करिसी । समस्त जगासी पाळिसी । गणांचा ईश तूं अससी । गुणरूप परमात्मा ॥४९॥
सर्वत्र संस्थितासी अमेयशक्तीसी । अमेय माया प्रचालकासी । मायाहीन स्वरूपासी । मायिकां मोहदात्या नमन ॥५०॥
ब्रह्मांसी ब्रह्मदात्यासी । ब्रह्मणस्पते ब्रह्मरूपा तुजसी । हेरंबासी कर्मधारकासी । कर्मफलदात्या तुज ममन ॥५१॥
कर्मयोगस्वरूपासी । परेशासी ज्ञानविहीनासी । ज्ञानयोग्यासी ज्ञानरूपासी । ज्ञानधाराका तुज नमन ॥५२॥
समासी स्वरूपासी । समरूपा साम्यदासी । आनंदकंदासी रूपहीनासी । सहजासी नमन असो ॥५३॥
सहजात्म्यासी सहजयोगासी । निर्मोहासी स्वानंदासी । स्वानंदमूर्तीसी देवेशासी । मायायुक्ता तुज नमन ॥५४॥
सर्वाधीशासी अयोगासी । सदा ब्रह्मनिवृत्ति धारकासी । असंप्रज्ञात भावासी । लंबोदरा तुज नमन असो ॥५५॥
शांतिरूपासी योगासी । योग्यासी योगदासी । चित्तभूमिविहीनासी । चिंतामणे तुज नमन ॥५६॥
अपराध माझा क्षमा करी । माझा भ्रम तूं सत्वर हरी । तुज न पूजितां गेलें संगरीं । लढावया महिषासवें ॥५७॥
आता वर देई मजप्रत । तुझ्या पादकमळीं भक्ति प्रतिष्ठित । होवो जेणें मोद मनांत । सदैव माझ्या रहावा ॥५८॥
महिषासुराचा वध करण्याशी । शक्ति देई देवा मजसी । देवदेवेशा परमेश्वरा तुजसी । शरण तुज मी मनोभावें ॥५९॥
ऐसी स्तुति ती करित । भक्तिभावें रस प्रकटत । त्यायोगें ती आनंदें नाचत । डोळयांतून वाहती आनंदाश्रू ॥६०॥
लंबोदर तिज तैसी पाहत । म्हणे देवी ऐक सुहित । तूं जें जें मागितलें मजप्रत । तें तें सर्व सफल होय ॥६१॥
तूं केलेलें हें स्तोत्र उत्तम । भक्तिरसप्रद पुरवील काम । अपराध क्षमा करून अभिराम । भुक्तिमुक्ति देईन मी ॥६२॥
या स्तोत्रानें मीं प्रसन्न । देईन सर्व इष्ट वरदान । ऐसें बोलून अंतर्धान । ब्रह्मनायक गणेश तैं ॥६३॥
खिन्न होऊन मनांत । शक्ति तेथेंच राहत । ध्यान करी अविरत । ब्रह्मणस्पती गजाननाचें ॥६४॥
वेदपारंगत ब्राह्मण बोलावून । मूर्ति त्याची करी स्थापन । विधिपूर्वक ती पूजून । नंतर गेली युद्धासी ॥६५॥
तेव्हांपासून तें स्थान । गणराजाचें ख्यात होऊन । सर्व सिद्धिप्रद हें महिमान । प्रसिद्ध झालें जगांत ॥६६॥
यात्रा तेथ प्रति संवत्सर । भरूं लागली अपार । तेथ मृत्यु येता नर । ब्रह्मभूयपदा जाती ॥६७॥
विघ्नेश्वरासी तें स्थान । जाहलें प्रिय मनोरम । महिषासुरा वरदानें करून । देवीनें तैं मारिलें ॥६८॥
घोर युद्ध ती करित । जगाच्या रक्षणा उद्युक्त । जय मिळवून पुनरपि जात । विघ्नेशक्षेत्रीं ती देवी ॥६९॥
तेथ महाभक्तीनें भजत । गणनायकासी सतत । ऐसें हें लंबोदराचें चरित । ऐकता वाचतां फलप्रद ॥७०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते शक्तिवरप्रदांन नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP