खंड ५ - अध्याय २१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । मायाकर असुरासी जैं पाहत । तैं गणनायक तुष्ट होत । मूषकवाहन युद्धा गेला ॥१॥
चार आयेधें करांत । त्याच्या होतीं विलसत । विघ्नेश्वरा त्या पाहून देत । मायाकर आजा असुरांसी ॥२॥
देवांचें करावें हनन । ते करिती आज्ञा पालन । दैत्यगण त्वेषयुक्त होऊन । वर्षू लागले शस्त्रास्त्रधारा ॥३॥
घनघोर वृष्टि मेघ करिती । तैसे ते दुर्धरशस्त्रे फेकिती । जयेच्छा प्रबल त्यांच्या चित्तीं । रक्ताच्या नद्या वाहती तैं ॥४॥
एकमेका संमुख ठाकती । प्रहार मर्मभेदक करिती । कधीं देव दैत्यांसी जिंकिती । कधी दैत्य देवांसी ॥५॥
रात्रीही विश्रांती न घेतीं । ऐसें सात दिवस ते लढती । शस्त्रास्त्रांत कोविद असती । हाहाकार घोर चालला ॥६॥
त्या युद्धधुमाळींत । देव जाहले भयभीत । ते पळूं लागले संभ्रान्त । शंकर तैं पातले रणांगणीं ॥७॥
विष्णुमुख्य देवही येती । सारेच क्रोधानें लढती । त्यांच्या शस्त्रप्रहारें मरती । अनेक दैत्य त्या वेळीं ॥८॥
तेव्हां असुर भयभीत । दशदिशांत पळून जात । अनेक दैत्यराज पडत । मूर्च्छित होऊन भूमीवरी ॥९॥
तें पाहून सिंहगर्जना करित । मायाकर आला तेथ क्षणांत । शस्त्रांचा वर्षाव अविरत । करूं लागला रागावून ॥१०॥
त्या शस्त्रवृष्टीनें ताडित । देव पडले रणांगणांत । प्रजापते शंकरावर सोडित । अग्न्यस्त्र तैं तो महादैत्य ॥११॥
त्या अस्त्रानें पाडवित । शंकरासी तो क्षणांत । दाहभयें पळून जात । अन्य देवही दशदिशांनी ॥१२॥
ऐसें त्याचें बळ पाहत । तैं मूषकग संतुष्ट होत । आनंदून स्वतः जात । रणभूमीवर महाबळी ॥१३॥
मूषकावरी तो आरूढ असत । त्यास पाहून दैत्य म्हणत । हास्य करून तो क्रोधयुक्त । मद्यपापरी वचन तेव्हां ॥१४॥
अरे विघ्नेशा लढण्यास । माझ्यासवें कां आलास । एका बाणानें जीवितास । मुकशील माझ्या निश्चित तूं ॥१५॥
तुझ्या समवेत मारीन । देव मुनीही मी भयहीन । चतुःपदार्थ रूप जग सारें म्हणून । त्यापासून मरण न मला ॥१६॥
माझें काय तूं अहित । करशील देवरक्षका सांग सांप्रत । ब्रह्मांड सारें ज्याच्या अंकित । त्या मजसवें काय लढसी ॥१७॥
तूं बालक बालभावें हें साहस । करूं नको जा स्वनगरास । जरी मज करशील नमस्कारास । तरी तुजसी न मारीन ॥१८॥
तूं बालक अज्ञानयुक्त्त । तुज ज्यांनी प्रेरिलें असत । त्यांसी मी मारीन निश्चित । ऐसें जाण मूषकगा ॥१९॥
तुझें नाव मूषकवाहन । उंदरासम तूं तुच्छ उन्मन । मूर्खापरी न जाणसी महान । सर्वभयदायक रूप माझें ॥२०॥
ऐसी मायाकराची दर्पोक्ती । ऐकून बोले गणपति । मूषकवाहन निर्भय चित्तीं । हितकारक त्या वेळीं ॥२१॥
दैत्येंद्रा काय मज सांगसी । मी बाळ नसे हें विसरसी । असुराधमा स्वानंदवासी । मी असे रे विघ्नेश्वर ॥२२॥
तुज वधण्या रूपयुक्त । आता तूज मारीन निश्चित । मी चार अवस्थांविरहित । मज नसे जगीं भीति ॥२३॥
दैत्यनायका पाहे सांप्रत । मज बालाचें बळ अद्‍भुत । ऐसें बोलून सोडित । कमल आपुल्या हातांतलें ॥२४॥
बिंदु ब्रह्ममय ज्योतियुक्त । तें कमळ असुराचा ठाव घेत । तें पाहून अति ज्वलंत । पकडिलें मायाकरासुरानें ॥२५॥
तें पकडण्या तो प्रयत्न करित । परी न ये त्याच्या करांत । परी कंठावरी तें पडत । मारिलें क्षणीं दैत्यनायका ॥२६॥
तया दैत्या ठार करून । कमल आले परतून गमन । गणराजाच्या करीं प्रसन्न । विलसलें तें तें महा अस्त्रा ॥२७॥
त्या वेळीं असुर समस्त । जाहले अत्यंत विस्मित । अहो मायाकरराजा अजित । कैसा पडला मृत्युमुखी ॥२८॥
त्याचें शरीर जैसें होतें । तैसेंचि अद्यापि दिसतें । तेज अद्‍भुत अवतरले होतें । शस्त्राघाताविण त्यानें मारिलें ॥२९॥
हा दैत्य नायक होता गर्वयुक्त । अजिंक्य आपणा मानित । परी आहे पडला मृत । रणांगणीं हा प्रत्यक्ष ॥३०॥
दैत्यगण सर्वही भयभीत । तत्क्षणीं प्रवेशती पाताळांत । देव जयजयकार करित । हर्षोत्साहें त्या समयीं ॥३१॥
मूषकग देवासी नमिती । मुनि तत्त्ववेत्ते पूजिती । देवेशही स्तुति करिती । जोडोनियां दोन्ही कर ॥३२॥
सर्वाच्या भोगभोक्त्यासी । मूषकवाहनासी गणेशासी । सर्व देवादिदेवासी । लंबोदरासी नमन असो ॥३३॥
विघ्ननायकासी परात्म्यासी । भक्तविघ्नहारकासी । अभक्तांसी विघ्नकर्त्यासी । हेरंबा तुज नमन असो ॥३४॥
भक्तवत्सलासी स्वानंदवासीसी । परेशासी महोदरासी । परमपूज्यासी सर्वादिपूज्यकासी । सर्वस्वरूपा तुज नमन ॥३५॥
वक्रतुंडासी त्रिनेत्रासी । चतुर्हस्त कमलधरासी । मूषकवाहनासी ज्येष्ठराजासी । अमेयासी नमन असो ॥३६॥
गणाध्यक्षासी शूर्पकर्णधरासी । सर्वेशासी ब्रह्मरूपासी । अनादीसी नानारूपध रासी । अंतीं तादृशरूपा नमन ॥३७॥
त्रिस्वरूपासीं शेषपुत्रासी । शैवासी पाराशर्यासी । सर्वांच्या मातापित्यासी । ब्रह्मेशा तुज नमन असो ॥३८॥
स्त्रष्टयासी पालनकर्त्यासी । संहर्त्यासी गणेशासी । शांतिरूपासी शांतिप्रदासी । अपार गुणधारा नमन ॥३९॥
योग्य़ांच्या ह्रदयांत । जो सदैव संस्थित । त्याचें स्तवन करण्या सांप्रत । बळ कोठलें आमुचें ? ॥४०॥
तरी गणाधीशा होई प्रसन्न । मान्य करी आमुचें स्तवन । ऐसें तयासी विनवून । सुरर्षि प्रणाम करिती तैं ॥४१॥
प्रसन्नमनें मूषकवाहन । तयांसी म्हणे सुखद वचन । माझे केलें जें स्तवन । तुम्हीं तें प्रिय मज झालें ॥४२॥
हें सर्वप्रद होईल । जें जें मनीं आणाल । तें तें पुरवीन मी प्रेमळु । भक्तितुष्ट सर्वदा ॥४३॥
वाचका श्रोत्यांसी देईन । स्तोत्रवाचनें इच्छित प्रसन्न । तेव्हा देवर्षि वदती वंदून । गणाधीज्ञा धन्य आम्हीं ॥४४॥
मायाकरसुराचा नाश केला । तेणें आम्हां मोद झाला । त्याहून अन्य वर आम्हांला । कोणता प्रिय असणार ॥४५॥
परी वर देण्या इच्छिसी । तरी तुझी दृढ भक्ति दे आम्हांसी । शांतिप्रद जी सर्वांसी । कृतकृत्य जगीं करील ॥४६॥
तथास्तु ऐसें म्हणोन । गणेश पावला अन्तर्धान । देव सारे विरहखिन्न । परतले स्वस्थाना तदनंतर ॥४७॥
मुनीं स्वाश्रमीं जात । महा हर्षसमन्वित । पूर्ववत्‍ सारे कर्मे करीत । यज्ञयागादि ऋषिमुनि ॥४८॥
सर्व प्राणी स्वकर्मे करिती । शेष पडला धरणीवरतीं । संमूर्च्छित तैं त्याच्या चित्तीं । प्रकटति देव गणेशान ॥४९॥
त्या महानागास आदेश देती । स्थापन करि माझी मूर्ति । तिची पूजा करीत जगतीं । घालवी आपला काळ तूं ॥५०॥
पाताळांत होईल प्रख्यात । तूं स्थापिलेलें क्षेत्र नुपीत । माझी पूजा करशील सतत । तेथ त्यांसी सर्वद मी ॥५१॥
ऐसा दृष्टान्त देऊन । पावला गणेश अन्तर्धान । ब्रह्मनायक तो महान । शेष जागा जाहला ॥५२॥
स्वप्न सारें त्यास स्मरत । स्वगृहीं तो परतून जात । आदेशानुसार स्थापित । शतयोजन विस्तीर्ण क्षेत्र ॥५३॥
गणेशक्षेत्र तें सिद्धिप्रद । पाताळांत प्रसिद्ध । स्वानंदनामें मोदद । वैशिष्टययुक्त तें स्थान ॥५४॥
तेथ करितां पूजन । मानवा लाभतें इच्छित धन । अन्य सर्वही लाभून । संतोष सर्वं लाभतसे ॥५५॥
अनुष्ठानविधानें पूजिती । तें ब्रह्मस्वरूप होती । ऐसें हें मूषकगाचे जगतीं । पावन दक्ष कथानक ॥५६॥
हें भुक्तिमुक्तिप्रद असत । श्रवणें पठनें नरांप्रत । जगांत ब्रह्मांत स्थित । चोरासम हा गणनायक ॥५७॥
तो सर्वांच्या ह्रदयीं वसत । भोग सारे तो भोगित । मूषकध्वज तेणें ख्यात । भक्तांसी सदा तारक असे ॥५८॥
भक्त जेव्हां स्मरण करिती । तेव्हां हा हरण करी जगतीं । पुण्यपापभव मल निश्चिती । ब्रह्ममय करी त्यांना ॥५९॥
ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी दिनीं । महोत्सव प्रवर्तिनी । अंगारकी तिथि शोभनी । मध्य सूर्य वतें जेव्हां ॥६०॥
विविध चौर्यांचा वाहक असत । राजवाह म्हणोनि ख्यात । मूषकग लंबोदर कृपावंत । प्रजापते महाभागा ॥६१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौदूगले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते मूषकगावतार चरितं नाम एकविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्री गजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP