खंड ५ - अध्याय २३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्गल म्हणती दक्षाप्रत । महाभागा ऐक सांप्रत । गणपतीचें रूप अदभुत । ज्यानें होईल गाणपत्य ॥१॥
जो नर गणेशभक्तिमार्गांत । गणेशास तोषवावया इच्छित । त्यानें व्हावें दीक्षायुक्त । गाणपत्यमार्गीं विधीनुसार ॥२॥
गाणपत्य जो वेदपारंगत । ऐसा गुरु जो शांतियुक्त । त्यास वंदून म्हणावें विनीत । दीक्षा द्यावी महाप्रभो ॥३॥
तूंच गणराज मजप्रत । गाणपत्य परायण पुनीत । मज सुशीलयुक्ता जगांत । करावें गाणपत्य आपुल्यासम ॥४॥
ऐसें जो शिष्य विचारित । शीलवंत जो विनीत । श्रौतस्मार्त क्रियायुक्त । गणेशभावीं लालस ॥५॥
त्यास प्रथम शिकवावे । गणेंशपंथाचे परमघर्म बरवे । ते ती तुज सांगतों ऐकावे । सर्वसुखदायक जे ॥६॥
दुसर्यांचे घरीं न जेवावें । रजस्वला स्त्रीसी न पहावें । परस्त्रीगमन न करावें । कोठेही कदापि मनानेही ॥७॥
स्वार्थासाठी क्रोध न करावा । लोभ मानसीं न धरावा । अभक्ष्य भक्षणाचा नसावा । छंद कधी गणेशभक्तासी ॥८॥
गुरुद्रोह नसावा न निष्ठुरता । ज्येष्ठांच्या अपमानीं नसावी आसक्ति चित्ता । वेदशास्त्रविहितमार्गीं हीनता । कदापिही न आचरावी ॥९॥
इहलोकीं वा परलोकांत । असावें ब्रह्मपरायण विरक्त । ऐसे विविध नियम उपदेशून साधकाप्रत । नंतर मंत्र सांगावा ॥१०॥
प्रारंभी कृच्छ्रादिक द्यावें । नंतर गाणपत्यांस विचारावें । सुदिनीं सुमुहूर्त पहावे । तेव्हाच द्यावा दीक्षामंत्र ॥११॥
किंवा गणराजाच्या उत्सवदिनीं । शुक्लकृष्ण चतुर्थी पाहोनी । गणेशाची प्रियवेळ अवलोकूनी । गुरूने शिष्यास मंत्र द्यावा ॥१२॥
भक्तिपूर्वक आदरें मंत्र द्यावा । तेथ दक्षा सुखदविधि बरवा । तो मी वर्णितों आघवा । ऐक आता आदरें ॥१३॥
पवित्र जागीं मंडप घालून । भूमी गोमयाने सारवून । मातीची चौकोनी वेदी करून । त्यात स्थापावे पवित्र घट ॥१४॥
प्रथम गणेशयंत्र काढावें । कुंकुमानें त्यास आराधावें । अष्ट गणेशांसी पूजावें । विधिपूर्वक त्या वेळीं ॥१५॥
दीक्षायुक्त जे गणेशव्रतधर । त्यांसी पूजावे होऊन विनम्र । त्यांस द्यावें भूषण वस्त्र । शाठयभाव सोडून ॥१६॥
त्यांच्याकडून गणेशमंत्राचा । जप करवावा पुरश्चरणाचा । लाख दशसहस्त्र वा हजारांचा । त्याचा दशांश अर्पण होमांत ॥१७॥
नंतर करावें बलिप्रदान । पूर्णाहुती आदरें देऊन । विघ्नेशासी पुनरपि पूजून । गुरुस प्रणाम करावा ॥१८॥
मनोभावें करावी प्रार्थना । प्रभो माझी पुरवी कामना । रक्षावें मज दीना । गाणपत्य मंत्र द्यावा ॥१९॥
पुनरपि गुरूसी पूजून । करावें कलशाचें पूजत । इष्टदेवाची स्थापना करून । गणेशमंत्रानें त्या वेळीं ॥२०॥
नंतर विघ्नेश्वराचें करून ध्यान । स्वल्प मार्गें पूजून । तदनंतर करुन वस्त्राच्छादन । मस्तकावरून शिष्यानें ॥२१॥
गुरूस प्रणाम करून । प्रार्थावे मंत्र म्हणा म्हणून । द्विजोत्तमा संसार जावा तरून । म्हणोनि मजला मंत्र द्यावा ॥२२॥
ऐसें शिष्य प्रार्थित । तैं महर्षि गुरु त्यास शिकवत । गणेशास मनीं ध्यात । मंत्र देण्यास शिष्यातें ॥२३॥
तदनंतर त्या कलशांतून । पूर्वदिशेचा क्राम ठेऊन । अभिमंत्रित जल घेऊन । गुरुनें अभिषेक करावा ॥२४॥
अष्टोत्तरशत जप करावा । तदनंतर स्नानविधि उरकावा । प्रत्येक कलश जाणावा । अपूर्व सिद्धिप्रदायक ॥२५॥
ऐसा शिष्य होत स्नात । त्यास घेऊन करावा प्रणिपात । शिष्यहस्ते पूजन विधिवत । करवून त्यास निरोप द्यावा ॥२६॥
तदनंतर गाणपत्यासी नमन । करावें त्या शिष्यानें एकमन । त्यांना दक्षिणा देऊन । भूयसी भक्तिपूर्वक ॥२७॥
शाठय न धरता मानसांत । भोजन द्यावें तयांसी पुनीत । मोदक लाडू पायस मनसोक्त । वाढावें त्या ब्राह्मणांना ॥२८॥
बारीक तांदुळांचें ओदन । नाना परींची पक्वान्नें मिष्टान्न । यथेष्ट त्यांना वाढून । पुनः पुनः प्रणास करावा ॥२९॥
त्यांना प्रार्थना करावी । भवार्णवी तरण्या मदत द्यावी । गुरुस दक्षिणा द्यावी । ग्रुरुवंशास नमावें सदा ॥३०॥
गाणपत्यांस भेटून । तयांसी करावे नमन । गाणपत्य भेटता वंदन । न करी तो अपराधी ॥३१॥
गाणपत्यांच्या अनादर । तेणें कोपे साक्षातू विघ्नेश्वर । यांत संशय नसे खरोखर । ऐसा दीक्षाविधि जाणावा ॥३२॥
त्यानंतर पूजावे गणेशास । पुरश्चरणयुक्त विशेष । आता सांगतों धर्मास । गाणपत्यांनी जे पाळावे ॥३३॥
दंतमंजन न करतां देवळांत । गणेशाच्या जो जात । तैसेंचि मैथुनानंतर मंदिरांत । जाता भ्रष्ट होतसे ॥३४॥
अशुद्ध वस्त्र घालून । विघ्नराजाचें करतां पूजन । परक्यांचें वस्त्र नेसून । गणाधिपा पूजितां दोष असे ॥३५॥
छिद्रयुक्त वस्त्र परिधान । करून न करावें पूजन । यथाविधि धरून मौन । गणेश्वरासी पूजावें ॥३६॥
गणेशपूजन करित । त्यासमयीं जरी बोलत । तरी अंतराय पूजेंत होत । विघ्नयुक्त नर होई ॥३७॥
स्नान न करितां अभ्यंगसंयुक्त । देवालयांत प्रवेश करित । तरी तो भ्रष्ट होय भक्त । आणखीही नियम असत ॥३८॥
पादत्राण घालून जात । परी पाय न प्रक्षालित । तैसाच गणेशमंदिरात । प्रवेश करितां विघ्न येई ॥३९॥
गंधानें चर्चित शरीर असत । परी गणनायका न पूजित । तैसाच देवालयीं जात । तरी भ्रष्ट होय तो नर ॥४०॥
अजीर्णांदि दोषयुक्त जो देवासमीप बैसत । ढेकर देतां पूजेंत । विघ्नयुक्त नर होय ॥४१॥
भेरी नगारा न वाजवित । तैसाच गणेशमंदिरीं प्रवेशत । तो भ्रष्ट जगीं होत । देवगृहय प्रभंजक हो ॥४२॥
देवालयात जाऊन । जो बोले असत्य वचन । अथवा न करी देवस्तवन । तोही भ्रष्ट जाणावा ॥४३॥
नित्य प्रजानाथ तेथ संयत । देवाच्या सन्निध राहत । मर्यादांचें पालन करित । तरीच ईप्सित लाभेल ॥४४॥
यथाशास्त्र विचारें भजत । सर्वसिद्धिद गणेशाप्रत । तो गाणपत्य स्वयं होत । गणेस साक्षात् या जगी ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गाणपत्यदीक्षावर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP